Tuesday, August 15, 2017

आत्महत्याग्रस्त शेतकरी व्यंकटी हाळे यांच्या 
कुटुंबियांना पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते
एक लाख रुपयांची मदत सुपुर्द
नांदेड दि. 15 :- आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी शासन खंबीरपणे उभे असून समाजानेही त्यांना आधार देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.  
 लोहा तालुक्यातील बामणी येथील व्यंकटी हाळे या शेतकऱ्याने परिस्थितीमुळे असहाय्य झाल्याने आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून एक लाख रुपयाची मदत देण्यात आली. पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते 30 हजार रुपयाचा धनादेश त्यांच्या पत्नी जनाबाई व्यंकटी हाळे यांना त्यांच्या घरी जाऊन देण्यात आला. तर उर्वरीत 70 हजार रुपये पोस्ट कार्यालयात एमआयएस योजनेत बचत करण्यात आली. याप्रसंगी त्यांचे कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी आमदार हेमंत पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, लोहा तहसिलदार डॉ. अशिषकुमार बिरादार, सरपंच, नागरीक उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. खोतकर यांनी हाळे कुटुंबियांची आस्थेवाईक विचारपूस केली. शेतकऱ्यांनी त्रस्त होऊन आत्महत्या करु नये. या परिस्थितीत शेतकऱ्यांचे मनौधैर्य कायम ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे आहे. शासनाच्या विविध योजनेतून  हाळे कुटुंबियांना उभे करण्यासाठी आवश्यक ती मदत जिल्हा प्रशासनाने त्वरीत करावी. मुलांचे शिक्षण, वसतिगृह प्रवेशासाठी जिल्हा परिषदेकडून मदत करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर गावातील नागरिकांशी पालकमंत्री श्री. खोतकर यांनी चर्चा केली. शेतकऱ्यांनी कोणती चिंता करु नये. शासनाकडून शेतकऱ्यांना सर्व सहकार्य राहील, असे सांगितले.  
हाळे कुटुंबियांना केलेल्या मदतीबद्दल गावातील नागरिकांनी पालकमंत्री अर्जुन खोतकर यांचे आभार मानले व शासन आमच्या सोबत असल्याचे सांगितले.
000000


No comments:

Post a Comment

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...