Monday, December 11, 2017

किनवट नगरपरिषद क्षेत्रात
मतदानासाठी बुधवारी सुट्टी
नांदेड , दि. 11 :- राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगरपरिषद किनवट सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी बुधवार 13 डिसेंबर 2017 रोजी संबंधीत क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
किनवट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2017 साठी बुधवार 13 डिसेंबर रोजी मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी शासनाने जाहीर केली आहे. ही सुट्टी निवडणूक क्षेत्रातील मतदारासंघातील जे मतदार उपरोक्त नमूद कार्यक्षेत्राच्या बाहेर कामासाठी असतील त्यांना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील. तसेच केंद्र शासनाचे शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना सुट्टी लागू राहील, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी पत्रात नमुद केले आहे.

00000
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार
अर्ज करण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
नांदेड, दि. 11राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले असून आता अर्ज करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. यापुर्वी या पुरस्कारासाठी 9 डिसेंबर 2017 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते आता या पुरस्कारासाठी 15 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. सदर अर्जासोबत 100 प्रमाणपत्राची मर्यादा रद्द करुन अर्जदाराने अर्जासोबत सादर केलेल्या सर्व ॲटॅचमेंट अपलोड करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
अर्जदारांनी विहीत नमुन्यात अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करून त्याची एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात दि. 16 डिसेंबर 2017 पूर्वी सादर करण्याचे आवाहन प्रसिद्धी पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रतिवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित असून राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, साहस उपक्रम, दिव्यांग खेळाडूंसह संघटक/ कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक व संघटक/ कार्यकर्ती यांच्यासाठी जिजामाता क्रीडा पुरस्कार तसेच ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरिता शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
सन 2014-15, 2015-16 व सन 2016-17 या वर्षासाठी मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य संघटनेमार्फत त्या त्या आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय स्तरावरील कनिष्ठ व वरिष्ठ गटातील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू, साहसी उपक्रम दिव्यांग खेळाडूंसह संघटक/ कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक व संघटक/ कार्यकर्ती यांच्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित राज्य संघटनेच्या कार्यकारिणीच्या ठरावासह दि. 15 डिसेंबर 2017 पर्यंत अर्जदाराने आपल्या कामगिरीचा तपशील देऊन विहित नमुन्यात अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावा. तसेच ऑनलाईन अर्जाची एक प्रत अर्जदाराने संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात 16 डिसेंबर 2017 पूर्वी स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रांसह सादर करावी. असे आवाहन क्रिडा प्र.आयुक्त श्री.नरेंद्र सोपल यांनी केले आहे.

00000
ग्रामपंचायत क्षेत्रात मतदानासाठी
26 डिसेंबर रोजी स्थानिक सुट्टी
नांदेड , दि. 11 :- राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील नागापूर, धर्माबाद तालुक्यातील येलापूर, मुदखेड तालुक्यातील वर्दडातांडा, हिमायतनगर तालुक्यातील वाईतांडा या ग्रामपंचायत क्षेत्रात सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान होणार आहे. त्या ठिकाणच्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी त्या मर्यादीत क्षेत्रापुरती मंगळवार 26 डिसेंबर 2017 रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांनी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी ते फेब्रुवारी 2018 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापीत ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार या क्षेत्रात सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, असे अधिसुचनेत नमुद केले आहे.

000000
माळेगाव यात्रेतील पशुप्रदर्शनासाठी    
जनावरांच्या नोंदणीचे आवाहन  
नांदेड , दि. 11 :-  माळेगाव येथील खंडोबा यात्रेत पशुसंवर्धन विभागाच्यावतीने 16 ते 20 डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पशुप्रदर्शनात भाग घेण्यासाठी प्रत्येक पशुपालकाने आपल्या जनावरांची नोंदणी करणे आवश्यक आहे,  असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी केले आहे.
शनिवार 16 डिसेंबर रोजी पशुसंवर्धन विषयक प्रदर्शनी स्टॉलचे उद्घाटन होणार आहे. रविवार 17 डिसेंबर रोजी भव्य पशु, अश्व, श्वान व कुक्कुट प्रदर्शन तर मंगळवार 19 डिसेंबर रोजी बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पशुप्रदर्शनासाठी पुढील प्रमाणे मार्गदर्शक सुचना पशुपालकांसाठी देण्यात येत आहेत.  पशुपालकासाठी जनावरांची नोंदणीची वेळ सकाळी 8 ते दुपारी 12 अशी राहील. नोंदणी शिवाय रिंगममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. निवड समितीचा निकाल अंतीम राहील. बक्षीस पात्र पशुपालकांना बक्षीसासोबत प्रशस्तीपत्र दिले जाईल. प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीसे दिले जातील. पशुपालकांनी येतांना बॅंक पासबुक व आधार कार्डची झेरॉक्स प्रत सोबत अणावी असेही जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी निवेदनात म्हटले आहे.

000000
 श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेतील भाविकांच्या सुविधेसाठी
समन्वयाने काम करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
नांदेड , दि. 11 :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेतील येणाऱ्या भाविकांना विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधीत यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले. श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेच्या पूर्वतयारीची जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार या होत्या.  
यावेळी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती श्रीमती शिला निखाते, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नईम कुरेशी, महावितरणचे अधीक्षक अभियंता रा. रा. कांबळे, लोहा तहसीलदार डॉ. आशिषकुमार बिरादार , जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मनरेगा) श्रीमती कल्पना क्षीरसागर, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. शिंगने तसेच सर्व तालुक्याचे गटविकास अधिकारी, ग्रामसेवक तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
श्री. पाटील म्हणाले की,  श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा दक्षिण भारतातील महत्त्वाची यात्रा आहे. त्यामुळे या यात्रेद्वारे पशू-प्राण्यांचे प्रदर्शन आणि त्यांच्या जाती-प्रजातींचे जतन करण्याचे काम करण्यात येत असते. या सर्व घटकांचा विचार करून यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः आरोग्य सुविधा आणि स्वच्छतेविषयी दक्ष रहावे. कचरा उचलणे आणि विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश श्री. पाटील यांनी दिले. तसेच आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी वीज व्यवस्था, अग्निशमनदलाच्या वाहनांची व्यवस्था आणि पोलीस बंदोबस्ताबाबतची माहिती श्री. पाटील यांनी यावेळी घेतली.
श्रीक्षेत्र माळेगाव येथे शंभर हेक्टरवर ही यात्रा 16 ते 20 डिसेंबर 2017 या पाच दिवसाच्या कालावधीत भरविण्यात येत आहे. शनिवार 16 डिसेंबर रोजी देवस्वारी पुजन, पालखी पुजन, भव्य कृषि प्रदर्शन, विविध स्टॉलचे उद्घाटन व कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कार. रविवार 17 डिसेंबर रोजी पशु, अश्व, श्वान व कुक्कुट प्रदर्शन. सोमवार 18 डिसेंबर रोजी कुस्त्यांची दंगल, मंगळवार 19 डिसेंबर रोजी लावणी महोत्सव तर बुधवार 20 डिसेंबर रोजी पारंपारीक लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रेत आरोग्य विभागाकडून 24 तास वैद्यकीय पथकांची नियुक्ती तसेच पुरेसा औषधसाठा, रुग्णवाहिका उपलब्ध राहतील अशी माहिती देण्यात आली.  बैठकीत पाणी पुरवठा, पोलीस बंदोबस्त, पशुसंवर्धन, कृषि, बांधकाम, शिक्षण आरोग्य आदी विभागांच्या जबाबदाऱ्या व सहभागाबाबत पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. पशू प्रदर्शन यावर्षीही भव्य आणि सुनियोजितपणे होईल असे सांगण्यात आले.
बैठकीच्या सुरुवातीला यात्रा समितीचे सचिव श्री. कोंडेकर यांनी प्रास्ताविक केले. बैठकीत माळेगाव ग्रामपंचायतीच्या सदस्यांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य तसेच लोहा पंचायत समितीचे सभापती संतोष पाटील-उमरेकर, जिल्हा परिषद सदस्य रंगनाथ गुरुजी भुजबळ आदींनी चर्चेत भाग घेतला व सूचना केल्या.

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेच्या पुर्वतयारीचीही बैठक पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली होती. पालकमंत्री श्री. खोतकर बैठकीसाठी नांदेडकडे निघाले असता त्यांचे पुणे येथील निकटवर्तीय नातेवाईकाचे दु:खद निधन झाल्याने पालकमंत्री श्री. खोतकर हे बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.                           
00000
राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा दौरा
नांदेड दि. 11 :- राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री दिलीप कांबळे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे राहील.
सोमवार 11 डिसेंबर 2017 रोजी नागपूर येथुन वाहनाने रात्री 11 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन, राखीव व मुक्काम.
मंगळवार 12 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 8 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथुन वाहनाने पांगरी ता. परळी वैजनाथ जि. बीडकडे प्रयाण करतील. दुपारी 2 वा. पांगरी येथुन वाहनाने नांदेड, यवतमाळ, वर्धा मार्गे नागपूरकडे प्रयाण करतील.

000000
सशस्‍त्र सेना ध्‍वजदिन निधीच्‍या 
संकलन प्रारंभाचा बुधवारी कार्यक्रम
नांदेड दि. 11 :- सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन प्रारंभ व माजी सैनिक, विधवा मेळाव्याचा कार्यक्रम प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार 13 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे होणार आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी कळवले आहे
या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून युद्धविधवांचा सत्कार, माजी सैनिकांना गौरव पुरस्कार, शिष्यवृत्ती वाटप व इतर आर्थिक मदतीचे धनादेश वाटप होणार आहेत. तसेच ध्वजदिन निधी संकलन 2016 मध्ये उत्कृष्ट संकलन करणाऱ्या कार्यालय प्रमुखांना प्रशस्तीपत्र देऊन बक्षीस वितरण होणार आहे. जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, विधवा यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000
किनवट नगरपरिषद मतदान ,
मतमोजणीमुळे दारु विक्री बंदचा आदेश
नांदेड दि. 11 :- किनवट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार 13 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी गुरुवार 14 डिसेंबर रोजी होणार आहे. किनवट नगरपरिषद हद्दीतील मतदान होत असलेली गावे मतदानाच्या अगोदरचा दिवस मंगळवार 12 डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस, मतदानाच्या दिवशी बुधवार 13 डिसेंबर रोजी संपुर्ण दिवस, व मतमोजणी होत असलेल्या ठिकाणी मतमोजणीचा दिवस गुरुवार 14 डिसेंबर रोजी मतमोजणी होत असलेल्या ठिकाणी मतमोजणी पूर्ण होईपर्यंत दारु विक्री पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.  
किनवट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया मुक्त, निर्भयपणे व शांततेत पार पडावे तसेच शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनूचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी नांदेड यांनी जिल्ह्यातील किनवट नगरपरिषद हद्दीतील सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल-4, एफएल/बिआर-2 विक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिला आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.

000000
प्रलंबीत शिष्यवृत्तीसाठी
ई-स्कॉलरशीप पोर्टल सुरु
नांदेड दि. 11 :- विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती / शिक्षण फी, परीक्षा फी, निर्वाह भत्ता आदी लाभ देण्याचे प्रलंबीत असल्याने ते देण्यासाठी ई-स्कॉलरशीप हे संकेतस्थळ मर्यादीत कालावधीसाठी सुरु करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे प्रलंबीत असलेले अर्ज शाळांनी संकेतस्थळावरुन शुक्रवार 15 डिसेंबर 2017 पर्यंत जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि. प. नांदेड यांचेकडे पाठवावीत, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
प्रथम टप्प्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सन 2015-16 साठी 31 मार्च 2016 तर सन 2016-17 करीता 31 मार्च 2017 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत परंतू ज्यांना अद्याप शिष्यवृत्ती, शिक्षणी फी, परीक्षा फी, आदीचा लाभ मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांचे प्रलंबित असलेले अर्ज पाठवावेत. सन 2013-14 ते आतापर्यंत सर्व शिष्यवृत्तीचा अहवाल याद्या व इतर माहिती शाळेने स्वत:च्या स्तरावर काढून ठेवावी. शाळांनी त्यांच्याकडे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन सादर केलेले सन 2015-16 व सन 2016-17 चे पात्र विद्यार्थ्यांचे प्रलंबित आणि नुतनीकरणाच्या ऑनलाईन प्रस्तावाची हार्ड कॉपी त्वरीत सादर करावी, असेही आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000
राज्यस्तरीय निवडणूक ज्ञान स्पर्धेसाठी
साईनाथ उत्तरवार, गणेश गादेवार पात्र
नांदेड, दि. 9 :- जिल्हास्तरीय निवडणूक ज्ञान स्पर्धेत प्रथम क्रमांकावर कौठा येथील नागार्जुना पब्लीक स्कूलचा साईनाथ मारोती उत्तरवार तर द्वितीय क्रमांकावर येथील शारदा भवन हायस्कूलचा सार्थक गणेश गादेवार हे विद्यार्थी राज्यस्तरीय परीक्षेस पात्र ठरले आहेत. या दोन्ही परिक्षार्थींची राज्यस्तरीय परिक्षा औरंगाबाद येथे घेण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप कच्छवे यांनी दिली आहे.
भविष्यातील नवमतदारांना निवडणूक विषयी विविध बाबीचे ज्ञान व्हावे या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार इयत्ता 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावरील परीक्षा नांदेडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली रविवार 10 डिसेंबर रोजी केंब्रीज विद्यालय नांदेड येथे घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील प्राथमिक फेरीत पात्र ठरलेल्या 213 शाळा, महाविद्यालयातील एकुण 331 परिक्षार्थींनी उर्त्स्फुतपणे सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेसाठी केंब्रीज विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी परिक्षेसाठी शाळा उपलब्ध करुन दिली तसेच जिल्हा परीषदचे शिक्षणाधिकारी (मा.) बळवंत जोशी, गटशिक्षणाधिकारी अशोक देवकरे, पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी, शिक्षक यांनी सहकार्य केल्याबद्दल उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री कच्छवे यांनी आभार मानले आहेत.

000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...