Monday, December 11, 2017

 श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेतील भाविकांच्या सुविधेसाठी
समन्वयाने काम करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
नांदेड , दि. 11 :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेतील येणाऱ्या भाविकांना विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधीत यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले. श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेच्या पूर्वतयारीची जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार या होत्या.  
यावेळी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती श्रीमती शिला निखाते, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नईम कुरेशी, महावितरणचे अधीक्षक अभियंता रा. रा. कांबळे, लोहा तहसीलदार डॉ. आशिषकुमार बिरादार , जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मनरेगा) श्रीमती कल्पना क्षीरसागर, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. शिंगने तसेच सर्व तालुक्याचे गटविकास अधिकारी, ग्रामसेवक तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
श्री. पाटील म्हणाले की,  श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा दक्षिण भारतातील महत्त्वाची यात्रा आहे. त्यामुळे या यात्रेद्वारे पशू-प्राण्यांचे प्रदर्शन आणि त्यांच्या जाती-प्रजातींचे जतन करण्याचे काम करण्यात येत असते. या सर्व घटकांचा विचार करून यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः आरोग्य सुविधा आणि स्वच्छतेविषयी दक्ष रहावे. कचरा उचलणे आणि विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश श्री. पाटील यांनी दिले. तसेच आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी वीज व्यवस्था, अग्निशमनदलाच्या वाहनांची व्यवस्था आणि पोलीस बंदोबस्ताबाबतची माहिती श्री. पाटील यांनी यावेळी घेतली.
श्रीक्षेत्र माळेगाव येथे शंभर हेक्टरवर ही यात्रा 16 ते 20 डिसेंबर 2017 या पाच दिवसाच्या कालावधीत भरविण्यात येत आहे. शनिवार 16 डिसेंबर रोजी देवस्वारी पुजन, पालखी पुजन, भव्य कृषि प्रदर्शन, विविध स्टॉलचे उद्घाटन व कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कार. रविवार 17 डिसेंबर रोजी पशु, अश्व, श्वान व कुक्कुट प्रदर्शन. सोमवार 18 डिसेंबर रोजी कुस्त्यांची दंगल, मंगळवार 19 डिसेंबर रोजी लावणी महोत्सव तर बुधवार 20 डिसेंबर रोजी पारंपारीक लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रेत आरोग्य विभागाकडून 24 तास वैद्यकीय पथकांची नियुक्ती तसेच पुरेसा औषधसाठा, रुग्णवाहिका उपलब्ध राहतील अशी माहिती देण्यात आली.  बैठकीत पाणी पुरवठा, पोलीस बंदोबस्त, पशुसंवर्धन, कृषि, बांधकाम, शिक्षण आरोग्य आदी विभागांच्या जबाबदाऱ्या व सहभागाबाबत पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. पशू प्रदर्शन यावर्षीही भव्य आणि सुनियोजितपणे होईल असे सांगण्यात आले.
बैठकीच्या सुरुवातीला यात्रा समितीचे सचिव श्री. कोंडेकर यांनी प्रास्ताविक केले. बैठकीत माळेगाव ग्रामपंचायतीच्या सदस्यांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य तसेच लोहा पंचायत समितीचे सभापती संतोष पाटील-उमरेकर, जिल्हा परिषद सदस्य रंगनाथ गुरुजी भुजबळ आदींनी चर्चेत भाग घेतला व सूचना केल्या.

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेच्या पुर्वतयारीचीही बैठक पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली होती. पालकमंत्री श्री. खोतकर बैठकीसाठी नांदेडकडे निघाले असता त्यांचे पुणे येथील निकटवर्तीय नातेवाईकाचे दु:खद निधन झाल्याने पालकमंत्री श्री. खोतकर हे बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.                           
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   1158 नीती आयोगाच्या मूल्यांकनात #किनवट आकांक्षित तालुका राज्यातून चौथ्या क्रमांकावर तर देशातून 51 व्या क्रमांकावर ...