वृत्त क्रमांक 380
इयत्ता दहावी-बारावी परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या
विद्यार्थ्यांची ऑनलाईन नाव नोंदणी अर्जाची कार्यवाही सुरू
नांदेड दि. 12 एप्रिल :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. 17 भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जुलै-ऑगस्ट 2025 परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नावनोंदणी अर्जाबाबतची कार्यवाही मंगळवार 15 एप्रिल 2025 पासून सुरु करण्यात येत असून सदरील अर्ज मंडळाच्या संकेतस्थळावर भरावयाचे आहेत.
सद्यस्थितीत फक्त फेब्रुवारी-मार्चच्या परीक्षांसाठीच खाजगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होण्यासाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तथापि अनेक विद्यार्थी पात्र असूनही मंडळाने दिलेल्या मुदतीत नावनोंदणी अर्ज भरू न शकल्याने अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते. शैक्षणिक वर्ष वाया जावू नये म्हणून यावर्षी प्रथमच जुलै-ऑगस्ट 2025 च्या परीक्षांसाठी खाजगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होण्याकरिता नावनोंदणीसाठी संधी देण्यात येत आहे.
इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांकरिता सर्व शाळा-कनिष्ठ महाविद्यालये मंडळाच्या अटी शर्ती नुसार नावनोंदणी करण्याकरिता उपलब्ध आहेत. यासंदर्भातील सर्व माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहेत. तसेच अधिक माहितीसाठी सर्व विद्यार्थी, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या कार्यकक्षेतील विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.
जुलै-ऑगस्ट 2025 मध्ये होणाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. 17) ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखा पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरुन अर्जाची प्रत, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोच पावतीची प्रिंट आऊट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात जमा करण्यासाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्वीकारण्याची मुदत 15 एप्रिल ते 15 मे 2025 पर्यंत देण्यात आली आहे.
खाजगी विद्यार्थी म्हणुन प्रविष्ठ होण्यासाठी फेब्रुवारी-मार्च 2025 च्या परीक्षेचेवेळी ज्या अटी व शर्ती निर्धारित केलेल्या होत्या त्याच अटी व शर्ती जुलै-ऑगस्ट 2025 च्या परीक्षेसाठी कायम राहतील. सदर अर्ज फक्त नियमित शुल्काने घ्यावयाचे असून याकरिता विलंब, अतिविलंब शुल्काची मुदत असणार नाही व मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व संबधित घटकांनी नोंद घ्यावी.
खाजगी विद्यार्थ्यांना इ. 10 वी व इ. 12 वी साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी. खाजगी विद्यार्थ्यांनी इ. 10 वी, 12 वीसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन भरण्यापूर्वी ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून मंडळाची परीक्षा दयावयाची आहे त्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाचा सांकेतांक, विषय योजना, माध्यम, शाखा व इतर आवश्यक माहिती घेऊनच नोंदणी करावी.
नावनोंदणी अर्ज करतांना विद्यार्थ्यांनी http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरील Student Corner या option चा वापर करावा, अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. सदर मूळ कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. काही कारणास्तव विद्यार्थ्यांकडे दुय्यम शाळा सोडल्याचा दाखला असेल तर त्याची मूळ प्रत जोडणे आवश्यक आहे. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर, मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो (पीडीएफ) काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे.
विद्यार्थ्यांनी अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोच पावतीची प्रिंटआऊट व मूळ कागदपत्रे नाव नोंदणी अर्जावर नमूद केलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात विहीत मुदतीत जमा करावयाची आहेत. खाजगी विद्यार्थी नावनोंदणी शुल्काचा तपशील खालीलप्रमाणे
इयत्ता 10 वी व बारावी : 1 हजार 110 रुपये नाव नोंदणी शुल्क अधिक 100 रुपये प्रक्रिया शुल्क लागू राहील.
दहावी-बारावी जुलै-ऑगस्ट 2025 परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी (फॉर्म नं. 17) नावनोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने (Debit Card/Credit Card/ युपीआय/नेटबँकिंगद्वारे) भरणे अनिवार्य राहील. ऑनलाईन पध्दतीने शुल्क जमा केल्याबाबतची पोच पावती विद्यार्थ्याला,संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयास त्यांच्या लॉगीनमध्ये प्राप्त होईल.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. 10 वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन पध्दतीने होणार असून नावनोंदणी करतांना विद्यार्थ्यांच्या सध्याच्या पत्त्यातील जिल्हा, तालुका व त्याने निवडलेल्या माध्यमानुसार, त्यास माध्यमिक शाळांची यादी दिसेल. त्यामधील एका माध्यमिक शाळेची निवड विद्यार्थ्याने करावयाची आहे. या माध्यमिक शाळेने परीक्षा अर्ज, प्रकल्प अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी विषय संदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन तसेच पुढील कार्यवाही करावयाची आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन पध्दतीने होणार असून नावनोंदणी करतांना विद्यार्थ्यांच्या सध्याच्या पत्त्यातील जिल्हा, तालुका व त्याने निवडलेल्या माध्यम व शाखेनुसार त्यास उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांची यादी दिसेल. त्यामधील एका उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्याने करावयाची आहे.
या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाने परीक्षा अर्ज, प्रकल्प अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी विषय संदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन तसेच पुढील कार्यवाही करावयाची आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट व्हावयाचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या प्राधिकृत केलेल्या रुग्नालयाचे प्रमाणपत्र, युडीआयडी कार्डची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ,माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडून माहिती प्राप्त करुन घ्यावी.
महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत इयत्ता 5 वी किंवा इयत्ता 8 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इयत्ता 10 वी साठी (17 नं.) खाजगी विद्यार्थी म्हणून नावनोंदणी करता येईल. ऑनलाईन अर्ज भरतांना अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत वेबसाईटवर दिलेल्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.
पात्र विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. तसेच पात्र विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे, असे देविदास कुलाळ सचिव राज्य मंडळ पुणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
00000