Saturday, May 15, 2021

 

658 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड जिल्ह्यात 273 व्यक्ती कोरोना बाधित

9 जणांचा मागील तीन दिवसात मृत्यू

नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 994 अहवालापैकी 273 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 209 तर अँटिजेन तपासणीद्वारे 64 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 86 हजार 716 एवढी झाली असून यातील 81 हजार 130 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 3 हजार 426 रुग्ण उपचार घेत असून 130 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

दिनांक 13, 14 व 15 मे 2021 या तीन दिवसाच्या कालावधीत 9 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 794 एवढी झाली आहे. दिनांक 13 मे 2021 रोजी देगलूर कोविड रुग्णालयात मानसनगर देगलूर येथील 65 वर्षाच्या पुरुषाचा, किनवट कोविड रुग्णालयात किनवट तालुक्यात डोंगरगाव येथील 60 वर्षाचा पुरुष, यशश्री कोविड रुग्णालयात हदगाव तालुक्यातील निवघा येथील 63 वर्षाचा पुरुष, दि. 14 मे रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटलमध्ये वाई मुदखेड येथील 65 वर्षाचा पुरुष, वाजेगाव नांदेड येथील 38 वर्षाची महिला, मुखेड कोविड रुग्णालयात नांदगाव येथील 60 वर्षाची महिला, अशा कोविड रुग्णालयात लोहा तालुक्यातील टेळकी येथील 45 वर्षाचा पुरुष, नांदेड येथील 52 वर्षाचा पुरुष तर 15 मे रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटलमध्ये देगलूर तालुक्यातील रुद्रपूर येथील 60 वर्षाची महिलेचा समावेश आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 81, देगलूर 7, कंधार 2, मुदखेड 1, परभणी 6, उस्मानाबाद 1, नांदेड ग्रामीण 4, धर्माबाद 8, किनवट 26, मुखेड 3, बीड 1, अर्धापूर 8, हदगाव 5, लोहा 3, नायगाव 9, तेलंगणा 1, बिलोली 3, हिमायतनगर 14, माहूर 17, हिंगोली 8, यवतमाळ 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे मनपा नांदेड 16, धर्माबाद 1, किनवट 10, उमरी 1, अर्धापूर 2, हदगाव 3, लोहा 3, यवतमाळ 3, बिलोली 1, हिमायतनगर 3, मुखेड 4, हिंगोली 1, देगलूर 10, कंधार 3, नायगाव 3 असे एकूण 273 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 658 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 22, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण व जंबो कोविड सेंटर 416, मालेगाव टी.सी.यू. कोविड रुग्णालय 1, धर्माबाद तालुक्यांतर्गत 24, बारड कोविड केअर सेंटर 5, देगलूर कोविड रुग्णालय 2, खाजगी रुग्णालय 97,  जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 9, मुखेड कोविड रुग्णालय 3, मुदखेड कोविड केअर सेंटर 15, किनवट कोविड रुग्णालय 2, उमरी तालुक्यातंर्गत 5, बिलोली तालुक्यांतर्गत 8, शासकीय आयर्वेदिक महाविद्यालय नांदेड 4, नायगाव तालुक्यातंर्गत 1, हिमायतनगर तालुक्यातंर्गत 17, हदगाव कोविड रुग्णालय 3, लोहा तालुक्यातंर्गत 2, माहूर तालुक्यांतर्गत 22 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 3 हजार 426 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 103, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 60, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 69, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 27, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 53, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 39, देगलूर कोविड रुग्णालय 8, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 22, बिलोली कोविड केअर सेंटर 95, नायगाव कोविड केअर सेंटर 7, उमरी कोविड केअर सेंटर 18, माहूर कोविड केअर सेंटर 13, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 17, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 21, कंधार कोविड केअर सेंटर 6, धर्माबाद कोविड केअर सेंटर 30, मुदखेड कोविड केअर सेंटर 6, अर्धापूर कोविड केअर सेंटर 11, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 10,  बारड कोविड केअर सेंटर 13, मांडवी कोविड केअर सेंटर 1, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 5, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 11, एनआरआय कोविड केअर सेंटर 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 794, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 1 हजार 305, खाजगी रुग्णालय 681 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 59, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 78, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 59, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 32 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 96 हजार 583,

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 99 हजार 623

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 86 हजार 716

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 81 हजार 130

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 794

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.55 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-07

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-38

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-230

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 426

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-130

00000

 

आजार असेल तर आता घरी बसल्या ॲपद्वारे

घेता येईल डॉक्टरांचे मार्गदर्शन 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- कोरोना सारख्या आव्हानात्मक काळात अत्यावश्यकतेप्रमाणे वारंवार करावे लागणारे लॉकडाऊन आणि इतर निर्बंध लक्षात घेता आजारी व्यक्तींना वेळीच डॉक्टरांचा सल्ला मिळावा या उद्देशाने आता आरोग्य विभागातर्फे घरी बसल्या ॲपद्वारे मार्गदर्शन घेता येईल. गतवर्षी सुरुवातीच्या काळात जी स्थिती होती ती लक्षात घेऊन शासनाने ई-संजीवनी ऑनलाईन ओपीडी सुरु केली. ही सेवा आता नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. कोरोनामुळे आजारी असलेले जे गृहविलगीकरणात आहेत ते सुद्धा या ऑनलाईन सुविधेचा लाभ घेत आहेत. 

राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय येथील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची नोंदणी या ॲपच्या ॲप्लीकेशनमध्ये करण्यात आली आहे. प्रत्येकाला ठराविक दिवस आणि वेळ ठरवून दिलेले असल्यामुळे सर्व संबंधित तज्ज्ञ डॉक्टर या ॲपवर उपलब्ध राहून नागरिकांना सुविधा देणे सुलभ झाले आहे. 

ई-संजीवनी ओपीडी ही ऑनलाईन सेवा (https://esanjeevaniopd.in/) या वेबपोर्टलवर किवा अ‍ॅन्ड्रॉइड मोबाईल असेल तर Google Play Store वर esanjeevaniopd या अ‍ॅपवर लाभ घेता येईल. ही सुविधा रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशीही उपलब्ध आहे. रुग्णांना एसएमएसद्वारे ई-प्रिस्कीप्शन अर्थात त्यांच्या आजारानुसार औषधांची यादी पाठविण्यात येईल.  या सुविधेचा नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले.

ई-संजीवनी ओ.पी.डी. नोंदणी करण्याची पद्धत

-संजीवनी ओ.पी.डी. सेवेचा लाभ घेण्यासाठी रुग्ण https://esanjeevaniopd.in/ या संकेतस्थळावर भेट देऊन डॉक्टरांशी संवाद साधू शकतात किंवा अ‍ॅन्ड्रॉइड मोबाईलमध्ये Google Play Store मध्ये जाऊन esanjeevani OPD National Teleconsultation Service या नावाचे अ‍ॅप (App) डाऊनलोड करता येईल. 

नोंदणी व टोकन जनरेशन : आपला मोबाईल नंबर टाकून, वनटाइम ओटीपी (वनटाइम पासवर्डद्वारे) द्वारे सत्यापित (Verify) करा. मोबाईल नंबर सत्यापित झाल्यानंतर रुग्णाची सविस्तर माहिती भरा व टोकन जनरेट करा. 

लॉगइन (Patient Login) : आपल्ला मोबाईल नबर व टोकन  नंबर टाकून लॉगीन करा.लॉग इन झाल्यावर तुमचा नंबर येईपर्यंत वाट पहा व तुमचा नंबर आल्यानंतर कॉल नाऊ (Call Now) वर क्लिक करुन डॉक्टरांसोबत सल्लामसलत करा.

---0000---




 

किनवट येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत

आता अकरावी व बारावी वर्गासाठी श्रेणीवाढ

दुर्गम भागातील आदिवासी मुलांना पुढील शिक्षणाची नवी संधी

– पालकमंत्री अशोक चव्हाण 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- तेलंगणा राज्याच्या काठावर असलेल्या किनवट सारख्या तालुक्यातील डोंगराळ व दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी युवकांना आता महाराष्ट्र शासनाने पुढील शिक्षणासाठी नवी संधी उपलब्ध करुन दिली आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत किनवट येथे चालविण्यात येणाऱ्या शासकिय माध्यमिक आश्रमशाळेची श्रेणीवाढ करुन संलग्न कनिष्ठ महाविद्यालयाचा दर्जा या आश्रमशाळेला देण्यात आलेला आहे. या भागातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी मुलांना अकरावी व बारावीच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी व त्यांनाही विकासाच्या प्रवाहात घेता यावे असा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. येथील आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रस्तावाचा पाठपुरावा करुन किनवट येथे ही मान्यता मिळवून घेतली. 

आदिवासी विभागाने यासंदर्भात शासन निर्णय काढून किनवट येथे कला व विज्ञान या दोन्ही शाखांना अटीनुसार मान्यता दिली. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून या आश्रमशाळेमध्ये अकरावीचे वर्ग सुरु करण्यात यावेत व सन 2022-23 पासून बारावीचे वर्ग सुरु करण्यात यावेत असे शासन निर्णयात निर्देशीत केले आहे. कला व विज्ञान या दोन्ही शाखेचे हे वर्ग असतील असेही स्पष्ट केले आहे. वित्त विभागाच्या शासन निर्णयात शिथिलता आल्यानंतर आकृतीबंधानुसार नवीन पद मान्यतेचा प्रस्ताव आदिवासी विकास विभागामार्फत शासनास सादर केला जाईल. याचबरोबर ही श्रेणीवाढ मान्यता देतांना आश्रमशाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. यात प्रामुख्याने आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल हा किमान 80 टक्के असावा तसेच किमान 60 टक्के विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळणे आवश्यक राहिल. याचबरोबर बालकांचा सक्तीचा व मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या सोई-सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करणे व शिक्षणाचा स्तर उत्कृष्ट ठेवणे बंधनकारक राहिल.

आदिवासी युवकांना पुढील शिक्षणाची नवी संधी मिळाल्याचा आनंद

नांदेड जिल्ह्याची व्याप्ती ही इतर जिल्ह्याच्या तुलनेत मोठी आहे. या जिल्ह्यात विविध धर्माची लोकसंख्या आहे. काही तालुके हे आदिवासी बहुल तालुके आहेत. किनवट सारख्या तालुक्यातील युवकांना विकासाच्या संधी मिळण्यासाठी चांगल्या शिक्षणाच्या संधी आगोदर मिळणे आवश्यक होते. त्यादृष्टिने किनवट येथील आश्रमशाळेच्या श्रेणीवाढचा प्रस्ताव बऱ्याच दिवसांपासून विचारात होता. आदिवासी विभागाशी पाठपुरावा करुन आता याठिकाणी विद्यार्थ्यांना कला व विज्ञान या दोन्ही शाखेत बारावीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध झाले याचा मनस्वी आनंद होत असल्याची प्रतिक्रिया नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

----****----

(सोबत संग्रहित छायाचित्रे)





महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...