Thursday, December 10, 2020

 

दिनांक 01.01.2021 या अर्हता  दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रम

नाव नोंदणीसाठी दिनांक 12 व 13 डिसेंबर 2020 रोजी विशेष मतदार नोंदणी  मोहिमेचे आयोजन

              मा. भारत निवडणूक आयोगाने दिनांक 01.01.2021 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर ज्या मतदारांची नावे या यादीत समाविष्ट नाहीत अशा मतदारांना अथवा प्रारुप मतदार यादीमध्ये करण्यात आलेल्या नोंदीबाबत ज्‍या मतदारांना आक्षेप घ्यावयाचे असतील अशा मतदारांना किंवा त्यामध्ये दुरुस्ती / सुधारणा करावयाची असेल अशा मतदारांना विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करता येतील.

              त्‍यासाठी दिनांक 17 नोव्‍हेबर 2020 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. या प्रारूप मतदार याद्या सर्व मतदान केंद्रांवर, मतदार नोंदणी अधिकारी , सहायक मतदार नोंदणी अधिकारी व जिल्‍हा  निवडणुक अधिकारी यांचे कार्यालयात प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्‍या आहेत. या मतदार यादीमध्‍ये ज्‍या मतदाराची नावे समाविष्‍ट नाहीत अशा मतदारांना नमुना -६ मध्‍ये अर्ज सादर  करून त्‍यांची नावे मतदार यादीत समाविष्‍ट  करता येतील. तसेच अनिवासी भारतीय नागरिकांना नमुना -6अ मध्‍ये अर्ज करुन मतदार यादीत नाव समाविष्‍ट  करता येईल. मतदार यादीत समाविष्‍ट असलेल्‍या नोंदीबाबत आक्षेप असल्‍यास सदर नोंद वगळण्‍यासाठी नमुना -७ मध्‍ये अर्ज सादर करता येतील. तसेच मतदार यादीत असलेल्‍या नोंदीबाबत दुरूस्‍ती करावयाची असल्‍यास नमुना -८ मध्‍ये आणि एका भागातून दुस-या  यादीभागात नोंद स्‍थलांतरीत करावयाची असल्‍यास विहीत नमुना -८अ मध्‍येअर्ज सादर करता येतील.

              उक्‍त प्रमाणे पात्र मतदारांना नाव नोंदणी /दुरूस्‍ती/वगळणी करण्‍याकरीता दिनांक 06 व 07 डिसेंबर 2020 रोजी विशेष मोहिम आयोजित करण्‍यात आली होती, सदर मोहिमेस नागरिकाकडुन चांगला प्रतिसाद मिळाला असुन त्‍याच धर्तीवर येत्‍या दिनांक 12 व 13 डिसेंबर 2020 रोजी विशेष मोहिम राबविण्‍यात येणार आहे. सदर विशेष मोहिमेच्‍या दिवशी  मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ) उपस्थित राहुन नागरिकांचे नाव नोंदणी/दुरूस्‍ती बाबतचे अर्ज स्विकारणार आहेत.

              दि.1 जानेवारी 2021 रोजी ज्या भारतीय नागरिकाचे वय १८ वर्षापेक्षा कमी नाही जो त्‍या यादी भागातील सर्वसाधारण रहिवासी आहे, अशी व्यक्ती मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र राहील. मतदारांच्या सुलभतेसाठी www.nvsp.in या संकेतस्थाळावर ऑनलाईन नाव नोंदणीची तसेच यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्‍यात आली आहे.अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळास भेट द्यावी.

              जिल्‍हयातील सर्व पात्र मतदारांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव असल्‍याची खात्री करून नाव नसल्‍यास नागरिकांनी  उक्‍त दिनांकास आपल्‍या भागातील मतदान केंद्रावर जाऊन संबंधित मतदान केंद्र स्‍तरीय अधिकारी  (बीएलओ) यांचेकडे आपला नाव नोंदणीचा अर्ज भरून द्यावा असे आवाहन मा. जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नांदेड, डॉ. विपीन ईटनकर यांनी केले आहे. 

 

39 कोरोना बाधितांची भर तर

46 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी  

नांदेड (जिमाका) दि. 10 :-  गुरुवार 10 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 39 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 27 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 12 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 46 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

 आजच्या 1 हजार अहवालापैकी 952 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 20 हजार 728 एवढी झाली असून यातील 19 हजार 652 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 327 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 11 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 554 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.    

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 11, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 20, किनवट कोविड रुग्णालय 1, देगलूर कोविड रुग्णालय 1, नायगाव तालुक्यांतर्गत 3, खाजगी रुग्णालय 10 असे एकूण 46 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.80 टक्के आहे.  

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 18, अर्धापूर तालुक्यात 1, कंधार 3, परभणी 1, नायगाव 1, देगलूर 1, बीड 1, लातूर 1 असे एकुण 27 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 4, हदगाव तालुक्यात 3, देगलूर 1, कंधार2, भोकर 1, अर्धापूर 1 असे एकुण 12 बाधित आढळले.  

जिल्ह्यात 327 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 23, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 29, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 29, मुखेड कोविड रुग्णालय 21, भोकर कोविड केअर सेंटर 2, हदगाव कोविड रुग्णालय 6, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 55, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 137, खाजगी रुग्णालय 25 आहेत.  

गुरुवार 10 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 174, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 68 एवढी आहे.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 61 हजार 33

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 36 हजार 317

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 728

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 652

एकुण मृत्यू संख्या-554

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.80 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-432

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-327

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-11. 

000000

 

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान

योजनेसाठी अर्ज करण्यास 8 जानेवारीपर्यत मुदत 

नांदेड (जिमाका) दि. 10 :-  राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनेसाठी इच्छूकांनी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सादर करण्यात येणाऱ्या अर्जाचा नमूना सुधारित असावा. अर्जामध्ये नमूद आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी, हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास 8 जानेवारी 2021 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालक श्रीमती शालिनी गो. इंगोले  मुंबई यांनी केले आहे. 

भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकत्ता यांच्या असमान निधी योजनेतर्गंत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येतात. असमान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार 2020-21 साठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्या संदर्भांतील नियम, अटी व अर्जाचा नमुना राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यातील इच्छूक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना सदर संकेतस्थळावर उपलब्ध करुन घ्यावा. 

सन 2020-21 साठीच्या असमान निधी योजना (Non Matching scemes) पुढील प्रमाणे आहे. ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य. "राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा" विकसीत करण्यासाठी अर्थसहाय्य. महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य. राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनांसाठी अर्थसहाय्य. बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय कोपरा स्थापन करण्याकरीता अर्थसहाय्य. या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे. आवश्यकता असल्यास संबंधीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

000000

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत

11 ते 13 डिसेंबर कालावधीत तपासणी मोहिम

-         निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 11 ते 13 डिसेंबर 2020 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. यात आयकर भरणाऱ्या व इतर कारणामुळे अपात्र झालेल्या जिल्‍हयातील 11 हजार 763 लाभार्थ्याकडून लाभाची 9 कोटी 16 लक्ष रूपये वसुली, सर्व गावातील सर्व लाभार्थ्‍यांचे सामाजिक अंकेक्षण, लाभार्थ्‍यांची भौतिक तपासणी, पोर्टलवरील लाभार्थ्‍यांचे विविध तांत्रीक कारणांमुळे लाभ थां‍बले असल्‍यास त्‍याबाबतची दुरूस्‍तीची कार्यवाही करण्‍यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

केंद्र पुरस्‍कृत प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधी (पीएम किसान) योजना राज्यात शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग यांच्या दि.4 फेब्रुवारी 2019 च्या परिपत्रकानुसार सुरू करण्‍यात आली आहे. या योजनेंतर्गत अल्‍प व अत्‍यल्‍प भूधारक शेतकऱ्यांना कुटूंबनिहाय प्रति वर्ष रूपये 6 हजार इतके आर्थिक सहाय 3 टप्‍प्‍यामध्‍ये उपलब्‍ध करून देण्‍यात येत आहे. 

प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधी (पीएम किसान) योजने अंतर्गत जिल्‍ह्यात एकूण 4 लाख 94 हजार 921 शेतकरी कुटूंबांची नोंदणी झालेली आहे. दरम्‍यान अशी कार्यवाही करताना काही आयकर भरणारे, अपात्र लाभार्थ्‍यांना योजनेचा लाभ मिळाल्‍याची बाब निदर्शनास आलेली आहे. अशा लाभार्थ्‍यांचा शोध घेवून त्‍यांना योजनेतून कायमस्‍वरूपी वगळण्‍यासाठी सर्व ग्राम स्‍तरावर सद्यःस्थितीतील कोवीड-19 महामारीचा संसर्गवाढ होवू नये यासाठी शासनाने वेळोवळी दिलेल्‍या निर्देशांचे तंतोतंत पालन करून जिल्‍हयातील सर्व गावातील 100 टक्‍के लाभार्थी यांचे सामाजिक अंकेक्षण पूर्ण करण्‍यात येणार आहे. सामाजिक अंकेक्षण कार्यवाही दरम्‍यान सर्व लाभार्थी यांची यादी वाचन करणे व गावातील अपात्र, मयत लाभार्थी यांचा लाभ थांबविणे अशा लाभार्थ्‍यांना पोर्टलवरुन कमी करणे अशी कार्यवाही केली जाणार आहे. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन 2020-21 या आर्थिक वर्षामधील यादृच्छीक पध्‍दतीने 5 टक्के लाभार्थ्यांची तपासणी करावयाच्‍या लाभार्थ्‍यांची यादी पी.एम.किसान पोर्टलवर उपलब्ध करुन दिली असून लाभार्थ्‍यांची तपासणी पुर्ण करून पोर्टलवर अपडेट झाल्याशिवाय त्यांचे पुढील Payment होणार नसल्‍याचे कळविले आहे. 

त्‍यानुषंगाने भोकर, अर्धापूर, बिलोली, लोहा व उमरी तालुक्याने पी. एम. किसान पोर्टलवर Physical Verification चे 100 टक्के काम व भोकर, उमरी, अर्धापूर, नायगाव व हिमायतनगर या तालुक्‍यांनी सामाजिक अंकेक्षणाचे 100 टक्के काम पूर्ण करून उल्‍लेखनिय काम केले आहे. उर्वरित तालुक्‍यांत मोहिमेदरम्‍यान Physical Verification तपासणी व सामाजिक अंकेक्षणची कार्यवाही पुर्ण केली जाणार आहे. 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांचा डाटा केंद्रिय आयकर विभागाच्या माहितीशी संलग्न केल्यावर बरेच लाभार्थी हे आयकर भरत असल्याने अपात्र ठरले असून अशा लाभार्थ्‍यांचा तात्काळ लाभ थांबवून त्यांना अपात्र करण्‍याच्‍या व लाभाची रक्‍कम वसूल करावयाची आहे. नांदेड जिल्‍हयातील आयकर भरणाऱ्या व इतर कारणामुळे अपात्र झालेले अर्धापूर-424, भोकर-652, बिलोली-849, देगलूर-1 हजार 496, धर्माबाद-327, हदगांव-889, हिमायतनगर-432, कंधार-916, किनवट-676, लेाहा-1 हजार 353, माहूर-353, मुदखेड-458, मुखेड-1 हजार 151, नायगांव-526, नांदेड-773 व  उमरी-488 असे एकूण जिल्‍हयातील 11 हजार 763 लाभार्थ्याकडून लाभाची 9 कोटी 16 लक्ष रूपये वसुली केली जाणार आहे. त्‍यापैकी 513 लाभार्थ्‍यांकडून 47 लक्ष रूपयाची वसुली झालेली आहे. उर्वरित वसुली करण्‍याकरीता व बाबीकरीता जिल्‍हयातील 93 मंडळाकरीता महसूल, जिल्‍हा परिषद व कृषी विभागातील अधिकारी यांच्‍या मंडळ निहाय नियुक्‍त्या करण्‍यात आलेल्‍या आहे. 

अर्धापूर तालुक्यात अपात्र / कर भरणारे 424 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 39,48,000, परतावा रक्कम 5,22,000 तर शेतकरी 55 दर्शविण्यात आले आहे.

भोकर तालुक्यात अपात्र / कर भरणारे 652 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 53,66,000, परतावा रक्कम 9,66,000तर शेतकरी 98 दर्शविण्यात आले आहे.

बिलोली तालुक्यात अपात्र / कर भरणारे 849 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 47,04,000, परतावा रक्कम 6,34,000 तर शेतकरी 71 दर्शविण्यात आले आहे.

 देगलूर तालुक्यात अपात्र / कर भरणारे 1,496 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 1,17,18,000, परतावा रक्कम 3,64,000 तर शेतकरी 41 दर्शविण्यात आले आहे.

धर्माबाद तालुक्यात अपात्र / कर भरणारे 327 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 27,26,000, परतावा रक्कम 12,000 तर शेतकरी 1 दर्शविण्यात आले आहे.

हदगाव तालुक्यात अपात्र / कर भरणारे 889 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 81,68,000, परतावा रक्कम 3,16,000तर शेतकरी 32 दर्शविण्यात आले आहे.

कंधार तालुक्यात अपात्र / कर भरणारे 916 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 68,70,000, परतावा रक्कम 3,22,000 तर शेतकरी 38 दर्शविण्यात आले आहे.

मुदखेड तालुक्यात अपात्र / कर भरणारे 458 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 28,30,000, परतावा रक्कम 92,000 तर शेतकरी 10 दर्शविण्यात आले आहे.

मुखेड तालुक्यात अपात्र / कर भरणारे 1,151 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 99,58,000, परतावा रक्कम 13,08,000 तर शेतकरी 147 दर्शविण्यात आले आहे.

नांदेड तालुक्यात अपात्र / कर भरणारे 773 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 62,00,000, परतावा रक्कम 1,70,000 तर शेतकरी 20 दर्शविण्यात आले आहे.

हिमायतनगर तालुक्यात अपात्र / कर भरणारे 432 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 39,08,000, परतावा रक्कम निरंक तर शेतकरी निरंक दर्शविण्यात आले आहे.

किनवट तालुक्यात अपात्र / कर भरणारे 676 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 51,30,000, परतावा रक्कम निरंक तर शेतकरी निरंक दर्शविण्यात आले आहे.

लोहा तालुक्यात अपात्र / कर भरणारे 1,353 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 98,30,000, परतावा रक्कम निरंक तर शेतकरी निरंक दर्शविण्यात आले आहे.

माहूर तालुक्यात अपात्र / कर भरणारे 353 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 21,38,000, परतावा रक्कम निरंक तर शेतकरी निरंक दर्शविण्यात आले आहे.

नायगाव तालुक्यात अपात्र / कर भरणारे 526 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 47,26,000, परतावा रक्कम निरंक तर शेतकरी निरंक दर्शविण्यात आले आहे.

उमरी तालुक्यात अपात्र / कर भरणारे 488 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 33,82,000, परतावा रक्कम निरंक तर शेतकरी निरंक दर्शविण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील एकुण 16 तालुक्यात अपात्र / कर भरणारे 11,763 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 9,16,02,000, परतावा रक्कम 47,06,000 तर शेतकरी 513 दर्शविण्यात आले आहे. 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 11 डिसेंबर ते 13 डिसेंबर 2020 या कालावधीत विशेष मोहिमेत पोर्टलवरील ऑनलाईन अर्जाचे निराकरण करणे, PM-KISAN Portal वर शेतकऱ्यांनी स्‍वतः किंवा सीएससी केंद्रामार्फत नोंदणी केली असल्‍यास त्‍याची पडताळणी करून मान्‍यता देणे, नाकारण्‍याची कार्यवाही केली जाणार आहे. जिल्‍हयातील सर्व शेतकरी लाभार्थ्‍यांनी सदर मोहिमेमध्‍ये जास्‍तीत सहभाग नोंदवून वसुलीबाबत सहकार्य व योजनेचा तांत्रीक कारणामुळे लाभ थांब‍ल्‍यास त्यांचे निराकरण करून घेण्‍याचे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

00000

 

जिल्ह्यातील प्रत्येक गावाला

असेल आता स्वत:ची स्मशान व दफनभूमी

महसूल व जिल्हा प्रशासन यांची संयुक्त मोहिम 

नांदेड (जिमाका) दि. 10  :- जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना आपल्या हक्काची स्मशान व दफनभूमी असावी यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या निर्देशाखाली महसूल व जिल्हा परिषद यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्नरत असून लवकरच प्रत्येक ग्रामपंचायत या भावनिक प्रश्नाची कोंडी दूर करुन ग्रामस्थांना दिलासा दिला जाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा घुगे-ठाकूर यांनी दिला. 

जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींना स्वत:ची स्मशान व दफनभूमी नसल्याने मोठ्या भावनिक आणि गुंतागुंतीच्या पेचाला सामोरे जावे लागत होते. शासनाने या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन यातून मार्ग काढण्यासाठी गाव तेथे स्मशान व दफनभूमी ही मोहिम हाती घेतली. या मोहिमेची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा घुगे-ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी व तहसिलदार यांची संयुक्त आढावा बैठक झाली. या बैठकीत त्यांनी माहिती दिली. 

प्रत्येक तालुक्यांच्या ठिकाणाहून तहसिलदार आणि गटविकास अधिकारी यांनी एकत्र येऊन आपआपल्या तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सद्यस्थिती दर्शक अहवालाची मांडणी करुन त्या-त्या ठिकाणच्या स्थानिक अडचणीही निदर्शनास आणून दिल्या. ज्या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा नाही अशा गावांसाठी ग्रामपंचायतकडे उपलब्ध गायरान व इतर जागेवर स्मशान व दफनभूमी उभी करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या गावांमध्ये ग्रामपंचायतीकडे गायरान व इतर कसलीही जमीन नाही अशा गावांमध्ये दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन जागा दिल्यास त्यांचा गौरव व सन्मान करुन त्या जमीनी स्विकारल्या जातील असेही शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या गावात दानशूर व्यक्ती पुढे आले नाही तर त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत खाजगी असलेल्या जमिनी विकत घेण्याचे प्रावधानही करण्यात आले आहे. यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. 

जिल्ह्यातील ग्रामपंचायतनिहाय स्मशान व दफनभूमीबाबत वस्तुस्थिती

नांदेड- 16 ग्रामपंचायतींना दफनभुमीला जागा नाही, यापैकी 3 ग्रामपंचायतीजवळ गायरन जमीन आहे, 13 ग्रामपंचायतीसाठी खाजगी जागा शोधाव्या लागतील. अर्धापूर- 7 ग्रामपंचायतींना जागा नाहीत यापैकी 1 ग्रामपंचायतीजवळ गायरान जमीन आहे, 6 ग्रामपंचायतींना जागा शोधाव्या लागतील. मुदखेड- 6 ग्रामपंचायतींना जागा नाहीत, यापैकी 5 ग्रामपंचायतीजवळ गायरान जमीन आहे, 1 ग्रामपंचायतींना जागा शोधाव्या लागतील. हदगाव– 39 ग्रामपंचायतींना जागा नाहीत यापैकी 21 ग्रामपंचायतीजवळ गायरान जमीन आहे, 18 ग्रामपंचायतींना जागा शोधाव्या लागतील. हिमायतनगर– 13 ग्रामपंचायतींना जागा नाहीत यापैकी 7 ग्रामपंचायतीजवळ गायरान जमीन आहे, 6 ग्रामपंचायतींना जागा शोधाव्या लागतील. किनवट– 43 ग्रामपंचायतींना जागा नाहीत यापैकी 33 ग्रामपंचायतीजवळ गायरान जमीन आहे, 10  ग्रामपंचायतींना जागा शोधाव्या लागतील. माहूर– 40 ग्रामपंचायतींना जागा नाहीत यापैकी 19 ग्रामपंचायतीजवळ गायरान जमीन आहे, 21 ग्रामपंचायतींना जागा शोधाव्या लागतील. भोकर– 24 ग्रामपंचायतींना जागा नाहीत यापैकी 10 ग्रामपंचायतीजवळ गायरान जमीन आहे, 14 ग्रामपंचायतींना जागा शोधाव्या लागतील. हदगाव– 5 ग्रामपंचायतींना जागा नाहीत यापैकी 5 ग्रामपंचायतीजवळ गायरान जमीन आहे,  निरंक ग्रामपंचायतींना जागा शोधाव्या लागतील. धर्माबाद – 14 ग्रामपंचायतींना जागा नाहीत यापैकी 4 ग्रामपंचायतीजवळ गायरान जमीन आहे, 10 ग्रामपंचायतींना जागा शोधाव्या लागतील. बिलोली- 21 ग्रामपंचायतींना जागा नाहीत यापैकी 15 ग्रामपंचायतीजवळ गायरान जमीन आहे, 6 ग्रामपंचायतींना जागा शोधाव्या लागतील. नायगाव– 10 ग्रामपंचायतींना जागा नाहीत यापैकी 6 ग्रामपंचायतीजवळ गायरान जमीन आहे, 4 ग्रामपंचायतींना जागा शोधाव्या लागतील. देगलूर– 21 ग्रामपंचायतींना जागा नाहीत यापैकी 10 ग्रामपंचायतीजवळ गायरान जमीन आहे, 11 ग्रामपंचायतींना जागा शोधाव्या लागतील. मुखेड– 32 ग्रामपंचायतींना जागा नाहीत यापैकी 31 ग्रामपंचायतीजवळ गायरान जमीन आहे, 1 ग्रामपंचायतींना जागा शोधाव्या लागतील. कंधार- 10 ग्रामपंचायतींना जागा नाहीत यापैकी 6 ग्रामपंचायतीजवळ गायरान जमीन आहे, 4 ग्रामपंचायतींना जागा शोधाव्या लागतील. लोहा– 39 ग्रामपंचायतींना जागा नाहीत यापैकी 17 ग्रामपंचायतीजवळ गायरान जमीन आहे, 22 ग्रामपंचायतींना जागा नाहीत.

सदर ग्रामपंचायतनिहाय प्रशासनातर्फे नियोजन केले जात आहे. 

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...