Saturday, November 25, 2023

यशकथा : 

वेटरच्या नोकरीपासून ते

मालकीच्या धाब्यापर्यंतची अनोखी यशोगाथा 

अवघ्या पाच एकरच्या आतली वडिलोपार्जित शेती. त्यात भावा-भावातील हिस्से. यात भागत नाही म्हणून सुरुवातीला व्यवसायाकडे वळण्याचे धाडस करणारे धनेगाव येथील मुळ रहिवासी असलेले बाळु शिंदे ! काय करायचे याचा कोणताही आराखडा त्यांना बांधला नाही. शिक्षण कमी म्हणजे नसल्यागतच. बँकेतल्या खात्यावर व्यवहारासाठी तीन-तीनवेळा त्यांच्याकडून सही करून घेतल्यावरही सारखी न आल्याने बँकेतील कर्मचारी त्यांच्या प्रत्येक व्यवहारासाठी दचकून राहतात. सहीपुरते कसेबसे अक्षरे जवळ करणाऱ्यांपैकी मी एक आहे अशी प्रांजळ कबुली देण्याइतपत निर्मळपणा बाळु शिंदेनी जपला आहे. या निर्मळपणातच त्यांचा आत्मविश्वास दिसून येतो. हा आत्मविश्वास त्यांचे मुख्य भांडवल.    

काही तरी काम करायचे आहे, हे डोक्यात घेऊन शिंदेनी अगोदर नांदेडला राहण्याचा निर्णय घेतला. महानगरपालिकेअंतर्गत काही करता येईल का याची चाचपणी त्यांनी केली. ही चाचपणी करतांना आपला रोजचा उदरनिर्वाह सुरू रहावा यासाठी ॲटोरिक्षा जवळ करायला त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. महानगरपालिकेतील तत्कालीन वरिष्ठ अधिकारी डॉ. निपुण विनायक यांनी शिंदेला घरकुलची कामे करण्याबाबत जी कौशल्य लागतात ती शिक्षणासाठी संधी दिली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर घरकुलच्या कामात हळूहळू शिंदेनी जम बसविला. घरांसाठी विट्टांचे एक-एक थर जसे वाढू लागले त्याप्रमाणात शिंदेला स्वत:ची ओळख निर्माण करायला उशीर लागला नाही. कष्टातील मिळकतीवर स्वत:चे एक घरकुल त्यांनी कॅनलरोडला बांधून घेतले.   

घरकुलच्या कामातून माझे घर सावरल्या गेले. मात्र कालांतराने आणखी किती काळ याच कामात अडकून पडायचे हा माझ्यापुढे मोठा प्रश्न होता. या विंवचनेत मी इतर व्यवसाय करता येतील का याची चाचपणी सुरू केली, असे आपल्या प्रवासाबद्दल शिंदे सांगतात. पुन्हा वेगळा व्यवसाय निवडायचा ही खुणगाठ मनाशी बाळगून सुरुवातीला चंद्रलोक व नंतर सिटी प्राईट या हॉटेलमध्ये त्यांनी काम करायला सुरूवात केली. हॉटेलमधील इतर कामे करतांना स्वयंपाकाची आवड शिंदे यांना निर्माण झाली. सुरुवातीला दाल फ्राय पासून छोटी-मोठे बारकावे त्यांनी शिकून घेतले. हा प्रवास पुढे  तंदूर, व्हेज हंडी, नॉनव्हेज हंडी करीत ज्वारीच्या रोटी पर्यंत पोहचला. यातच त्यांच्या हाताला चव लागली. सारेकाही मी इथेच शिकलो असे शिंदे सांगतात. यात आत्मविश्वास आल्याने मीही माझ्या स्वत:च्या मालकीचे छोटे का असेना पण स्वत:चे हॉटेल असावे हे स्वप्न उराशी बाळगले.   

अनुभवाची शिदोरी सोबत असल्यामुळे आपल्याला जे काही सुरू करायचे आहे, त्या व्यवसायाचे कौशल्य अंगी असल्याने मी स्वत:चे हॉटेल सुरू करण्यासाठी कुठून अर्थसहाय्य मिळेल का याचा विचार सुरू केला. यातूनच मला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडे संपर्क करण्याचा मित्रांनी सल्ला दिला. त्यानुसार मी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत भेट घेतली. त्यांनी माझ्यातला आत्मविश्वास पाहून व पडेल ते काम करण्याची माझी तयारी पाहून साडेनऊ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. यातूनच नांदेडमध्ये स्वत:चे एक हॉटेल (धाबा) सुरू करू शकलो यावर माझा मलाच कधीकधी विश्वास बसत नाही, असे शिंदेनी सांगतात. दर महिन्याला 23 हजार 300 एवढा हप्ता आजवर मी नित्यनियमाने फेडत आलो आहे. येत्या काही महिन्यात माझे हे संपूर्ण कर्ज पूर्णपणे फिटलेले असेल. नंतर ते हॉटेल विनाकर्जाचे असेल, हे त्यांचे स्वप्न साकार होणार आहे.   

नांदेड येथील महाराणा प्रतापसिंह चौक येथे बाळु शिंदे यांनी भाड्याचे जागा घेऊन हॉटेल तुळजाई अर्थात धाबा सुरू केला आहे. हॉटेल तुळजाईसाठी त्यांनी घरातील सर्व मनुष्यबळ उपयोगात घेतले हे विशेष ! कामाची लाज बाळगुन चालणार नाही, मला हे जमणार नाही, आपले हे काम नाही असा भेदभाव मनात कधीच येऊ दिला नाही. त्याच श्रद्धेने माझे मुले त्यांचे शिक्षण पूर्ण करत हॉटेलमध्ये किचनचे काम करतात हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे, असे शिंदे सांगतात. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने माझ्या स्वयंरोजगाराच्या कल्पनेला उचलून घेत जे कर्ज दिले आहे, जी योजना दिली आहे त्यामुळे मला पुढे येता आले, असे स्पष्ट सांगण्याचा निर्मळपणा बाळु शिंदे यांनी जपला आहे. 

विनोद रापतवार,

जिल्हा माहिती अधिकारी नांदेड.   

 






    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...