Thursday, September 9, 2021

 नांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित तर 2  कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 705 अहवालापैकी 2 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 273 एवढी झाली असून यातील 87 हजार 588 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 34 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 651 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे उमरखेड 1, तर ॲटीजन तपासणीद्वारे लोहा तालुक्यांतर्गत 1 असे एकुण 2 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील एका कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. यात शासकीय वै.कीय महाविद्यालय विष्णुपुरी 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 34 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 9, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 16, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 5, खाजगी रुग्णालय 4  व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 18 हजार 436

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 15 हजार 299

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 273

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 588

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 651

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.2 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-16

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-34

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4

00000

 जिल्ह्यातील 97 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 97 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. शुक्रवार 10  सप्टेंबर 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पौर्णिमा नगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, या 13 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पौर्णिमा नगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, या 13 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस डोस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत.  

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. जिल्ह्यात 8 सप्टेंबर 2021 पर्यंत एकुण 11 लाख 14 हजार 479 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 8 सप्टेंबरपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 9 लाख 90 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 3 लाख 2 हजार 80 डोस याप्रमाणे एकुण 12 लाख 92 हजार 110 डोस प्राप्त झाले आहेत. 

 केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणी सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 सर्व समावेशक महिला सल्लागार समिती गठीत करण्याबाबत प्रस्ताव करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका ) दि. 9 :- महिला व बालविकास विभागातर्गत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावरील विविध समित्या एकत्रित करुन सर्व समावेशक महिला जिल्हा सल्लागार समिती गठीत करण्याच्या शासन निर्णय निर्गमित झालेला आहे.

या समितीत स्थानिक महिला संघटनांचे /संस्थाचे /दोन प्रतिनिधी तसेच महिलाच्या कायद्या संदर्भात कार्यरत पाच अशासकीय महिला कार्यकर्ते यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड करावयाची आहे. त्यासाठी इच्छूक व पात्र महिला संघटना, संस्था व कायद्याच्या संदर्भात अशासकीय महिला कार्यकर्त्यांनी शैक्षणिक पात्रता व कार्याचा अनुभवासह परिपूर्ण प्रस्ताव 16 सप्टेंबर 2021 पर्यत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, शास्त्री नगर, भाग्यनगर नांदेड येथे सादर करावेत.  अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दु. क्र. 02462-261242 यावर संपर्क करावा, या असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. अब्दुल रशिद शेख यांनी केले आहे.

0000

 

विमा दावा मंजूर होण्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरित विमा कंपनीस कळवावे

 - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 नांदेड (जिमाका) दि. 9 :- नांदेड जिल्ह्यात 1 सप्टेंबरपासून अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना मोठया प्रमाणात पुर येऊन शेती व पिकाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे.  विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीची पुर्व सुचना संबधीत शेतकऱ्यांनी तात्काळ विमा कंपनीस कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. कंपनीच्या नियमाप्रमाणे ही माहिती 72 तास म्हणजेच तीन दिवसाच्या आत कळविणे क्रमप्राप्त आहे. 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भुस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गीक आग या नैसर्गीक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते. या जोखीमेंतर्गत शेताचे क्षेत्र पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडुन वाहणारी विहिर किंवा पुराचे पाणी शेतात शिरून दिर्घकाळ जलमय राहिल्यामुळे शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो. 

विमा दावा मंजूर होणेसाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती, पुर्वसुचना कंपनीस देणे गरजेचे आहे. त्यासाठी पीक विमाधारक शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरुन क्रॉप इंन्सुरन्स हे ॲप डाउनलोड करुन घ्यावे. त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी किंवा 18001035490 या टोल फ्री क्रमांकावर किंवा supportagri@iffcotokio.co.in या पत्यावर ई- मेलवर नुकसानीची पुर्वसुचना द्यावी. काही तांत्रीक अडचणीमुळे शेतकरी वरील माध्यमांद्वारे विमा कंपनीस पुर्वसुचना देऊ न शकल्यास तालुका प्रतिनिधी, इफ्को टोकीयो विमा कंपनी किंवा संबधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयास  किंवा आपल्या  गावातील संबधित कृषि  सहाय्यकाकडे ऑफलाईन अर्ज सादर करावेत, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालयाने कळविले आहे.

0000


 सुधारीत वृत्त 

"नीट" परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड (जिमाका) दि. 9 :- "नीट" परीक्षा 2021 ही रविवार 12 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 2 ते 5 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील एकूण 21 परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे. या परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.  

या परीक्षा केंद्राच्या परिसरात 12 सप्टेंबर रोजी 2  वाजेपासून ते सांयकाळी 5 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील शंभर मीटर पर्यंतची सर्व झेरॉक्स मशीन चालू ठेवण्यास व भ्रमणध्वनी व पेजर चालू ठेवण्यास प्रतिबंध राहील, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळविले आहे.

00000

 जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील लोकांशी भेट घेऊन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला धीर

 नांदेड (जिमाका) दि. 9 :- सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात विविध भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांची घरे पाण्याखाली आली. काही ठिकाणी छोटे रस्ते व पूल वाहून गेले. या सर्व परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी व जनतेला भेटून धीर देण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज जिल्ह्याचा धावता दौरा केला. यावेळी त्यांच्यासमेवत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, महापौर मोहिनी येवनकर, माजी आमदार वसंत चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त सुनिल लहाने, जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती संजय बेळगे आदी मान्यवर उपस्थित होते. 

नांदेड शहरातील खडकपुरा, दुलेशहा रहेमान, राष्ट्रीय गांधी विद्यालय गाडीपुरा, नावघाट, पाकिजा फंक्शन हॉल देगलूरनाका येथे त्यांनी भेट देऊन नागरीकांशी सुसंवाद साधला. याचबरोबर महानगरपालिका व सेवाभावी संस्थांच्यावतीने केल्या जात असलेल्या मदतीची त्यांनी माहिती घेतली. दुपारच्या सत्रात त्यांनी कंधार तालुक्यातील देवीची वाडी येथील क्षतीग्रस्त पूल व वाहून गेलेल्या शेतीची पाहणी केली. यानंतर मुखेड तालुक्यातील कमळेवाडी, मुखेड येथील क्षतिग्रस्त पूल, नायगाव, लोहगाव येथील लघुसिंचन तलावाचे झालेले नुकसानीचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला. 

दिवसेंदिवस नैसर्गिक आव्हानांची संख्या वाढीस लागली आहे. काही ठिकाणी अचानक होणारी अतिवृष्टी, यामुळे येणारे महापूर, काही ठिकाणी पावसाची हुलकावनी हे सारे पर्यावरण असंतुलनाचे व हवामान बदलाचे संकेत आहेत. केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण जगभर अशा नैसर्गिक आपत्तीला लोकांना तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राज्याच्या मंत्रीमंडळ पातळीवर चर्चा सुरु असून लवकरच याबाबत कृति आराखडा केला जा असल्याची माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. 

जिल्ह्यात विविध रस्ते व पुलांचे झालेले नुकसान हे मोठ्या प्रमाणात आहे. याचाही स्वतंत्रपणे आढावा घेऊन ज्या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत अशा लहान व पाण्याखाली येणाऱ्या पुलांबाबत लवकर निर्णय घेऊन आम्ही याबाबत कायम स्वरुपी मार्ग कसा काढता येईल याचे नियोजन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

देगलूर येथे त्यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सादरीकरणाद्वारे केलेल्या अतिवृष्टी नुकसानीचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी माहिती दिली. उपविभागीय दंडाधिकारी शंक्ती  कदम यांनी तालुक्यातील बिकट परिस्थिती व शासनाच्यावतीने युद्धा पातळीवर केलेल्या मदत कार्याचा आढावा मांडला.

00000  








 माजी आमदार किशनराव राठोड यांना भेटतांना पालकमंत्री अशोक चव्हाण जेंव्हा गहिवरतात !

नांदेड (जिमाका) दि. 9 :- गत एक सप्ताहापासून जिल्ह्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांसह सखल भागात राहणाऱ्या नागरीकांना खूप काही सोसावे लागले. यात मुखेड येथील माजी आमदार किशनराव राठोड यांना आपले पुत्र भगवान राठोड व नातु संदिप भगवान राठोड यांना मुकावे लागले दिनांक 7 सप्टेंबर रोजी मुखेड-कौठा रोडवरील नाल्याच्या पुलावरुन वाहत्या पाण्यात ते चारचाकी वाहनासह वाहून गेले होते. त्यांचे मृतदेह 8 सप्टेंबर रोजी हाती लागले.

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी तातडीने 8 सप्टेंबर रोजी नांदेड येथे धाव घेऊन पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. 9 सप्टेंबर रोजी त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेला नुकसानीचा धावता आढावा घेत माजी आमदार किशनराव राठोड यांच्या भेटीसाठी मुखेड येथील कमळेवाडीकडे धाव घेतली. येथे माजी आमदार किशनराव राठोड यांची त्यांनी भेट घेतली. सांत्वनपर झालेल्या या भेटीत पालकमंत्री अशोक चव्हाण यांना आपला गहिवर आवरता आला नाही. स्व. शंकरराव चव्हाण यांच्यापासून किशनराव राठोड परिवाराचा स्नेह हा आजवर कायम राहत आलेला आहे. आपल्या असंख्य आठवणीला घेऊन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज किशनराव राठोड यांची भेट घेऊन सांत्वन करुन धीर दिला. या वयात ऐवढे मोठे दु:ख पचविणे सोपे काम नाही. जी स्थिती आली आहे त्याला सहन करण्याची इश्वर शक्ती देवो अशी प्रार्थना त्यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार शामसुंदर शिंदे, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार वसंत चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्याची भौगोलिक रचना ही आव्हानात्मक आहे. जिल्ह्यातील नदी-नाल्यांचे प्रमाण व अतिवृष्टी आल्यानंतर असंख्य ठिकाणावरुन वाहणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे अनेकांना अंदाज येत नाही. हा अंदाज न आल्यामुळेच भगवान राठोड व त्यांचे चिरंजीव संदिप राठोड यांनी पुलावरुन वाहत्या पाण्यातून जाण्याचा निर्णय घेतला असावा. पाण्याच्या प्रवाहात हे वाहन वाहत जाऊन झालेली दुर्घटना अतिशय दुर्देवी असल्याचे ते म्हणाले. त्यांनी ज्या ठिकाणी अपघात घडला त्या पुलावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

00000





 गणेश उत्सव काळात डॉल्बी सिस्टीम वापरास बंदी   

नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्ह्यात गणेश उत्सव काळात डॉल्बी सिस्टीम वापरास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रतिबंध केले आहे. हा आदेश 10 सप्टेंबर रोजी मध्यरात्री पासून 19 सप्टेंबर रोजी मध्यरात्री पर्यंत लागू राहणार आहे.

गणेश उत्सव काळात जिल्ह्यातील डॉल्बी चालक-मालकाच्या डॉल्बी सिस्टीम रोखून ठेवण्यासाठी कब्जा असलेल्या ठिकाणच्या जागेवरच त्या सिलबंद करुन प्रतिबंध कराव्यात. डॉल्बी सिस्टीम चालक-मालकांनी डॉल्बी सिस्टीम वापरात उपभोगात आणु नये, असे आदेशात स्पष्ट केले आहे.  

0000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...