Thursday, October 3, 2024

 वृत्त क्र. 897 

मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू 

नांदेड, दि. 3 ऑक्टोबर :  केंद्र शासनाचे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत एन.सी.सी.एफ च्यावतीने जिल्ह्यात खरीप हंगाम 2024-25 मध्ये हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी 1 ऑक्टोबर पासून ऑनलाईन पोर्टलवर नोंदणीसाठी 13 खरेदी केंद्र निश्चित केली आहेत. शेतकरी बांधवांनी ऑनलाईन नोंदणीसाठी चालू हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचा ऑनलाईन पिकपेरा नोंद असलेला 7/12 उतारा, आधारकार्ड व बँकपासबूक इत्यादी कागदपत्रे संबंधित तालुक्यातील खरेदी केंद्रावर देऊन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे. 

प्रत्यक्षात मुंग, उडीद खरेदी 10 ऑक्टोबर व सोयाबीन खरेदी 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. या खरेदी केंद्रात मुखेड तालुक खरेदी विक्री संघ मुखेड, हदगाव तालुका खरेदी विक्री संघ हदगाव, लोहा तालुका खरेदी विक्री संघ लोहा, कृषि उत्पान्न बाजार समिति किनवट, तालुका खरेदी विक्री संघ बिलोली (कासराळी), पंडित दीनदयाल उपाध्याय अभिनव सह. संस्था देगलूर, मृष्णेश्वर फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. धनज (ता. मुखेड), सिद्राम फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. बेटमोगरा (ता. मुखेड), किनवट तालुका कृषिमाल प्रक्रिया  सह. संस्था गणेशपूर (ता. किनवट), तिरुपति शहापूर फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. वन्नाळी (ता. देगलूर), राधामाई फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. रातोळी (ता.नायगाव), अष्टविनायक शेतीमाल खरेदी विक्री सह. संस्था मानवाडी फाटा (ता. हदगाव), व श्रीजगदंब फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. जांब (बु) (ता. मुखेड) या ठिकाणी मार्केटिंग फेडरेशनमार्फत मूग, उडीद, सोयाबीन ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू झाली आहे.

0000

 वृत्त क्र. 896 

युवक-युवतींसाठी मुदखेड, उमरी येथे सोमवारी उद्योग मेळावा   

नांदेड, दि. 3 ऑक्टोबर :  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत नांदेड जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी उद्योग मेळाव्याचे आयोजन सोमवार 7 ऑक्टोबर रोजी मुदखेड पंचायत समिती सभागृह

 व उमरी पंचायत समिती सभागृह या तालुक्यामध्ये सकाळी 10 वा. करण्यात आले आहे. तालुक्यातील व आजूबाजूच्या परिसरातील पात्र, होतकरू सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी सदर मेळाव्यास उपस्थित राहून, या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी यांनी केले आहे.   

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्वसमावेश कार्यक्रम शासनाने ऑगस्ट-2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केलेला आहे. सन 2024-25 साठी नांदेड जिल्हयास एकूण एक हजार युवक-युवतींना वित्तीय संस्थेच्या माध्यमातून लाभ देण्याचे महाराष्ट्र शासनाचे लक्षांक आहे. या योजनेतून मोठया प्रमाणात स्वतःचा उद्योग उभारणी करुन त्याअंतर्गत स्वयंरोजगार निर्मिती होणार असल्याने मुदतीत लक्षांक पूर्ती होण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. 

त्याचाच एक भाग म्हणून या योजनेतंर्गत 7 ऑक्टोबर 2024 रोजी मुदखेड व उमरी या दोन तालुक्यांमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात कर्जमंजूरी प्रस्तावाबाबत अर्ज अपलोड करणे, मंजूरीच्या प्रक्रियेबाबत जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाचे अधिकारी तसेच बँकेचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी अनुषंगिक व आवश्यक त्या पुढील कागदपत्रासह या मेळाव्यास उपस्थित राहावे. तसेच या योजनेंतर्गत कर्ज प्रस्ताव प्रलंबित असलेल्या अर्जदारांनी आवश्यक त्या कागदपत्रासह, कारणासह पूर्ततेसाठी उपस्थित राहावे. 

आधार कार्ड. पॅन कार्ड, रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, दोन फोटो, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल,जातीचा दाखला, व्यवसायानुंषिक इतर परवाने आवश्यक आहेत. ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असून अधिक माहितीसाठी सदर योजनेचे https://maha-cmegp.gov.in संकेतस्थळ आहे, असेही आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

00000

वृत्त क्र. 895 

राज्य शासनाच्या महिला विषयक धोरणांची मांडणी मेळाव्यातून व्हावी : जिल्हाधिकारी 

 7 ऑक्टोंबरच्या नवा मोंढा येथील महिला मेळाव्यासाठी प्रशासनाची तयारी 

 जिल्हा प्रशासनाकडून महिला सशक्तिकरण अभियानाचा आढावा 

नांदेड दि. 3 ऑक्टोबर : नवा मोंढा मैदानावर सात ऑक्टोबरला होणाऱ्या महिला सक्षमीकरणाच्या मेळाव्याची तयारी प्रशासन करत असून जिल्ह्यामध्ये महिला सक्षमीकरणा संदर्भात यशस्वी झालेल्या वेगवेगळ्या योजना व उपक्रमांची योग्य मांडणी करण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जिल्ह्यातील यंत्रणांचा आढावा त्यांनी आज घेतला. 

राज्य शासनाच्या पथदर्शी योजनातून मोठ्या प्रमाणात निधी सामान्य जनतेपर्यंत पोहोचला आहे.अनेक योजना, उपक्रमातून अनेकांना लाभ मिळाला आहे. याशिवाय जिल्ह्यातील प्रत्येक यंत्रणेमार्फत कृषी,महिला, युवक, कामगार, महिला बचत गट, शिक्षण महिला सक्षमीकरण आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे या सर्व निर्णयाचे प्रतिबिंब या मेळाव्यात दिसायला हवेत अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या. 

सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने येणाऱ्या महिलांच्या प्रवासाची खाणपणाची आरोग्याची तसेच सुरक्षिततेची पुरेशी काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून ज्याला जे काम नेमून दिले ते जबाबदारी करण्याची सूचनाही त्यांनी या बैठकीत केली. 

बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रूपाली रंगारी कोल्हे, यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. 

राज्य शासनाने मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान सुरू केले असून या संकल्पनेतून सर्व जिल्ह्यांमध्ये राज्य शासनाच्या पथदर्शी योजनांमधील लाभार्थ्यांची संवाद साधने व त्यांना प्रत्यक्ष या योजनाचा कार्यक्रमांमध्ये लाभ देणे सुरू आहे. विविध जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत कार्यक्रम झाले असून आता नांदेडमध्ये देखील ७ ऑक्टोबरला हा कार्यक्रम होणार आहे. 

नवा मोंढा येथील मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

या कार्यक्रमांमध्ये रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले असून शेकडो पैठणीचे वाटपही होणार आहे. महिलांसाठी वाहन व्यवस्था करण्यात आली असून यासंदर्भात यंत्रणेकडून महिलांशी संपर्क साधणे सुरू आहे.

00000






 वृत्त क्र. 894 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड, दि. 3 ऑक्टोबर : नांदेड जिल्ह्यात 4 ऑक्टोबर 2024 चे सकाळी 6 वाजेपासून ते 18 ऑक्टोबर 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.  

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 4 ऑक्टोबर चे सकाळी 6 वाजेपासून ते 18 ऑक्टोबर 2024 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 

वृत्त क्र. 893 

 नांदेड जिल्हयाचा आज शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा 

 कुसुम सभागृहात सकाळी 10 वा. कार्यक्रमाचा शुभारंभ  

नांदेड, दि. 3 ऑक्टोबर : जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिकविणाऱ्या आपल्या अध्यापन कार्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणाऱ्या शिक्षकांस नांदेड जिल्हा परिषदेकडून जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.  सन 2022, 2023 2024 या शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या एकूण 100 शिक्षकांना शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर, 2024 रोजी येथील कुसुम सभागृहात सकाळी 10 वाजता संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते गौरविण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गिरीश महाजन हे उपस्थित राहणार आहेत. 

 या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ. अजित गोपछडे,  खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार शिवाजी काळगे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार बालाजी कल्याणकर,  आमदार भीमराव केराम, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार डॉ.तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार राजेश पवार, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करणवाल, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. 

या ठिकाणी महावाचन उपक्रमांतर्गत जिल्हा ग्रंथ प्रदर्शन व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास शिक्षण प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे आणि माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी केले आहे.

चौकट

-----------

जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या उपक्रमशील व गुणवंत शिक्षकांना त्यांच्या कार्याबद्दल योग्य वेळी शाब्बासकी मिळावी व ते प्रेरित होऊन नव्या उमेदीने विद्यार्थी विकास साधावा या हेतूने तीन वर्षांपासून प्रलंबित असलेला हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

- मीनल करनवाल,  मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक, जिल्हा परिषद नांदेड.

0000


वृत्त क्र. 892 

तात्‍पुरते फटाका परवानासाठी

26 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड दि. 3 ऑक्टोबर : वर्षे-2024 मध्‍ये दिपावली उत्‍सव 28 ऑक्‍टोंबर ते 3 नोव्‍हेंबर 2024 या कालावधीत साजरा होत आहे. त्‍यानिमित्‍त नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्‍पुरते फटाका परवाना जि‍ल्‍हादंडाधिकारी हे निर्गमित करणार आहेत. जिल्‍हयातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी यांना त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रातील तात्‍पुरता फटाका परवाना निर्गमित करण्‍याचे अधिकार प्रदान करण्‍यात आले आहेत. त्‍यानुषंगाने नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्‍पुरता फटाका परवाना सेतू समिती जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्‍यामार्फत व जिल्‍हयातील उपविभागीय कार्यालयामार्फत त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रातील तात्‍पुरते फटाका परवाना अर्ज विस्‍फोटक अधिनिमय 2008 नुसार 4 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर 2024 या कालावधीत विक्री व स्विकारले जातील. अर्ज स्विकारण्‍याची अंतीम तारीख बुधवार 16 आक्‍टोंबर 2024 आहे.   

तात्‍पुरता फटाके विक्री परवानासाठी विहित नमुन्‍यातील अर्ज पुढे नमुद कागदपत्रांसह आपल्‍या कार्यक्षेत्रातील कार्यालयात दाखल करावा. नमुना AE-5 मधील अर्ज. परवाना घेण्‍याच्‍या दुकानाचा नकाशा ज्‍यात साठा व विक्री करावयाचे ठिकाण, साठवणूक क्षमता, त्‍याचा मार्ग, परिसरातील सुविधा इत्‍यादी तपशील दर्शविण्‍यात यावा. The Explosive Rules 2008 मधील नियम 84 अन्‍वये सदर दुकानातील एकमेकांपासून किमान अंतर 3 मीटर असावे तसेच संरक्षीत क्षेत्रापासूनचे अंतर 50 मीटर असणे आवश्‍यक  आहे. सदर नकाशात दुकान क्रमांक नमुद असावा तसेच सदर नकाशा स्‍थानिक प्राधिकरणा कडून साक्षांकित केलेला असावा. 

अर्जदाराचे दोन पासपोर्ट साईज फोटो. लायसंन्‍स  फीस सहाशे रूपये चलनाची प्रत जोडलेली असावी. एकाच परिसरात सामुहिकरित्‍या दुकाने टाकण्‍यात येत असल्‍यास संबंधीत अर्जदारास देण्‍यात आलेला दुकान क्रमांक नमुद असलेले प्रमाणपत्र (Allotment Letter). आयुक्‍त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड, मुख्‍याधिकारी नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत कार्यालय यांचे नाहरकत प्रमाणपत्र. संबंधीत पोलीस स्‍टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्र व नाहरकत प्रमाणपत्र. जिल्‍हा व्‍यवसायकर अधिकारी,नांदेड या कार्यालयाचे   नाहरकत प्रमाणपत्र. महाराष्‍ट्र प्रदुषण नियंत्रक मंडळ,नांदेड या कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र. विद्युत निरीक्षक, विद्युत निरीक्षण विभाग, उद्योग, उर्जा व कामगार विभाग नांदेड यांचे नाहरकत प्रमाणपत्र. जागेच्‍या मालकी हक्‍काचा पुरावा जोडणे आवश्यक आहे. 

नोंदणीकृत, मान्‍यताप्राप्‍त असोसिएशन मार्फत तात्‍पूरता फटाका परवानासाठी अर्ज केल्‍यास या कार्यालया मार्फत देण्‍यात येणाऱ्या परवान्‍यातील नमूद  अटी व शर्तीनूसार सबंधित दुकानांची उभारणी करणे बंधनकारक राहिल. तसेच कोणत्‍याही विस्‍फोटक नियमांचे व परवान्‍यातील अटी व शर्तीचे उल्‍लंघन होवून कोणताही अनूचित प्रकार घडल्‍यास त्‍याची सर्वस्‍वी जबाबदारी सबंधित असोसिएशनची असेल याबाबत सबंधित असोसिएशनकडील शपथपत्र, दुकानाच्‍या ठिकाणी करण्‍यात आलेली व्‍यवस्‍था तपशील अग्निशमन दल सुरक्षा रक्षक इत्यादी. इतर अटी व शर्ती नियम 84 नुसार. संबधीत तहसिलदार यांचे नाहरकत प्रमाणपत्र शासन स्‍तरावरुन तसेच विस्‍फोटक नियंत्रक व इतर सबंधित विभागाकडून वेळोवेळी फटाका परवाना निर्गमनाबाबत प्राप्‍त होणाऱ्या अटी व शर्तीचे अधीन राहून तात्‍पुरता फटाका परवाना वितरीक केला जाईल.

अर्जदाराने विहित नमुन्‍यातील सर्व कागदपत्रांची पुर्तता केली असल्‍याची खात्री झाल्‍यानंतर सबंधीत कार्यालयाकडून चलन नोंदवून देण्‍यात येईल. चलनद्वारे फिस शासन खाती जमा झाल्‍यानंतर चलनाची प्रत अर्जासोबत जोडून, संबंधीत परिपुर्ण अर्जाच्‍या अनुषंगाने दिनांक 2425 ऑक्टोंबर 2024 या कालावधीत नांदेड महानगरपालिका हद्दीतील परवाने जिल्‍हादंडाधिकारी नांदेड यांच्‍यामार्फत तसेच उ‍पविभागीय दंडाधिकारी यांच्‍या हद्दीतील परवाने सबंधीत उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍या मार्फत निर्गमित केले जातील. 

दिपावली सण-उत्‍सव कालावधीत The Explosive Rules 2008 मधील नियम 84 (6) अन्‍वये एकाच ठिकाणी 50 पेक्षा जास्‍त दुकानास अनुज्ञप्‍ती दिली जाणार नाही. विहित केलेल्‍या साठा व विक्री परिमाणा पर्यंतचाच व्‍यवहार करता येईल.  याबाबत The Explosive Rules 2008 मधील नियमानुसार व SET-X  ते SET-XV  मधील निर्देशानुसार साठा नोंदवही तयार करून ती तपासणीसाठी उपलब्‍ध ठेवावी लागेल. The Explosive Rules 2008 अन्‍वये अनाधिकृतपणे विस्‍फोटक साठा व विक्री करणे हा गंभीर स्‍वरूपाचा अपराध असून तो दंडनीय आहे, असे जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.  

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...