Sunday, January 5, 2025

 वृत्त क्रमांक 24

दर्पण दिनानिमित्त आज जिल्हाधिकाऱ्यांचे व्याख्यान 

नियोजन भवनमध्ये ४ वाजता पत्रकार दिन कार्यक्रम 

नांदेड दि. 5 जानेवारी : 6 जानेवारीला सोमवारी जिल्हा माहिती कार्यालयाने पत्रकार दिनाचे आयोजन केले आहे. नियोजन भवन येथे दुपारी 4 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि बातमीदारी ' या विषयावर पत्रकारांना संबोधित करणार आहेत.

नांदेड जिल्हा प्रशासन, नांदेड पोलीस प्रशासन, जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटना व जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यासाठी,दर्पण दिनाच्या पर्वावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

6 जानेवारी मराठी पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरा होतो. या दिनाचे औचित्य साधून पत्रकारांसोबत प्रशासनाचा संवाद आयोजित करण्यात आला आहे. यावेळी 'कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बातमीदारी ', या विषयावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा बातमीदारीमध्ये कशा पद्धतीने वापर करता येईल, त्याचे फायदे व तोटे याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार उपस्थित राहणार असून ते देखील पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

सोमवार दिनांक 6 जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता जिल्ह्यातील विविध संघटनांशी, माध्यम संस्थांशी, केंद्रांशी संबंधित सर्व प्रिंट इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील पत्रकार बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 23

दीप कांगनेने जिंकली मानाची कुस्ती

 खा. रवींद्र चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते उद्घाटन 

मल्‍लांचे कौशल्‍यपूर्ण डावपेच; एकापेक्षा एक ताकदीचे मल्‍ल

नांदेड दि ५ जानेवारी :  येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात सुरू झालेल्या माळेगाव येथील कुस्तीच्या दंगलीतील मानाची पहिली कुस्ती माळाकोळी तालुका लोहा येथील दीप रविदास कागणे या पहेलवानाने जिंकली असून त्यांनी राम तेलंगे पालम येथील राम तेलंगेची पाठ टेकवली.

माळेगाव यात्रेत वीर नागोजी नाईक मैदानात झालेल्या कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन 

नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार रोहिदास चव्हाण,

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, श्याम दरक, एकनाथ मोरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय बेळगे, माजी शिक्षण सभापती संजय क-हाळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय भोसीकर, हनुमंत धुळगंडे, गट विकास अधिकारी दशरथ आडेराघो, समाज कल्याण अधिकारी आऊलवार, गणेशराव साळवे, डॉ. प्रमोद चिखलीकर, श्रीधर चव्हाण, बंटी पाटील उमरेकर, रोहित पाटील, अनिल बोरगावकर, नरेंद्र गायकवाड, माधव चांदने, केरबा पाटील मन्नान चौधरी, श्रीनिवास मोरे, ग्रामविकास अधिकारी देवकांबळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

माळेगाव येथील आखाड्यावर झालेल्या कुस्ती दंगलीमध्ये नांदेड जिल्ह्यासह लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोलीसह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील पहिलवानांनी हाजरी लावली. लाखो यात्रेकरूंच्या साक्षीने हलगीच्या तालावर अनेक पैलवानांनी आपापल्या डावपेचाद्वारे प्रतिस्पर्धी पैलवानांना चांगलीच पकड दिली. 

 माळेगाव येथील ग्रामपंचायतच्या कार्यालयातून मान्यवरांच्या उपस्थितीत निशान घेऊन श्री खंडोबाचे दर्शन घेतले. यानंतर खंडोबाच्या साक्षीने कुस्तीच्या आखाड्याकडे प्रस्थान करून मान्यवर व यात्रेकरू यांच्या उपस्थितीत कुस्तीची दंगल पार पडली. यावेळी विस्तार अधिकारी धनंजय देशपांडे, सतिश चोरमले यांच्यासह लोहा पंचायत समितीचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परशुराम कौशल्य यांनी केले.

चौकट 

माळेगाव यात्रेला अ दर्जा मिळवून देण्‍यासाठी प्रयत्‍न करणार- खा. रवींद्र चव्‍हाण

माळेगाव देवस्थानाला अ दर्जा मिळवून देण्यासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न करणार असल्‍याचे प्रतिपादन खासदार रवींद्र चव्हाण यांनी केले. याशिवाय, गावकऱ्यांच्या स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्मारक उभारणीच्या मागणीला देखील त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व ते पूर्ण करण्‍यासाठी प्रयत्‍न करणार असल्‍याचे ते म्‍हणाले. तसेच माळेगाव येथे होत असलेल्‍या कुस्‍त्‍या अतिशय काटेकोर पणे नियमांत पार पाडल्या जावेत. कुस्तीच्या कार्यक्रमासह माळेगाव येथील सर्वच कार्यक्रम उत्कृष्टपणे व नियोजनबध्‍द झाल्‍याबद्दल सर्वाचे आभार व्‍यक्‍त केले. यावेळी त्‍यांनी श्री खंडोबाचे दर्शन घेऊन सर्व शेतकरी व कामगार यांना सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली.

चौकट

माळेगाव यात्रेस निधी कमी पडू देणार नाही- आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

माळेगाव यात्रा ही गरीब, कष्टकरी व शेतकरी वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची व श्रद्धास्थान असलेली परंपरागत यात्रा आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी या यात्रेच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याच परंपरेला पुढे नेत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दरवर्षी दोन ते अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून यात्रेचा विकास सुनिश्चित केला जाणार आहे, असे प्रतिपादन आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.

चौकट

माळेगावच्या यात्रेतील कुस्ती दंगली: मल्लांचे अप्रतिम प्रदर्शन

माळेगावच्या यात्रेत कुस्त्यांच्या दंगलींना नेहमीच खास स्थान असते व यावेळीही त्याचा अनुभव घेण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कुस्तीच्या आखाड्यात एकापेक्षा एक ताकदीचे मल्ल उतरले होते. त्यांनी कौशल्यपूर्ण डावपेच, ताकद आणि चातुर्याने आपले प्रदर्शन दाखवले. प्रत्येक मल्लाने आपल्या प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी अप्रतिम खेळ दाखवला. यात्रेतील या कुस्तीच्या दंगलींमुळे संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. लोकांनी जल्लोषात कुस्तीचा आनंद घेतला आणि मल्लांना उत्स्फूर्तपणे प्रोत्साहन दिले.

00000













वृत्त क्रमांक 22

माळेगाव यात्रा ही शेतकऱ्यांच्या परिश्रमांचा सन्मान करण्याचे व्यासपीठ

#दर्पणदिन #पत्रकारदिन #नांदेड