Friday, September 4, 2026

वृत्त क्रमांक 

तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे 

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष हरदीप सिंग गिल यांनी घेतले दर्शन

नांदेड (जिमाका), दि. 4  : राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष हरदीप सिंग गिल यांनी नांदेड येथील दौऱ्यात सुप्रसिद्ध तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले. 

बाबा जीवनसिंग यांचे जन्मदिवस साजरा करण्यासाठी अमृतसर येथून विशेष रेल्वेने आणलेल्या सर्व संगतसोबत श्री. गिल यांनी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे माथा टेकून दर्शन घेतले. 

यावेळी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष हरदीप सिंग गिल यांचा पारंपारिक पद्धतीने शाल, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. यावेळी सुरेश लोट, सरदार अवतारसिंग पहरेदार आदी उपस्थित होते. 

***









 वृत्त क्रमांक 

ऊसावरील ‘पायरीला’ किडीचे वेळीच व्यवस्थापन करावे – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांचे आवाहन

नांदेड (जिमाका), दि. 4 : ऊस पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर परिणाम करणाऱ्या ‘पायरीला’ अथवा पानावरील तुडतुडा या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी वेळीच सतर्क होऊन पिकाची नियमित पाहणी करणे आवश्यक आहे. पायरीला किडीची पिल्ले व प्रौढ कीटक पानातील रस शोषत असल्याने पाने पिवळसर पडतात. तसेच किडीमुळे साचणाऱ्या चिकट मधासारख्या पदार्थावर काळी बुरशी वाढल्याने प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया बाधित होऊन ऊसाची वाढ व उत्पादन घटू शकते. त्यामुळे प्रादुर्भावाची सुरुवातीची लक्षणे दिसताच रासायनिक नियंत्रणाची घाई न करता एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी आठवड्यातून किमान एकदा पिकाची पाहणी करावी. विशेषतः पानांच्या खालच्या बाजूस पायरीलाची पिल्ले, प्रौढ कीटक व अंडीपुंज तपासावेत. शेताच्या बांधावरील तसेच दाट वाढलेल्या उसातील प्रादुर्भावाची प्रथम तपासणी करावी. पिकामध्ये प्रादुर्भावाची सुरुवात दिसताच आवश्यक नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

सर्वेक्षण व देखरेख : पायरीला किडीच्या निरीक्षणासाठी पिकाच्या शेंड्यापासून 15 सें.मी. उंचीवर प्रति 5 एकर एक प्रकाश सापळा लावावा. हे सापळे सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवावेत. तसेच शेतातील वेगवेगळ्या ठिकाणच्या 10 ऊसावरील 20 पानांची पाहणी करून पिल्ले, प्रौढ कीटक व अंडीपुंजांची संख्या नोंदवावी. प्रति पान 3 ते 5 पिल्ले किंवा प्रौढ अथवा 1 अंडीपुंज आढळल्यास ती आर्थिक नुकसान पातळी मानावी.

एकात्मिक व्यवस्थापन : ऊसाचे शेत एकदल तणांपासून स्वच्छ ठेवावे. उसाच्या खालची वाळलेली पाने (पाचट) काढून टाकावीत, कारण त्यावर पायरीलाची अंडी असू शकतात. नत्राचा अतिरेकी वापर टाळून पिकास योग्य प्रमाणात स्फुरद व पालाश द्यावे. पानांच्या मागील बाजूस आढळणारे पांढऱ्या कापसासारखे अंडीपुंज हाताने गोळा करून नष्ट करावेत. शक्य असल्यास सकाळच्या वेळी उसाची पाने हलवून प्रौढ व पिल्ले खाली पाडून नष्ट करावीत. पक्व झालेला ऊस शक्य तितक्या लवकर कापून घ्यावा.

जैविक नियंत्रणाला प्राधान्य : पायरीला किडीच्या नियंत्रणासाठी इपिरिकॅनिया मेलॅनोल्युका या नैसर्गिक शत्रूचा वापर करावा. शेतात इपिरिकॅनियाचा प्रादुर्भाव आढळल्यास रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करू नये. इपिरिकॅनियाचे ४ हजार ते ५ हजार कोश किंवा ४ ते ५ लाख अंडी प्रति एकरी सोडावीत. जास्त परजीवीकरण झालेल्या शेतातून इपिरिकॅनिया गोळा करून कमी परजीवीकरण झालेल्या शेतात सोडावे. तसेच ढालकिडे, लेसविंग, सिरफिड माशी व कोळी यांसारख्या नैसर्गिक शत्रूंचे संरक्षण करावे.

नैसर्गिकरित्या मेटारायझियम अॅनिसोपली या बुरशीने बाधित झालेल्या पायरीलाचा वापर जैविक नियंत्रणासाठी करता येतो. अशा बाधित प्रौढ पायरीला गोळा करून इतर बाधित शेतात सोडावेत. इपिरिकॅनियाचे जिवंत कोश व अंडीपुंज असलेली पाने तसेच जिवंत कोश असलेले पाचट जाळू नये; ते पायरीला प्रादुर्भाव असलेल्या शेतात सोडावे.

रासायनिक नियंत्रण : जैविक शत्रू उपलब्ध नसतील आणि पायरीला किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा अधिक असेल, तरच शिफारशीनुसार रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. त्यासाठी क्लोरपायरीफॉस 20 टक्के ईसी 1500 मिली प्रति हेक्टर 500 ते 1000 लिटर पाण्यात किंवा अॅसिफेट 50 टक्के + इमिडाक्लोप्रिड 1.80 टक्के एसपी 2500 ग्रॅम प्रति हेक्टर 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पायरीला कीड दिसताच रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीची घाई करू नये. प्रथम पिकाचे निरीक्षण करून अंडीपुंज व बाधित पाने नष्ट करावीत, नैसर्गिक शत्रूंचे संवर्धन करावे आणि जैविक नियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा. प्रादुर्भाव तीव्र झाल्यासच शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा वापर करावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

**








 वृत्त क्रमांक 

नोंदणीकृत सहकारी पतसंस्थांनी सुधारित आदर्श उपविधी स्वीकारावेत

नांदेड (जिमाका), दि. 4 : राज्यातील नागरी, ग्रामीण बिगरशेती तसेच पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्थांना सुधारित ‘आदर्श उपविधी’ लागू करण्यास सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी मान्यता दिली आहे. त्यानुषंगाने नांदेड जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत नागरी, ग्रामीण बिगरशेती व पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्थांनी सुधारित आदर्श उपविधीचा स्वीकार करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील संबंधित सर्व सहकारी पतसंस्थांनी आपल्या नजिकच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे सुधारित आदर्श उपविधी ठेवून त्यास मान्यता घेऊन स्वीकार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सुधारित आदर्श उपविधी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.

जिल्ह्यातील सर्व संबंधित नोंदणीकृत सहकारी पतसंस्थांनी सुधारित आदर्श उपविधीचा अवलंब करून आवश्यक कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांच्यावतीने करण्यात आले आहे.

***

वृत्त क्रमांक 

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या 

अंमलबजावणीबाबत सोमवारी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

नांदेड(जिमाका), दि. 4 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे व येथील सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 व सुधारित अधिनियम 2016 च्या प्रभावी अंमलबजावणीबाबत जिल्हास्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन सोमवार, दि. 7 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथील सभागृहात करण्यात आले आहे.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहणार असून पोलीस उपमहानिरीक्षक, पोलीस अधीक्षक तसेच पोलीस अधीक्षक (ना.ह.स. विभाग) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीशी संबंधित विविध शासकीय यंत्रणांमधील अधिकारी व कर्मचारी कार्यशाळेत सहभागी होणार आहेत.

या कार्यशाळेस पुणे येथील बार्टीच्या प्रशिक्षण विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड तसेच येथील अॅड. डॉ. भीमराव हटकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत नागरिकांमध्ये माहिती व जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यशाळेस जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे.

****

 


वृत्त क्रमांक   तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे  राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष हरदीप सिंग गिल यांनी घेतले दर्शन नांदेड ...