Thursday, September 3, 2026

 वृत्त  

पावसाच्या खंड काळात खरीप पीक व्यवस्थापनासाठी कृषि विभागाकडून तातडीच्या मार्गदर्शक सूचना जारी 

लातूर (विमाका), दि. ०३ : लातूर विभागात मागील सुमारे २० दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे. सततच्या पावसाच्या खंडामुळे विशेषतः हलक्या जमिनीतील ओलावा वेगाने कमी झाला असून पिकांना पाण्याचा ताण सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर लातूर विभागातील सर्व तालुक्यांमधील खरीप पिकांची सद्यस्थिती, पावसाचे प्रमाण, जमिनीतील ओलावा आणि पीकनिहाय नुकसानाची पातळी विचारात घेऊन कृषि विभागाने तातडीच्या पीक व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांसाठी सविस्तर उपाययोजना व मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

कृषि विभागाने दिलेल्या सूचनांनुसार, शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची सद्यस्थिती व जमिनीतील ओलाव्याचे नियमित निरीक्षण करून उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा आणि पिकांच्या संवेदनशील वाढीच्या अवस्थांमध्ये संरक्षित सिंचन द्यावे. तसेच कपाशी आणि तूर यांसारख्या पिकांमध्ये जलसंधारणासाठी आंतरमशागतीद्वारे सरी काढून पुढे पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जलसंधारण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी उपट तणांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, जेणेकरून तणमुक्त जमिनीतील ओलावा मुख्य पिकासाठी उपयोगी पडेल. यासोबतच पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आंतरमशागत करून जमिनीला पडलेल्या भेगा बुजवाव्यात, ज्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यास मदत होईल.

पिकांवर पडणारा ताण कमी करण्यासाठी आणि त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विविध अन्नद्रव्ये व जैविक निविष्ठांच्या फवारणीचा सल्ला देण्यात आला आहे. पिकांच्या स्थितीनुसार पोटॅशियम नायट्रेट (१ ते २ टक्के) किंवा ००:५०:३४ (१ टक्का) या अन्नद्रव्यांची दर ८ ते १० दिवसांच्या अंतराने फवारणी करावी, ज्यामुळे पिकांना पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता प्राप्त होते. या व्यतिरिक्त बायो एनपीके, बायोमिक्स आणि मायकोऱ्हायझा यांसारख्या जैविक निविष्ठांचा वापर केल्यास पिकांना जैविक व अजैविक ताण सहन करण्यास मदत होते. फळबागा आणि ऊस पिकांमध्ये जमिनीतील ओलावा संरक्षित ठेवण्यासाठी सेंद्रिय आच्छादनाचा प्रभावी वापर करावा. तसेच पिकांवरील कीड व रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमित पाहणी करून एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करावा.

तसेच, शेततळ्यांमधील साठवलेल्या पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी विशेष तांत्रिक उपाययोजना सुचवण्यात आली असून, त्यासाठी सिटाईल अल्कोहोल २० मिली प्रति चौरस मीटर या प्रमाणात दर १० दिवसांनी पाण्याच्या पृष्ठभागावर पसरवावे, असे आवाहन लातूर विभागीय कृषि सहसंचालक महेश तीर्थकर यांनी केले आहे.

ठळक मुद्दे :

          पिकांची सद्यस्थिती व जमिनीतील ओलाव्याचे नियमित निरीक्षण करण्यात यावे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून संवेदनशील अवस्थेतील पिकांना संरक्षित सिंचन द्यावे.

          कपाशी, तूर पिकांत जलसंधारण सरी काढून पुढे पडणा-या  पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जलसंधारण करावे.

          उपट तणांना काढून  तण नियंत्रण करावे जेणेकरून जमिनीतील ओलावा टिकून राहून पिकासाठी उपयोगी पडेल.

          पिकांच्या अवस्थेनुसार आंतरमशागतीच्या माध्यमातून जमिनीतील भेगा बुजवून ओलावा टिकवून ठेवावा.

          पिकांवरील कीड व रोगांचे नियमित निरीक्षण करून एकात्मिक व्यवस्थापन करावे.

          फळबाग आणि ऊसामध्ये आच्छादनाचा वापर करून जमिनीतील ओलावा संरक्षित करावा.

          पिकांच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांची फवारणी करावी. त्यासाठी पोटॅशियम नायट्रेट (१ ते २ टक्के), ००:५०:३४ (१ टक्के) अशा अन्नद्रव्यांची फवारणी दर ८ ते १० दिवसांनी करावी जेणे करून पिकांना पाण्याचा ताण सहन करता येईल.

          जैविक निविष्ठा जसे बायो एनपीके, बायोमिक्स, मायकोऱ्हायझा  इत्यादींचा वापर करावा जेणेकरून जैविक व अजैविक ताण सहन करण्यास पिकांना मदत होईल.

          शेततळ्यातील पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी सिटाईल अल्कोहोल 20 मिली/चौ मी  दर १० दिवसांनी पाण्याच्या पृष्ठभागावर पसरावे.

***

 वृत्त क्रमांक 

स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

नांदेड (जिमाका), दि. ३ : अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता स्वाधार योजनेचा लाभ घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी नूतनीकरणाचे अर्ज दि. १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

अनुसूचित जातीतील ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आणि समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेले पात्र विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. महानगरपालिका क्षेत्रापासून पाच किलोमीटरच्या आत तसेच नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आणि तालुक्याच्या हद्दीतील महाविद्यालयांमध्ये प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नूतनीकरणाचा अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर आपल्या यूजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करून अर्ज परिपूर्ण कागदपत्रांसह ऑनलाइन सादर करावा. अर्जाची सद्यस्थितीदेखील याच संकेतस्थळावर तपासता येणार आहे. आजअखेर नूतनीकरणाचे अत्यल्प अर्ज प्राप्त झाले असल्याने पात्र विद्यार्थ्यांनी मुदतीचा लाभ घेऊन तत्काळ अर्ज सादर करावा. दि. १५ सप्टेंबर २०२६ नंतर नूतनीकरणाचा अर्ज सादर करता येणार नाही. याबाबत विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तसेच ई-मेलवर संदेश पाठविण्यात आले आहेत.

नवीन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेशाची प्रक्रिया सुरू

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी संबंधित वसतिगृहाशी संपर्क साधून तत्काळ प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत.

अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असताना स्वाधार योजनेचा लाभ घेतलेल्या आणि पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक कारणामुळे वसतिगृह प्रवेशाची संधी उपलब्ध होत नव्हती. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच ते वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहू नयेत, यासाठी त्यांना वसतिगृह प्रवेशासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी वसतिगृहास भेट देऊन प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत.

विद्यार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयाच्या अधिकृत Instagram व Facebook पेज samajkalyannanded ला फॉलो करून वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणारी अधिकृत माहिती पाहावी. तसेच विद्यार्थ्यांसाठी अधिकृत व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आले असून, त्यांनी त्यामध्ये सहभागी व्हावे. कोणत्याही अनधिकृत ग्रुप किंवा व्यक्तीकडून मिळणाऱ्या माहितीवर अवलंबून न राहता अडचणी किंवा शंका असल्यास समाज कल्याण कार्यालयातील संबंधित टेबलच्या कर्मचाऱ्यांशी थेट संपर्क साधावा.

स्वाधार योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य मिळत असल्याने पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपला परिपूर्ण अर्ज विहित मुदतीत सादर करावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

****

 वृत्त क्रमांक 

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष हरदीप सिंग गिल यांचा नांदेड दौरा

नांदेड (जिमाका), दि. 3 : राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष हरदीप सिंग गिल हे दि. 4 सप्टेंबर, 2026 रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 

शुक्रवार, दि. 4 सप्टेंबर रोजी दुपारी 3.20 वाजता गाझीयाबाद विमानतळ येथून विमानाने प्रयाण करुन सायंकाळी 5.10 वाजता नांदेड विमानतळावर आगमन. सायंकाळी 5.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सफाई कर्मचारी आढावा बैठकीस उपस्थिती व सर्कीट हाऊस, नांदेड येथे मुक्काम राहील. शनिवार, दि. 5 सप्टेंबर रोजी सकाळी 5 वाजता वाहनाने पुणेकडे प्रयाण करतील. 

***

  वृत्त    पावसाच्या खंड काळात खरीप पीक व्यवस्थापनासाठी कृषि विभागाकडून तातडीच्या मार्गदर्शक सूचना जारी   लातूर (विमाका), दि. ०३ : लातूर वि...