Monday, August 31, 2026

वृत्त क्रमांक 

नांदेड जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

मतदारांनी 30 सप्टेंबरपूर्वी दावे व हरकती नोंदवाव्यात-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन

नांदेड(जिमाका), दि. 31 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकाच्या अनुषंगाने विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम  राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत आज दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

प्रारूप मतदार यादी सर्व तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालये तसेच संबंधित मतदान केंद्रांवर नागरिकांच्या पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच प्रारूप मतदार यादीसोबत अनुपस्थित, स्थलांतरित, मयत व दुबार मतदार यांची यादी जिल्ह्याच्या अधिकृत https://nanded.nic.in या संकेतस्थळावर⁠ प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दावे व हरकतींसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत

प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीची तारीख 31 ऑगस्ट 2026 असून, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 असा आहे. दावे व हरकतींवर सुनावणी घेऊन त्यांचा निपटारा 29 ऑक्टोबर 2026 पर्यंत करण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मतदारांनी यादीतील नाव तपासावे

जिल्ह्यातील सर्व मतदारांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव, पत्ता व इतर तपशील अचूक असल्याची खात्री करावी. मतदारांना आपले नाव भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवर⁠ किंवा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या https://voters.eci.gov.in  किंवा https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर⁠ ऑनलाइन तपासता येईल. तसेच संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), तहसील कार्यालय किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयातही मतदार यादीची पाहणी करता येईल.

नवमतदारांसाठी विशेष संधी

ज्या नागरिकांचे वय 1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण होत आहे, ते नवमतदार म्हणून नोंदणीस पात्र आहेत. पात्र नागरिकांनी नमुना 6 चा अर्ज घोषणापत्रासह व आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा.

मतदारांसाठी विविध नमुना अर्जांची तरतूद करण्यात आली आहे. नमुना 6 नवीन मतदार नोंदणीसाठी, नमुना 6A परदेशस्थित भारतीय मतदारांच्या नोंदणीसाठी, नमुना 7 मतदार यादीतील नावाला हरकत घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी, तर नमुना 8 नाव, वय, पत्ता आदी तपशीलात दुरुस्ती, अपंगत्वाचे चिन्हांकन किंवा मतदाराचे नाव स्थलांतरित करण्यासाठी वापरता येईल.

नोटीस प्राप्त मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह सुनावणीस उपस्थित राहावे

मतदार यादीतील नाव, वय, इतर तपशीलातील विसंगती किंवा अनमॅपिंगच्या अनुषंगाने मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांनी सुनावणीस उपस्थित राहताना जन्मतारीख व जन्मस्थळ सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत.

1 जुलै 1987 पूर्वी भारतात जन्मलेल्या व्यक्तींनी स्वतःची जन्मतारीख किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारे आवश्यक कागदपत्र सादर करावे. 1 जुलै 1987 ते 2 डिसेंबर 2004 दरम्यान भारतात जन्मलेल्या व्यक्तींनी स्वतःसोबत वडील किंवा आई यांची जन्मतारीख आणि जन्मस्थळ सिद्ध करणारी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. 2 डिसेंबर 2004 नंतर भारतात जन्मलेल्या व्यक्तींनी स्वतःसोबत वडील व आई यांची आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.

पालकांपैकी कोणीही भारतीय नागरिक नसल्यास मतदाराच्या जन्माच्या वेळी संबंधित व्यक्तीचा वैध पासपोर्ट व व्हिसाची प्रत सादर करणे आवश्यक आहे. भारताबाहेर जन्म झाल्यास विदेशस्थित भारतीय दूतावास किंवा मिशनने जारी केलेल्या जन्म नोंदणीच्या पुराव्याची प्रत, तर नोंदणीकरण अथवा नागरिकीकरणाद्वारे भारतीय नागरिकत्व प्राप्त केले असल्यास नागरिकत्व नोंदणी प्रमाणपत्राची प्रत सादर करावी.

मान्य कागदपत्रांमध्ये विविध पुराव्यांचा समावेश

जन्मतारीख व जन्मस्थळ सिद्ध करण्यासाठी सूचक व सर्वसमावेशक नसलेल्या कागदपत्रांच्या यादीमध्ये केंद्र व राज्य शासन तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारकांना दिलेले ओळखपत्र अथवा निवृत्तीवेतन प्रदान आदेश, शासन किंवा स्थानिक प्राधिकरण, बँका, टपाल विभाग, एलआयसी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांनी भारतात निर्गमित केलेले दिनांक 1 जुलै 1987 पूर्वीचे ओळखपत्र अथवा दस्तऐवज, सक्षम प्राधिकरणाचे जन्म प्रमाणपत्र, पारपत्र, मान्यताप्राप्त मंडळ अथवा विद्यापीठाचे मॅट्रिक्युलेशन/शैक्षणिक प्रमाणपत्र, कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र, वनहक्क प्रमाणपत्र, इतर मागासवर्गीय/अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अथवा इतर जात प्रमाणपत्र, लागू ठिकाणी राष्ट्रीय नागरिक नोंदवही, शासकीय अधिकाऱ्यांनी जतन केलेली कौटुंबिक नोंदवही तसेच शासनाकडून निर्गमित जमीन/घर वाटप प्रमाणपत्र आदींचा समावेश आहे.

आधारबाबत भारत निवडणूक आयोगाच्या पत्र क्र. 23/2025-ERS/Vol. II दिनांक 9 सप्टेंबर 2025 (परिशिष्ट-II) अन्वये निर्गमित निर्देश लागू राहतील.

पात्र नागरिकांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा

“लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे अत्यंत आवश्यक आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, विशेषतः तरुण नवमतदारांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील व परिसरातील सर्व पात्र मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे. नजरचुकीने एखादा पात्र मतदार वगळला गेला असल्यास नमुना 6 चा अर्ज घोषणापत्रासह व आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा. कोणतीही त्रुटी अथवा नाव वगळले असल्यास 30 सप्टेंबर 2026 पूर्वी संबंधित बीएलओ किंवा पोर्टलवर दावे व हरकती नोंदवाव्यात.”

मतदार यादीच्या अनुषंगाने झालेल्या सुनावणीत मतदार नोंदणी अधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे अपील करता येईल. तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अपील करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे.

****



वृत्त क्रमांक 

भटके-विमुक्त जमातीतील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रमाणपत्रांचे विशेष शिबिर

हस्सापूर येथील आश्रमशाळेत भटके-विमुक्त दिवस उत्साहात साजरा

नांदेड(जिमाका), दि.31 : भटके-विमुक्त जमातीतील विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली विविध शासकीय प्रमाणपत्रे सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी हस्सापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्राथमिक आश्रमशाळा तसेच जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 31 ऑगस्ट हा भटके-विमुक्त दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांना क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे समग्र वाङ्मय हा ग्रंथ भेट देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग काकडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार (महसूल) सुनील माचेवाड उपस्थित होते.

याप्रसंगी प्राध्यापक, लेखक व कवी अशोक कुबडे यांनी भटके-विमुक्त जमातीचा इतिहास, सामाजिक परिस्थिती, शैक्षणिक प्रगती तसेच विद्यार्थ्यांसमोरील विविध संधी व आव्हाने याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध संधींचा लाभ घेऊन आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

नायब तहसीलदार सुनील माचेवाड यांनी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रासह आवश्यक विविध शासकीय प्रमाणपत्रे मिळविण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे तसेच शासकीय सेवा व योजनांचा लाभ घेण्यासाठी करावयाची कार्यवाही याबाबत मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे मिळवून देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्राचे चालक गणेश मॅकल यांच्या माध्यमातून आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रमाणपत्रे काढताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर होऊन शासकीय प्रक्रियेत सुलभता निर्माण होणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक एस. एल. गायकवाड तसेच प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व्ही. आर. कदम यांचे सहकार्य लाभले. श्रीमती एस. एस. शेळके यांनी स्वागतगीत सादर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डी. आर. कळसे यांनी केले.

या विशेष शिबिरामुळे भटके-विमुक्त जमातीतील विद्यार्थ्यांना शासकीय कागदपत्रे तसेच विविध शासकीय योजना व सेवांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सर्वांगीण विकासाला या उपक्रमाचा निश्चितच लाभ होणार आहे.

***





 वृत्त क्रमांक 

मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

‘खेलेगा भारत, जितेगा भारत’च्या घोषवाक्यासह ४५० खेळाडूंचा सामुदायिक रॅलीत सहभाग

नांदेड(जिमाका), दि. ३१ : महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या अतुलनीय क्रीडायोगदानाची स्मृती जपण्यासाठी तसेच युवकांमध्ये खेळ व क्रीडा संस्कृतीची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन नांदेड जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशन तसेच विविध एकविध क्रीडा संघटनांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त २९ ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित खेळाडूंना क्रीडा शपथ देण्यात आली. सायंकाळच्या सत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन प्राविण्य संपादन केलेल्या खेळाडूंचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी यांनी खेळाडू व प्रशिक्षकांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. “मैदान आपली वाट पाहत आहे. तुमची मेहनत आणि जिद्द दाखवा. जिंकलात तर विनम्र राहा आणि हरलात तर अधिक शिकून पुन्हा मैदानावर उतरा,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच कुटुंबीय व मित्रांना दररोज एक तास खेळ आणि फिटनेस उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद दल, नांदेड कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रशांत राठोड उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव, सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी किशोर पाठक, नांदेड जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. इम्तियाज खान, उपाध्यक्ष विनोद गोस्वामी, सचिव रवी बकवाड, राज्य क्रीडा मार्गदर्शक चंद्रप्रकाश होनवडजकर, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, चंद्रकांत पुलकंटवार, विजय गावंडे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर शिरसाठ आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमास विविध क्रीडा संघटनांचे खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शक, एकनाथ पाटील अकॅडमीचे प्रतिनिधी व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘खेलेगा भारत, जितेगा भारत’च्या घोषवाक्याने सामुदायिक रॅली
राष्ट्रीय क्रीडा दिन सप्ताहाच्या अनुषंगाने ३० ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता सामुदायिक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटनांचे खेळाडू, प्रशिक्षक व मार्गदर्शक तसेच एकनाथ पाटील अकॅडमीचे खेळाडू आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे अधिकारी-कर्मचारी अशा सुमारे ४५० खेळाडूंनी सहभाग घेतला. ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ या घोषवाक्याने रॅली उत्साहात संपन्न झाली.

संपूर्ण कार्यक्रम जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमप्रमुख क्रीडा अधिकारी संजय बेतीवार यांच्या नेतृत्वात यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक चंद्रप्रकाश होनवडजकर, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, संजय चव्हाण, हनमंत नरवाडे, इक्रम शेख, मोहन पवार, सुभाष धोंगडे, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे, सोनबा ओव्हाळ आदींनी सहकार्य केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले, तर आभार क्रीडा अधिकारी संजय बेतीवार यांनी मानले. 
**




Friday, August 28, 2026

वृत्त क्रमांक 

रक्षाबंधनानिमित्त ‘रोड सेफ्टी राखी-२०२६’ उपक्रमाचे आयोजन

वाहतूक नियमांचे पालन करून रस्ते सुरक्षित करण्याचे पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांचे आवाहन

नांदेड, दि. २८ : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहर वाहतूक पोलीस, परिवहन विभाग आणि ‘सेफर इंडियन रोड्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रोड सेफ्टी राखी-२०२६’ या अभिनव जनजागृती उपक्रमाचे आज येथील वझीराबाद सर्कल रोड, पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी वाहनचालक व नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे तसेच रस्त्यावरील इतर वापरकर्त्यांचा आदर करण्याचे आवाहन केले. जीवघेणे रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे आहे. वाहनचालकांनी सतर्क व सुरक्षित वाहन चालविण्याचे कौशल्य आत्मसात करावे, असे त्यांनी सांगितले.

बहुतांश जीवघेणे अपघात हे मानवी चुका तसेच रस्ते सुरक्षेच्या नियमांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे घडतात. त्यामुळे नागरिकांनी रस्ता सुरक्षेबाबतच्या सूचनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या आपल्या कुटुंबीय व प्रियजनांपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

पालकांनी अल्पवयीन मुलांना योग्य वाहन चालविण्याचे प्रशिक्षण आणि वैध वाहन परवाना मिळेपर्यंत कोणतेही वाहन चालविण्यास प्रोत्साहन देऊ नये. तसेच पादचाऱ्यांनी सुरक्षिततेसाठी पदपथांचा वापर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नांदेड शहर वाहतूक पोलीस महानगरपालिका प्रशासनाच्या समन्वयाने शहरातील पदपथांवरील अनधिकृत अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही करीत आहेत. शहरातील रस्ते वाहनचालक, पादचारी आणि सर्व नागरिकांसाठी अधिक सुरक्षित करण्यासाठी नागरिकांनी पोलीस व महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस अधीक्षकांनी केले.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने रस्ता सुरक्षेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविणारा हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी नांदेड शहर वाहतूक पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच ‘सेफर इंडियन रोड्स’च्या सदस्यांचे कौतुक केले.

या कार्यक्रमास वाहतूक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे, ‘सेफर इंडियन रोड्स’चे सदस्य घनशाम ओझा, महेश तिवारी, सोनू उपाध्याय, अंबादास जोशी, तरुण तिवारी, सिमरन तिवारी, राजश्री अडबलवार, वरुण तिवारी, सय्यद जैद अली, नेताल तिवारी, सृष्टी उपाध्याय, राघव तिवारी यांच्यासह नांदेड शहर वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

****





Thursday, August 27, 2026

 विशेष वृत्त

एसआयआरच्या पुढील टप्प्यातील प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व सर्वसमावेशक ठेवा

– मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

पुढील टप्प्यातील कामांसाठी विभागाची यंत्रणा सज्ज! 

छत्रपती संभाजीनगर, दि. २७ : विशेष सखोल पुनरीक्षणाच्या पुढील टप्प्यात प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या अर्ज, सूचना व हरकतींवर तत्परतेने कार्यवाही करण्यासाठी सक्षम यंत्रणा सज्ज ठेवावी. मतदार यादीतील नोंदींची पडताळणी, नमुना क्रमांक ६, ७ व ८ मधील अर्जांवर कार्यवाही आणि आवश्यक दुरुस्त्या नियमानुसार पूर्ण करताना प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व नागरिकाभिमुख ठेवावी, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले. 

छत्रपती संभाजीनगर विभागातील विशेष सखोल पुनरीक्षणाच्या कामाचा श्री. चोक्कलिंगम यांनी स्मार्ट सिटी कार्यालयात आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, परभणी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, लातूर जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, सहआयुक्त मंजुषा मिसकर यांच्यासह संबंधित आठही जिल्ह्यांतील उपजिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी, सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

श्री. चोक्कलिंगम म्हणाले, विशेष सखोल पुनरीक्षणाच्या कामाला गती देण्यासाठी मतदार यादीची पाने आणि नोटिसांची छपाई नियोजनबद्ध पद्धतीने वेळेत पूर्ण करावी. यासाठी जिल्हानिहाय नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी विभागातील आठही जिल्ह्यांतील छपाईची कामे, उपलब्ध यंत्रसामग्री, संबंधित संस्थांची क्षमता आणि कामाचे नियोजन यांचा त्यांनी आढावा घेतला. 

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या सूचना व अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी संबंधित यंत्रणा सक्रिय ठेवावी. एखाद्या नागरिकाचे नाव प्रारूप यादीत आढळून न आल्यास त्याची सध्याची निवासस्थिती तपासून आवश्यकतेनुसार नमुना क्रमांक ६ भरून घेऊन नियमानुसार कार्यवाही करावी. नागरिकांना प्रक्रिया व अर्जांबाबत स्पष्ट आणि सुलभ मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, असे त्यांनी सांगितले.

 प्रारूप मतदार यादीबाबत नागरिकांच्या शंका व सूचनांचे निराकरण करण्यासाठी निवडणूक अधिकारी आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवावा. मतदार यादीतील नोंदींमध्ये झालेल्या बदलांबाबत नागरिकांना स्पष्ट माहिती द्यावी. तसेच नाव समाविष्ट करणे, आवश्यक दुरुस्ती करणे किंवा नियमानुसार वगळण्याच्या प्रक्रियेबाबत योग्य मार्गदर्शन करावे. 

यावेळी एसआयआरच्या पुढील टप्प्यात पात्र मतदारांची नावे मतदार यादीत कायम राहतील तसेच दावे व हरकतींची प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार पूर्ण होईल, यासाठी जिल्हानिहाय यंत्रणा सज्ज ठेवावी. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांनी आपले नाव तपासून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावा किंवा हरकत दाखल करावी. तसेच अनमॅप्ड मतदारांच्या प्रकरणांमध्ये निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी. 

नोटीस बजावणे, कागदपत्रांचे संकलन आणि प्राथमिक पडताळणीसाठी स्थानिक परिस्थितीनुसार योग्य पद्धत स्वीकारावी. पात्र मतदारांचे उपलब्ध मोबाईल क्रमांक, फोटो ओळखपत्र तसेच इतर वैध ओळखपत्रांच्या माध्यमातून संपर्क व पडताळणीची प्रक्रिया सुलभ करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबतीत इतर राज्यांमध्ये अवलंबिलेल्या चांगल्या पद्धतींचा अभ्यास करून त्यांचा अवलंब करता येईल, असे त्यांनी सांगितले. 

नागरिकांचे दावे, हरकती तसेच तक्रारींची तातडीने दखल घेऊन संबंधितांची आवश्यक कागदपत्रे पडताळावीत. पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत अचूकपणे समाविष्ट करण्याची प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करावी, अशी सूचना करून प्रत्येक भारतीय नागरिकाचा मतदानाचा हक्क अबाधित राखण्यासाठी निवडणूक आयोग कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. 

एसआयआरच्या पहिल्या टप्प्यात निवासी स्थितीची पडताळणी करण्यात आली असून, पुढील टप्प्यात प्रारूप मतदार यादी, दावे-हरकती, सुनावणी आणि त्यावरील पुढील कार्यवाहीचे नियोजन आवश्यक आहे. नागरिकत्व असलेल्या नागरिकांना अनावश्यक त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. 

मतदार नोंदणीची प्रक्रिया अधिक व्यापक करण्यासाठी नव्याने पात्र झालेल्या युवकांच्या नोंदणीसाठी विशेष जनजागृती करावी. महाविद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये आणि मतदार साक्षरता मंचांच्या माध्यमातून जनजागृती उपक्रम राबवावेत. निवडणूक प्रक्रियेबाबत राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांच्या माध्यमातून नागरिकांना अचूक माहिती उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले. 

प्रारंभी सहाय्यक आयुक्त श्रीमती मिसकर यांनी छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, हिंगोली, धाराशिव व नांदेड या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या पथकांनी निर्धारित कालावधीत एसआयआरच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केल्याचे सांगितले.

यावेळी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या कामकाजाची माहिती दिली. हाऊस-टू-हाऊस सर्व्हे, एन्यूमरेशन फॉर्मचे वितरण व संकलन, मतदार नोंदींचे मॅपिंग व डिजिटलायझेशन तसेच अनमॅप्ड, अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार नोंद असलेल्या मतदारांची पडताळणी याबाबत जिल्हानिहाय सद्यस्थिती त्यांनी सादर केली. पुढील टप्प्यातील नियोजनाची माहितीही त्यांनी दिली. 

३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी : 

एसआयआरच्या सुधारित वेळापत्रकानुसार ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांना दावे व हरकती दाखल करता येतील. दावे-हरकतींवरील नोटीस बजावण्याची व ते निकाली काढण्याची प्रक्रिया २९ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. 

*******










वृत्त क्रमांक 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ३० ऑगस्ट रोजी नांदेड दौरा

नांदेड(जिमाका), दि. २७ : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहणार आहे.

रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता मुंबई विमानतळ येथून विमानाने नांदेड विमानतळाकडे प्रयाण करतील. दुपारी १२.१५ वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन झाल्यानंतर हेलिकॉप्टरने परभणीकडे प्रयाण करतील.

दुपारी ३.१५ वाजता पोलीस परेड मैदान, हेलिपॅड, परभणी येथून हेलिकॉप्टरने नांदेड विमानतळाकडे प्रयाण करतील. दुपारी ३.४५ वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन झाल्यानंतर शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

****

वृत्त क्रमांक 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 

नांदेड जिल्ह्यातील ५१,३३० शेतकऱ्यांना ३८१ कोटी ९४ लाख रुपयांची कर्जमाफी

नांदेड(जिमाका), दि. २७ : महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत नांदेड जिल्ह्यात कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्यात ५१ हजार ३३० शेतकऱ्यांसाठी ३८१ कोटी ९४ लाख ६७ हजार ३८ रुपये इतकी कर्जमाफीची रक्कम प्राप्त झाली आहे. ही रक्कम जिल्ह्यातील संबंधित बँकांमध्ये वर्ग करण्यात आली असून, लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही संबंधित बँकांकडून सुरू आहे.

यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १ हजार ५३५ कर्जदार शेतकऱ्यांसाठी ११ कोटी ३६ लाख ९ हजार ७३१ रुपये इतकी रक्कम प्राप्त झाली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांनी दिली आहे.

यापूर्वी योजनेच्या पहिल्या टप्प्यात नांदेड जिल्ह्यातील १२ हजार ९२९ पात्र शेतकऱ्यांसाठी १०६ कोटी २४ लाख ९८ हजार २३१ रुपये इतकी रक्कम बँक खात्यात वर्ग करण्यात आली असून, सदर रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर वर्ग करण्यात आली आहे. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेण्यास पात्रता प्राप्त होते.

दरम्यान, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्ह्यातील ७३ हजार ६६६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. अद्याप २३ हजार १०६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही. यापैकी १२ हजार २५७ शेतकऱ्यांकडे अद्याप ॲग्रीस्टॅक आयडी उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे आधार प्रमाणीकरण होऊ शकलेले नाही.

ज्या शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक आयडी नाही, त्यांनी तात्काळ ॲग्रीस्टॅक आयडी काढून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही, त्यांनी विलंब न करता प्रमाणीकरण पूर्ण करून शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

****

वृत्त क्रमांक 

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त २९  ऑगस्ट रोजी पदकप्राप्त खेळाडूंचा होणार सत्कार

नांदेड(जिमाका), दि. २७ : महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती आणि भारताचा समृद्ध क्रीडा वारसा साजरा करण्यासाठी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येणार आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय क्रीडा दिनाची संकल्पना ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ असून ‘आदर, खेळ आणि हालचाल’ या प्रमुख स्तंभांवर आधारित विविध क्रीडा स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन  येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने दि. २८ ते ३० ऑगस्टदरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वाजता ‘डिजिटल डिस्ट्रिब्युट’, ‘२९ चॅलेंज’, ‘पास द बॉल’ आणि ‘स्पोर्ट बंधन’ या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता ‘एक घंटा खेल के मैदान में’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून, सायंकाळी ५ वाजता जिल्हा क्रीडा संकुल, नांदेड येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सत्कार समारंभ होणार आहे.

सन २०२५-२६ या वर्षात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेल्या तसेच प्राविण्य प्राप्त केलेल्या नांदेड जिल्ह्यातील पात्र खेळाडूंनी सत्कारासाठी दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, स्टेडियम परिसर, नांदेड येथे नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता ‘संडेज् ऑन रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीची सुरुवात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बास्केटबॉल मैदान येथून होऊन स्टेडियम कमान, कुसुम सभागृह, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले पुतळा (आयटीआय चौक) मार्गे पुन्हा कुसुम सभागृह व स्टेडियम येथे रॅलीचा समारोप होणार आहे.

या रॅलीमध्ये जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, विविध क्रीडा पुरस्कारार्थी तसेच क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी तथा कार्यासन प्रमुख संजय बेतीवार यांच्याशी संपर्क साधावा , असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी यांनी केले आहे. 

**

#शेतकरीकर्जमुक्ती




 मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धा

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधील १५ ते ३० वर्षे वयोगटातील तरुणांसाठी जिल्हास्तरीय रील्स स्पर्धा.
थीम: Save Soil, Save Water, Secure Tomorrow
विषय: माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे, पारंपरिक मृद व जलसंधारण पद्धती, माती व पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना, आजचे संवर्धन – उद्याचे सुरक्षित भविष्य.
यातील कोणत्याही एका विषयावर रील करू शकता !
रील अपलोड कालावधी: १५ ते ३१ ऑगस्ट
रीलची वेळ: ३० ते ६० सेकंद
रीलच्या सुरुवातीला रीलचा उद्देश, तुमचे नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक.
रील स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करावी.
#SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरणे आणि विभागाच्या अधिकृत अकाउंट mahawalkathon2026 Tag करणे आवश्यक.
रील पोस्ट केल्यानंतर अधिकृत QR Code स्कॅन करून Registration Form भरावा आणि रीलची लिंक Submit करावी.
प्रत्येक जिल्ह्यातील बक्षिसे
प्रथम विजेता: २५,००० रुपये
द्वितीय विजेता: १५,००० रुपये
तृतीय विजेता: १०,००० रुपये
३६ जिल्ह्यातील युवकांच्या कल्पनेसाठी मोठं व्यासपीठ.
तुमची रील बनवा, माती आणि पाणी संवर्धनाचा संदेश द्या आणि महाराष्ट्राच्या जलसंधारण चळवळीत सहभागी व्हा.

 वृत्त क्रमांक 

व्यावसायिक आस्थापनांमध्ये केवळ व्यावसायिक एलपीजी गॅसचा वापर बंधनकारक

मंगल कार्यालये, लॉन, हॉटेल्स व केटरिंग सेवांच्या ठिकाणी दर्शनी भागात सूचना फलक लावण्याचे जिल्हा प्रशासनाचे निर्देश

नांदेड(जिमाका), दि. २७ : नांदेड जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, लॉन, हॉटेल्स तसेच केटरिंग सेवा पुरविणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांनी स्वयंपाकासाठी व अन्य कामांसाठी केवळ व्यावसायिक (कमर्शियल) एलपीजी गॅस सिलिंडरचाच वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात संबंधित आस्थापनांच्या स्वयंपाकघराच्या दर्शनी भागात व्यावसायिक गॅसच्या वापराबाबत स्पष्ट सूचना फलक लावण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आले आहेत.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार व्यावसायिक आस्थापनांमध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा व्यावसायिक कारणांसाठी वापर करणे हा जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५ अन्वये दंडनीय अपराध आहे.

दर्शनी भागात सूचना फलक लावणे अनिवार्य

प्रत्येक मंगल कार्यालय, लॉन, हॉटेल आणि केटरिंग सेवा पुरवठादाराने आपल्या स्वयंपाकघराच्या दर्शनी भागात “येथे केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडरचाच वापर केला जाईल. घरगुती गॅसचा वापर करणे कायद्याने गुन्हा आहे.” असा स्पष्ट आणि ठळक सूचना फलक लावणे आवश्यक आहे.

घरगुती गॅसच्या वापरावर पूर्णपणे बंदी

व्यावसायिक कारणांसाठी कोणत्याही परिस्थितीत घरगुती एलपीजी सिलिंडरचा वापर किंवा त्याचा अवैध साठा करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित आस्थापना चालकांनी आपल्या आस्थापनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलिंडरची उपलब्धता व वापर याबाबत आवश्यक ती दक्षता घ्यावी.

विशेष तपासणी मोहीम

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पुरवठा विभागामार्फत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या तपासणीदरम्यान कोणत्याही व्यावसायिक आस्थापनामध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरचा अवैध वापर अथवा साठा आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, लॉन, हॉटेल्स, केटरिंग सेवा पुरवठादार तसेच इतर व्यावसायिक आस्थापना चालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे आणि तपासणी मोहिमेदरम्यान प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

******

Wednesday, August 26, 2026

मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

‘आपले सरकार’ सेवा केंद्रात वयस्कर शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधा.




 वृत्त 

महिला आर्थिक सक्षमीकरणास प्राधान्य;‘उमेद’मुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी अवजार बँक, कृषी निविष्ठा केंद्रांसह महिलांच्या हातात शेतीची यंत्रे 

मुंबई,दि. 26 : ग्रामीण महिलांना केवळ बचत गटांपुरते मर्यादित न ठेवता त्यांना शेती, व्यवसाय आणि उद्योजकतेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रभावी प्रयत्न राज्य शासन विविध माध्यमातून करत आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’च्या माध्यमातून सक्षणीकरणाचे हे काम ग्रामीण भागात यशस्वीपणे व्यापक स्वरुपात  सुरू आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर, कृषी निविष्ठांची उपलब्धता आणि विविध व्यवसायांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना शाश्वत उत्पन्नाचे साधन मिळत असून, त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला नवी दिशा मिळत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

‘उमेद’ अभियानांतर्गत कृषी अवजार बँक आणि कृषी निविष्ठा केंद्र हे दोन महत्त्वाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. अल्पभूधारक महिला शेतकऱ्यांना महागडी कृषी यंत्रे स्वतः खरेदी न करता भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देणे, हा कृषी अवजार बँकेचा प्रमुख उद्देश आहे.

 ४०८ कृषी अवजार बँकांची उभारणी

वर्ष २०२४-२५ आणि २०२५-२६ या कालावधीत राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील ३५१ तालुक्यांत ४०८ कृषी अवजार बँका स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याचा सुमारे ४० हजार ८०० महिला शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ झाला आहे. या अवजार बँकांमध्ये विविध कृषिपूरक अवजारांसह ट्रॅक्टरचीही सुविधा उपलब्ध आहे. महिला स्वयंसहाय्यता समूह, ग्राम संघ, प्रभाग संघ तसेच महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून या अवजार बँकांचे व्यवस्थापन केले जाते. त्यामुळे या सुविधा केवळ यंत्रसामग्री उपलब्ध करून देणाऱ्या केंद्रांपुरत्या मर्यादित न राहता समुदायाच्या मालकीच्या आणि व्यवस्थापनाखालील कृषी सेवा केंद्रे म्हणून विकसित होत आहेत.

शेतीचा खर्च कमी; उत्पादकतेला हातभार

महागडी कृषी यंत्रे खरेदी करण्याची गरज नसल्याने महिला शेतकऱ्यांचा भांडवली खर्च कमी होत आहे. पेरणी, आंतरमशागत आणि कापणीसारखी कामे आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने वेळेत पूर्ण होत असल्याने शेतीतील कार्यक्षमता वाढण्यास मदत होत आहे. त्याचबरोबर अवजारे भाड्याने देण्याच्या माध्यमातून समुदाय आधारित संस्थांना नियमित उत्पन्नाचा स्रोत मिळत आहे. अवजार बँकांच्या व्यवस्थापन, देखभाल आणि वाहतुकीमुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधीही निर्माण होत आहेत. त्यामुळे एका उपक्रमातून महिला शेतकरी, बचत गट आणि स्थानिक ग्रामीण अर्थव्यवस्था अशा अनेक घटकांना लाभ मिळत आहे.

५४ महिला उत्पादक कंपन्यांकडून कृषी निविष्ठांचा पुरवठा

कृषी निविष्ठांच्या क्षेत्रातही ‘उमेद’च्या माध्यमातून महिलांना नवी संधी उपलब्ध झाली आहे. राज्यातील ५४ महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे बियाणे व खत विक्रीसाठी आवश्यक परवाने उपलब्ध आहेत. या माध्यमातून सुमारे ५४ हजार महिला सभासदांना सेवा दिली जात आहे.

महिला शेतकरी उत्पादक कंपन्या आपल्या सभासदांची मागणी एकत्रित करून मोठ्या प्रमाणावर बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठांची खरेदी करतात. सामूहिक खरेदीमुळे दर्जेदार निविष्ठा वेळेत आणि योग्य दरात उपलब्ध करून देण्यास मदत होत आहे. परिणामी शेतकऱ्यांचा निविष्ठांवरील खर्च आणि बाजारपेठेवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेनेही या उपक्रमाची वाटचाल सुरू आहे.

 रेशन दुकानापासून वीट निर्मितीपर्यंत

‘उमेद’ अभियानाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला कृषी क्षेत्रापुरते मर्यादित न ठेवता विविध व्यवसायांपर्यंत विस्तार दिला आहे. राज्यात स्वयं-सहाय्यता समूहांच्या माध्यमातून रेशन दुकाने, सिमेंट एजन्सी, वीट निर्मिती, केरोसीन एजन्सी आणि टाईल्स निर्मिती यांसारखे व्यवसायही महिलांकडून चालविले जात आहेत.

३२ स्वयं-सहाय्यता समूहांमधील ५८ महिला रेशन दुकाने, तर एका स्वयं-सहाय्यता समूहातील २३ महिला सिमेंट विक्रीचा व्यवसाय सांभाळत आहेत. दोन समूहांमधील २४ महिला वीट निर्मिती व्यवसायात कार्यरत आहेत. याशिवाय दोन महिला केरोसीन एजन्सी, तर दोन महिला टाईल्स निर्मितीचा व्यवसाय चालवत आहेत.

बचत गटातून उद्योजकतेकडे

‘उमेद’च्या माध्यमातून ग्रामीण महिलांचा प्रवास बचत आणि कर्जाच्या चौकटीपलीकडे जाऊन उद्योजकतेकडे होत आहे. व्यवसाय व्यवस्थापन, वित्तीय समावेशन आणि बाजारपेठेशी जोडणी यासाठी संस्थात्मक पाठबळ मिळत असल्याने महिलांची निर्णयक्षमता आणि आर्थिक स्वावलंबन वाढत आहे. ग्रामीण भागातच रोजगार आणि नियमित उत्पन्नाच्या संधी उपलब्ध झाल्याने महिलांच्या कौटुंबिक उत्पन्नाला हातभार लागत आहे. त्याचवेळी गावातील नागरिकांनाही आवश्यक वस्तू आणि सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होत आहेत.

महिला स्वयंसहाय्यता समूहांची सामूहिक ताकद, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि उद्योजकतेला संस्थात्मक पाठबळ यांचा संगम घडवून ‘उमेद’ अभियान ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच गावच्या अर्थव्यवस्थेलाही बळकटी देत आहे. शेतीतील यांत्रिकीकरणापासून व्यवसायाच्या व्यवस्थापनापर्यंत महिलांचा वाढता सहभाग हा ग्रामीण महाराष्ट्राच्या बदलत्या आर्थिक चित्राचा महत्त्वपूर्ण भाग ठरत आहे.

0000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...