वृत्त क्रमांक
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त २९ ऑगस्ट रोजी पदकप्राप्त खेळाडूंचा होणार सत्कार
नांदेड(जिमाका), दि. २७ : महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती आणि भारताचा समृद्ध क्रीडा वारसा साजरा करण्यासाठी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येणार आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय क्रीडा दिनाची संकल्पना ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ असून ‘आदर, खेळ आणि हालचाल’ या प्रमुख स्तंभांवर आधारित विविध क्रीडा स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने दि. २८ ते ३० ऑगस्टदरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वाजता ‘डिजिटल डिस्ट्रिब्युट’, ‘२९ चॅलेंज’, ‘पास द बॉल’ आणि ‘स्पोर्ट बंधन’ या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता ‘एक घंटा खेल के मैदान में’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून, सायंकाळी ५ वाजता जिल्हा क्रीडा संकुल, नांदेड येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सत्कार समारंभ होणार आहे.
सन २०२५-२६ या वर्षात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेल्या तसेच प्राविण्य प्राप्त केलेल्या नांदेड जिल्ह्यातील पात्र खेळाडूंनी सत्कारासाठी दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, स्टेडियम परिसर, नांदेड येथे नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता ‘संडेज् ऑन रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीची सुरुवात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बास्केटबॉल मैदान येथून होऊन स्टेडियम कमान, कुसुम सभागृह, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले पुतळा (आयटीआय चौक) मार्गे पुन्हा कुसुम सभागृह व स्टेडियम येथे रॅलीचा समारोप होणार आहे.
या रॅलीमध्ये जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, विविध क्रीडा पुरस्कारार्थी तसेच क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी तथा कार्यासन प्रमुख संजय बेतीवार यांच्याशी संपर्क साधावा , असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी यांनी केले आहे.
**
No comments:
Post a Comment