Tuesday, November 7, 2023

डाकघर अधिक्षक कार्यालयात 

24 नोव्हेंबर रोजी विमा सल्लागार पदाच्या मुलाखती 

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- डाक विभागाकडून डाक जीवन विमा (पीएलआय) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (आरपीएलआय) योजने अंतर्गत डायरेक्ट एजंट (विमा सल्लागार) च्या भर्तीसाठी मुलाखती घेण्यात येत आहेत. यासाठी अर्ज अधिक्षक डाकघर कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरुन 24 नोव्हेंबर 2023 रोजी कार्यालयीन वेळेत अधिक्षक डाकघर, नांदेड 431601 येथे मुलाखतीसाठी स्वखर्चाने यावे. सोबत बायोडाटा, मूळ कागदपत्र, प्रमाणपत्र / अनुभव प्रमाणपत्र घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन नांदेड विभागाचे अधिक्षक डाकघर यांनी केले आहे.

 


पीएलआय व आरपीएल योजनेच्या एजंट विमा सल्लागार या पदासाठी  पात्रता व मापदंड पुढीलप्रमाणे आहे.  उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 50 वर्षे दरम्यान असावे. शैक्षणिक पात्रतेत अर्जदार हा केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे मान्यताप्राप्त बोर्डाची 10 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावा.

श्रेणी- बेरोजगार, स्वयं बेरोजगार, माजी विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचा माजी विमा एजंट, माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ते, महिला मंडळ कार्यकर्ते, ग्राम प्रधान, ग्राम पंचायत सदस्य इ. टपाल जीवन विमा प्रतिनिधीसाठी थेट असे अर्ज करू शकतात.

उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे होईल. यात व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, जीवन विमा बाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची माहिती इ. बाबीवी चाचणी होईल. निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रुपयांची रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. जी एनएससी/केव्हीपी च्या स्वरूपात असेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल. जो आयआरडीए ची परवाना परीक्षा पास केल्यानंतर कायम स्वरूपाच्या परवाना मध्ये रुपांतरीत केली जाईल. ही परीक्षा ३ वर्षाच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. नियुक्ती ही लायसन्स तत्वावर आणि कमिशन तत्वावर राहील असेही अधिक्षक डाकघर नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

0000

 नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा-2023

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

नांदेड, (जिमाका) दि. 7 :-  महाराष्ट्र नगरपरिषद गट-क परीक्षा-2023 च्या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे  कलम 144  अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.

 

या आदेशात नमूद केलेल्या महाराष्ट्र नगरपरिषद विद्युत अभियांत्रिकी सेवा, विद्युत गट-क (श्रेणी अ,ब आणि क) संवर्गाची ऑनलाईन परीक्षा 9 नोव्हेंबर 2023 रोजी आयऑन डिजीटल झोन, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विष्णुपुरी गेट नं 18 आणि 22 नांदेड या  परीक्षा केंद्रावर एका सत्रात सकाळी 9 ते 11  या वेळेत घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेच्या दिवशी सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंतच्‍या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी  या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस  प्रवेश करता येणार नाही. तसेच या दर्शविलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स / एस.टी.डी./ आय.एस.डी/ भ्रमणध्वनी/पेजर/ फॅक्स/झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.

 0000

 रमाई आवास योजनेतील

3 हजार 549 पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- अनुसूचित जाती तथा नवबौद्ध घटकातील कुटूंबाना घर, निवारा उपलब्ध करुन देण्यासाठी रमाई आवास घरकुल (शहरी व ग्रामीण) योजना राबविली जाते. या योजनेत सन 2023-24 साठी जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील एकूण 3 हजार 549 बेघर व पात्र लाभार्थ्यांना घरकुलास मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त, शिवानंद मिनगिरे यांनी दिली.

 

सन 2023-24 या मध्ये जिल्ह्यासाठी रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रासाठी प्राप्त उदिष्टांच्या अनुषंगाने सर्व ग्रामपंचायत, गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेकडून घरकुलासाठी प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्राप्त प्रस्तावांना पालकमंत्री तथा अध्यक्ष रमाई आवास घरकुल योजना जिल्हा निवड समिती, नांदेड यांच्याकडून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे, असे समाज कल्याण कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणीसाठी

10 नोव्हेंबरपर्यत सहभाग नोंदविण्याचे आवाहन 

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- विद्यार्थ्यांना खेळाविषयी असलेले ज्ञान व कौशल्याबाबत व्यासपीठ उपलब्ध व्हावे. त्यांना भारतीय खेळांचा इतिहास, स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळ, भारतीय खेळाडू इ. बाबत जाणीव जागृती निर्माण होण्यासाठी क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणी घेण्यात येते. केंद्रीय युवक कल्‍याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने फिट इंडिया क्विझ-3 या सामान्य ज्ञान चाचणीसाठी 3 कोटी 25 लाख रुपयांची  बक्षीसे विद्यार्थी व शाळांना वाटप करण्यात आले आहे. या चाचणीत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील शाळा व विद्यार्थ्यांनी https:/fitindia.nta.ac.in/ या संकेतस्थळावर 10 नोव्हेंबरपर्यत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

 

केंद्रीय युवक कल्‍याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने शालेय विद्यार्थ्यासाठी क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या चाचणीत प्राचार्य/ मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळा/ महाविद्यालयातील विद्यार्थी व शाळा यांनी सहभाग नोंदवावा. शालेय विद्यार्थ्यासाठी क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणीचे आयोजन सन 2019 पासुन करण्यात येत आहे. सन 2022 मध्ये फिट इंडिया क्विझ- 2 चे आयोजन करण्यात आले होते. याचप्रमाणे केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यासाठी क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणीचे फिट इंडिया क्विझ-3 साठी शाळा व विद्यार्थ्यांसाठी 3 कोटी 25 लाखांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत, असे जिल्हा क्रीडा कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 दहावी, बारावी परीक्षेचे

अंतिम वेळापत्रक जाहीर   

नांदेड (जिमाका) दि7 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, मरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता दहावी व बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये आयोजित केली आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतुने लेखी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक पुढीलप्रमाणे तयार करण्यात आले आहे. 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम लेखी परीक्षा बुधवार 21 फेब्रुवारी 2024 ते  मंगळवार 19  मार्च 2024 या कालावधीत होईल. माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा इ. 12 वी  बुधवार 20 मार्च 2024 ते शनिवार 23 मार्च 2024 कालावधीत होईल. तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10 वी लेखी परीक्षा शुक्रवार 1 मार्च 2024 ते मंगळवार 26  मार्च 2024 या कालावधीत होईल. दिनांक निहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर 2 नोव्हेंबर 2023 पासून उपलब्ध करुन देण्यात आले आहे. संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. 

परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम राहील. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉटस्ॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये. 

इ. 10 वी प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मुल्यमापन परीक्षा 10 फेब्रुवारी ते गुरुवार 29 फेब्रुवारी 2024 व इ. 12 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मुल्यमापन परीक्षा शुक्रवार 2 फेब्रुवारी  ते 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे असे राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

00000

 रब्बी हंगामासाठी शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी 

प्रकल्पातून 10 नोव्हेंबरला प्रथम पाणीपाळी 


नांदेड (जिमाका) 7 :- शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या धरणातील उपलब्ध पाणी साठ्यानुसार रब्बी हंगाम 2023-24 साठी एकुण दोन पाणी पाळया देण्याचे नियोजन आहे. यात पहिली पाणीपाळी शुक्रवार 10 नोव्हेंबर 2023 पासून देण्याचे नियोजन आहे. याबाबत शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या कालव्यावरील लाभधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता चा.रा.बनसोड यांनी केले आहे. 

शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या धरणातील उपलब्ध पाणी साठ्यानुसार रब्बी हंगाम 2023-24 साठी कालव्यावरील प्रथम पाणीपाळी आवर्तनाचे नियोजन 10 नोव्हेंबर तर दुसऱ्या आवर्तनचे नियोजन 15 डिसेंबर 2023 पासून करण्यात आले आहे. पाऊस व आकस्मिक कारणामुळे पाणीपाळी संख्या, कालावधी व तारखांमध्ये बदल होवू शकतो असेही नांदेड पाटबंधारे विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

रब्बी हंगामातील उभी पिके व चारा पिके या पिकांसाठी कालव्याचे प्रवाही/कालव्यावरील उपसा, नदी-नाल्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यायचे असल्यास लाभधारकांनी मागणी नमुना अर्ज 7  - 7 अ मध्ये भरुन 15 नोव्हेंबर 2023 पुर्वी संबंधित शाखा कार्यालयात सादर करावेत. सिंचनासाठी पाण्याची गरज तसेच विहित नमुन्यातील प्राप्त मागणी अर्ज संख्या विचारात घेवून प्रत्यक्ष सिंचनासाठी पहिली पाणीपाळी 10 नोव्हेंबर 2023 रोजी सुरु करण्याचे नियोजन आहे. शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पांतर्गत व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावित कार्यक्रमानुसार सिंचनासाठी सोडण्यात येणार आहे. तरी प्रकल्प क्षेत्रातील लाभधारकांनी पाणी मागणी अर्ज विहित कालावधीत सादर करावे. तसेच थकीत व चालू पाणीपट्टी वेळेत भरून जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहनीर नांदेड पाटबंधारे विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

0000

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...