Tuesday, December 12, 2023

 वृत्त क्र. 858 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात

त्वचा व गुप्तरोग विभागाचे विस्तारीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपूरी नांदेड येथील त्वचा व गुप्तरोग विभागाचे विस्तारीकरण व नवीन बाहयरुग्ण विभागाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. गणेश मनुरकर, त्वचा व गुप्तरोग विभागाचे डॉ. प्रल्हाद राठोड तसेच महाविद्यालय अंतर्गत असलेल्या सर्व विभागाचे विभाग प्रमुख  व नांदेड येथील नामवंत  त्वचा व गुप्तरोग तज्ञ, सर्व वरिष्ठ निवासी व कनिष्ठ निवासी उपस्थित होते. 

त्वचा व गुप्तरोग विभागामध्ये  सद्यस्थितीत प्राध्यापक डॉ. प्रल्हाद राठोड, सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रियंका कानोजे, डॉ. साक्षी, वरिष्ठ निवासी डॉ. अश्विनी, डॉ. अमित, डॉ. अंकिता, डॉ. पल्लवी, डॉ. दिपीका, कनिष्ठ निवासी -2 डॉ. रुपाली,  डॉ. प्रहर, डॉ. राजकुमार, डॉ. ज्योती, डॉ. प्रणिता, कनिष्ठ निवासी – 1 डॉ. संदेश, व रजिस्टार डॉ. सुधिंद्र  आदी कार्यरत आहेत. 

त्वचा व गुप्तरोग विभागात 2022 पासून प्रत्येक वर्षी एम.डी.च्या 5 जागा भरल्या जातात. विभागाच्या बाहयरुग्ण कक्षामध्ये उपचाराकरीता दररोज सरासरी 150 ते 200 रुग्ण उपचाराकरीता येत असतात. विभागातील सर्व डॉक्टर यांचेकडून उपचाराकरीता आलेल्या  रुग्णांना तत्परतेने सेवा दिली जाते. तसेच आंतररुग्ण कक्षामध्ये आवश्यकतेनुसार रुग्णांना दाखल करुन घेतल्या जाते व त्यांच्यावर योग्य ते उपचार केल्या जातात. 

त्वचा व गुप्तरोग विभागातील नवीन बाहयरुग्ण कक्षामध्ये त्वचारोग, सौंदर्य विकार, गुप्तरोग व कुष्ठरोग यांच्याकरीता उपचार दिला जातो. विभागामध्ये केस विकार करीता पी.आर.पी., सौंदर्य विकार करीता रुग्णांना इलेक्ट्रोकॉटरी, केमीकल पिल, डर्मारोलर, एम.एन.आर.एफ.,लेझर (ND YAG, FRAC. CO2) ची सुविधा अत्यल्प दरात सर्वांसाठी उपलब्ध आहे. गुप्तरोगींकरीता आपल्या येथे त्यांच्या रोगांचे निदान व त्यांचे समुदेशन करुन त्यांना एस.टी.आय. कीट मोफत देण्यात येते. कुष्ठरोग पिडीत असलेले रुग्ण यांच्या रोगाचे निदान करुन त्यांना आजारानिरुप एम.डी.टी. ब्लिस्टर पॅकेट मोफत दिल्या जाते व समाजामध्ये कुष्ठरोगाबददल असलेले गैरसमज दुर करण्यासाठी व त्यांचे समुपदेशन करुन त्यांचे जीवन सुखकर करण्याकरीता मार्गदर्शन केल्या जाते.

00000




 वृत्त क्र. 857 

 18 डिसेंबर रोजी अल्पसंख्यांक हक्क दिवस  

नांदेड (जिमाका) दि. 12 :- महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडून 18 डिसेंबर  हा दिवस “अल्पसंख्यांक हक्क दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो. राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य शासनाची माहिती सर्व नागरिकांपर्यत पोहचावी या उद्देशाने 18 डिसेंबर 2023 रोजी अल्पसंख्याक दिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्याबाबत निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.  

अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव / माहिती होण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयामध्ये अशासकीय समाजसेवी संस्थाच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी गट व विद्यार्थी यांच्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. यात भित्तीपत्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, कार्यक्रमातील विजेत्यांना पारितोषिके, व्याख्यानमाला, चर्चासत्र, परिसंवाद इत्यादीचा समावेश असावा. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत अल्पसंख्याकांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांना मेळावे, चर्चासत्रे इत्यादीद्वारे प्रसिद्धी करावी. जिल्ह्यात हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबविण्यात यावा  असे, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्देशीत करण्यात आले आहे.

0000

 वृत्त क्र. 856 

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन व सप्ताह साजरा करण्याचे निर्देश  

नांदेड (जिमाका) दि. 12 :- राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन 14 डिसेंबर आणि ऊर्जा संवर्धन सप्ताह 14 ते 20 डिसेंबर या कालावधीत साजरा करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व कार्यालयाना दिले आहेत. 

ऊर्जा संवर्धन दिन व सप्ताह साजरा करतांना ऊर्जा संवर्धनाची प्रतिज्ञा द्यावी. तसेच विविध प्रसिध्दीमाध्यमातून जनजागृती, शालेय स्तरावर ऊर्जा संवर्धन विषयांतर्गत निबंध, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करावे. ऊर्जा संवर्धन कायद्यातर्गंत उद्योगक्षेत्रातील पथनिर्देशित ग्राहकांकडून हा आठवडा साजरा करण्यात येणार आहे. तसेच या आठवड्या दरम्यान विविध क्षेत्रासाठी जनजागृतीपर कार्यक्रमांचे उपक्रम राबवून ऊर्जा दिन व सप्ताह साजरा करण्याच्याही सूचना जिल्हा प्रशासनाच्यावतीने दिल्या आहेत.

0000

 वृत्त क्र. 855 

अपहृत मुलीच्या शोधासाठी आवाहन  

 

·         माहिती मिळाल्यास शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे साधावा संपर्क 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- श्रावस्तीनगर नांदेड येथील कु. पल्लवी ज्ञानेश्वर वाघमारे वय 17 वर्षाच्या मुलीला 31 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वा. अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार कल्पना ज्ञानेश्वर वाघमारे यांनी पोलीस स्टेशन शिवाजीनगर नांदेड येथे दिली आहे. 

कु. पल्लवी ज्ञानेश्वर वाघमारे या मुलीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे. तिचे वय 17 वर्षे असून शिक्षण 11 वी पर्यंत झाले आहे. तिचा रंग सावळा असून उंची 5 फुट आहे. चेहरा लांबट तर बांधा मजबुत आहे. तिला मराठी व हिंदी भाषा बोलता येत. या वर्णनाच्या मुलीचा शोध चालू असून ती मिळून आल्यास पोलीस स्टेशन शिवाजीनगर नांदेड येथे 02462-256520 व मोबाईल नं. 9970073425 वर संपर्क करावा, असे आवाहन शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.

00000 



 वृत्त क्र. 854 

आयकर बचतीचा तपशील सादर करण्याचे

निवृत्तीवेतन धारकांना आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- वित्तीय वर्ष 2023-2024 करीता केंद्रशासनाच्या निर्देशानुसार नवीन करप्रणाली ही मुळ करप्रणाली लागू करण्यात आली आहे. नवीन आयकर प्रणालीनुसार 7 लाख 50 हजार पर्यंत आयकर लागू राहणार नाही. आयकर परिगणना जुन्या करप्रणालीने करण्याकरीता निवृत्तीवेतन धारकांनी त्या आशयाचे विनंती अर्ज व त्यासोबत बचतीचा तपशील, अनुषंगिक सहपत्रे कोषागार कार्यालयात दाखल करणे आवश्यक आहे. असा अर्ज प्राप्त न झाल्यास शासनाच्या निर्देशानुसार नवीन कर प्रणालीद्वारे परिगणना करून आयकर कपात करण्यात येईल. निवृत्तीवेतन धारकांनी आयकर बचतीचा तपशील बुधवार 20 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्र. 853

नांदेडकरांनो जन आरोग्य योजनेच्या

ऑनलाईन कार्डासाठी तात्काळ नोंदणी करा

-         मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल   

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- नांदेड जिल्ह्यात एकत्रीत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यासाठी सुमारे 23 लाख पात्र लाभार्थी आहेत. आरोग्य विभागाकडून सर्वांची नोंदणी या योजनेच्या लाभार्थ्यांनी करावी यासाठी गावपातळीवर नियोजन केले आहे. विविध माध्यमातून जनतेला आवाहनही वेळोवेळी करण्यात येत आहे. तथापि सद्यस्थितीत या 22 लाख 89 हजार 441 लाभार्थ्यांपैकी केवळ 27 टक्के लाभार्थ्यांनीच आयुष्यमान कार्डासाठी नोंदणी केल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास आलेले आहे. आरोग्यासाठी बाहेर होणारा खर्च टाळण्यासाठी व विशेषत: न टाळता येणाऱ्या आजारांवर तात्काळ नि:शुल्क उपचारासाठी आयुष्यमान कार्ड अत्यंत गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वाधिक प्राधान्य या बाबीसाठी देऊन ऑनलाईन पद्धतीने तात्काळ नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले आहे.  

 

या योजनेंतर्गत सुमारे 1 हजार 300 पेक्षा अधिक विविध प्रकारच्या व्याधी आजारांवर उपचार व वेळप्रसंगी शस्त्रक्रिया या मोफत पुरविल्या जातात. शासकीय रुग्णालयांसह शासनाने यासाठी काही खाजगी रुग्णालयांनाही अंगिकृत केले असून त्याठिकाणीही या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्वसामान्य व्यक्तीला कोणत्याही आजारावर तात्काळ विनाशुल्क उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी केंद्र व राज्य सरकारने एकत्रीत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही उपलब्ध करून दिली आहे.

 

ग्रामीण भागात अनेक कुटुंबांना उपचाराचा खर्च न परवडल्यामुळे ते कर्जाच्या विळख्यात सापडतात. बऱ्याचवेळा उपचारासाठी टाळाटाळ केल्याने दुरूस्त होणारे आजार बळावून दुर्धर आजारात त्याचे रूपांतर होते. हे टाळण्यासाठी सर्व केशरी, पिवळे, पांढरे रेशनकार्डधारक कुटूंब या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. याचबरोबर प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका, अंत्योदय योजनेचे लाभधारक यांनाही ही योजना लागू आहे. ऑनलाईन अर्ज करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीतील केंद्रचालक, सीएससी सेंटर, आशाताई, अंगिकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र तसेच सर्व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, प्राथामिक आरोग्य केंद्र, नागरी आरोग्य केंद्र आदी सर्व शासकीय रुग्णालयात याबाबत मार्गदर्शन उपलब्ध आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वत:ही मोबाईमध्ये आयुष्यमान ॲप डाऊनलोड करून त्यात आपल्या नावाची नोंदणी करता येईल.

00000   



  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...