Wednesday, November 2, 2022

 लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. लोकशाही दिन सोमवार 7 नोव्हेंबर 2022 दुपारी 12 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे. 

या दिवशी महसूल, जिल्हा पोलिस अधीक्षक , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,  पाटबंधारे विभाग, सार्वजनिक  बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल. 

यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. अर्ज विहित नमुन्यात दोन प्रतीमध्ये असावा (नमुना प्रपत्र 1 ते 1 ड)  तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे. लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील, अशी मााहिती जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिली आहे.

00000

 जिल्ह्यातील 2624 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

4 लाख 15 हजार 636 पशुधनाचे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील एकुण 894 बाधित गावात 2 हजार 624 गाय वर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे. 

आतापर्यंत 122 पशुधन मृत्यूमुखी पडले असून आजारातून बरे झालेले पशुधनाची संख्या 1 हजार 592 आहे. औषधोपचार चालू असलेले पशुधन 910 आहे. सद्यस्थितीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. सद्यस्थितीत 4 लाख 15 हजार 636 प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. मृत्त पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या 54 वर पोहचली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध लसमात्रा असून पशुपालकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी केले.

0000

माहितीच्या गर्दीत सकारात्मकतेचा

आवाज अधिक बुलंद होण्याची आवश्यकता

-  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर  

 

·  13 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे भव्य

पॅन इंडिया कायदेविषयक जागरूकता शिबीर   

नांदेड (जिमाका) दि. 2 :- सर्वांपर्यंत न्याय पोहचण्याच्या उद्देशाने, लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेमधून शासन सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी व्यापक योजना आखते. भारतीय राज्यघटनेने यासाठी विशेष तरतुदी केलेल्या आहेत. त्यानुसार आखलेल्या योजनाद्वारे अनेकांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदतही होते. विविध शासकीय यंत्रणा या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचाव्यात यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. तथापि यातील तांत्रिक अपवाद व वस्तुस्थिती समजून न घेता योजनेच्या हिताविरुद्ध होणारी चर्चा समाजासाठी घातक असून माहितीच्या गर्दीत सकारात्मकतेचा आवाज अधिक बुलंद होण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर यांनी केले. 

नांदेड येथे जिल्हा पातळीवरील पॅन इंडिया कायदेविषयक जागरुकतेच्यादृष्टिने मोठ्या प्रमाणात 13 नोव्हेंबर रोजी शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबिराच्या आढावा बैठकीत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर बोलत होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हा विधी प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश डी. एम. जज, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस उपअधिक्षक डॉ. अश्विनी जगताप, समाज कल्याणचे सहायक आयुक्त तेजस माळवदकर व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. 

जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत कायदेविषयक जागरूकता निर्माण करून त्यांना विविध योजना दिल्यास त्या योजनांचे लाभार्थी म्हणून ते व्यापक हित पाहतील. यातून योजनांचा उद्देश सफल होण्यास मदत होईल. नागरीकरणाच्या या प्रक्रियेत म्हणूनच कायदेविषयक साक्षरता अत्यावश्यक आहे. सर्वसामान्य लोकांना त्यांच्यासाठी ज्या योजना आहेत त्या योजना व्यवस्थित पोहोचविल्या तर खऱ्या अर्थाने त्यांना न्यायाच्या कक्षेत सामावून घेतल्या सारखे आहे. या योजना शिबिराच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचाव्यात हा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर यांनी सांगितले. 

नांदेड जिल्ह्यात सामुहिक प्रयत्नातून गतवर्षी हा विशेष उपक्रम किनवट सारख्या आदिवासी तालुक्यातील मांडवी येथे यशस्वीपणे राबविला आहे. सर्व विभागाच्या समन्वयातून यावर्षीचा हा उपक्रम अधिक यशस्वीपणे राबविण्याची तयारी करू असे अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी सांगितले. या बैठकीत जिल्ह्यातील शासनाच्या विविध प्रमुखांनी आपल्या योजनांची माहिती सादर केली. प्रारंभी जिल्हा विधी प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश डी. एम. जज यांनी पॅन इंडिया कायदेविषयक जागरुकता उपक्रमाबाबत माहिती दिली.  

0000




 पालकमंत्री गिरीश महाजन यांचा नांदेड जिल्हा दौरा 

नांदेड (जिमाका), दि. 2 :- राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज, वैद्यकिय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा नांदेड दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. 

गुरूवार 3 नोव्हेंबर 2022 रोजी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथून रात्री 9 वा. मुखेड तालुक्यातील वसंतनगर येथे आगमन व आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या निवासस्थानी राखीव. त्यानंतर सोयीनुसार शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण व मुक्काम.   

शुक्रवार 4 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 8.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून गुरूद्वारा नांदेडकडे प्रयाण. सकाळी 8.45 वा. गुरूद्वारा नांदेड येथे आगमन. सकाळी 8.45 ते 9.30 वाजेपर्यंत गुरूद्वारा दर्शन. सकाळी 9.30 ते 10.30 वाजेपर्यंत डॉ. अजित गोपछडे यांच्या निवासस्थानी राखीव. सकाळी 10.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडकडे प्रयाण. सकाळी 10.45 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आगमन. सकाळी 10.45 ते 11 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे राखीव. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समिती बैठक. दुपारी 1 ते 1.30 वाजेपर्यंत आमदार राजेश पवार यांच्या निवासस्थानी राखीव, स्थळ फुलेनगर नांदेड. दुपारी 1.30 ते 2.30 वाजेपर्यंत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी राखीव, स्थळ वसंतनगर नांदेड. दुपारी 2.30 ते 3 वाजेपर्यंत महानगर जिल्हाअध्यक्ष प्रवीण साले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, स्थळ भाग्यनगर नांदेड. दुपारी 3 ते सायं. 5 वाजेपर्यंत कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती, स्थळ हॉटेल विसावा पॅलेस एम.आय.डी.सी. नांदेड. सायं. 5 वा. भाजपा जिल्हा कार्यालयास भेट, स्थळ आनंदनगर नांदेड. सायं. 6.15 हजुर साहिब रेल्वे स्थानक नांदेडकडे प्रयाण. सायं. 6.45 वाजता हजुर साहिब रेल्वे स्थानक नांदेड येथे आगमन. सायं 6.50 वा. देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...