Monday, September 13, 2021

 जिल्ह्यातील 101 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 101 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. मंगळवार 14 सप्टेंबर 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पौर्णिमा नगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, रेल्वे हॉस्पिटल या 17 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस व कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तसेच कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस डोस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. जिल्ह्यात 12 सप्टेंबर 2021 पर्यंत एकुण 11 लाख 64 हजार 354 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 13 सप्टेंबरपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 9 लाख 90 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 3 लाख 2 हजार 80 डोस याप्रमाणे एकुण 12 लाख 92 हजार 110 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणी सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 

 जिल्ह्यात नवीन एकही व्यक्ती कोरोना बाधित नाही

दोन कोरोना बाधित उपचारानंतर झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 649 अहवालामध्ये एकही व्यक्ती कोरोना बाधित आढळली नाही. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 282 एवढी आहे. यात 87 हजार 600 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 31 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 651 एवढी आहे. आज जिल्ह्यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरणातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.   

आज 31 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 9, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 12, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 6, खाजगी रुग्णालय 4  व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 21 हजार 21

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 17 हजार 834

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 282

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 600

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 651

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.2 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-10

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-31

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4

00000

 उर्ध्व पेनगंगा प्रकल्प इसापुर धरणाचे दोन दरवाजे उघडले


पैनगंगा नदीपात्रात  1374 क्युसेस पाण्याचा होणार विसर्ग
 
नांदेड (जिमाका) दि. 13 :- उर्ध्व पेनगंगा प्रकल्प (इसापुर धरण) धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्यामुळे व  पाणलोट क्षेत्रात पडलेल्या  पावसामुळे आज 13 सप्टेंबर रोजी सकाळी 9.45 वा. पाणी पातळी 440.85 मीटर इतकी झाली. धरणात सध्या 449.75 दलघमी पाणीसाठा झाला असून धरण 98.51 टक्के भरले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जयपूर बंधाऱ्यामधून 54.66 क्युमेक्स इतका विसर्ग पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे जलाशय पाणीपातळीत वाढ होत आहे. पाण्याचा येवा पाहता इसापूर धरणाचे दोन दरवाजे आज 13 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वा. उघडण्यात आले असून नदीपात्रात 1374 क्युसेस इतका विसर्ग सोडण्यात येणार आहे. यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हे लक्षात घेऊन व संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जिवीत व वित्त हानी होऊ नये यादृष्टीने पैनगंगा नदीकाठच्या दोन्ही तिरावरील गावातील नागरीकांनी आपली जनावरे, घरगुती व शेती उपयोगी सामान सुरक्षीतस्थळी स्थलांतरीत करण्याचे आवाहन उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता अ. बा. जाधव यांनी केले आहे.
00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...