Thursday, May 20, 2021

 

डोसच्या उपलब्धतेनुसार कमी-अधिक प्रमाणात

   जिल्ह्यातील सर्व केंद्रांना लसीचे वाटप 

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- वय 45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीचा दुसरा डोस जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रांना त्या-त्या ठिकाणच्या परिस्थितीनुरुप वाटप करण्यात आला असून नागरिकांनी डोसच्या उपलब्धतेप्रमाणे लसीकरण केंद्रावर पोहचावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. दिनांक 21 मे रोजी पुढीलप्रमाणे केंद्रनिहाय डोसेसची मात्रा उपलब्ध करुन दिली आहे. यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा समावेश आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा, सिडको या 8 केंद्रावर कोविशिल्डचे 100 डोस देण्यात आले. श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा, सिडको या 8 केंद्रावर कोव्हॅक्सिनचे 100 डोस तर शहरी भागात श्रावस्तीनगर व दशमेश हॉस्पिटल या 2 केंद्रावर कोव्हॅक्सिनचे 50 डोस उपलब्ध करुन देण्यात आले.

 

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, माहूर, उमरी, नायगाव, बारड येथे कोविशिल्डचे प्रत्येकी 100 डोस, उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, उमरी, नायगाव येथे कोव्हॅक्सिनचे 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे कोव्हॅक्सिनचे 90 डोस, भोकर कोव्हॅक्सिनचे 50, मुदखेड कोव्हॅक्सिनचे 40, हिमायतनगर कोव्हॅक्सिनचे 30 डोस तर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र (एकुण 67) येथे कोविशिल्डचे प्रत्येकी 100 डोस याप्रमाणात लसीची उपलब्धता करुन दिली आहे.

 

जिल्ह्यात 19 मे पर्यंत एकुण 4 लाख 6 हजार 667 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. जिल्हयात 20 मे पर्यंत कोविशिल्डचे 3 लाख 34 हजार 930 व कोव्हॅक्सिनचे 1 लाख 5 हजार 340 डोस असे एकुण 4 लाख 40 हजार 270 डोस मिळाले आहेत.

 

कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस घेणे वैज्ञानिकांनी अधिक हितावह असल्याचे स्पष्ट केले आहे. 18 ते 44 वयोगटातील लाभार्थीचे लसीकरण तुर्तास थांबविण्यात आले आहे. उपलब्ध कोव्हॅक्सिन लस 45 वर्षावरील लाभार्थ्यांना फक्त दुसरा डोससाठी वापरण्यात येणार आहे. मनपा क्षेत्रातील 45 वर्षावरील लाभर्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच Appointment Session Site Confirm झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

0000

 

एमआयडीसी परिसरातील मिश्र खत

कारखान्याची पथकामार्फत  तपासणी 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- नांदेड येथील एमआयडीसी परिसरातील मिश्र खत उत्पादक कारखान्यांची तपासणी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या निर्देशानुसार नुकतीच करण्यात आली. ही तपासणी कृषी विभाग व महसूल विभाग यांच्या संयुक्त पथकामार्फत करण्यात आली. यावेळी मिश्र खत कारखान्यातील उत्पादन व उपलब्ध साठा तसेच गुणवत्तेसाठी नमुने घेण्यात आले. यापुढेही अशाच प्रकारची अचानक पाहणी करुन खताची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. 

या कारवाईत उपविभागीय दंडाधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार किरण आंबेकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी संतोष नादरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, नांदेड तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी सामान्य तंत्र अधिकारी व महसूल विभागातील नायब तहसीलदार तसेच मंडळ अधिकारी यांचा समावेश होता.

0000



 

435 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड जिल्ह्यात 162 व्यक्ती कोरोना बाधित

तर 3 जणांचा मृत्यू  

नांदेड (जिमाका) दि. 20 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 563 अहवालापैकी 162 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 106 तर अँटिजेन तपासणीद्वारे 56 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 87 हजार 636 एवढी झाली असून यातील 83 हजार 539 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 848 रुग्ण उपचार घेत असून 85 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.                                                                                                        

दिनांक 19 मे 2021 रोजी आश्विनी कोविड रुग्णालयात नायगाव तालुक्यातील शेळगाव येथील 88 वर्षाचा पुरुष, शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे विष्णुपुरी नांदेड येथील 31 वर्षाचा पुरुष व हदगाव येथील 75 वर्षाच्या पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 833 एवढी आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 54, बिलोली 4, लोहा 2, परभणी 3, नांदेड ग्रामीण 6, देगलूर 4, मुदखेड 2, यवतमाळ 3, अर्धापूर 2, धर्माबाद 2, मुखेड 6, बीड 2, किनवट 6, हदगाव 4, हिंगोली 5, बोधन 1 बाधित आढळले तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 7, धर्माबाद 2, लोहा 1, उमरी 4, अर्धापूर 2, हदगाव 1, माहूर 2, परभणी 1, भोकर 3, कंधार 1, मुदखेड 19, दिल्ली 2, देगलूर 4, किनवट 6, मुखेड 1 असे एकूण 162 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 435 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 10, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण व जंम्बो कोविड सेंटर 236, मुखेड कोविड रुग्णालय 30, धर्माबाद तालुक्यातंर्गत 1, अर्धापूर तालुक्यातंर्गत 14, भोकर तालुक्यांतर्गत 7, मालेगाव टी.सी.यु कोविड रुग्णालय 1,  जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 7,  नायगाव तालुक्यांतर्गत 2, मुदखेड कोविड केअर सेटर 15, माहूर तालुक्यातर्गंत 11, बिलोली तालुक्यांतर्गत 1, उमरी तालुक्यातर्गंत 3, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 6, बारड कोविड केअर सेंटर 3, किनवट कोविड रुग्णालय 6, लोहा तालुक्यातर्गंत 3, खाजगी रुग्णालय 76 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 1 हजार 848 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 58, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 56, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 55, बारड कोविड केअर सेंटर 11,किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 43, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 18, देगलूर कोविड रुग्णालय 5, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 16, भोकर कोविड केअर सेंटर 1, नायगाव कोविड केअर सेंटर 5, उमरी कोविड केअर सेंटर 12, माहूर कोविड केअर सेंटर 15, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 9, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 13, धर्माबाद कोविड केअर सेंटर 32, मुदखेड कोविड केअर सेंटर 10, अर्धापूर कोविड केअर सेंटर 5, बिलोली कोविड केअर सेंटर 30, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 4, एनआरआय कोविड केअर सेंटर 14, मांडवी कोविड केअर सेंटर 2, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 7, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 88, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 1 हजार 10, खाजगी रुग्णालय 329 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 82, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 80, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 85, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 32 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 6 हजार 932

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 8 हजार 906

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 87 हजार 636

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 83 हजार 539

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 833

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.32 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-16

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-232

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 848

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-85

00000

 

मान्सूम पूर्व कामे संबंधित यंत्रणांनी वेळेच्या आत पूर्ण करावी

 

- जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- मान्सूम काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी संबंधित यंत्रणांच्या विभाग प्रमुखांनी योग्य ती खबरदारी घेऊन मान्सूम पूर्व कामे वेळेच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदी आणि इतर लहान-मोठ्या नद्या लक्षात घेता जवळपास 337 गावांना पुरांचा धोका हा उद्भवू शकतो. जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्या-त्या भागातून सुरक्षिततेच्या उपाययोजना योग्य पद्धतीने जिल्हा प्रशासनाला हाताळता याव्यात यादृष्टिने सर्व यंत्रणानी दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. मान्सून 2021 च्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. 

या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती अनुराधा ढालकरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांच्यासह परिवहन,  सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे,  महानगरपालिका, आरोग्य,  कृषि,  महसूल विभाग आदी विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष तर तालुकास्तरावरील उपविभागीय अधिकारी,  तहसीलदार, मृद व जलसंधारण, विद्युत, पोलीस, अग्निशमन, शिक्षण, पशुसंवर्धन  विभागाचे अधिकारी व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित होते. 

पावसाळयात उद्भवणाऱ्या विविध खरेदी आपत्तींना तोंड देण्यासाठी आणि सावधगिरीच्या उपाययोजनांचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी डॉ. इटनकर पुढे म्हणाले, जिल्ह्यात 337 गावे पूरग्रस्त आहेत या गावात रंगीत तालीम घ्याव्यात. आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणाची आवश्यक साहित्यांची करावी. 24 तास नियंत्रण कक्षाची स्थापना करुन कक्षातील कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक अद्यावत करावेत. आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी उपस्थित राहतील यांचे नियोजन करावे. आदिवासी व ग्रामीण भागात सर्पदंशासह इतर आजारांवरील उपचार स्थानिक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रातच करावेत. रुग्णाला औषध उपचारासाठी इतरत्र जाण्याची गरज भासू नये. आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी आरोग्य पथकांची नियुक्ती करावी. पावसाळयात उत्पन्न होणाऱ्या साथीच्या रोगराईंना थांबविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात मुबलकपणे औषधी, रक्तसाठा इतर अनुषंगिक साहित्य उपलब्ध करावीत. ब्लिचिंग पावडरची साठवणुक सुरक्षितपणे ठेवून त्याचा योग्य उपयोग करावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इटनकर आरोग्य विभागाला दिले. 

गावांना धोका होऊ नये  यादृष्टीने पाझर तलावाची दुरुस्ती करुन गाळ काढावा. शहरातील धोकादायक इमारतीना नोटीस देवून नियमानुसार कारवाई करावी. पुर परिस्थितीत नदी काठच्या लोकांचे स्थलांतर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी. सुरक्षित स्थळे निश्चित करावीत. तसेच महावितरण, जिल्हा पुरवठा कार्यालय, शिक्षण विभाग, पशुसंवर्धण विभाग, कृषि विभाग यांनाही आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या. 

सर्व प्रमुख यंत्रणांनी  या मान्सून कालावधीत नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवावीत. पाटबंधारे विभागाने गोदावरी व इतर नदीच्या पाणी पातळीचा धोका, इशारा पातळीबाबत उपाययोजना करतांना सर्व विभागांशी समन्वय ठेवून धरणनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.  उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तालुकास्‍तरावर मान्सुन पूर्व तयारीची आढावा बैठक घेवून पूर परिस्थिती प्रतिबंधक कामे मान्सून पूर्वी करावीत. आपत्कालिन नियंत्रण कक्षातील शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मोबाईल संपर्क अद्यावत करावीत. वाहन व्यवस्था सुस्थितीत ठेवावी. विजपातामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी जनजागृती आणि बचाव कार्याचे रंगीत प्रशिक्षण पूर्ण करावेत. नगरपालिका प्रशासनाने शहरातील नाली साफसफाईचे कामकाज युध्‍द पातळीवर करावेत. आपत्ती निवारणाची कामे सक्षमपणे पार पाडावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी यावेळी दिले. 

निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाबाबत करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. 

00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...