Thursday, October 12, 2023

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गत 24 तासात 155 रुग्ण बरे होऊन परतले घरी

 डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात

 गत 24 तासात 155 रुग्ण बरे होऊन परतले घरी

 

·         45 रुग्णांवर शस्त्रक्रिया 

·         885 रुग्णांवर उपचार 

·         रुग्णालयामध्ये भरती रुग्ण 685

 

 नांदेड, (जिमाका) दि. 12 :- येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकुण 885  रुग्णांनी ओपीडीमध्ये उपचार घेतला. सद्यस्थितीत 685 रुग्ण रुग्णालयामध्ये भरती आहेत. मागील 24 तासात म्हणजेच दि. 10 ऑक्टोंबर ते  11 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत एकुण  151 नवीन रुग्णांची भरती झालेली आहे. या 24 तासात  155  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत,  याचबरोबर या 24 तासात  8 अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात नवजात बालक 2(स्त्री जातीचे 2) व प्रौढ 6 (पुरुष जातीचे 4, स्त्री जातीचे 2) यांचा समावेश आहे. 

 

गत 24 तासात एकूण 45 शस्त्रक्रिया झाल्या. यात 28 रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया तर 17 रुग्णांवर लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मागील 24 तासात 27  प्रसुती करण्यात आल्या. यात  10  सीझर होत्या तर 17 नॉर्मल प्रसुती झाल्या अशी माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ. गणेश मनुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. 

 00000

आपत्ती धोके निवारण्यास कटिबद्ध होण्यासाठी प्रत्येक कार्यालयात 13 ऑक्टोबर रोजी घेतली जाईल प्रतिज्ञा

 आपत्ती धोके निवारण्यास कटिबद्ध होण्यासाठी

प्रत्येक कार्यालयात 13 ऑक्टोबर रोजी घेतली जाईल प्रतिज्ञा

 

नांदेड, (जिमाका) दि. 12 :- संयुक्‍त राष्ट्र संघाने आपत्ती धोके कमी करण्यासाठी व लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने  13 ऑक्‍टोबर हा दिवस आपत्‍ती निवारण दिवस म्हणुन जाहीर केला आहे. जगभर हा दिवस आपत्‍ती धोके निवारणासंबंधी जनजागृती करुन व यासंबंधी निरनिराळे उपक्रम राबवुन साजरा करण्‍यात येतो. महाराष्ट्रातही शासनातर्फे दरवर्षी सर्व जिल्ह्यांमध्ये 13 ऑक्टोबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा केला जातो.

सर्व जिल्ह्यामध्ये याबाबत अधिक जागरूकतेसाठी रंगीत तालीम घेण्याबाबत सूचना निर्गमित केल्या आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी नागरिकांना आपत्ती प्रतिसादासाठी कटिबध्द होण्यासंदर्भात सन 2023 यावर्षी प्रतिज्ञा तयार केली आहे. सदर प्रतिज्ञा 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. जिल्ह्यातील सर्व कार्यालयात घेण्यात यावी, असे जिल्हाप्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.  

00000

वाचन प्रेरणा दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा जागर

 वाचन प्रेरणा दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा जागर

 

नांदेड, (जिमाका) दि. 12 :- माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने 15 ऑक्टोंबर हा त्यांचा जन्मदिवस "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार हा दिन साजरा करण्यात यावाअसे आवाहन जिल्हा‍ प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्यभिषेकाच्या औचित्याला अधोरेखित करुन वाचन ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित करुन वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तकांच्या वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

 

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यामध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी व वाचनाची आवड वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने यापुर्वी शासनाकडून सूचना देण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याच्या दृष्टीने सर्व विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीयनिमशासकीय कार्यालयेशासकीय संस्थामंडळसार्वजनिक उपक्रम इत्यादी कार्यालयांनी देखील विविध उपक्रमांचे आयोजन करावे.

 

रविवार 15 ऑक्टोंबर रोजी शासकीय कामकाजाच्या वेळेमध्ये किमान अर्धा तास वाचनासाठी देण्यात यावा.  वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सर्वांनी आपले मित्रकुटुंबातील सदस्य इत्यादींना किमान एक पुस्तक भेट दयावे. व्हॉटसअपइंटरनेटफेसबुकटिवटर अशा प्रकारच्या सामाजिक प्रसार माध्यमातून वाचन संस्कृती वृद्धींगत होईलवाचनास प्रेरणा मिळेल असे संदेश प्रसारीत करावेत. व्याख्यानभाषणचर्चासत्रसामुहिक वाचनअभिवाचनवाचन अनुभव कथनग्रंथप्रदर्शनविविध स्पर्धा, मान्यवरांच्या मुलाखती, परिसंवाद इत्यादी पैकी सुयोग्य उपक्रम राबवावेत. विविध क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्ती ज्यांचा वाचक म्हणूनही लौकिक आहे. त्याचे सहकार्य घेऊन आयोजित कार्यक्रम यशस्वी करण्यात यावेत व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड कार्यालयास सादर करण्यात यावेअसे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय सामान्य प्रशासन शाखा यांनी दिले आहे.

0000

जिल्हा परिषदेच्या गट-क सरळसेवा पदभरती परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 जिल्हा परिषदेच्या गट-क सरळसेवा पदभरती

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

नांदेड, (जिमाका) दि. 12 :-  नांदेड जिल्‍हा परिषद गट-क सरळसेवा पदभरती परीक्षा-2023 च्या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे  कलम 144  अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.

 

या आदेशात नमूद केलेल्या इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विष्णुपुरी नांदेड, होरिझोन इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल नांदेड, राजीव गांधी कॉलेज कॅम्पस विद्युत नगर नांदेड, शामल एज्युकेशन कॅम्पस देगाव रोड समोर  नांदला, दिग्रस, खडकूत या 4 परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात 15 ऑक्‍टोंबर ते 17 ऑक्‍टोंबर 2023 या कालावधीत सकाळी 5 ते रात्री  9 वाजेपर्यंतच्‍या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी  या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस  प्रवेश करता येणार नाही. तसेच या दर्शविलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स / एस.टी.डी./ आय.एस.डी/ भ्रमणध्वनी/पेजर/ फॅक्स/झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.

0000

एनएमएमएस व दिव्यांग शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 एनएमएमएस व दिव्यांग शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, (जिमाका) दि. 12 :- 'राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती (एनएमएमएस) व 'दिव्यांग  विद्यार्थ्यांसाठी  असलेली प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती' या योजनेसाठी अर्ज करण्यास 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरवात झाली आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी 30 नोव्हेंबर 2023 पर्यत अर्ज करावेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले आहे.

लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य -

सन  २०२३-२४ वर्षासाठी केंद्रीय  शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या 'राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती' योजनेसाठी ( एनएमएमएस) राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल ( एनएसपी ) (www.scholarships.gov.in ) वर नवीन आणि नूतनीकरण अर्जांच्या ऑनलाइन नोंदणी व अर्ज भरण्यास 1 ऑक्टोबर पासून सुरवात झाली आहे. नवीन आणि नूतनीकरण नोंदणीची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2023 आहे.

 जिल्ह्यामध्ये  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद  पुणे यांच्यामार्फत एनएमएमएस परीक्षेत शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये निवड  झालेल्या जिल्ह्यातील  सर्व  विद्यार्थ्यांनी 2023-24 शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी नवीन अर्जदार म्हणून इ. 9 वी10 वी 11 वी उत्तीर्ण झालेल्या शिष्यवृत्तीधारकांना स्वतःची नोंदणी आधारनुसार करावी. यापूर्वी शिष्यवृत्ती घेत असलेल्या विद्यार्थ्यांना  शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी 10 वी, 11 वी आणि 12 वी साठी नुतनीकरण अर्जदार म्हणून स्वतःचे नुतनीकरण करावे.

केंद्र शासनाच्या अपंग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग (DEPWD) मार्फत राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (एनएसपी) द्वारे अपंग विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती ( इ. ९ वी  आणि १० वी ) शिष्यवृत्ती लागू केली आहे. एनएसपी २.० पोर्टलवर विद्यार्थ्यांची नोंदणी 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झाली आहे. या योजनचे तपशील ( www.depwd.gov.in ) आणि राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल ( www.scholarships.gov.in ) वर उपलब्ध आहेत.

एनएमएमएस साठी पात्रतेचे निकष

पालकाचे उत्पन्न ३ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे . उत्पन्नाचा दाखला हा सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा आवश्यक. शासकीय , स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित (टप्पा अनुदानासह ) शाळेतील विद्यार्थांना  ही योजना लागू आहे .

केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय तसेच केंद्र /राज्य शासनाकडून वसतिगृहाची सवलत घेत असलेल्या शासकीय तसेच खाजगी विनाअनुदानित शाळेतील, खाजगी अनुदानित सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत. इयत्ता 10 वी नंतर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेत असल्यास शिष्यवृत्तीसाठी अपात्र करण्यात येईल .

इयत्ता 10 वी मध्ये सर्वसाधारण ( जनरल ) विद्यार्थ्यास 60 टक्केपेक्षा अधिक गुण असणे आवश्यक (अनुसूचित जाती / जमातीच्या विद्यार्थ्यास 5 टक्के सुट) इयत्ता 9 वी मधून 10 वी मध्ये गेलेले विद्यार्थी व 11 वी मधून 12 वी मध्ये गेलेले विद्यार्थी प्रथम प्रयत्नात पास होणे आवश्यक आहे .

शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेत विद्यार्थ्यांच्या नावाचेच खाते असावे, संयुक्त खाते नसावे . शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड असावे व त्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न असावे. विद्यार्थीची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा व जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील .

दिव्यांग विद्यार्थांसाठी असलेल्या प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती साठी  पात्रतेचे निकष 

अनुदानित शाळांतील इयत्ता 9 वी व 10 वीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रि - मॅट्रिक शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्याचे दिव्यांगत्वाचे प्रमाण 40 टक्के किंवा जास्त असावे. सक्षम अधिकाऱ्याचे दिव्यांगत्व चे वैध प्रमाणपत्र हे Rights of Persons with Disabilities Act 2016 मध्ये निकषांनुसार असावे. एकाच पालकांच्या २ पेक्षा अधिक अक्षम ( दिव्यांग ) पाल्यांना ही शिष्यवृत्ती लागु नाही. मात्र दुसरे अपत्य जुळे असल्यास त्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल. ही शिष्यवृत्ती एका इयत्तेला एका शैक्षणिक वर्षासाठीच लागु राहील. विद्यार्थ्याने तीच इयत्ता रिपीट केल्यास या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही. विद्यार्थी नियमित असावा.

जर विद्यार्थ्याला एकापेक्षा जास्त शिष्यवृत्ती लागू होत असतील तर विद्यार्थ्याने त्याच्या सोयीनुसार लाभाची ( लाभदायी ) शिष्यवृत्ती स्विकारुन दुसरी शिष्यवृत्ती वरिष्ठ कार्यालयास कळवून रद्द करवून घ्यावी. मात्र विद्यार्थी निवास, निवासासाठी देय अनुदान किंवा अशा प्रकारची राज्यशासनाची किंवा इतर स्त्रोतांकडुन पुस्तके किंवा इतर शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी प्राप्त मदत स्विकारु शकतात.

शिष्यवृत्तीधारक जर केंद्रशासनाच्या किंवा राज्यशासनाच्या अर्थसहाय्यित परीक्षा केंद्रावर प्रशिक्षण घेत असतील तर ही शिष्यवृत्ती सदर कालावधीसाठी बंद राहील. पालकांचे उत्पन्नाच्या सर्व स्त्रोतातून प्राप्त वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयापेक्षा जास्त नसावे .

शिष्यवृत्ती रक्कम-

एनएमएमएसएस साठी वार्षिक 12 हजार रुपये, दिव्यांग विद्यार्थांसाठी असलेली विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती वार्षिक 9 हजार ते 14 हजार 600 रुपये आहे.

वेळापत्रक-

एनएमएमएसएस व प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरवात झाली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर 2023 पर्यत आहे. शाळास्तर अर्ज पडताळणी अंतिम मुदत 15 डिसेंबर 2023 असून जिल्हा स्तर अर्ज पडताळणीसाठी अंतिम मुदत 30 डिसेंबर 2023 आहे.

एनएसपी पोर्टलवरील सर्व योजनांसाठी लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. याबाबतच्या सविस्तर सूचना शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर देण्यात येणार आहेत. दोन्ही योजनांसाठी पात्र लाभार्थानी विहित कालावधीत ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी (योजना) जिल्हा परिषद  नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

00000

 

  

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती (NMMSS)” साठी

30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन  अर्ज भरावेत

          लातूर, दि.12 (विमाका) : केंद्रीय  शिक्षण मंत्रालयशालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या सन  2023-24 वर्षासाठी "राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती(NMMSS)"  www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्यास 01 ऑक्टोबर, 2023 पासून सुरवात झाली आहे. नोंदणी  आणि अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख  30 नोव्हेंबर 2023 असून पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन पुणे येथील शिक्षण संचालनालय(योजना)चे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेल्या शिष्यवृत्ती  योजनेसाठी (NMMSS) राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP 2.0) वर नवीन आणि नूतनीकरण अर्जांची ऑनलाईन नोंदणी  करता येणार आहे. राज्य शिक्षण परिषदेने  राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती  योजनेमध्ये  ज्या विद्यार्थ्यांची 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये निवड झाली आहे. तसेच इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांनी  नवीन अर्जदार म्हणून आधार कार्डनुसार स्वत:ची नोंदणी करावी. यापुर्वी  शिष्यवृत्ती  घेत असलेल्या विद्यार्थांनी  शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी दहावीअकरावी आणि बारावीसाठी नूतनीकरण अर्जदार म्हणून स्वतःची नोंदणी करून नूतनीकरण करून घ्यावे.

NMMSS साठी पात्रतेचे निकष :

1. पालकांचे  उत्पन्न रु . 3,50,000 / - पेक्षा जास्त नसावे . उत्पन्नाचा दाखला हा सक्षम    

     प्राधिकारी यांच्या सहीचा आवश्यक आहे .

2. शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित (टप्पा अनुदान सह ) शाळेतील       

    विद्यार्थांना  सदर योजना लागू आहे .

3. केंद्रीय विद्यालय जवाहर नवोदय विद्यालय तसेच केंद्र, राज्य शासनाकडून वसतिगृहाची   

    सवलत घेत असलेल्या शासकीय तसेच खाजगी विनाअनुदानित शाळेतील खाजगी    

    अनुदानित सैनिकी शाळेतील विद्यार्थी  शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत .

4. इयत्ता 10 वी नंतर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश   

     घेतल्यास शिष्यवृत्तीसाठी अपात्र करण्यात येईल .

5.  इयत्ता 1० वी मध्ये सर्वसाधारण ( जनरल ) विद्यार्थ्यास 60 टक्के पेक्षा अधिक गुण

    (अनुसूचित जाती , जमातीच्या विद्यार्थ्यास 05 टक्के सुट . ) इयत्ता 9 वी मधून 10 वी      

     मध्ये गेलेले विद्यार्थी  व 11 वी मधून 12 वी मध्ये गेलेले विद्यार्थी  प्रथम प्रयत्नात पास    

    होणे आवश्यक आहे .

6. शिष्यवृत्ती  पात्र विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेतील विद्यार्थ्याच्या नावाचेच खाते असावे,     

    संयुक्त खाते नसावे .

7. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड असावे व विद्यार्थ्याच्या बँक खात्याशी आधार   

     कार्ड संलग्न असावे .

8. विद्यार्थीची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा

     व जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे .

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी  (NMMSS) वार्षिक 12,000 रुपये इतकी   शिष्यवृत्ती  देण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यावर शाळास्तर अर्ज पडताळणीची अंतिम तारीख 15 डिसेंबर,2023 तर  जिल्हास्तर अर्ज पडताळणीची अंतिम तारीख 30 डिसेंबर,2023 असणार आहे, असे शिक्षण संचालक श्री. पालकर यांनी  प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.

या संदर्भात अधिक माहितीसाठी शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या 020-26123515 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

 

 

*******

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...