Wednesday, March 29, 2023

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी कार्यक्रमाचा शुभारंभ 

▪️31 मार्च रोजी अर्जापूर येथे होणार मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा जागर

▪️1 एप्रिल रोजी बंदाघाट येथे शाहीर उमप यांच्या कार्यक्रमाने शुभारंभ

▪️मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा जागर 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा शुभारंभ 1 एप्रिल रोजी बंदाघाट येथे होणार आहे. सायं. 5.30 वा. होणाऱ्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार असून खासदार तथा समिती अध्यक्ष प्रतापराव पाटील चिखलीकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकर श्रृंगारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. महाराष्ट्राची लोकधारा आणि लोकपरंपरा यांना वृद्धींगत करणाऱ्या शाहीर नंदेश उमप आणि त्यांच्या 50 पेक्षा अधिक कलाकारांसह असलेले सादरीकरण नांदेडकरांना अनुभवण्याची अपूर्व संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. या समारंभासाठी बंदाघाट येथे गोदावरी काठावर भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. 

या समारंभास आमदार सतिश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार जितेश अंतापुरकर, आमदार भिमराव केराम, आमदार माधव पाटील जवळगावकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार हे मान्यवर यांची उपस्थिती समारंभास राहील. शुभारंभ समारंभानंतर शाहीर नंदेश उमप यांचा जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

या समारंभास नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत शासन गठीत समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व सचिव तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. याचबरोबर समारंभास मुखेडचे माजी आमदार सुभाषराव साबणे, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, प्रविण साले, दिलीप कंदकुर्ते, गंगाधरराव जोशी, सुनील नेरलकर, प्रविण पाटील चिखलीकर, मिंलीद देशमुख, दीपक सिंह रावत, लक्ष्मण संगेवार, नाथा चितळे, शंतनु डोईफोडे, जेष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी, विजय जोशी, प्रल्हाद उमाटे, संजय जोशी, लक्ष्मीकांत तांबोळी, रत्नाकर अपस्तंभ, श्रीमती आनंदी विकास, श्रीमती वृषाली किन्हाळकर, देविदास फुलारी, प्रभाकर देव, दिलीप ठाकूर, डॉ. श्याम तेलंग, सुरेश सांवत, डॉ. साध्वी (भरत) जेठवाणी, शाहीर रमेश गिरी, यशवंत गादगे, सुरेश गायकवाड, विजय सोनवणे, प्रभाकर घनशाम कानडखेडकर, जगदीश कदम, राजेश कपूर, चारुदत्त चौधरी, राम तुप्तेवार, प्रा. निवृत्ती कौशल्ये, गोविंद नांदेडे, शिवाजीराव कपाळे, कृष्णा पापीनवार, गजानन पिंपरखेडे, बापु दासरी यांची उपस्थिती राहणार आहे. 

अर्जापूर येथे हुतात्मा गोविंद पानसरे यांच्या समाधीस्थळी अभिवादन

शुक्रवार 31 मार्च रोजी अर्जापूर येथे सकाळी 10 वा. हुतात्मा गोविंद पानसरे यांचे समाधीस्थळी मराठवाडा मुक्ती संग्रामात सर्व ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येईल. यानिमित्ताने हुतात्मा पानसरे महाविद्यालय बिलोली येथे सकाळी 10.30 वा. जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार केला जाईल. सकाळी 11.30 वा. इतिहास तज्ज्ञ प्रा. एल. के. कुलकर्णी यांचे मराठवाडा मुक्ती संग्राम यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. संगीतकार आनंदी विकास आणि संच यांनी सादर केलेल्या राज्यगीत व मराठवाडा गिताने कार्यक्रमाचा शुभारंभ होईल.

00000


सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नदी संवाद व गाळ काढणाऱ्या लोकाभिमुख उपक्रमांचा 1 एप्रिल रोजी शुभारंभ

▪️चला जाणुया नदीला अंतर्गत विशेष उपक्रम

▪️जिल्ह्यातील सेवाभावी संस्थांचा पुढाकार

नांदेड (जिमाका) दि. 29 :- नदीच्याप्रती पिढीजात चालत आलेली आस्था अधिक दृढ व्हावी, नदीच्या स्वच्छते प्रती लोकाभिमूखतेचे बळ मिळावे व जनामनात नदी साक्षरतेविषयी अधिक जागर व्हावा या उद्देशाने शासनाने हाती चला जाणुया नदीला हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत नदी संवाद यात्रा व जलसाठ्यांना गाळातून मुक्त करण्यासाठी गाळ काढण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 1 एप्रिल रोजी केला जाणार आहे. नियोजन भवन येथे दुपारी 3 वा. आयोजित केलेल्या या विशेष समारंभास जिल्ह्यातील सर्व सेवाभावी संस्थांचे प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

नांदेड जिल्ह्यात विविध संस्थांनी गोदावरी नदी व इतर नदी स्वच्छतेसाठी लोकसहभागातून कृतीशील पुढाकार घेतला आहे. नदी स्वच्छतेचा हा उपक्रम लोकसहभागाचा एक आदर्श मापदंड ठरला असून या चळवळीला युवकांचीही भक्कम साथ मिळाली आहे.

 

या दृष्टीने मांजरा नदी समन्वयक अनिकेत लोहिया, प्रमोद देशमुख, दीपक मोरतळे, सीता नदी समन्वयक बाळासाहेब शेंबोलीकर, नंदन फाटक, लेंडी नदी समन्वयक कैलास येसगे, वसंत रावणगावकर, यादव बोरगावकर, मन्याड नदी समन्वयक प्रमोद देशमुख, शिवाजीराव देशपांडे,

दुधाना नदी समन्वयक रमाकांत कुलकर्णी, कयाधू नदी समन्वयक दयानंद कदम, जयाजी पाईकराव, आसना नदी समन्वयक तानाजी भोसले, डॉ परमेश्वर पौळ, वरुणा नदी समन्वयक सुनील परदेशी, राहुल जोरे हे नागरिकांच्या कृतिशील गटासोबत कार्य करीत आहेत.

नांदेड येथे नागरिकांचा कृतीगट म्हणून माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे, नांदेड प्लॉगर्स ग्रुप, भारतीय जैन संघटना, वृक्षमित्र फाउंडेशन, गोदावरी नदी संसद, आर्य वैश्य महिला मंडळ, माहेश्वरी महिला मंडळ, नमामी मॉ गोदावरी व इतर संस्थानचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

चला जाणुया नदीला उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनासमवेत सांस्कृतिक संवर्धन मंडळ, नाम फाउंडेशन, वन विभाग, कृषि विभाग व इतर संबंधित विभागामार्फत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गाळ काढणे आणि नदी संवाद यात्रा हा या उपक्रमातील एक भाग आहे. या समारंभास अधिकाधिक नदी, पर्यावरण क्षेत्रातील योगदान देणाऱ्या नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

000000


 वनेसांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दौरा 

 

नांदेड, (जिमाकादि. 29 :- राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मस्त्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार हे 30 व 31 मार्च 2023 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

 

गुरुवार 30 मार्च 2023 रोजी चंद्रपुर येथून हेलिकॉप्टरने सकाळी 10.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वा. चंद्रकांत उत्तरवार यांच्या निवासस्थानी राखीव. स्थळ-वासवी माता भवनसिडको रोड नांदेड. सायं.6 वाजता डॉ. बिडवई यांच्याकडील कार्यक्रमास नांदेड येथे उपस्थिती. रात्री नांदेड येथे मुक्काम.

 

शुक्रवार 31 मार्च 2023 रोजी सायं. 6 वा.चंद्रकांत उत्तरवार यांच्याकडील कौटुंबिक कार्यक्रमास उपस्थिती. स्थळवासवी माता भवन सिडको रोड नांदेड. रात्री नांदेड येथे मुक्काम करतील.

00000

 लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. लोकशाही दिन सोमवार 3 एप्रिल 2023 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे.

 

यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.

 

न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.

 

लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000

 

 दुय्यम निबंधक कार्यालय 30 मार्च रोजी सुरु राहणार 


नांदेड (जिमाका) दि. 29 :- जनतेच्या सोयीसाठी व इतर कार्यालयीन कामकाजासाठी शुक्रवार 30 मार्च  रोजी श्रीराम नवमी सणाच्या निमित्ताने शासकीय सुट्टीच्या दिवशी सह दुय्यम निबंधक वर्ग-2 कार्यालय नांदेड क्र. 1 व 2 तसेच दुय्यम निबंधक श्रेणी-1 नांदेड क्र. 3, हदगाव, बिलोली या कार्यालयात दस्त नोंदणी सुरु ठेवण्यात येत आहे. संबंधितानी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी वि.प्र. बोराळकर यांनी कळविले आहे. 


माहे मार्च 2023 मधील कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपामुळे राज्यातील बहुतांश दुय्यम निबंधक कार्यालयात संप कालावधीत दस्त नोंदणी बंद होती. तसेच मार्च अखेर मुळे दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दस्त नोंदणीसाठी गर्दी होत आहे त्यामुळे 30 मार्च रोजी सुटीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज सुरु राहील, असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000  

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...