Tuesday, May 22, 2018


उच्च रक्तदाब दिनानिमित्त
आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
नांदेड, दि. 22:- जागतिक उच्चरक्तदाब दिन व सप्ताहाच्यानिमित्त श्री गुरु गोविंद सिंघजी स्मारक, जिल्हा रुग्णालय यांच्यावतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तपासणी शिबिरात तीस वर्षावरील एस. टी. कर्मचारी व प्रवाशी असे एकूण 51 व्यक्तींचे उच्चरक्तदाब व मधुमेहासाठी तपासणी करण्यात आली. त्यात सात व्यक्तींना उच्चरक्तदाब, तीन व्यक्तींना मधुमेह व पाच व्यक्तींना मधुमेह व उच्च रक्तदाब (दोन्ही) असल्याचे आढळून आले. या शिबिरास जिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुप्रिया गहेरवार, डॉ. प्रदीप बोरसे, समुपदेशक सुवर्णकार सदाशिव, प्रयोगशाळा तंत्रज्ञ संतोष बेटकर, अधिपरिचारिका वर्षा सोळंके यांची उपस्थिती होती.
000000



निवासी शाळेतील प्रवेशासाठी
अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 22:- अनु. जाती निवासी शाळेत सन 2018-19 या शैक्षणिक वर्षाच्या 182 रिक्त जागेसाठी प्रवेश अर्ज मागविण्यात येते आहे. प्रवेशासाठी उमरी, नायगाव, माहूर व हदगाव येथील शासकीय निवासी शाळेतील मुख्याध्यापक यांचेकडे अर्ज सादर करावीत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील मुला-मुलींसाठी इयत्ता 6 वी ते 10 वी या वर्गाकरीता अनु.जाती मुलांची शासकीय निवासी शाळा उमरी, नायगाव, मुलींची शासकीय निवासी शाळा माहुर व हदगाव येथे कार्यरत आहे. हे प्रवेश गुणवत्ता व आरक्षणावर आधारित असुन प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास व भोजन तसेच शैक्षणिक साहित्य, बेडींग साहित्य आदी सोयी सुविधा मोफत पुरविण्यात येतात. विद्यार्थ्यांनी अर्ज संबधीत शासकीय निवासी शाळेतील मुख्याध्यापक यांच्याकडे सादर करावेत तसेच अधिक माहितीसाठी मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
00000


"उन्नत शेती समृद्ध शेतकरी"
शेतकऱ्यांना अनुदानावर औजारे
इच्छूक शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन  
नांदेड, दि. 22:- खरीप रब्बी  हंगाम 2018 मध्ये "उन्नत शेती समृध्द शेतकरी" ही मोहिम राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत कृषि यांत्रिकीकरणास चालना देण्यात येणार आहे. औजारांचे अनुदान दर निश्चित केले असून र्वसंमती दिलेल्या शेतकऱ्यांना औजारे, ट्रॅक्टरची खरेदी खुल्या बाजारातून आपल्या पसंतीप्रमाणे करता येणार आहे. इच्छूक शेतकऱ्यांनी विहित अर्ज मंगळवार 5 जून 2018  पर्यंत तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी केले आहे.
या मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रिपर कम बाईंडर, रिपर, नांगर, कल्टीव्हेटर, सबसॉयलर, रोटावेटर, प्लांटर (खत बि पेरणी यंत्र), पॉवर विडर, थ्रेसर, ट्रॅक्टर माऊंटेड / ऑपरेटेड स्प्रेअर, मिनी राईस मील मिनी दाल मिल आणि त्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे पॉलिशर / क्लिनर कम ग्रेडर / ग्रॅडीयंट सेपरेटर, स्पेशिफिक ग्रॅव्हीटी सेपरेटर, भात लावणी यंत्र, भात मळणी यंत्र, पाचरट कुट्टी यंत्र, कडबा कुट्टी यंत्र आदी औजारे अनुदानावर घेता येतील. ट्रॅक्टरसाठी अनुसूचित जाती / जमाती , अल्प, अत्यल्प भुधारक शेतकरी , महिला शेतकरी  यांना किंमतीच्या 35 टक्के किंवा 1 लाख ते 1 लाख 25 हजार इतर शेतकऱ्यांना किंमतीच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 75 हजार ते 1 लाख अनुदान देय राहील.  
कृषि औजारांसाठी अनुसूचित जाती, जमाती, अल्प, अत्यल्प, भुधारक शेतकरी महिला शेतकरी यांना किंमतीच्या 50 टक्के किंवा शासनाने ठरवून दिलेली उच्चतम अनुदान मर्यादा इतर शेतकऱ्यांना किंमतीच्या 40 टक्के किंवा शासनाने ठरवून दिलेली उच्चतम अनुदान मर्यादे प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. औजारे / यंत्रनिहाय अनुदान मर्यादा तालुका कृषि अधिकारी / जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे.
अर्जाचा नमुना तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे तसेच कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्जासोबत सातबारा,  8-, अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दिलेल्या जात वैधता प्रमाणपत्राची प्रत, आधार कार्ड / फोटो असलेले ओळखपत्र, खरेदी करावयाच्या यंत्र / औजारांचे अधिकृत विक्रेत्यांचे दरपत्रक / कोटेशन जोडावे. लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पध्दतीने लाभार्थ्यांची निवड केली जाईल निवड केलेल्या लाभार्थ्यांना औजारे, यंत्र खरेदीची पूर्वसंमती दिली जाईल. पूर्वसंमती मिळाल्यानंतर एक महिन्यामध्ये औजार खरेदी करणे बंधनकारक आहे. अन्यथा र्वसंमती रद्द समजली जाईल. खरेदी केलेल्या औजाराचे केंद्र किंवा राज्य शासनाच्या अधिकृत सक्षम तपासणी संस्थेने (बीआयएस किंवा अन्य सक्षम संस्था) तपासणी प्रमाणपत्र / तपासणी अहवाल सादर करणे शेतक-यांना बंधनकारक आहे. औजारांच्या गुणवत्तेची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थींची राहणार आहे. अर्ज करतांना यापुर्वी लाभार्थ्यांने कोणत्याही शासकीय योजनेतून लाभ घेतलेला नसावा.
खुल्या बाजारातून औजारांची खरेदी करतांना शेतकऱ्यांना स्वत:च्या बँक खात्यातून इलेक्ट्रॉनिक पध्दतीने (आर.टी.जी.एस.), धनादेश / धनाकर्ष विक्रेत्यास रक्कम अदा करणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांना विक्रेत्याशी रोखीने व्यवहार करता येणार नाही.
प्रत्येक औजारांसाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या औजारांस जास्तीतजास्त अनुदान  देय आहे त्या एकाच यंत्र / औजारास अनुदान दिले जाईल. जे शेतकरी केवळ ट्रॅक्टर चल यंत्र / औजारांकरीता अर्ज करतील त्यांना अर्जासोबत त्यांचेकडे ट्रॅक्टर असल्याबाबतचा पुरावा (आरसीबुक) जोडणे आवश्यक आहे. खरेदी केलेल्या औजारांची तपासणी झाल्यानंतर अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाईल.
भाडेतत्वावर कृषि यांत्रिकीकरण सेवेसाठी कृषि औजारे बँक स्थापन करण्यासाठीपण अनुदान दिले जाणार आहे. शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकऱ्यांचे स्वयंसहाय्यता गट, कृषि विज्ञान केंद्र यांना या योजनेचा लाभ घेता येईल, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी , नांदेड यांनी कळविले आहे.
0000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...