Friday, September 6, 2024

  वृत्त क्र.  814

सोयाबिनच्या शेतात पक्षी थांबे उभारण्याचे कृषी विभागाचे आवाहन

विविध कीड आणि रोग नियंत्रण उपाययोजना

नांदेड दि. 6 सप्टेंबर :-   शेतकऱ्यांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन शेतात विविध ठिकाणी 'T’ आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. तसेच विविध किड आणि रोग नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार विविध उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

 

विविध कीड आणि रोग नियंत्रणाबाबत उपाययोजना

तूर पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास 5 टक्के निंबोळी अर्क किंवा डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 15 मिली प्रती 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. तूर पिकात शेंगा पोखरणारी अळीच्या प्रादुर्भावाचा आगाऊ अंदाज समजण्यासाठी हेक्टरी 5 कामगंध सापळे 50 मीटर अंतरावर शेतात उभारावेत. सोयाबीन पिकात स्पोडोप्टेरा अळीच्या उपद्रवाचा आगाऊ अंदाज घेऊन नुकसान टाळण्यासाठी हेक्टरी 5 स्पोडोलूरचा वापर करण्यात आलेले फेरोमेन सापळे नियंत्रणासाठी वापरावेत.मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीच्या १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी क्लोरानट्रानीली प्रोल १८.५ टक्के एस. सी ०.४ मिली प्रती लीटर पाणी किंवा स्पीनोटोराम ११.७ टक्के एससी ०.५ मिली प्रती लीटर पाणी किंवा इमामेक्टिनबेन्झोएट ५ टक्के एसजी ०.४ ग्राम प्रती लीटर पाणी वापरून फवारणी करावी. भुईमूग पिकावरील रसशोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी फ्लुबेन्डामाइड ३.५ टक्के + हेक्साकोनॅझोल ५ टक्के डब्ल्यूजी २५ ग्रॅमप्रति १० लिटरपाण्यात मिसळून फवारणी करावी. भात पिकावर काही ठिकाणी तपकिरी तुडतुडे आणि हिरवे तुडतुडे याकिडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रादुर्भाव दिसून येताच फिप्रोनिल ५ टक्के एस.सी. २० मि.ली. प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी पावसाची उघडीप पाहून करावी असेही कृषि विभागाच्यावतीने कळविले आहे.

00000

   वृत्त क्र.  813

धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त खेळाडू व त्यांच्या पालकांचा सत्कार

नांदेड दि. 6 सप्टेंबर :-  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आशियाई विद्यापीठ धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त नांदेडचा खेळाडू तेजविरसिंग जहागीरदार व त्यांचे पालक यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

 

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी संजय बेत्तीवार, प्रविण कोंडेकर, राहूल श्रीरामवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर, श्रीमती शिवकांता देशमुख, वरिष्ठ लिपिक संतोष कनकावार, दत्तकुमार धुतडे, संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, आकाश भोरे आदीनी शुभेच्छा दिल्या. यावेळी मोहन पवार, सुभाष धोंगडे, चंद्रकांत गव्हाणे, विद्यानंद भालेराव, सोनबा ओव्हाळ, यश कांबळे आदी उपस्थित होते.

00000

 *‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन*

मुंबई दि. ६ : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.

या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

0000

  वृत्त क्र.  812

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी

आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी नोंदवावी

 नांदेड,दि. 6 सप्टेंबर : जिल्ह्यातील अनेक युवक आपले शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या शोधात आहेत. युवकांना विद्या वेतनासह घेतलेल्या शिक्षणाच्या बळावर अनुभवाची जोड देता यावी या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत युवकांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असून बारावी पास, आयटीआय, पदविका आणि पदवीधर किंवा पदव्युत्तर युवकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत त्यांनी आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.

 यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, महिला व बाल विकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम, ग्राम पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख, जिल्हा कौशल्य विभागाच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार, विविध प्रमुख आदीची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत आतापर्यत जिल्ह्यात 1 हजार 768 युवकांची निवड करुन त्यांना विविध आस्थापनामध्ये नियुक्ती दिली आहे.  तरी उर्वरित आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणीची संकेतस्थळावर नोंदवून त्यांना नियुक्ती पत्र देण्याची कार्यवाही तत्परतेनी करावी, असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी आस्थापनाना सांगितले आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना काय आहे

बारावी पास विद्यार्थ्यांना प्रतिमहा सहा हजार, आयटीआय/पदविका उत्तीर्ण युवकांना आठ हजार व पदविधर/पदव्युत्तर युवकांना दहा हजार असे भरघोस विद्यावेतन दिले जाणार आहे. हे विद्यावेतन प्रशिक्षणार्थींच्या थेट बँक खात्यात ऑनलाईन पध्दतीने दरमहा अदा केले जाईल, असे शासन निर्णयात स्पष्ट केले आहे. या योजनेंतर्गत खाजगी क्षेत्रातील उद्योजकांना एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 10 टक्के व सेवा क्षेत्रासाठी 20 टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील.

 या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. याचबरोबर उमेदवाराचे वय किमान 18 व कमाल 35 वर्ष असावे. उमेदवार महाराष्ट्राचा अधिवासी असावा. त्याची आधार नोंदणी आवश्यक असून बँक खातेही आधारशी संलग्न असावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या आस्थापनांना पुढे यायचे आहे त्या आस्थापना/उद्योगाची स्थापना किमान तीन वर्षापूर्वीची असावी.

000000




  वृत्त क्र.  855   जिल्ह्यात  " हरित ऊर्जा सौर क्रांती "  मो ही म     ·    5 हजार   पेक्षा जास्त लोकसं ख्येचे गाव  मॉडेल सोलर व्ह...