Monday, January 16, 2017

शासकीय अध्यापक महाविद्यालयात
मकरसंक्रांत, भुगोल दिन साजरा
            नांदेड दि. 16 :- मकरसंक्रांत, भूगोल दिन, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा समारोपीय कार्यक्रम एकत्रितपणे शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे आज संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्या  डॉ. सुनंदा रोडगे या होत्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने,  सहसंचालक डॉ. मोहन खताळ यांची प्रमुख उपस्थित होत.
यावेळी डॉ. माने यांनी शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना मराठी भाषा व मातृभाषेचे महत्व विशद केले. आपल्या भाषिक संस्कृतीचा आढावा घेत ग्रामीण भागातील प्रत्येक आई ही सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीत संक्रमित करीत होती, असे सांगून शिक्षणात मातृभाषेला महत्व देवून सर्वांनी आपले योगदान दिले पाहिजे असे नमूद केले. कार्यक्रमात बीएड व एमएड प्रशिक्षणार्थ्यांनी मकरसंक्रांतीचे व भगोल दिनाचे महत्व विशद केले. प्रा. डॉ. बेलोकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. सोळुके व डॉ. बेलोकर यांनी केले.

0000000
रास्तभाव धान्य दुकानात
फेब्रुवारीसाठी साखर उपलब्ध
नांदेड दि. 16 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी फेब्रुवारी 2017 साठीची साखर रास्तभाव धान्य दुकानात उपलब्ध झाल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी  नांदेड  यांनी कळवले आहे
या नियतनानुसार  प्रती  व्यक्ती 500 ग्रॅम प्रमाणे साखर प्रौढ अथवा मुल-बालक अशा भेदभाव न करता शिधापत्रिकाधारकांना साखर वितरीत करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्याला आवश्यक 4 हजार 575 क्विंटल साखरेचा पुरवठा उपलब्ध झाला आहे. तालुका निहाय उपलब्ध साखर पुढील प्रमाणे क्विंटल मध्ये : नांदेड व लोहा-494, हदगाव-446, किनवट-389, भोकर-195, बिलोली-313, देगलूर-261, मुखेड-509, कंधार-417, लोहा-362, अर्धापूर-140, हिमायतनगर-223, माहूर-220, उमरी-53, धर्माबाद-143, नायगाव-251, मुदखेड-159. याची शिधापत्रिकाधारकांनी नोंद घेवून स्वस्त धान्य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहनही  जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000000
दहावी, बारावी परीक्षांसाठीचे
संभाव्य वेळापत्रक संकेतस्थळावर
नांदेड, दि. 16 :- फेब्रुवारी-मार्च 2017 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 29 ऑक्टोंबर 2016 पासून उपलब्ध करुन देण्यात आले होते. या वेळापत्रकाबाबत सूचना, हरकती त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे 15 दिवसाच्या आत लेखी स्वरुपात मागविण्यात आलेल्या होत्या.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी तसेच माध्यमिक व शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परीक्षाचे संभाव्य वेळापत्रकाबाबत लोकप्रतिनिधी, संघटना, पालक, शिक्षक, विद्यार्थी यांचेकडून प्राप्त झालेल्या तक्रारी, सूचना, अभिप्राय यांचे अवलोकन करुन इयत्ता 12 वीच्या वेळापत्रकात कोणताही बदल केलेला नाही. मात्र इयत्ता 10 वीच्या इतिहास, भूगोल यासह सर्वच मुख्य पेपर सलग न ठेवता एक दिवसाचा खंड देऊन बदल करण्यात आलेला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार लेखी परीक्षा पुढील कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा ( सर्वसाधारण व द्विलक्षी विषय ) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम – लेखी परीक्षा कालावधी मंगळवार 28 फेब्रुवारी 2017 मे शनिवार 25 मार्च 2017. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा- मंगळवार 7 मार्च 2017 ते बुधवार 1 एप्रिल 2017 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.  दिनांक निहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत  www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपुर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरुन खात्री करुन घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये.
प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपुर्वी मंडळामार्फत शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी , असे आवाहन विभागीय सचिव, लातूर विभागीय शिक्षण मंडळ लातूर यांनी केले आहे.

000000
प्रत्येक मताचे महत्व
चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर
नांदेड, दि. 16 :-   मतदार जागृती अभियानांतर्गत निवडणूक विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येक मतांचे महत्व या विषयावरील ही स्पर्धा 7 जानेवारी रोजी घेण्यात आली होती. यात प्रथम क्रमांक केब्रीज विद्यालयाची अभिलाषा साहेब नरवाडे, द्वितीय सावित्रीबाई फुले विद्यालयाची किर्ती रविंद्र बंडेवार यांनी गुणानुक्रमे यश मिळविले आहे.
विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण व प्रमाणपत्राचे वितरण बुधवार 25 जानेवारी 2017 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात होणार आहे. सर्वांनी मतदार जागृतीसाठी सहभागी व्हावे, असे आवाहन निवडणूक विभागातर्फे करण्यात आले आहे.

000000
मतदार जागृतीसाठी
विविध कार्यक्रमांचे आयोजन
नांदेड, दि. 16 :-  फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर निवडणूक विभागातर्फे मतदार जागृती अभियानांतर्गत व मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मतदारांनी स्वयंस्फुर्त, निर्भयपणे मतदान करावे तसेच मोठ्या संख्येने मतदानासाठी समोर यावेत यासाठी 16 ते 20 जानेवारी 2017 दरम्यान मतदान यंत्र इलेक्ट्रॉनिक ओटींग मशीन्स ( ईव्हीएम) ची माहिती, शालेय परिसंवाद कार्यक्रम, मतदानासाठी प्ररित करण्यासाठी गेट-सेट-वोट हा कार्यक्रम होणार आहे. तसेच मतदान केल्यामुळे आपण सक्षम लोकशाही निर्माण करु शकतो या संदर्भात लघुपटही विविध महाविद्यालयातून दाखविण्यात येणार आहे.
ज्या मतदारांचे नाव दोन ठिकाणी आहे अशा मतदारांनी स्वत:हून आपले एका ठिकाणचे नाव वगळावे व मी सजग मतदार या अभियानांतर्गत महानगरपालिका व पंचायत समिती यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
शनिवार 21 जानेवारी रोजी महिला मतदारांसाठी विवेक ज्योती सखी सहेली मेळाव्याचे आयोजन तहसील कार्यालय नांदेड येथे करण्यात आले आहे. तत्पूर्वी दिनांक 20 जानेवारी 2017 रोजी 18 वर्षापुढील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी शिबीर बचत भवन नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. रविवार 22 जानेवारी 2017 रोजी सक्षम करुया युवा व भावी मतदार या विषयावर खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी शब्द मर्यादा एक हजार शब्दाची असेल.
सोमवार 23 जानेवारी रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी युवा महोत्सवाचे आयोजन सहयोग कॅम्पस विष्णुपुरी येथे करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध महाविद्यालयाचे संघ, गीत, नाटय, घोषवाक्य आदींच्या माध्यमातून मतदान जागृतीचा संदेश देणार आहेत. यासाठी संघांना सादरीकरणासाठी प्रत्येकी 15 मिनिटाचा वेळ असेल. विजेत्या संघांना बक्षिसेही देण्यात येणार आहेत.
मतदार जागृती अभियानांतर्गत सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवडणूक विभागातर्फे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, नांदेड तहसिलदार प्रदिपसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विभागाने केले आहे.

000000
निवडणूक आचारसंहिता
अवैध दारू, समाज माध्यमांतील
संदेशांवर राहणार कडक नजर
जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती बैठक संपन्न

नांदेड, दि. 17 :- जिल्ह्यात औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठीची आचारसंहिता अंमलात आहे. त्यासह जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्याअनुषंगाने या दोन्ही निवडणुकांसाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होईल, यासाठी यंत्रणांनी दक्ष रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिले. निवडणुकीसाठी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न  झाली. या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध दारुचा वापर, तसेच समाज माध्यमातील (सोशल मिडीया) संदेशावरही कडक नजर ठेवण्यात यावेत, असे निर्देशही देण्यात आले.
बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव बी. बी. पाटील, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी  जयराज कारभारी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील, जि.प.चे मुख्य वित्त व लेखा अधिकारी आप्पासाहेब चाटे तसेच आयकर, प्रादेशिक परिवहन आदीं विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थिती होती.
भारत निवडणूक आयोगाकडून विधानपरिषदेच्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाची तसेच राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.
 या दोन्ही निवडणुकांच्या अनुषंगाने आज बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी काकाणी यांनी निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश विविध यंत्रणांना दिले. आचारसंहिता अंमलबजावणीसाठी यंत्रणांना जबाबदाऱ्याही सोपविण्यात आल्या. यामध्ये भरारी पथके, स्थानिक पथकांची  नियुक्ती तसेच त्यांच्यासोबत व्हिडीओ चित्रीकरणाची व्यवस्था करण्याबाबतही चर्चा झाली. जिल्ह्यातील दारू विक्रीच्या उलाढालीबाबत माहिती घेण्याचा, तसेच अवैधरित्या साठा, विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले. प्रचार-प्रसिद्धी दरम्यान विनापरवाना बॅनर्स, फ्लेक्स तसेच निनावी स्वरुपात करण्यात येणाऱ्या प्रसिद्धी, हॅण्डबिल्स आदी प्रकारांवर कडक नजर ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
निवडणूक काळातील संशयास्पद आर्थिक व्यवहारांवरही आयकर, विक्रीकर तसेच पोलीस यंत्रणेकडून सतर्क नजर राहणार आहे.
समाज माध्यमांतील प्रचार-प्रसिद्धीवर कडक नजर
समाज माध्यम (सोशल मिडीया) द्वारे करण्यात येणाऱ्या प्रचार प्रसिद्धीवर निवडणूक काळात कडक नजर राहणार आहे. शांतता व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या संदेशाची तातडीने दखल घेण्यात येणार आहे. धार्मिक-जातीय-वांशिक मुद्यांवरील संदेशांच्याबाबतीत सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्यांवर माहिती तंत्रज्ज्ञान तसेच अनुषंगीग दंडसंहितेनुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उमेदवारांच्या आणि त्यांच्यांशी निगडीत व्यक्तींच्या इंटरनेट वापराची माहितीही प्रसंगी मिळविण्यात येणार आहे. जेणेकरून डाटा वापराच्या प्रमाणावरून, सोशल मिडीयाच्या वापराचा खर्च, निवडणूक खर्चात समाविष्ट करता येईल.
राजकीय पक्ष प्रतिनिंधीची बैठक संपन्न
दरम्यान जिल्हा परिषद –पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठकही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीतही निवडणूक कार्यक्रम, अधिसूचना ते प्रचाराचा कालावधी, मतदान केंद्रांबाबत तसेच वाहनांचा वापर, सार्वजनिक मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध, निवडणूक खर्च आदींबाबत माहिती देण्यात आली. उपस्थित प्रतिनिधींनीही चर्चेत सहभाग घेतला.

0000000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...