Monday, January 16, 2017

निवडणूक आचारसंहिता
अवैध दारू, समाज माध्यमांतील
संदेशांवर राहणार कडक नजर
जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती बैठक संपन्न

नांदेड, दि. 17 :- जिल्ह्यात औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठीची आचारसंहिता अंमलात आहे. त्यासह जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्याअनुषंगाने या दोन्ही निवडणुकांसाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होईल, यासाठी यंत्रणांनी दक्ष रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिले. निवडणुकीसाठी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न  झाली. या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध दारुचा वापर, तसेच समाज माध्यमातील (सोशल मिडीया) संदेशावरही कडक नजर ठेवण्यात यावेत, असे निर्देशही देण्यात आले.
बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव बी. बी. पाटील, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी  जयराज कारभारी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील, जि.प.चे मुख्य वित्त व लेखा अधिकारी आप्पासाहेब चाटे तसेच आयकर, प्रादेशिक परिवहन आदीं विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थिती होती.
भारत निवडणूक आयोगाकडून विधानपरिषदेच्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाची तसेच राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.
 या दोन्ही निवडणुकांच्या अनुषंगाने आज बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी काकाणी यांनी निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश विविध यंत्रणांना दिले. आचारसंहिता अंमलबजावणीसाठी यंत्रणांना जबाबदाऱ्याही सोपविण्यात आल्या. यामध्ये भरारी पथके, स्थानिक पथकांची  नियुक्ती तसेच त्यांच्यासोबत व्हिडीओ चित्रीकरणाची व्यवस्था करण्याबाबतही चर्चा झाली. जिल्ह्यातील दारू विक्रीच्या उलाढालीबाबत माहिती घेण्याचा, तसेच अवैधरित्या साठा, विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले. प्रचार-प्रसिद्धी दरम्यान विनापरवाना बॅनर्स, फ्लेक्स तसेच निनावी स्वरुपात करण्यात येणाऱ्या प्रसिद्धी, हॅण्डबिल्स आदी प्रकारांवर कडक नजर ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
निवडणूक काळातील संशयास्पद आर्थिक व्यवहारांवरही आयकर, विक्रीकर तसेच पोलीस यंत्रणेकडून सतर्क नजर राहणार आहे.
समाज माध्यमांतील प्रचार-प्रसिद्धीवर कडक नजर
समाज माध्यम (सोशल मिडीया) द्वारे करण्यात येणाऱ्या प्रचार प्रसिद्धीवर निवडणूक काळात कडक नजर राहणार आहे. शांतता व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या संदेशाची तातडीने दखल घेण्यात येणार आहे. धार्मिक-जातीय-वांशिक मुद्यांवरील संदेशांच्याबाबतीत सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्यांवर माहिती तंत्रज्ज्ञान तसेच अनुषंगीग दंडसंहितेनुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उमेदवारांच्या आणि त्यांच्यांशी निगडीत व्यक्तींच्या इंटरनेट वापराची माहितीही प्रसंगी मिळविण्यात येणार आहे. जेणेकरून डाटा वापराच्या प्रमाणावरून, सोशल मिडीयाच्या वापराचा खर्च, निवडणूक खर्चात समाविष्ट करता येईल.
राजकीय पक्ष प्रतिनिंधीची बैठक संपन्न
दरम्यान जिल्हा परिषद –पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठकही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीतही निवडणूक कार्यक्रम, अधिसूचना ते प्रचाराचा कालावधी, मतदान केंद्रांबाबत तसेच वाहनांचा वापर, सार्वजनिक मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध, निवडणूक खर्च आदींबाबत माहिती देण्यात आली. उपस्थित प्रतिनिधींनीही चर्चेत सहभाग घेतला.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...