Sunday, June 7, 2020

वृत्त क्र. 525


पन्नास व्यक्तींच्या मर्यादेत
लग्नसमारंभास मंगलकार्यालयांना मुभा
नांदेड दि. 7 (जिमाका) :- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंगलकार्यालयांवरील घातलेले निर्बंध शासनाने आता शिथिल केले असून 50 व्यक्तींना नियम व अटींच्या अधीन राहून लग्नसमारंभासाठी मुभा देण्यात आली आहे. 
एकावेळेस लग्न समारंभाच्या ठिकाणी मंगल कार्यालयात कर्मचारी व लग्नासाठी उपस्थित सर्व व्यक्तींची संख्या ही 50 पेक्षा जास्त असणार नाही. कोणताही आजारी व्यक्ती लग्न समारंभाला येणार नाही यासह आदेशातील अटी व शर्तीचे उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालयाचे परवाने रद्द करुन कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज निर्गमीत केले आहेत. 
लग्न समारंभासाठी लोकांची गैरसोय व कोविड-19 रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निश्चित केलेले नियम व अटीचे उल्लंघन होणार नाहीत याची दक्षता घेऊन नांदेड जिल्ह्यातील मंगल कार्यालयांना मुभा देण्यात आली आहे. 
समारंभात सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे लागेल. लग्न समारंभाच्या प्रवेशापूर्वी हॅन्डवॉश, सॅनिटायझरचा वापर करणे तसेच थर्मल स्क्रिनिंगद्वारे प्रत्येक व्यक्तींची तपासणी करुनच प्रवेश देणे बंधनकारक राहील. याठिकाणी सर्वांच्या चेहऱ्यावर मास्क असणे व  मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व वस्तू / ठिकाणांचे वेळोवेळी नियमित निर्जंतूकीकरण करणे बंधनकारक आहे. लग्न समारंभ सकाळी 9 ते सायं. 5 या कालावधीत करणे तसेच लग्नसंमारंभाची पूर्ण प्रक्रिया 5 ते 6 तासाच्या आत संपविणे बंधनकारक असेल. सर्वांना पुरेल या प्रमाणात सॅनिटायझरचा साठा असावा. कोणताही आजारी व्यक्ती लग्न समारंभास येणार नाही. अशा ठिकाणी 55 वर्षावरील जेष्ठ नागरिक, ज्यांना मधुमेह, रक्तदाब आणि इतर अनेक आजार असलेल्या व्यक्ती, गरोदर माता व दहा वर्षाखालील मुलांना शक्यतोवर प्रवेश टाळावा. लग्नामध्ये येणाऱ्या लोकांची यादी इंसिडंट कमांडर (Incident Commander) यांना सादर करावी. ही यादी लग्नाच्या अगोदर सादर करावी व त्यामध्ये लग्नाला येणाऱ्या लोकांचे मोबाईल क्रमांक व पत्ते असणे आवश्यक आहे. मंगल कार्यालयाच्या आवारात थुंकण्यास प्रतिबंध करण्यात यावे. ही जबाबदारी मंगल कार्यालय मालक यांची राहील. 
या अटी व शर्तीचे उल्लंघन झाल्यास अशा मंगल कार्यालयाचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. संबंधीत आस्थापना चालकाविरुद्ध साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानून कारवाई करण्यात येईल. 
या आदेशात नमूद संपूर्ण निर्देशाचे तंतोतंत पालन होते किंवा नाही याबाबी तपासून आवश्यक कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यास पुढील यंत्रणेस प्राधिकृत करण्यात आले आहे. महानगरपालिका हद्दीत- महानगरपालिका व पोलीस विभाग यांनी संयुक्त पथके गठीत करावीत. नगरपालिका हद्दीत- नगरपालिका व पोलीस विभाग यांनी तर गावपातळीवर ग्रामपंचायत व पोलीस विभागाने संयुक्त पथक गठीत करावे. 
वरील सर्व संबंधीत यंत्रणेने पर्यवेक्षणासाठी गठीत केलेले पथकांचे आदेश संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा इंसिडंट कमांडर (Incident Commander) यांच्याकडे सादर करावीत. संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा इंसिडंट कमांडर (Incident Commander)  यांची वरीलप्रमाणे आदेशाची अंमलबजावणीच्या अनुषंगाने संनियंत्रणांची जबाबदारी असेल. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नमूद केले आहे. 
00000

वृत्त क्र. 524


कोरोना बाधितांमध्ये नवीन व्यक्ती नाही ;
दोन बाधित बरे झाल्याने दिली सुट्टी
नांदेड (जिमाका) दि. 7 :-  कोरोना बाधितांमध्ये आज नवीन एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नसून पंजाब भवन यात्री निवास नांदेड येथील दोन व्यक्ती बऱ्या झाल्याने आज रविवार 7 जून रोजी त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. कोरोना बाधित व्यक्तींची संख्या नियंत्रीत ठेवण्यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 190 बाधित व्यक्तींपैकी 131 व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. रविवार 7 जून रोजी सायं. 5 वा. प्राप्त झालेल्या 32 अहवालापैकी 27 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. तर उर्वरित 51 बाधित व्यक्तींवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली रुग्णालयात औषधोपचार सुरु आहे. उपचार घेत असलेले तीन बाधितांची प्रकृती गंभीर असून एक 65 वर्षाची स्त्री तर दोन पुरुष 65 74 वर्षांचे आहेत.
आतापर्यंत एकूण 190 बाधितांपैकी 8 बाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात 51 बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 10 बाधित व्यक्तींवर, एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 38, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 2 तर माहूर ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटर 1 बाधित व्यक्तीवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरु आहेत. रविवार 7 जून रोजी 59 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्वेक्षण- 1 लाख 42 हजार 956, घेतलेले स्वॅब 4 हजार 453, निगेटिव्ह स्वॅब 3 हजार 942, आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या एकही नाही, एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती 190, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 174, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या 81, मृत्यू संख्या 8, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 131, रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती 51, स्वॅब तपासणी चालू असलेली 59 एवढी संख्या आहे.
जनतेने घाबरुन न जाता गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येक व्यक्तींने आपल्या वर्तनात बदल करुन स्वत: सुरक्षितेची अधिक काळजी घेतली पाहिजे. रोजच्या जीवनात आपण ज्या काही वस्तू बाहेरुन आणतो त्याची योग्य ती स्वच्छता केली पाहिजे. भाजीपाला घेतल्यास तो स्वच्छ करुन किमान 12 तास न वापरता स्वच्छ जागी ठेवून आपल्या आहाराप्रतीही अधिक सजग राहून नागरिकांनी दक्षाता घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...