Monday, August 3, 2020


कार्यालय सुशोभित असेल तर
काम करताना प्रसन्नता वाटते
- विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

औरंगाबाद (विमाका) 03 - कार्यालय व कार्यालयाचा परिसर स्वच्छ व सुशोभित असल्यास काम करताना प्रसन्नता वाटते. त्यामुळे आपले कार्यालय स्वच्छ ठेवण्यावर प्रत्येकाने भर द्यावा, असे मत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी व्यक्त केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आज महसूल दिनानिमित्त पुरवठा विभागाच्यावतीने कार्यालय सुशोभीकरणाबाबत माहिती पुस्तीका प्रसिद्ध करण्यात आली. या पुस्तिकेच्या विमोचन श्री.केंद्रेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे, अप्पर विभागीय आयुक्त डॉ. विजयकुमार फड, उपायुक्त (सामान्य प्रशासन) वर्षा ठाकूर, उपायुक्त (पुनर्वसन) पांडुरंग कुलकर्णी, उपायुक्त (पुरवठा) वामन कदम, उपायुक्त (नियोजन) रविंद्र जगताप, उपायुक्त (विकास-नियोजन) विणा सुपेकर यांच्यासह तहसीलदार, नायब तहसीलदार, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
            श्री. केंद्रेकर म्हणाले की, कामानिमित्त कार्यालयात आपण आठ ते दहा तास उपस्थित असतो जर तो परिसर नीट-नेटका ठेवल्यास आपले मनदेखील प्रसन्न राहते. विभागीय आयुक्त कार्यालयातील पुरवठा विभागाने स्वच्छता मोहिम हाती घेऊन कार्यालयाचे अतिशय सुंदर सुशोभिकरण केले आहे. तोच आदर्श इतर विभागांनी घ्यावा.  जेणेकरुन कार्यालयात आल्यावर प्रत्येकाला काम करण्यासाठी नवीन ऊर्जा प्राप्त होईल.           
            श्री. टाकसाळे म्हणाले की, औरंगाबादमध्ये लॉकडाऊनच्या काळात गरजूंपर्यंत अन्नधान्य पुरविण्याचे काम पुरवठा विभागाने अतिशय चोखपणे केले आहे. तसेच कार्यालय सुशोभीकरणाचा एक चांगला उपक्रमही हाती घेतला आहे. या उपक्रमांत इतर विभागांनी सुध्दा सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. 
डॉ. विजयकुमार फड म्हणाले की, महसुल दिनाचे औचित्य साधत पुरवठा विभागाने स्वच्छतेचे रोप रुजवले आहे. ते दिवसेंदिवस अजून बहरत जाईल. कार्यालय स्वच्छतेचा अतिशय चांगला उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
प्रास्ताविकात श्री. कदम  म्हणाले की, कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी दिवसभरातील अधिक वेळ घालवतो, त्यामुळे कार्यालय स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे आहे. स्वच्छतेमुळे आरोग्यही चांगले राहण्यास मदत मिळते व उत्साहाने कामे करण्याची ऊर्जा प्राप्त होते.
श्रीमती ठाकुर यांनी आभार मानले. आभारात महसूल दिनाचे महत्त्व त्यांनी विषद केले. कार्यालय स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. स्वच्छ कार्यालयामुळे मन आनंदी राहण्याबरोबरच कामेही जलद गतीने पूर्ण होतात आणि आपले आरोग्यही चांगले राहते.
*****


तहसिल कार्यालयात ऑक्सिजन पार्क

नांदेड, (जिमाका) दि. 3 :- नांदेड तहसिल कार्यालयाच्या परिसरात असलेल्या जवळपास 80 आर मोकळ्या जागेवर आता विविध वृक्षांची लागवड करुन त्याचे अनौपचारिक उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते करण्यात आले. तहसिल कार्यालयाच्या परिसरात असलेल्या या मोकळ्या जागेवर पाणी साचून घाण निर्माण झाली होती. या वृक्षलागवडीमुळे आता या जागेसह घाणीचा प्रश्न मार्गी लागला आहे.

तहसीलदार डॉ. अरुण जऱ्हाड यांनी यासाठी पुढाकार घेऊन काही महिन्यांपूर्वी जेसीबीच्या सहाय्याने ही जागा साफ करुन मोकळे मैदान तयार केले होते. जिल्हाधिकारी यांनी याठिकाणी वृक्षारोपण करुन हरित परिसर करावा अशा सूचना प्रभारी तहसीलदार सारंग चव्हाण व कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. या सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाची पूर्ण तयारी व आखणी केली. वृक्ष मित्र फौंडेशनचे संतोष मुगटकर यांची टीम तसेच सामाजिक वनीकरण विभाग यांनी सर्वतोपरी यासाठी मदत केली.

नेरली, मरळक तसेच अर्धापुर तालुक्यातील विविध नर्सरी मधून सामाजिक वनीकरण विभागाने 4 हजार वृक्ष उपलब्ध करुन दिले. कर्मचाऱ्यांच्या लोकसहभागातून परिसरास तारेचे कुंपण व पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या जागेत वड, पिंपळ, जांभूळ, करंज, गुलमोहोर , आंबा , पेरु अशा विविध प्रजातीचे 4 हजार वृक्ष जापनीज पर्यावरण तज्ज्ञ डॉ. मियावाकी यांचे पद्धतीनुसार 1 चौमी जागेत 3 वृक्ष त्रिकोणाकृती जागेत घनदाट पद्धतीने लावण्यात आले आहेत. भविष्यात या झाडांचे संवर्धन करण्याचा संकल्प महसूल दिनी सर्व कर्मचाऱ्यांनी केला.

महसूल दिनाच्या औचित्य साधून या जागेस ऑक्सिजन पार्क म्हणून नामकरण करण्यात आले. यावेळी छोटेखानी समारंभास मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी , निवासी उपजिल्हाधिकारी  डॉ. सचिन खल्लाळ, उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार मुगाजी  काकडे यांनी केले तर आभार  नायब तहसीलदार श्रीमती उर्मिला कुलकर्णी यांनी मानले. नायब तहसीलदार विजयकुमार पाटे तसेच सर्व अव्वल कारकून, लिपिक, मंडळ अधिकारी, तलाठी , शिपाई व कोतवाल यांनी वृक्षारोपण व महसूल दिन कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केले.
0000



कोरोनातून आज 66 व्यक्ती बरे 
जिल्ह्यात 203 बाधितांची भर तर चौघांचा मृत्यू 

नांदेड (जिमाका) दि. 3 :-  जिल्ह्यात आज 3 ऑगस्ट रोजी सायं. 6.30 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 66 व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 203 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण 1 हजार 106 अहवालापैकी 854 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 2 हजार 359 एवढी झाली असून यातील 1 हजार 20 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 1 हजार 232 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 19 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 7 महिला व 12 पुरुषांचा समावेश आहे.

रविवार 2 ऑगस्ट रोजी देगलूर येथील 72 वर्षाची एक महिला, चौफाळा नांदेड येथील 65 वर्षाचा एक पुरुष, नाटकार गल्ली देगलूर येथील 56 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर सोमवार 3 ऑगस्ट रोजी फुलेनगर कंधार येथील 65 वर्षीय महिला जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत पावले. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 94 एवढी झाली आहे.  

आज बरे झालेल्या 66 कोरोना बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील 25, मुखेड कोविड केअर सेंटर येथील 13, भोकर कोविड केअर सेंटर येथील 1, खाजगी रुग्णालय नांदेड येथील 5, हदगाव कोविड केअर सेंटर येथील 3, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथील 4, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 15 अशा 66 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  

आरटीपीसीआर तपासणीद्वारे नवीन बाधितांमध्ये अर्धापूर तालुक्यात 1, भोकर तालुक्यात 2, बिलोली तालुक्यात 8, देगलूर तालुक्यात 19, धर्माबाद तालुक्यात 5, हदगाव तालुक्यात 26, कंधार तालुक्यात 1, नांदेड ग्रामीणमध्ये 2, किनवट तालुक्यात 5, मुखेड तालुक्यात 2, नायगाव तालुक्यात 6, उमरी तालुक्यात 11, नांदेड शहरी 33, परभणी 2, यवतमाळ 1 याप्रमाणे आरटीपीसीआर तपासणीद्वारे 124 बाधित असल्याचे निष्पन्न झाले. तर अँटिजेन तपासणीद्वारे अर्धापूर तालुक्यात 2, किनवट तालुक्यात 9, नायगाव तालुक्यात 23, बिलोली तालुक्यात 9, मुखेड तालुक्यात 11, नांदेड शहरात 25 याप्रमाणे अँटिजेन तपासणीद्वारे 79 बाधित आढळले.

जिल्ह्यात 1 हजार 232 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 116, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 469, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 39, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 70, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 40, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 105, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 86, लोहा कोविड केअर सेंटर येथे 5, हदगाव कोविड केअर सेंटर 70, भोकर कोविड केअर सेंटर 2, उमरी कोविड केअर सेंटर 11, कंधार कोविड केअर सेंटर येथे 12, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 34, किनवट कोविड केअर सेंटर येथे 22, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 10, खाजगी रुग्णालयात 109 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 5 बाधित औरंगाबाद येथे, निजामाबाद येथे 1 बाधित, हैदराबाद येथे 2 तर मुंबई येथे 2 बाधित संदर्भित झाले आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 49 हजार 476,
घेतलेले स्वॅब- 16 हजार 686,
निगेटिव्ह स्वॅब- 13 हजार 147,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 203,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 2 हजार 359,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 28,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 02,
मृत्यू संख्या- 94,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 हजार 20,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 232,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 47. 

प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   
00000


रास्तभाव धान्य दुकानात
तीन महिन्यांची साखर उपलब्ध
नांदेड (जिमाका), दि. 3 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर 2020 साठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो (प्रति महिना) याप्रमाणे मंजूर केले आहे. सदर महिन्यात जिल्ह्यासाठी 2 हजार 192 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्यक्ष शिधापत्रिकाधारकास संबंधित स्वस्त धान्य दुकानामार्फत वितरण करण्यात येणार आहे.

तालुका निहाय नियतन (क्विंटलमध्ये) पुढील प्रमाणे देण्यात आले आहे. नांदेड-192.5, अर्धापूर- 31.5, मुदखेड-32, कंधार-95, लोहा-126.5, भोकर-87.5, उमरी-72, देगलूर-97, बिलोली-74.5, नायगाव-141, धर्माबाद-78.5, मुखेड-200.5, किनवट-454.5, माहूर-209, हदगाव-203, हिमायतनगर-97 याची सर्व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...