Monday, August 3, 2020


कार्यालय सुशोभित असेल तर
काम करताना प्रसन्नता वाटते
- विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

औरंगाबाद (विमाका) 03 - कार्यालय व कार्यालयाचा परिसर स्वच्छ व सुशोभित असल्यास काम करताना प्रसन्नता वाटते. त्यामुळे आपले कार्यालय स्वच्छ ठेवण्यावर प्रत्येकाने भर द्यावा, असे मत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी व्यक्त केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आज महसूल दिनानिमित्त पुरवठा विभागाच्यावतीने कार्यालय सुशोभीकरणाबाबत माहिती पुस्तीका प्रसिद्ध करण्यात आली. या पुस्तिकेच्या विमोचन श्री.केंद्रेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे, अप्पर विभागीय आयुक्त डॉ. विजयकुमार फड, उपायुक्त (सामान्य प्रशासन) वर्षा ठाकूर, उपायुक्त (पुनर्वसन) पांडुरंग कुलकर्णी, उपायुक्त (पुरवठा) वामन कदम, उपायुक्त (नियोजन) रविंद्र जगताप, उपायुक्त (विकास-नियोजन) विणा सुपेकर यांच्यासह तहसीलदार, नायब तहसीलदार, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
            श्री. केंद्रेकर म्हणाले की, कामानिमित्त कार्यालयात आपण आठ ते दहा तास उपस्थित असतो जर तो परिसर नीट-नेटका ठेवल्यास आपले मनदेखील प्रसन्न राहते. विभागीय आयुक्त कार्यालयातील पुरवठा विभागाने स्वच्छता मोहिम हाती घेऊन कार्यालयाचे अतिशय सुंदर सुशोभिकरण केले आहे. तोच आदर्श इतर विभागांनी घ्यावा.  जेणेकरुन कार्यालयात आल्यावर प्रत्येकाला काम करण्यासाठी नवीन ऊर्जा प्राप्त होईल.           
            श्री. टाकसाळे म्हणाले की, औरंगाबादमध्ये लॉकडाऊनच्या काळात गरजूंपर्यंत अन्नधान्य पुरविण्याचे काम पुरवठा विभागाने अतिशय चोखपणे केले आहे. तसेच कार्यालय सुशोभीकरणाचा एक चांगला उपक्रमही हाती घेतला आहे. या उपक्रमांत इतर विभागांनी सुध्दा सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. 
डॉ. विजयकुमार फड म्हणाले की, महसुल दिनाचे औचित्य साधत पुरवठा विभागाने स्वच्छतेचे रोप रुजवले आहे. ते दिवसेंदिवस अजून बहरत जाईल. कार्यालय स्वच्छतेचा अतिशय चांगला उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
प्रास्ताविकात श्री. कदम  म्हणाले की, कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी दिवसभरातील अधिक वेळ घालवतो, त्यामुळे कार्यालय स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे आहे. स्वच्छतेमुळे आरोग्यही चांगले राहण्यास मदत मिळते व उत्साहाने कामे करण्याची ऊर्जा प्राप्त होते.
श्रीमती ठाकुर यांनी आभार मानले. आभारात महसूल दिनाचे महत्त्व त्यांनी विषद केले. कार्यालय स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. स्वच्छ कार्यालयामुळे मन आनंदी राहण्याबरोबरच कामेही जलद गतीने पूर्ण होतात आणि आपले आरोग्यही चांगले राहते.
*****

No comments:

Post a Comment

निवडणुकीच्या लगबगीत माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला.जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे नांदेड लोकसभापोटनिवडणुकीत निवडणूक ...