Wednesday, October 23, 2024

 वृत्त क्र. 972 

नांदेड जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी विधानसभेसाठी 4 अर्ज दाखल 

* 9 विधानसभेसाठी एकूण 441 तर लोकसभेसाठी 28 अर्जाची उचल 

* लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज एकाही उमेदवाराचा अर्ज नाही

नांदेड दि. 23 ऑक्टोंबर :- जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात बुधवारी दुसऱ्या दिवशी तीन उमेदवारांनी 4 अर्ज  दाखल केले आहेत. भोकर येथे एकाच उमेदवाराने दोन अर्ज दाखल केले आहेत. नऊ मतदारसंघात 253 इच्छूक अर्जदारांनी 441 उमेदवारी अर्ज नेले आहेत. तर नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज दुसऱ्या दिवशी 17 इच्छुकांनी 28 अर्जाची उचल केली आहे. काल बुधवारी जिल्ह्यामध्ये 411 अर्जांची उचल करण्यात आली होती. तथापि काल विधानसभेसाठी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. आज मात्र 4 अर्ज दाखल झाले आहेत. 

विधानसभेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर आहे. नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, भोकर, लोहा, किनवट, हदगाव, देगलूर, मुखेड आणि नायगाव विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. नांदेड उत्तर मतदारसघात 41 उमेदवारांनी 67 अर्ज नेले आहेत. भोकर विधानसभा मतदारसंघात 61 इच्छूकांनी 69 अर्जाची उचल केली आहे. लोहा मतदारसंघात 7 इच्छूकांनी 17 अर्ज, किनवट मतदार संघात 16 इच्छूकांनी 44 अर्ज, हदगाव मतदारसंघात 35 इच्छूकांनी 72 अर्ज, नांदेड दक्षिण मतदार संघात 21 इच्छूकांनी 31 अर्ज, देगलूर मतदारसंघात 17 इच्छूकांनी 39 अर्ज, मुखेड विधानसभा मतदारसंघात 17 इच्छूकांनी 38 अर्ज आणि नायगाव मतदारसंघात 38 इच्छूकांनी 64 अर्ज घेतले आहेत. दुसऱ्या दिवशी किनवट 1, भोकर 2, नांदेड उत्तर 1 या तीन मतदार संघातील  इच्छूकांनी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दाखल केली आहे.

अर्ज दाखल करणारे उमेदवार

नांदेड उत्तरमध्ये अकबर अख्तर खान यांनी एक अर्ज दाखल केला. किनवटमध्ये अर्जुन किशन आडे यांनी एक तर भोकरमध्ये अब्दुल वाहिद मोहमद यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत.  

आज लोकसभेसाठी एकही अर्ज दाखल नाही 

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. आज 17 अर्जदार व्यक्तींनी जवळपास 28 अर्जाची उचल केली आहे. 

00000













वृत्त क्र. 971 

खर्च निरीक्षकांकडून जिल्ह्यातील विभाग प्रमुखांचा आढावा 

एसएसटी, एफएसटी, सी-व्हिजील, एमसीएमसीच्या कामकाजाची पाहणी 

नांदेड दि. 23 ऑक्टोबर :- नांदेड जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आलेले खर्च निरीक्षक ए. गोविंदराज व मयंक पांडे मंगळवार 22 ऑक्टोबरला दाखल झाले आहेत. त्यांनी 23 रोजी जिल्ह्यातील विविध विभाग प्रमुखांच्या बैठकी घेतल्या तसेच सी-व्हिजील कक्ष, निवडणूक खर्च कक्ष, माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती कक्ष (एमसीएमसी) कक्षाला त्यांनी भेट दिली. 

यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने, महानगरपालिकेचे मुख्यालेखा अधिकारी डॉ. जनार्दन पक्वाने यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. 

आज सर्वप्रथम खर्च निरीक्षक ए. गोविंदराज व मयंक पांडे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची त्यांच्या कक्षामध्ये भेट घेतली.त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी कक्षामध्ये जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत स्थिरनिगरानी पथक तसेच भरारी पथकाच्या गेल्या काही दिवसातील कार्याचा आढावा घेतला. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी केवळ 40 लक्ष रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे उमेदवारांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्याचे स्पष्ट केले. जाहीर कार्यक्रम, सभा, याबाबत रॅलीचे संपूर्ण रेकॉड्रींग झाले पाहिजे. व्हिडिओग्राफरने अतिशय व्यावसायिकपणे चित्रीकरण केले पाहिजे. तपासणी दरम्यान सगळ्या गाड्यांचे नंबर, साहित्याचा तपशील कॅमेऱ्यात कसा येईल याबाबत त्यांनी सूचना केल्या. 

सिव्हिल कक्षाला त्यांनी भेट दिली कक्षाचे नोडल अधिकारी गंगाधर इरलोड यांनी त्यांचे स्वागत केले. आचारसंहितेपासून झालेल्या कामकाजाचा आढावा दिला. 

त्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या खर्चावर नियंत्रण ठेवणाऱ्या खर्च समितीच्या कार्यालयाला भेट दिली. निवडणूक खर्चा संदर्भात नोडल अधिकारी असणारे डॉ जनार्दन पक्वाने यांनी यावेळी कक्षाच्या संदर्भात माहिती दिली. एमसीएमसी समितीच्या कक्षाला यावेळी त्यांनी भेट दिली. जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी त्यांचे स्वागत केले.

जाहिरातीवरील खर्च उमेदवाराचा मुख्य खर्च असून सर्व वर्तमानपत्रे, समाज माध्यम, बल्क एसएमएस संदेश तसेच सोशल माध्यमावरील पोस्ट या सर्व बाबींची माहिती खर्च निरीक्षकांना नियमितपणे कळली पाहिजे. यासाठी एमसीएमसी समितीने तत्पर रहावे. तसेच पेडन्यूजचा प्रकार होत तर नाही ना याकडे लक्ष वेधावे, असे यावेळी सांगितले.

00000








वृत्त क्र. 970

विधानसभेसाठी निवडणूक खर्च निरीक्षक

ए. गोविंदराज, मयंक पांडे नांदेडमध्ये दाखल       

नांदेड दि. 23 ऑक्टोबर : नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक म्हणून तामिळनाडू कॅडरचे ए. गोविंदराज (आयआरएस) तसेच गुजरात कॅडरचे वरिष्ठ अधिकारी मयंक पांडे (आयआरएस) यांचे काल दि. 22 ऑक्टोबरला आगमन झाले असून त्यांनी आपल्या कार्याला प्रारंभ केला आहे. 

निवडणुकीमध्ये भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. 40 लक्ष रुपये विधानसभेसाठी तर 95 लक्ष लोकसभेसाठी खर्च मर्यादा आहे. निवडणुकीमध्ये पैशांचा गैरवापर होऊ नये यासाठी आयोगामार्फत अनेक प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले आहेत. निवडणुकीतील सभा, संमेलन, जेवनावळी, जाहिरातीवरील खर्च नियंत्रीत केल्या जाते. याशिवाय पैशाचे अमिष व अन्य बाबींबाबत  कडक निगरानी केली जाते. निवडणूक निरीक्षकांमार्फत याबाबींची तपासणी केली जात असून ते नांदेड जिल्ह्यामध्ये याकाळात कायम रहिवाशी असतात.            

ए. गोविंद राज नायगाव, देगलूर,

मुखेड व लोहासाठी निरीक्षक

तामिळनाडू कॅडरचे चेन्नई येथील गोविंद राज यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी नांदेड मध्ये आल्यानंतर चर्चा केली. ए गोविंदराज यांच्याकडे भारत निवडणूक आयोगाने नायगाव, देगलूर, मुखेड, लोहा या विधानसभा क्षेत्राच्या खर्च निरीक्षणाची जबाबदारी सोपविली आहे. कार्यालयीन वेळेमध्ये त्यांच्याशी नागरिकांना संपर्क साधता येईल. 

ए. गोविंद राज यांचा स्थानिक संपर्क क्रमांक 7249048040 आहे. त्यांचे संपर्क अधिकारी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास गंगथडे (मोबाईल क्रमांक 9850485332) आहेत. कार्यालयीन कालावधीत त्यांना नागरिकांना भेटता येईल. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे लेंडी कक्ष येथे ते निवडणूक काळात निवासी आहेत. 

मयंक पांडे किनवट, हदगाव, भोकर,

नांदेड उत्तर, नांदेड दक्षिणसाठी निरीक्षक

गुजरात कॅडरचे 2009 बॅचचे आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी मयंक पांडे हे सुरत येथे आयकर विभागात अतिरिक्त आयुक्त आहेत. त्यांच्याकडे भारत निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण या विधानसभा क्षेत्राचे खर्च निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविली आहे. मयंक पांडे यांचा संपर्क क्र. 08483845220 आहे. तर त्यांचे संपर्क अधिकारी जिल्हा परिषदचे मुख्य लेखापाल शिवप्रकाश चन्ना (मो.नं. 9011000921) आहेत. शासकीय विश्रामगृह नांदेड येथील आसना कक्षात ते निवडणूक काळात निवासी आहेत. 

नागरिकांना आपापल्या विधानसभा क्षेत्राच्या संदर्भातील काही माहिती द्यायची असेल तक्रार असेल तर कार्यालयीन वेळेमध्ये या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटता येणार आहे.

00000

ए. गोविंदराज

निवडणूक निरीक्षक मयांक पांडे



दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी आवाहन : भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग नागरिक व ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच मतदानाची व्यवस्था केली आहे. 22 ते 27 ऑक्टोबर या काळात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी बिएलओ आपल्यापर्यंत पोहोचतील. त्यांना प्रतिसाद द्यावा व या प्रक्रियेत सहभागी व्हावे,असे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

 वृत्त क्र. 969

आचारसंहिता भंगाच्‍या तक्रारी सी-व्हीजील अॅपवर

तसेच 1950 या टोल फ्रि नंबरवर दाखल करण्‍याचे आवाहन 

नांदेड दि. 22 ऑक्टोंबर : नांदेड जिल्ह्यामध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक तसेच लोकसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.या काळात आदर्श आचारसंहितेचे भंग झाल्यास सी-व्हीजील अॅपवर तसेच 1950 या टोल फ्रि नंबरवर नागरिकांनी तक्रार करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 तसेच, 16-नांदेड लोकसभा पोटनिवडणूकीसाठी भारत निवडणूक आयोग यांचेकडून 15 ऑक्टोंबरला घोषणा करण्‍यात आल्‍यामुळे संपूर्ण महाराष्‍ट्र राज्‍यात व जिल्‍हयात आदर्श आचासंहिता लागू झाली आहे.     

आचारसंहिता लागू झालेल्‍या दिनांकापासून नांदेड जिल्‍हयात निवडणूक संदर्भात आदर्श आचारसं‍हितेचा भंग होत असल्‍यास नागरीकांनी cVIGIL अॅपद्वारे तसेच १९५० या टोल फ्रि क्रमांकावर फोन करुन तक्रारी दाखल करु शकतात. सदरील तक्रारीचे फिल्‍डस्‍तरावरील FST टिमद्वारे प्राप्‍त तक्रारींची शहानिशा करुन तक्रार १०० मिनिटात निकाली काढण्‍यात येते. त्‍यासाठी जिल्‍हास्‍तरावर जिल्‍हा नियंत्रण कक्ष स्‍थापन करण्‍यात आले आहे. 

नागरीक cVIGIL अॅपद्वारे जर कोणी बंदुक/पिस्‍तुल प्रदर्शन करणे, दारु वाटप, पैसे वाटप, सरकारी मालमत्‍तेचे विद्रुपन, बनावट बातमी, मतदारांची वाहतुक, भेटवस्‍तू वाटप, पेड  न्यूज, जातीत तेढ निर्माण करणारे भाषण, धमकी इत्‍यादी बाबत प्रकार होत असल्‍यास अशा घटनांचे cVIGIL अॅपद्वारे फोटो, व्हिडीओ तसेच ऑडिओ रेकॉर्ड करुन ऑनलाईन तक्रारी दाखल करु शकतात. नागरिकांनी या सुविधांचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

000000




 

 वृत्त क्र. 968

नांदेड जिल्ह्यात पहिल्या दिवशी विधानसभेसाठी एकही अर्ज नाही 

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज 

९ विधानसभेसाठी एकूण ४११अर्जाची तर लोकसभा मतदार संघात ४५ अर्जाची उचल 

नांदेड दि. २२ ऑक्टोंबर :  जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात मंगळवारी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. २०० हून अधिक इच्छूकांनी ४११ उमेदवारी अर्ज नेले आहेत. तर नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज पहिल्याच दिवशी एका अपक्ष उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला आहे.

नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, भोकर, लोहा, किनवट, हदगाव, देगलूर, मुखेड आणि नायगाव विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. 

नांदेड उत्तर मतदारसघात ३७ उमेदवारांनी ५४ अर्ज नेले आहेत. भोकर विधानसभा मतदारसंघात ६१ इच्छूकांनी ६९ अर्जाची उचल केली आहे. लोहा मतदारसंघात २१ इच्छूकांनी ५३ अर्ज, किनवट मतदार संघात १८ इच्छूकांनी ४१ अर्ज, हदगाव मतदारसंघात २५ इच्छूकांनी ३६ अर्ज, नांदेड दक्षिण मतदार संघात ४० इच्छूकांनी ६९ अर्ज, देगलूर मतदारसंघात २२ इच्छूकांनी ४४ अर्ज, मुखेड विधानसभा मतदारसंघात ५ इच्छूकांनी ९ अर्ज आणि नायगाव मतदारसंघात २२ इच्छूकांनी ३६ अर्ज घेतले आहेत. पहिल्या दिवशी एकाही इच्छूकांनी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दाखल केली नाही.

 लोकसभेसाठी एक अर्ज दाखल 

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एक अर्ज दाखल झाला आहे. आज पंचवीस व्यक्तींनी जवळपास 45 अर्जाची उचल केली आहे. आज पहिल्याच दिवशी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करणारे अपक्ष उमेदवार जफर अली खान आहेत.

असा आहे कार्यक्रम :

अधिसूचना जाहीर             : 22 ऑक्टोबर

नामांकनाची अंतीम तारीख : 29 ऑक्टोबर

नामांकनाची छाणणी          : 30 ऑक्टोबर

नामांकन मागे अंतीम तारीख : 4 नोव्हेंबर

मतदान तारीख.                   : 20 नोव्हेंबर

मतमोजणी तारीख.              : 23 नोव्हेंबर 2024.

0000

 वृत्त क्र. 967

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के ;हदगाव तालुक्यात केंद्रबिंदू 

नांदेड दि. 22 ऑक्टोंबर : नांदेड शहर व तसेच अर्धापूर, हदगाव या तालुक्यातून आज दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 06:52 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली.

अधिकृतरित्या दिलेल्या वृत्तानुसार या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर 3.8 अशी नोंदविण्यात आलेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू नांदेड शहरापासून 29 किमी दूर उत्तरपूर्व दिशेला हदगाव तालुक्यातील सावरगाव या गावात असून या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली असल्याचे जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राचे अधिकारी किशोर कुऱ्हे यांनी दिली आहे.

000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...