Friday, October 4, 2024

वृत्त क्र. 905

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान

योजनांसाठी 30 नोव्हेंबरपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि. 4 ऑक्टोबर :-  राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनेसाठी इच्छूकांनी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. ग्रंथालयांनी कोणत्याही एका योजनेसाठी प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत व आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी, हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन मुंबईचे ग्रंथालय संचालक अशाक गाडेकर यांनी केले आहे. 

भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभांगातर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकत्ता यांच्या समान व असमान निधी योजनेतर्गंत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येतात. समान व असमान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार 2024-25 साठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्या संदर्भांतील नियम, अटी व अर्जाचा नमुना राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यातील इच्छूक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना या संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावा. 

सन 2024-25 साठीच्या समान निधी योजना पुढील प्रमाणे आहे. इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजना 25 लाख रुपये. उपरोक्त योजने व्यतिरिक्त समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने देण्यात येत असल्यामुळे इतर योजनेसाठीचे प्रस्ताव सादर करु नयेत.  सन 2024-25 साठीच्या असमान निधी योजना पुढीलप्रमाणे आहेत. ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य (फर्निचर खरेदी 4 लाख रुपये व इमारत बांधकाम 10 ते 15 लाख रुपये). "राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा" विकसीत करण्यासाठी अर्थसहाय्य- 2 लाख 50 हजार रुपये व विशेष अर्थसहाय्य आधुनिकीकरण 2 लाख रुपये.  महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य 6 लाख 20 हजार रुपये व इमारत विस्तार 10 लाख रुपये. राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरूकता कार्यक्रम आयोजनांसाठी अर्थसहाय्य 1 लाख 50 हजार रुपये/ 2 लाख 50 हजार रुपये/ 3 लाख रुपये.  बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय कोपरा स्थापन करण्याकरीता अर्थसहाय्य 6 लाख 80 हजार रुपये याप्रमाणे आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे. आवश्यकता असल्यास संबंधीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

0000

 वृत्त क्र. 904

नांदेड जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी 

विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता 

नांदेड दि 4 ऑक्टोबर : नांदेड जिल्ह्यासाठी 4 ते 8 ऑक्टोबर 2024 या चार दिवसासाठी येलो अलर्ट हवामान शास्त्र विभागाने जाहीर केला आहे. या चार दिवसांत  जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्रमुंबई यांनी दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 01:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 4 ते 8 ऑक्टोबर 2024 या चार दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे.  या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावीअसे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

या गोष्टी करा :

१)विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.

२)आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनीछत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.

३)आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.

४)तारांचे कुंपणविजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.

५)पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका: 

१)आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळपाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.

२)विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.

३)उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.

४)धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.

५)जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

00000

वृत्त क्र. 903

मुख्यमंत्री वयोश्री योजनेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर

यानंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत यांची नोंद घेण्याचे आवाहन

नांदेड दि. 4 ऑक्टोबर :- राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अंपगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु केली. या योजनेत साहित्य खरेदी करण्यासाठी महाडिबीटीद्वारे लाभार्थ्याच्या बँक खात्यात 3 हजार रुपये रक्कम एकदा जमा करण्यात येणार आहे.

या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हिल चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सवाईकल कॉलर इत्यादी साहीत्य खरेदीसाठी रक्कम देण्यात येणार आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी 4 ऑक्टोबर 2024 पर्यत अर्ज करण्याची शेवटची मुदत होती. तरी 4 ऑक्टोबर 2024 नंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, यांची सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले.

00000 

 वृत्त क्र. 902

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील ज्येष्ठ नागरिकांना घेवून

नांदेड येथून पहिली रेल्वे 12 ऑक्टोबर रोजी होणार रवाना

नांदेड दि. 4 ऑक्टोबर :- राज्यातील नागरिकांना देशातील मोठया तीर्थस्थळांना जाऊन मनशांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे, यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या आहेत त्यांना राज्य आणि देशातील तीर्थक्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना शासनाने सुरु केली आहे.

या योजनेअंतर्गत नांदेड येथून ज्येष्ठ नागरिकांना घेवून पहिली ट्रेन 12 ऑक्टोबर 2024 रोजी निघणार आहे. या योजनेत पात्र लाभार्थ्यांनी निवड यादी समाज कल्याण कार्यालयाच्या सूचना फलकावर लावली आहे. तरी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी आपले नाव पात्र यादीत आहे किंवा कसे याची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन  समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्र. 901

नांदेडला नुकसानग्रस्तासाठी 812 कोटींची मागणी

·         अतिवृष्टीचा सात लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फटका

·         अतिवृष्टीमुळे 5 लाख 96 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

नांदेड दि. 4 ऑक्टोबर : नांदेड जिल्‍हयात एक ते तीन सप्‍टेंबर 2024 या  कालावधीत 62 मंडळात अतिवृष्‍टी होवून शेतीपीक व शेतजमीन नुकसान झाल्‍याचा प्राथमिक अहवाल प्राप्‍त झाला. त्‍यानुसार नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनास सादर करण्‍यात आला आहे. जिल्‍हा प्रशासनाकडून ग्रामस्‍तरीय समितीमार्फत नुकसानीचे संयुक्‍त पंचनामे करण्‍यात आले. राज्‍य शासनाकडून प्राप्‍त मान्‍यतेनुसार पीक नुकसान अनुदान वाटपाचे  दर  वाढविण्‍यात आले आहेत. तसेच अनुदान वाटपातील क्षेत्राची मर्यादा 2 हेक्‍टरवरून 3 हेक्टरपर्यंत करण्‍यात आली आहे. त्‍यानुसार ग्रामस्‍तरीय समितीमार्फत सदर नुकसानीचे संयुक्‍त पंचनामे पुर्ण झाले आहेत व निधी मागणी विभागीय आयुक्‍त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना सादर केली आहे.  

तालुका बाधित शेतकरी संख्या एकूण बाधित क्षेत्र (हे.आर.)अपेक्षीत निधी (रक्कम कोटीत) पुढीलप्रमाणे आहे.

नांदेड बाधित शेतकरी 34641 व बाधित क्षेत्र 21752 अपेक्षित निधी 29.85 कोटी रुपयेअर्धापूर -32448, 24245, 32.97, कंधार- 73650, 52402, 71.27, लोहा -80840, 61642, 84.40, बिलोली- 36099, 34169, 46.47, नायगांव- 56172, 41645, 56.64, देगलूर- 61123, 37462, 50.95, मुखेड- 79603, 41114, 55.92, धर्माबाद- 28795, 20042, 27.26, उमरी- 34038, 24042, 32.70, भोकर- 43059, 38308, 52.19, मुदखेड- 3081221584, 29.35, हदगांव- 74228, 60492, 82.27, हिमायतनगर- 34533, 32805, 44.61, किनवट- 57702, 59132.78, 80.42, माहूर- 26172, 25681.18, 35.12 असे एकूण 783915 बाधित शेतकरी आहे तर बाधित क्षेत्र हे.आर 596517.96 इतके आहे यासाठी अपेक्षित रुपये 812.386 कोटी निधीची मागणी करण्यात आली आहे.

000000

 वृत्त क्र. 900

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त

 खादी वस्त्र व ग्रामोद्योगी वस्तुचे प्रदर्शन व विक्री

उद्योग भवन येथे 9 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत  प्रदर्शन

नांदेड दि. 4 ऑक्टोबर :- राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ नांदेड यांच्यावतीने खादी वस्त्र व ग्रामोद्योगी वस्तुचे प्रदर्शन व विक्री 9 ते 11 ऑक्टोबर 2024 या कालावधीत आयोजित केलेले आहे. सदर प्रदर्शन व विक्री उद्योग भवन, शिवाजी नगर, औद्योगिक वसाहत, नांदेड येथे सकाळी 11 ते 6 या कालावधीत होणार आहे. तरी नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्र. 899

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत 

नांदेड दि. 4 ऑक्टोबर :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 8 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्र. 898 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची पोहरादेवीला सभा

नांदेड विमानतळावर आज आगमन व प्रस्थान 

नांदेड दि. 4 ऑक्टोबर :- बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे नंगारा म्युझियम लोकार्पण व जाहीर सभेसाठी शनिवार 5 ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येणार आहेत. सकाळी 11 वा. पोहरादेवी येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी नांदेड येथील गुरूगोविंदसिंघजी विमानतळावर त्यांचे सकाळी 10 वा. आगमन होणार आहे. या ठिकाणावरून ते हेलिकॉप्टरने पोहरादेवीला पोहचतील. 

प्रधानमंत्र्यांचा दौरा

पुढीलप्रमाणे आहे...

सकाळी 8.05 वा. ते दिल्ली विमानतळावरून नांदेडसाठी निघतील. नांदेड येथे गुरूगोविंदसिंघजी विमानतळावर त्यांचे सकाळी 9.55 वा. आगमन होईल. सकाळी 10 वा. विशेष हेलिकॉप्टरने पोहरादेवीकडे प्रयाण करतील. सकाळी 10.45 ला वाशिम जिल्ह्यातील पोहारादेवी हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल. पोहरादेवी येथील जगदंबा मंदिरात संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज यांच्या समाधी स्थळाचे ते दर्शन घेतील. सकाळी 11.15 वा. बंजारा विरासत नंगारा म्युझियमचे ते लोकार्पण करतील. त्यानंतर सकाळी 11.30 वा. पोहरादेवी येथील जाहिर सभेमध्ये ते जनतेला संबोधित करतील. दुपारी 12.55 वा. पोहरादेवी येथून प्रस्थान करून 1.45 वाजेच्या सुमारास नांदेड विमानतळावर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर दुपारी 1.50 ला नांदेड विमानतळावरून ते मुंबईकडे प्रयाण करतील.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...