Thursday, June 20, 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर स्वागत



नांदेड, दि. 20 :-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय शिबिरासाठी येथील गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर आज रात्री 10.20 वा. आगमन झाले. यावेळी त्यांचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.   
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, मनपा आयुक्त लहुराज माळी, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, गुरुद्वारा बोर्डाचे इंदरसिंघ मनहस, परमज्योतसिंघ चहेल, डी. पी. सिंघ, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, माजी महापौर अजय बिसेन, राजेश पवार, संतूक हंबर्डे, चैतन्यबापू देशमुख, संजय कोडगे आदी उपस्थित होते.  

000000

नांदेड येथील राज्यस्तरीय योगशिबिराची तयारी पूर्ण



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार ; सुमारे दीड लाख नागरिकांचा सहभाग अपेक्षीत

नांदेड, दि. 20 :- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या दि. 21 जून 2019 रोजी शिवरत्न जिवाजी महाले चौक (मामा चौक) असर्जन नांदेड येथे सकाळी 5 ते 7.30 वा. राज्यस्तरीय योग शिबिराचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्वामी रामदेव महाराज यांची उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. सर्वस्‍तरातील नागरिक, महिला, विद्यार्थ्यांनी या राज्यस्तरीय योग शिबिरात जास्तीतजास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य शासनातर्फे करण्यात आले आहे.   
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस घोषित केला आहे. जगभरातील  देश हा दिवस उत्साहाने साजरा करीत आहेत. महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित व पतंजली योगपीठाच्या सहयोगाने आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या राज्यस्तरीय योग शिबिरात जवळपास दीड लाखापेक्षा अधिक लोकांना एकाचवेळी योगासने करता येतील अशी व्यवस्था येथे करण्यात आली आहे.   
स्वामी रामदेव महाराज यांचे आज नांदेड येथे आगमन झाले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती स्वामी रामदेव महाराज यांनी मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत दिली. नियमितपणे योग केल्याने आपला दिवसच नाही तर आयुष्य चांगले होईल. आजारापासून आपण दूर राहू असे बाबा रामदेव यांनी योग दिनाच्या पार्श्वभूमीवर माहिती देताना सांगितले. यावेळी बाबा रामदेव यांनी योग करण्याचे महत्व, योग कसा करता येतो, योगमुळे काय फायदे होतात याची प्रात्यक्षिके दाखविली.
यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस राज्यातील 36 जिल्हा मुख्यालय आणि 322 तालुका मुख्यालय अशा 358 ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. या योग दिनामध्ये प्रत्येक तालुक्यातील किमान 5 हजार विद्यार्थी (शाळा/महाविद्यालये/एनएसएस/एनसीसी/स्काऊट गाईड) सहभागी होणार आहेत.
00000

गुटखा तत्सम पदार्थाची विक्री करणाऱ्यावर कारवाई



नांदेड, दि. 20 :- माहूर पोलिसांनी कासीब युसूफ खाकरा (रा. माहूर) या व्यक्तीकडील सामानाची तपासणी करुन प्रतिबंधीत अन्नपदार्थ गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखु आदींचा 69 हजार रुपयाचा साठा व वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी कार जप्त केली आहे.
याप्रकरणी संबंधिता विरुद्ध पोलीस स्टेशन माहूर येथे अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006  भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्हाचा पुढील तपास माहूर पोलीस करीत आहेत. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांचे मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड यांनी  केली.
प्रतिबंधित अन्नपदार्थाची साठवणूक, वाहतूक, विक्री व उत्पादन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरुद्ध नियमित कार्यवाही करण्यात येणार आहे. सदर अन्नपदार्थ कोणीही छुप्या, चोरटया पध्दतीने विक्री, उत्पादन, साठा, वाहतुक करु नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
00000

रास्तभाव धान्य दुकानात तीन महिन्यांची साखर उपलब्ध



नांदेड, दि. 20 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर 2019 साठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो (प्रति महिना) याप्रमाणे मंजूर केले आहे. सदर महिन्यात जिल्ह्यासाठी 2 हजार 112 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्यक्ष शिधापत्रिकाधारकास संबंधित स्वस्त धान्य दुकानामार्फत वितरण करण्यात येणार आहे.
तालुका निहाय नियतन पुढील प्रमाणे देण्यात आले आहे. नांदेड 176.5 , हदगाव -199, किनवट -460, भोकर-82.02, बिलोली-136.5, देगलूर-123, मुखेड-162.8, कंधार-44.5, लोहा-124, अर्धापूर-33, हिमायतनगर-92.5, माहूर-201, उमरी-51, धर्माबाद-76, नायगाव-115.5, मुदखेड-34.5 याची सर्व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000

जिल्हा कारागृहात आरोग्य तपासणी संपन्न



नांदेड, 20 :- येथील श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय वैद्यकीय पथकामार्फत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. आय भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कारागृह वर्ग 2 नांदेड येथील 25 अधिकारी, कर्मचाऱ्यांचे उच्चरक्तदाब, मधुमेह, मौखिक आरोग्य तसेच त्वचारोग याची तपासणी करण्यात आली.
यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. एन. हजारी यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना नियमित व्यायाम, पुरेशी झोप योग्य आहार, हेच निरोगी आरोग्याचा मूलमंत्र आहे, असे म्हणाले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. के. साखरे, डॉ. अनुप्रिया गहेरवार, कारागृह अधीक्षक आर. सी. चांदणे, डॉ. कौतिकलाल इंगळे, डॉ. साईप्रसाद शिंदे, तुरुंगाधिकारी यु. एन. गायकवाड, के.एम बर्गे ,बी.टी. माळी, सुभेदार रामेश बारंग, मिश्रक रावसाहेब देवकते, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ संतोष बेटकर,  समुपदेशक सुवर्णकार सदाशिव यांनी परिश्रम घेतले.
00000

कामगारांसाठी विशेष नोंदणी अभियान



नांदेड, 20 :- अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यातील बांधकाम कामगार व त्याअनुषंगाने इतर कामावरील कामगारांसाठी १५ जून २०१९ ते १४ ऑगस्ट २०१९ या कालावधीत जिल्ह्यात विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात प्रत्यक्ष बांधकामाच्या साईटवर जाऊन कामगारांची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी करण्यात येत असून या योजनेंतर्गत शासनाने घोषीत केलेले लाभ बांधकाम कामगारांना देण्यात येत आहेत. सर्व इमारत व इतर बांधकाम कामगारांनी या नोंदणी अभियानात आपण सक्रीय सहभाग नोंदवून महाराष्ट्र व इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सर्व योजनांचा लाभ घ्यावा.
पुढील उद्योगातील कामगारांचा देखील समावेश करण्यात आलेले आहे. दगड कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे. लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे. रंग, वार्निश लावणे इत्यादीसह सुतारकाम. गटार व नळजोडणीची कामे. वायरिंग, वितरण, तावदान बसविणे आदीसह विद्युत कामे. अग्निशमन यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे. वातानुकूलित यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे. उद्वाहने, स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे. सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे. लोखंडाच्या किंवा धातूच्या ग्रील्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे व बसविणे. जलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे. सुतारकाम करणे, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पेरीस यासंहीत अंतर्गत (सजावटीचे) काम. काच कापणे, कचाची तावदाने बसविणे. कारखाने अधिनियम, 1948 खाली समावेश नसलेल्या विटा, छप्परावरील कौल इत्यादी तयार करणे. सौर तावदाने इत्यादी सारखे ऊर्जाक्षम उपकरण बसविणे. स्वयंपाकखोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोडूलर (आधुनिक) युनिट बसविणे. सिमेंट काक्रीटच्या साचेबद्ध वस्तू इत्यादी तयार करणे व बसविणे. जलतरण तलाव, गोल्फचे मैदान इत्यादीसह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधाचे बांधकाम. माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवाशी निवारे किंवा बसस्थानके, सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे. रोटरीजचे बांधकाम करणे, कारंजे बसविणे इत्यादी. सार्वजनीक उद्याने, पदपथ, रमणीय भूप्रदेश इत्यादीचे बांधकाम.
ही नोंदणी अभियान सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. बांधकाम क्षेत्रातील निगडीत असलेल्या सर्व बांधकाम कामगारांची नोंदणी करावी व बांधकाम बांधकाम क्षेत्रातील व इतत्र काम करणाऱ्या बांधकाम कामगारांनी देखील नोंदणीसाठी सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय नांदेड उद्योग भवन तळ मजला औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर नांदेड या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त सय्यद मोहसीन तसेच अ.ज.पेरके व अ.अ.देशमुख सरकारी कामगार अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...