Monday, August 29, 2016

मन-बुद्धी-शरीराच्या तंदुरूस्तीसाठी
क्रिडास्पर्धांचे योगदान महत्त्वपुर्ण - कुलगुरू डॉ. विद्यासागर
जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन

नांदेड, दि. 29 :- बदलत्या परिस्थितीत पोलिस दलाच्याही मन-बुद्धी आणि शारिरीक तंदुरूस्तीसाठी क्रिडास्पर्धांचे योगदान महत्त्वपुर्ण राहील, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. पंडीत विद्यासागर यांनी आज येथे केले. नांदेड जिल्हा पोलीस दलाच्यावतीने आयोजित जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धा-2016 चे उद्घाटन कुलगुरू डॅा. विदयासागर यांच्या हस्ते संपन्न झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर या तीन दिवसीय स्पर्धांना पथसंचलन आणि जिम्नॅस्कीक्सच्या कवायतींनी उत्साहात प्रारंभ झाला.

याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय येनपुरे यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, संदीप डोईफोडे आदींसह जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते. नांदेड मुख्यालय, नांदेड शहर आणि कंधार आणि भोकर अशा चार विभागांच्या संघांचा या स्पर्धांमध्ये सहभाग राहील. या संघांमध्ये सुमारे दोनशे खेळाडुंचा समावेश आहे.
उद्घाटनपर भाषणात डॉ. विद्यासागर म्हणाले की, पोलिस दलाविषयी आदर आणि विश्र्वासार्हता या महत्त्वाच्या बाबी आहेत. आता गुन्ह्यांचे प्रकार आणि गुन्हेगारांचेही प्रकारही बदलत आहेत. तंत्रज्ज्ञानामुळेही नवी गुन्हेगारीचे स्वरुप बदलले आहे. खरेतर सुरक्षा ही केवळ पोलिसांची जबाबदारी नाही, तर त्यामध्ये समाजाचाही सहभाग असणे आवश्यक आहे. तशी मानसिकता निर्माण करणेही आवश्यक आहे. पोलिस दलातील मनुष्यबळासाठी मन-बुद्धी आणि शरीराची तंदुरूस्ती ही खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी खेळांचा, विविध प्रकारच्या क्रिडा प्रकारांचाही विचार करावा लागेल. आज क्रिडाजगत हे विज्ञानाशीही जोडले गेले आहे. त्यामुळे पोलिसांच्या क्षमता वृद्धींगत करण्यासाठी अशा क्रिडा स्पर्धांचे योगदान मोठे राहील. यावेळी डॅा. विद्यासागर यांनी विद्यापीठाकडूनही पोलिसांच्या क्षमता विकासासाठी विविध अभ्यासक्रमांसाठी सहकार्य केले जाईल, असेही नमूद केले.

सुरवातीला कुलगुरू डॅा. विद्यासागर यांना पथसंचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. संघाच्या या पथसंचलनाचे नेतृत्व रामराव राठोड यांनी केले. पोलीस क्रिडापटू रेणुका देवणे यांनी वाहून आणलेल्या क्रिडा ज्योतीद्वारे मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेची क्रिडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. श्री. राठोड यांनी सहभागी खेळाडुंना स्पर्धेची शपथ दिली. किरण स्पोर्टस असोसिएशनच्या खेळाडुंनी जिम्नॅस्टीक्सचे प्रकार सादर केले. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. येनपुरे यांनी प्रास्ताविक केले. गृह पोलीस उपअधीक्षक व्ही. पी. नांदेडकर यांनी आभार मानले. प्रा. संतोष देवराय यांनी सुत्रसंचालन केले. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा समारोप बुधवार 31 ऑगस्ट रोजी होणार आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांसाठी
10 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्यास मुदत
नांदेड, दि. 26 :- सामाजिक न्याय विभागामार्फत शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार सन 2016-17 साठी इच्छूक सामाजिक संस्था, समाजसेवकांनी परीपूर्ण अर्ज दोन प्रतीमध्ये शनिवार 10 सप्टेंबर 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अधिक माहितीसाठी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन नांदेडचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त भगवान वीर यांनी केले आहे.    
            मागासवर्गीय कल्याण क्षेत्रात लक्षणीय वैशिष्टयपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती संस्थेला दरवर्षी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येते. पुरस्कारांसाठी सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात मागासवर्गीय, पददलित, दिव्यांग, वृध्द, व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा निर्मुलन इत्यादी क्षेत्रात वैशिष्टयपूर्ण काम करणाऱ्या संस्थाकडून दरवर्षी  प्रस्ताव  मागविण्यात येतात.  प्राप्त प्रस्तावांची राज्यस्तरीय समितीमार्फत निवड छाननी करुन पुरस्कार निश्चित करण्यात येतो, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.  

000000            
मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू 
नांदेड, दि. 26 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा शनिवार 27 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 6 वाजेपासून सोमवार 26 सप्टेंबर 2016 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी सुरेश काकाणी यांनी घोषित केले आहे. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. 

00000
दहावी, बारावी खाजगी विद्यार्थ्यांसाठी
परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ
          नांदेड, दि. 26 :-  फेब्रुवारी-मार्च 2017 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांसाठी फॉर्म नंबर 17 अतिविलंब शुल्कासह नाव नोंदणीसाठी अर्ज स्विकारण्याची मुदत शुक्रवार 30 सप्टेंबर 2016 पर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील मान्यता प्राप्त माध्यमिक शाळ, कनिष्ठ महाविद्यालयांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.

000000
कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी
माहिती सादर करण्याचे आवाहन
          नांदेड, दि. 26 :-  इतर मागास प्रवर्गातील इच्छूक व्यक्तींना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याच्या दृष्टिने हस्तकला, वस्त्रोद्योग, हातमाग व कुशल कारागीर याबाबत कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी माहिती मागविण्यात येत आहे. इच्छूक पात्र व्यक्तींनी याबाबतची माहिती जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेसमोर नांदेड येथे सादर करावी, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एन. झुंजारे यांनी केले आहे.

000000
एसटीतील बडतर्फ कर्मचाऱ्यांना
कुटुंब सुरक्षा योजनेतून फेर नेमणूक
          नांदेड, दि. 26 :-  राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेतील गैरहजेरीमुळे बडतर्फ झालेल्या कर्मचारी व अपहार प्रकरणी बडतर्फ झालेल्या वाहकांच्या कुटुंबाची होणारी आर्थिक कुचंबणा थांबावी यासाठी 45 वर्षापेक्षा जास्त वय नसलेल्या कर्मचाऱ्यांना कुटुंब सुरक्षा योजनेअंतर्गत अटी व शर्तीनुसार नेमणूक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
            फेर नेमणूक देताना संबंधीत कर्मचाऱ्यांच्या पदातील त्याच्या विभागातील सामाजिक आरक्षाणानुसार व सध्याच्या रिक्त जागेनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. याबाबतचे परिपत्रक राज्य परिवहन महामंडळाच्या www.msrtc.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच विभाग व आगाराच्या सूचना फलकावरही लावण्यात आले आहे. संबंधितांनी अधिक माहितीसाठी राज्य परिवहन विभागाशी संपर्क साधावा व कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन  नांदेड राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी केले आहे.

000000
 हंगामात आतापर्यंत 66.52 टक्के पाऊस
          नांदेड, दि. 26 :- जिल्ह्यात  सोमवार 29 ऑगस्ट 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 34.57 मिलीमीटर  पाऊस झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 2.16  मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे.  तर जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 635.58 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या  हंगामातील  पावसाची  टक्केवारी  66.52 इतकी झाली आहे.   
जिल्ह्यात सोमवार 29 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात  झालेला  पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय  पुढील  प्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस  : नांदेड- निरंक (604.61), मुदखेड- निरंक (526.68), अर्धापूर- निरंक (656.99) , भोकर- 1.00 (852.50) , उमरी- निरंक (487.29), कंधार- 0.33 (515.97), लोहा- 0.17 (660.84), किनवट- 11.75 (755.03), माहूर- 3.75 (905.50), हदगाव- 2.57 (770.99), हिमायतनगर- निरंक (725.65), देगलूर- 3.67 (433.68), बिलोली- 5.00 (634.20), धर्माबाद- 6.33 (565.36), नायगाव- निरंक  (543.20), मुखेड- निरंक (530.55) आज  अखेर  पावसाची सरासरी 635.58  (चालू वर्षाचा एकूण पाऊस 10169.34) मिलीमीटर आहे.  

000000
"उज्ज्वल नांदेड" अभियानास नेत्रदिपक यश
आठ यशस्वी उमेदवारांचा 6 सप्टेंबर रोजी सत्कार
नांदेड दि. 26 :- "उज्‌ज्वल नांदेड" अभियानांतर्गत  महिला व बालविकास अधिकारी पदासाठी नांदेड जिल्ह्यातून 6 उमेदवारांची तर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत वरिष्ठ अधिव्याख्याता वर्ग-अ पदासाठी 2 उमेदवारांची निवड झाली आहे. अभिरुप मुलाखतीद्वारे तयारी करुन निवड झालेल्या उमेदवारांचा सत्कार आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मार्गदर्शन जिल्हा प्रशासनातर्फे मंगळवार 6 सप्टेंबर 2016 रोजी सायं 5 वाजता डॉ. शंकराराव चव्हाण प्रेक्षागृह येथे  जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.
अभिरुप मुलाखतीद्वारे तयारी करुन निवड झालेले उमेदवारांमध्ये जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी पदासाठी उमेश माधवराव मुदखेडे, शिवा येजगे, मयुरी उमेश मुदखेडे (पूणे),  सखाराम माने, शिवगंगा पवार, एल. एम. राजुरे तर डीआयईटी अंतर्गत जगन्नाथ संतराम कापसे, मंजुषा गोविंदराव औढेंकर यांची निवड झाली आहे. जिल्हाधिकारी श्री. काकाणी आणि इतर अधिकाऱ्यांमार्फत एमपीएससी, युपीएससी लेखी परीक्षेतील यशानंतर मुलाखतीस पात्र उमेदवारांची "उज्ज्वल नांदेड" अभियानांतर्गत अभिरुप मुलाखती घेवून त्यांची तयारी करुन घेतल्या जाते. यातून ग्रामीण भागातील उमेदवारात मुलाखतीचे तंत्र विकसित व्हावे व जिल्ह्यातील जास्तीतजास्त  उमेदवारांची  निवड व्हावी हा उद्देश आहे.
अभिरुप मुलाखत घेण्यासाठी पुणे येथील प्रा. मनोहर भोळे, उपजिल्हाधिकारी डॉ. अजित ‍थोरबोले, तहसिलदार सुरेश घोळवे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आउलवार, महिला बालकल्याण अधिकारी  विजय बोराटे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांचे मुलाखत मंडळ स्थापन करण्यात आले होते.  या यशस्वी उमेदवारांनी जिल्हाधिकारी सुरेश  काकाणी, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, इतर अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत तर जिल्हा प्रशासनानेही या उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

000000
महा-अवयवदान अभियानात
आज शहरात भव्य जनजागरण फेरी      
नांदेड दि. 26 :- अवयवदानाचे महत्व जाणून रुग्णसेवेसाठी मोठ्या प्रमाणात अवयवदानाविषयी जनजागृती होण्यासाठी अवयवदानाला जनतेतून चालना मिळावी यासाठी मंगळवार 30 ऑगस्ट रोजी नांदेड शहरात महा-अवयवदान अभियान -2016 या कार्यक्रमाद्वारे जनजागृती करण्यासाठी भव्य जनजागरण फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.  
या फेरीची सुरुवात शासकीय आयुर्वेद महाविद्यालय वजिराबाद नांदेड येथून मंगळवारी  सकाळी 8 वा. होणार असून फेरीचा समारोप डॉ. शंकरराव चव्हाण सभागृह स्टेडीयम जवळ नांदेड येथे होणार आहे.  फेरीत जास्तीतजास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्यावतीने डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांनी केले आहे.  

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...