Monday, August 29, 2016

मन-बुद्धी-शरीराच्या तंदुरूस्तीसाठी
क्रिडास्पर्धांचे योगदान महत्त्वपुर्ण - कुलगुरू डॉ. विद्यासागर
जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन

नांदेड, दि. 29 :- बदलत्या परिस्थितीत पोलिस दलाच्याही मन-बुद्धी आणि शारिरीक तंदुरूस्तीसाठी क्रिडास्पर्धांचे योगदान महत्त्वपुर्ण राहील, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. पंडीत विद्यासागर यांनी आज येथे केले. नांदेड जिल्हा पोलीस दलाच्यावतीने आयोजित जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धा-2016 चे उद्घाटन कुलगुरू डॅा. विदयासागर यांच्या हस्ते संपन्न झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर या तीन दिवसीय स्पर्धांना पथसंचलन आणि जिम्नॅस्कीक्सच्या कवायतींनी उत्साहात प्रारंभ झाला.

याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय येनपुरे यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, संदीप डोईफोडे आदींसह जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते. नांदेड मुख्यालय, नांदेड शहर आणि कंधार आणि भोकर अशा चार विभागांच्या संघांचा या स्पर्धांमध्ये सहभाग राहील. या संघांमध्ये सुमारे दोनशे खेळाडुंचा समावेश आहे.
उद्घाटनपर भाषणात डॉ. विद्यासागर म्हणाले की, पोलिस दलाविषयी आदर आणि विश्र्वासार्हता या महत्त्वाच्या बाबी आहेत. आता गुन्ह्यांचे प्रकार आणि गुन्हेगारांचेही प्रकारही बदलत आहेत. तंत्रज्ज्ञानामुळेही नवी गुन्हेगारीचे स्वरुप बदलले आहे. खरेतर सुरक्षा ही केवळ पोलिसांची जबाबदारी नाही, तर त्यामध्ये समाजाचाही सहभाग असणे आवश्यक आहे. तशी मानसिकता निर्माण करणेही आवश्यक आहे. पोलिस दलातील मनुष्यबळासाठी मन-बुद्धी आणि शरीराची तंदुरूस्ती ही खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी खेळांचा, विविध प्रकारच्या क्रिडा प्रकारांचाही विचार करावा लागेल. आज क्रिडाजगत हे विज्ञानाशीही जोडले गेले आहे. त्यामुळे पोलिसांच्या क्षमता वृद्धींगत करण्यासाठी अशा क्रिडा स्पर्धांचे योगदान मोठे राहील. यावेळी डॅा. विद्यासागर यांनी विद्यापीठाकडूनही पोलिसांच्या क्षमता विकासासाठी विविध अभ्यासक्रमांसाठी सहकार्य केले जाईल, असेही नमूद केले.

सुरवातीला कुलगुरू डॅा. विद्यासागर यांना पथसंचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. संघाच्या या पथसंचलनाचे नेतृत्व रामराव राठोड यांनी केले. पोलीस क्रिडापटू रेणुका देवणे यांनी वाहून आणलेल्या क्रिडा ज्योतीद्वारे मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेची क्रिडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. श्री. राठोड यांनी सहभागी खेळाडुंना स्पर्धेची शपथ दिली. किरण स्पोर्टस असोसिएशनच्या खेळाडुंनी जिम्नॅस्टीक्सचे प्रकार सादर केले. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. येनपुरे यांनी प्रास्ताविक केले. गृह पोलीस उपअधीक्षक व्ही. पी. नांदेडकर यांनी आभार मानले. प्रा. संतोष देवराय यांनी सुत्रसंचालन केले. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा समारोप बुधवार 31 ऑगस्ट रोजी होणार आहे.

No comments:

Post a Comment

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...