Friday, December 31, 2021

 बारावी परीक्षेचे साहित्य शुक्रवारी स्विकारले जाणार   

नांदेड (जिमाका) दि. 31 :- मार्च 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षेचे अर्ज 12 नोव्हेंबर ते 28 डिसेंबर 2021 या कालावधीत नियमित शुल्काने ऑनलाईन पद्धतीने भरले आहेत, त्या विद्यार्थ्यांचे प्रि-लिस्ट, विद्यार्थ्यांच्या एक्सल सीटमधील याद्या, चलन, आरटीजीएस केलेल्या चलनाची प्रत, परिशिष्ट ब आदी साहित्य शुक्रवार 7 जानेवारी 2022 रोजी पिपल्स हायस्कूल नांदेड येथे सकाळी 11 ते दुपारी 1 व दुपारी 2 ते 5 या वेळेत मंडळाच्या प्रतिनिधी मार्फत स्विकारण्यात येणार आहेत. 

लातूर विभागीय मंडळांतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी याची नोंद घ्यावी. महाविद्यालयाच्या प्रतिनिधीला हे साहित्य देऊन संकलन केंद्रावर जमा करण्याबाबत कळवावे, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.

00000

 

 नांदेड जिल्ह्यात 4 व्यक्ती कोरोना बाधित

तर 4 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 31 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 850 अहवालापैकी 4 अहवाल कोरोना बाधित आला आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 550 एवढी झाली असून यातील 87 हजार 879 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 16 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3 व नायगाव तालुक्यातंर्गत 1 असे एकुण 4 बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील 1 व खाजगी रुग्णालयातील एका कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.  आज 16 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 2, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 13, खाजगी रुग्णालय 1 अशा एकुण 16 व्यक्ती उपचार घेत आहेत.

  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 96 हजार 867

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 92 हजार 760

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 550

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 879

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-04

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-16

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 दहावी, बारावी परीक्षेसाठी

अर्ज भरण्याचे विलंब शुल्क माफ

 

नांदेड (जिमाका) दि. 31 :- सन 2022 च्या इयत्ता दहावी व बारावी परीक्षेसाठी अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्क आकारण्यात येणार नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवशापर्यंत नियमित शुल्काने ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेच्या विलंब शुल्काने अर्ज भरण्याबाबत तारखा जाहीर केल्या होत्या. परंतू आता विलंब शुल्क माफ करण्यात आला आहे. ही सुविधा मार्च-एप्रिल 2022 या वर्षासाठी मर्यादीत आहे. इयत्ता दहावीची परीक्षा 15 मार्च 2022 तर बारावीची परीक्षा ही 4 मार्च 2022 पासून सुरु होत आहे. नियमित शुल्काने परीक्षेच्या एक दिवस अगोदर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. याबाबत संबंधित विद्यार्थी, पालक, शाळा, महाविद्यालयांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाने केले आहे.

000000

 ओमिक्रॉनच्‍या पार्श्‍वभूमीवर 

नांदेड जिल्‍ह्यासाठी निर्बंध लागू 

 

नांदेड (जिमाका) दि. 31 :- ओमिक्रॉन, कोविड-19 विषाणूचा प्रसार होण्याचा वाढलेला धोका आणि कोविड-19 चा प्रसार रोखणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही तातडीच्या उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यासाठी पुढील काही नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत.   

 

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानी पुढील काही निर्देश निर्गमीत केले आहेत. हे निर्देश 31 डिसेंबर 2021 रोजी मध्यरात्रीपासून लागू होतील. या आदेशानुसार नांदेड जिल्‍ह्यात पुढील निर्बंध जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी लागू केले आहेत. 

 

विवाह समारंभाच्या बाबतीत समारंभ बंदिस्त जागेत असो किंवा मोकळ्या जागेवर असो त्‍याठिकाणी उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्ती पुरती मर्यादित असेल. बंदिस्त जागेत किंवा मोकळ्या जागेवर, कोणताही मेळावा किंवा कार्यक्रम, मग तो सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक असो, त्‍याठिकाणी उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्तींपर्यंत मर्यादित असेल. 

 

अंत्‍यसंस्कारांच्या बाबतीत जास्तीतजास्त उपस्थितांची संख्या 20 लोकांपर्यंत मर्यादित असेल. राज्य / जिल्‍ह्याच्‍या कोणत्याही गर्दीच्‍या ठिकाणी, पर्यटन स्थळे किंवा समुद्रकिनारे, मोकळी मैदाने इत्‍यादी ठिकाणी, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्‍याबाबत निर्देश देण्‍यात आले आहेत. त्‍यानुसार नांदेड जिल्‍ह्यातील गर्दीच्‍या ठिकाणी आवश्‍यकतेनुसार तसे यथावकाश आदेश निर्गमित करण्‍यात येतील. तसेच याअधी अस्तित्‍वात असलेल्‍या इतर सर्व सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. 

 

या आदेशाचे पालन न करणारे नागरीक भारतीय दंड संहिता 1860 मधील व संदर्भ 1 व 2 मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहतील. निर्गमीत आदेशाचे काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात गट विकास अधिकारी तसेच नागरी भागात संबंधीत आयुक्त, महानगरपालिका, नगरपालिका / नगरपंचायत मुख्याधिकारी तसेच जिल्‍ह्यातील सर्व संबंधीत कार्यालय प्रमुखांची राहिल. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकारी व तहसिलदार यांची राहील.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...