Wednesday, September 25, 2024

 वृत्त क्र. 868 

खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन उत्पादक

शेतकऱ्यांनी अर्थसहाय्यासाठी ई-केवायसी करावी    

 

नांदेड दि. 25 सप्टेंबर : राज्यातील ज्या कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक ॲपपोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरीता पात्र लाभार्थीं शेतकऱ्यांना 0.20 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये 1 हजार तर 0.20 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर 5 हजार रुपये (2 हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी 27 सप्टेंबर पर्यंत 100 टक्के ई-केवायसी प्रक्रिया  करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले संमतीपत्र व नाहरकत पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत संकलित करून शासनाने महाआयटीकडून तयार केलेल्या scagridbt.mahaitgov.in या वेबपोर्टलवर माहिती भरली जात आहे. त्या करिता कोणत्याही मध्यस्थांच्या सहभागाशिवाय आर्थिक सहाय्य योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांच्या आधार-सीड बँक खात्यांपर्यंत पोहोचते याची खात्री करण्यासाठी राज्याने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली. त्याकरिता शेतकऱ्यांनी नजीकच्या सेतू सुविधा केंद्रावर जाऊन आपले ई-केवायसी पक्रिया पुर्ण करून घ्यावे. केवायसी यशस्वीरित्या पूर्ण केल्यावरच एक वेळ अनुदान वितरणासाठी शेतकरी पात्र ठरतील. शेतकऱ्यांनी 27 सप्टेंबर 2024 पर्यंत 100 टक्के ई-केवायसी प्रक्रिया  करावी. लवकरच अर्थसहाय्य वितरीत करावयाचे अपेक्षित आहे. अधिक माहितीसाठी गावचे कृषी सहाय्यककृषी पर्यवेक्षकमंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क करावाअसे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना केले आहे.

0000

वृत्त क्र. 867

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळाव्याचे 30 सप्टेंबरपर्यंत

जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये आयोजन

नांदेड दि. 25 सप्टेंबर :- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये 24 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील युवक-युवकांनी जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार केले आहे.

या मेळाव्यात सर्व शासकीय /निमशासकीय आस्थापना व सहकारी संस्था, औद्योगिक आस्थापना, लाभार्थी उमेदवार यांचा सहभाग असणार आहे. कार्य प्रशिक्षण इंटर्नशिप कालावधी सहा महिण्याचा राहील. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत 12 वी पास युवकांना 6 हजार, आयटीआय पदविका 8 हजार, पदवीधर, पदव्युत्तर  विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरुप

मुख्यमंत्री युवार कार्य प्रशिक्षण योजनेसाठी 5 हजार 500 कोटीची तरतुद, उमेदवाराचे वय 18 ते 35 या वयोगटातील असावे, शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे व विविध क्षेत्रातील प्रकल्प उद्योग, स्टार्टअप्स आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदविणे गरजेचे आहे. कार्य प्रशिक्षण इंटर्नशिप कालावधी सहा महिण्याचा राहील. उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत 12 वी उत्तीर्ण 6 हजार रुपये, आयटीआय व पदविका उत्तीर्ण 8 हजार रुपये, पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण 10 हजार रुपये दरमहा विद्यावेतन मिळणार आहे. उद्योग क्षेत्रात प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे इंटर्नशिप उमेदवारांना रोजगारक्षम करुन उद्योगासाठी मनुष्यबळ तयार करणार. प्रत्येक आर्थिक वर्षात 10 लाख कार्य प्रशिक्षण इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध होणार आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी कौशल्य रोजगार व उद्योजकता केंद्राच्या 02462-251674 किंवा 9860725448 व nandedrojgar01@gmail.com वर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

00000

वृत्त क्र. 866

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘तंबाखू प्रतिबंधक केंद्र’चा शुभारंभ 

नांदेड दि. 25 सप्टेंबर : भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार भारतातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘तंबाखू प्रतिबंधक केंद्र’ (TOBACCO CESSASION CENTER )  चा शुभारंभ केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांच्या शुभहस्ते दूरदर्शी प्रणालीद्वारे करण्यात आला. 

त्याअनुषंगाने डॉ. शंकरराव चव्हान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी, नांदेड येथील दंतरोगशास्त्र बाह्यरुग्ण विभागात TCC केंद्राची  (ओ पी डी क्र. 126-A) अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख आणि इतर सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थित सुरुवात करण्यात आली. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे सध्या भारतातील युवा पिढी दुर्धर आजाराच्या विळख्यात अडकत चालली आहे. सध्यस्थितीत दरवर्षी जगात 80 लाख मृत्यू तर भारतात 13.5 लाख मृत्यू हे केवळ तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होतात. ही मोठी सामाजिक समस्या बनली असून याचे दुष्परिणाम केवळ रुग्णापुरते मर्यादित नसून संपूर्ण कुटुंबावर परिणाम होत आहेत. त्यामुळे युवा पिढीला या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी TCC च्या माध्यमातून तज्ञ मार्गदर्शन, समुपदेशन आणि जनजागृती करण्यासाठी केंद्रीय मंत्री, आरोग्य व कुटुंब कल्याण, भारत सरकार, जे.पी. नड्डा यांच्या पुढाकाराने या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला.  

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शालेय तसेच महाविद्यालयीन तरुणांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन हे विष प्राशन करण्यासारखे असून तंबाखू रुपी विषाची परीक्षा कुणीही करू नये असे आवाहन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले.  हे महाविद्यालय व रुग्णालय परिसर तंबाखू मुक्त करण्याचा संकल्प  देखील त्यांनी केला.  कार्यक्रमाच्या प्रास्ताविक पर भाषणात बोलताना दंतरोग तज्ञ डॉ. अरुण नागरिक यांनी तंबाखू सेवनामुळे होणारे आजार, दुष्परिणाम, आणि सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम यावर प्रकाश टाकला. 

या कार्यक्रमासाठी दंतरोग शास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. भावना भगत,  जन औषधवैद्यकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. इस्माईल इनामदार, सहयोगी प्राध्यापक डॉ. रामभाऊ गाडेकर, नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य  बालाजी नगराळे, TCC प्रमुख डॉ. सुशील येमले, डॉ. अनुराधा राऊत व इतर अधिकारी, कर्मचारी, आंतरवासिता विद्यार्थी, नर्सिंग विद्यार्थी, रुग्ण व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समाजसेवा अधीक्षक गजानन वानखेडे तर आभार अर्जुन राठोड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व निवासी डॉक्टर्स आणि समाजसेवा अधीक्षक संतोष मुंगल, राजरत्न केळकर, दंत तंत्रज्ञ कल्याण कुंडीकर आदींनी परिश्रम घेतले.

00000



 वृत्त क्र. 865

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळाव्याचे

अर्धापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 27 सप्टेंबर रोजी आयोजन 

नांदेड दि. 25 सप्टेंबर : कुशल व रोजगारक्षम महाराष्ट्र बनवण्यासाठी तसेच राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांना नौकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळावा औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्धापूर येथे  27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वा. आयोजित करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अर्धापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विश्वंभर कंदलवाड यांनी केले आहे. 

औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्धापूर येथे  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्ग भरती मेळाव्याचे आयोजन केले असून शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनामध्ये एकूण 100 जागेची मागणी आलेली आहे. तरी परिसरातील 18 ते 35 वयोगटातील 12 वी, आयटीआय, पदवी, पदविका, डीएड, बीएड उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी 27 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) म्हाडा कॉलनी जवळ, अर्धापूर जि. नांदेड येथे मुळ कागदपत्रासह उपस्थित राहावे असे अर्धापूर आयटीआयचे प्राचार्य विश्वंभर कंदलवाड यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी गटनिदेशक डी.एन.मोरे यांचा संपर्क क्रमांक 9404738738442 वर संपर्क साधावा .

 00000

  वृत्त क्र. 864

29 सप्टेंबर रोजी शौर्य दिनाचे आयोजन

नांदेड दि. 25 सप्टेंबर :- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नांदेड येथे 29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता शौर्य दिवस साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व माजी सैनिक तसेच शहीद जवानांचे नातेवाईक व समाजातील देशभक्त यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी कल्याण संघटक यांचा मोबाईल क्रमांक 8698738998/8707608283 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

देशभरात 29 सप्टेंबर हा दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो. 29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्य दलाने उरी सेक्टर मधील अतिरेकी भ्याड हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक द्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याची ही अभिमानस्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यत व्यापक प्रमाणात पोहोचविण्यासाठी तसेच जनतेस देश भक्तीची ज्वाला मोठया प्रमाणात जागविण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी माजी सैनिकांचा सन्मान करुन शौर्य दिवस साजरा करण्यात येतो.

00000

  वृत्त क्र. 863

शेतकरी गटांसाठी प्रत्येक तालुक्यात सूक्ष्म प्रक्रिया उद्योग  

- मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल

नांदेड दि. 25 सप्टेंबर :- जिल्ह्यामध्ये सोयाबीन, तुर, मुग, उडीद, हरभरा, हळद, केळी, कापूस इत्यादी प्रमुख पिके आहेत. कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करून पीक मूल्य साखळी विकसित करणे या उद्देशाने शेतकरी उत्पादक कंपनी/ शेतकरी गट/ महिला बचतगट यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद कृषी विभाग उपकर योजनेच्या अर्थसाहयातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सूक्ष्म प्रक्रिया उद्योगाची उभारणी करीत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली.

या योजनेच्या माध्यमातून शेतकरी गटांना उद्योग उभारणी करून गटाचे विस्तारीकरण  करणे, बळकटीकरण करणे, रोजगार निर्मिती करणे हा या योजनेचा उद्देश आहे. ही योजना मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे.    

जिल्ह्यामध्ये दाल मिल उद्योग, ऑइल मिल, उद्योग, मसाला उद्योग, चिप्स उद्योग, दुग्धजन्य पदार्थ उद्योग, प्राथमिक प्रक्रिया उद्योग इत्यादी सूक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारणी करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये प्रत्येक तालुक्यातून पुढील बचतगटांची निवड झालेली आहे. या बचतगटांना जिल्हा परिषदेमार्फत पूर्व संमती देऊन उभारणी करण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे .सदर योजनेअंतर्गत शेतकरी गटांनी प्रक्रिया उद्योग उभारणी केल्यानंतर त्या  अनुषंगाने रक्कम रुपये 3 लाख किंवा  75 टक्के अनुदान मर्यादित अनुदान वितरित करण्यात येणार आहे.

या योजनेमध्ये पुढील बचतगटांची निवड झालेली आहे           

माहेर स्वयंसहाय्यता समूह गट जैतापूर तालुका नांदेड सूक्ष्म प्रक्रिया - पापड मशीन ,नमकीन मशीन या 

उद्योगाची उभारणी करण्यात येणार आहे.  अहिल्यादेवी होळकर शेतकरी बचत गट पिंपळकोठा तालुका मुदखेड सूक्ष्म प्रक्रिया उद्योग,-दुग्धजन्य पदार्थ तयार करणे. कै. गिरीश भाऊ  गोरठेकर पुरुष बचत गट गोरठा तालुका उमरी दाल - मिल प्रक्रिया उद्योग उभारणी करण्यात येणार आहे.जेठालाल महाराज महिला सेंद्रिय  शेतकरी बचत गट रूपा नाईक तांडा तालुका माहूर दाल मिल प्रक्रिया उद्योग.  रानी झलकारी महिला बचत गट पोटा बुद्रुक तालुका हिमायतनगर- दाल मिल शेलार मशीन प्रक्रिया उद्योग. संत सावतामाळी महिला बचत गट काठेवाडी देगलूर - मसाले प्रक्रिया उद्योग कृषी उन्नती शेतकरी  गट लोणी बुद्रुक तालुका अर्धापूर - चिप्स उद्योग, ज्योतिर्लिंग फार्मर प्रोडूसर कंपनी सापती तालुका हदगाव - मल्टीग्रेन डीस्टोन मशीन प्रक्रिया उद्योग. ग्रीन ओझोन ऍग्रो प्रोडूसर कंपनी लोणावळा बुद्रुक तालुका मुखेड - तेल घाना भुईमूग फोडणी यंत्र प्रक्रिया उद्योग. शिवानी महिला स्वयंसहाय्यता बचत गट हिप्परगा तालुका कंधार - पॅकिंग मशीन मसाला मशीन प्रक्रिया  उद्योग. अनुसया माता महिला बचत गट काजीपोड तालुका किनवट- दाल मिल प्रक्रिया उद्योग. साई समर्थ शेतकरी गट मांजरम तालुका नायगाव - दाल मिल प्रक्रिया उद्योग. जय भवानी महिला बचत गट चिंचाळा तालुका भोकर - दाल मिल प्रक्रिया उद्योग. धरणी शेतकरी उत्पादक गट जोमेगाव तालुका लोहा दाल मिल - ग्रेडिंग पॅकेज प्रक्रिया उद्योग.  अमृतालयाम शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड बेळकोणी तालुका बिलोली - सोलार ड्रायर प्रक्रिया उद्योग. धर्माबाद ऍग्रो प्रोडूसर कंपनी लिमिटेड समराळा तालुका धर्माबाद - सेंद्रिय दाल प्रतवारी पॅकिंग मशीन, ग्रेडिंग स्वच्छता मशीन. याप्रमाणे नांदेड जिल्ह्यात 16 सूक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारणी करण्यात येणार आहे.

00000

 वृत्त क्र. 862

उगम प्रमाणपत्राचा समावेश कृषी विक्रेत्याच्या परवान्यामध्ये आवश्यक

शेतकऱ्यांनी पक्की पावती घेवूनच किटकनाशकाची खरेदी करावी 

नांदेड दि. 25 सप्टेंबर :-  कंपनीच्या उगम प्रमाणपत्राचा समावेश परवान्यामध्ये नाही अशा कंपनीच्या किटकनाशकाची खरेदी व विक्री कृषी सेवा केंद्रधारकांनी करू नये. शेतकऱ्यांनी किटकनाशक खरेदी करते वेळेस पक्की पावती घेवून संबंधित कंपनीचे नाव कृषी विक्रेत्यांच्या परवान्यामध्ये असल्याची खात्री करून किटकनाशक खरेदी करावे, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. 

खरेदी व विक्री कृषी सेवा केंद्रधारकांनी ज्या किटकनाशकाची खरेदी कंपनी कडून करीत आहेत. त्या कंपनीचे उगम प्रमाणपत्र संबंधित घाऊक किटकनाशक विक्रेते यांनी परवान्यामध्ये समाविष्ठ करून खरेदी करावे. संबंधित घाऊक विक्रेते यांनी किटकनाशकाची विक्री करतांना खरेदी करणाऱ्या कृषी सेवा केंद्रधारकांच्या परवान्यामध्ये संबंधित कंपनीचे उगम प्रमाणपत्र समाविष्ट असल्याची खात्री करूनच किटकनाशकाची विक्री करावी. तसेच किरकोळ कृषी सेवा केंद्रधारकांनी त्यांना ज्या कंपनीच्या किटकनाशकांची खरेदी व विक्री करावयाची आहे अशा कंपनीच्या उगम प्रमाणपत्राचा समावेश त्यांच्या परवान्यात करावा असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.  

00000

 वृत्त क्र. 861

अधिकच्या नुकसान भरपाईसाठी दुसऱ्यांदा विमा कंपनीस पूर्वसूचना देण्याचे आवाहन

नांदेड दि. 25 सप्टेंबर :-  माहे सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवडयात नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली ही एक आपत्ती घटना मानली जाते. त्याअनुषंगाने यानंतर जर पुन्हा मोठा पाऊस किंवा अतिवृष्टी झाल्यास लाभार्थी पुन्हा विमा कंपनीस पूर्वसूचना देऊ शकतात. जेणेकरुन संबंधित लाभार्थ्यांना अधिकची नुकसान भरपाई नुकसानीच्या प्रमाणात मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकचे नुकसान भरपाई मिळण्यासाठी दुसऱ्यांदा पूर्वसूचना देण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.  

जर 25 टक्के पेक्षा पूर्वसूचना येत असतील तर अशा ठिकाणी लागू व्हायची नियमावली ही विमा कंपनीकडून बदलण्यात आलेली आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हा समितीने 25 टक्के अग्रीम देण्यासाठी मध्यावधी नुकसान अर्थात मीड सीजन ॲडव्हर्सिटी अधिसूचना लागू केलेली आहे. त्यामुळे या कालावधीत झालेल्या नुकसानीचे वैयक्तीक पंचनामे हे वेगळे करण्याची आवश्यकता राहणार नाही. मात्र या सर्व शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई लागू झाल्यास अदा केली जाईल.

00000

 वृत्त क्र. 860 

नांदेडमधील 169 आदिवासी गावांचा कायापालट होणार 

प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानात समावेश 

नांदेड दि. 25 सप्टेंबर :दुर्गम अति दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे देशातील ६३ हजार तर महाराष्ट्रातील ४ हजार ९७६ आदिवासी गावांचा कायापालट होणार आहे. यामध्ये नांदेडच्या १६९ गावांचा सहभाग आहे.

त्यामाध्यमातून राज्यामधील 32 जिल्ह्यातील 12 लाख 87 हजार ७०२ आदिवासी बांधवाचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण केले जाणार आहे. या अभियानासाठी आवश्यक निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून उपलब्ध होणार आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाची घोषणा केली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत या अभियानाला मंजुरी देण्यात आली. या अभियानाचा शुभारंभ ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. 'पीएम-जनमन' अभियानात १७ मंत्रालयांद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध २५ उपक्रमांचा समावेश असणार आहे. त्याद्वारे सामाजिक पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, अजीविका यामधील तफावत भरून काढण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच आदिवासी क्षेत्र आणि समुदायांच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासावर भर दिला जाणार आहे. 

प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानात सहभागी प्रत्येक मंत्रालयावर  पुढील 5 वर्षात निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अनुसूचित जमातींचा विकास कृती आराखडा तयार करून उपलब्ध निधीद्वारे त्यांच्याशी संबंधित योजना कालबद्ध पद्धतीने कार्यान्वित करण्याची जबाबदारी असणार आहे. 

दरम्यान, या अभियानांतर्गत समाविष्ट असलेली आदिवासी गावे पीएम गतिशक्ती पोर्टलवर संबंधित विभागाद्वारे त्याच्या योजनेतुन मॅप केल्या जातील. पोर्टलचे भौतिक आणि आर्थिक प्रगतीचे परीक्षण केले जाईल. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. 

या सुविधा मिळणार

पक्की घरे, ग्रामीण भागात रस्ते, प्रत्येक घरात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, सर्व घरांमध्ये वीज जोडणी, मोबाईल मेडिकल युनिटची स्थापना, आयुष्मान कार्ड, एलपीजी कनेक्शन, आदिवासी बहुउद्देशीय विपणन केंद्र, आश्रमशाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, सिकलसेल ॲनिमियाशी लढण्यासाठी केंद्राची निर्मिती, होम स्टे. 

जिल्हानिहाय गावांची संख्या

अहमदनगर- 118, अकोला- 43, अमरावती- 321, छत्रपती संभाजीनगर- 11, बीड- २, भंडारा- 14, बुलढाणा- 43, चंद्रपूर- 167, धुळे- 213, गडचिरोली- 411, गोंदिया- 104, हिंगोली- 81, जळगाव- 112, जालना- 25, कोल्हापूर- 1, लातूर- 2, नागपूर- 58, नांदेड- 169, नंदुरबार- 717, नाशिक- 767, उस्मानाबाद- 4, पालघर- 654, परभणी- 5, पुणे- 99, रायगड- 113, रत्नागिरी- 1, सातारा- 4, सोलापूर- 61, ठाणे- 146, वर्धा- 72, वाशीम- 71, यवतमाळ- 366.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...