Wednesday, December 4, 2024

वृत्त क्र. 1161

 राज्यस्तरीय शालेय सेपकटाकरॉ क्रीडा स्पर्धेचे शानदार उदघाटन

नांदेड दि. 4 डिसेंबर:- आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र सेपकटाकरॉ असोसिएशन व नांदेड जिल्हा सेपकटाकरॉ असोसिएशन यांचे सहकार्याने राज्यस्तरीय शालेय सेपकटाकरॉ (14 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धा सन 2024-25 चे आयोजन 3 ते 5 डिसेंबर, 2024 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथे करण्यात आले आहे.  यास्पर्धेचे उदघाटन कार्यक्रम जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचे अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र सेपकटाकरॉ असोसिएशचे उपाध्यक्ष प्रवीण कुपटीकर यांचे हस्ते  आज 4  डिसेंबर 2024 रोजी संपन्न झाला. 

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सेपकटाकरॉ असो. सदस्य डॉ. विनयमुन, निवड समिती सदस्य गणेश माळवे, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, क्रीडा अधिकारी विपुल दापके, निवड समिती सदस्य रवीकुमार बकवाड,  निवड समिती सदस्य श्रीदर्शन हस्ती, डॉ. रंगनाथ सुपकर आदी मान्यवर उपस्थित होते.

शालेय क्रीडा स्पर्धेतून खेळाडूंचा शारीरिक, बौध्दीक व संघटनात्मक विकास होतो. शालेय जिवनातून विद्यार्थ्यानी एक तरी खेळ खेळावा व आपले करीअर घडवावे असे  आवाहन  जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले.

नाविन्यपुर्ण खेळण्यात येणारा सेपकटाकरॉ हा खेळ आज संपुर्ण जगात प्रसिध्द झालेला असून या खेळातून शारीरिक लवचिकता दिसून येते. शालेय क्रीडा स्पर्धेसोबत फेडरेशनच्या स्पर्धेत सहभाग नोंदवून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा खेळाव्यात व यातून आपले करिअर घडवावे, असे आवाहन निवड समिती सदस्य गणेश माळवे यांनी केले.  

नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे यावर्षीतील ही 7 वी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केल्याबददल महाराष्ट्र सेपकटाकरॉ असोसिएशनच्यावतीने जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचा सत्कार करण्यात आला.

यास्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातील 8 विभागातून खेळाडू मुले-मुली, निवड समिती सदस्य, पंच, सामनाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित झालेले आहेत. मुले व मुली खेळाडू, संघव्यवस्थापक व पंच यांची निवास व भोजन व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल क्रीडा वसतिगृहात करण्यात आली आहे. 

या स्पर्धेसाठी पंच म्हणुन मोहमद कमरान अन्सारी (नागपूर), इर्शाद सागर (नागपूर), रामदेव बालपांडे (वर्धा),  दर्शन हस्ती (वर्धा), लखांशु लडके (वर्धा), अनिकेत काळे (वर्धा), सौरभ कौसुलकर (वर्धा), ओम मुळे (वर्धा), सागर कवळे (मुंबई), वैभव शिंदे (मुंबई), विनीत ओव्हाळ (मुंबई), व्यापारे (मुंबई) आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. 

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचे मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, राज्यक्रीडामार्गदर्शक चंद्रप्रकाश होनवडजकर, श्रीमती शिवकांता देशमुख, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, क्रीडा अधिकारी विपुल दापक, वरिष्ठ लिपीक संतोष कनकावार, कनिष्ठ लिपीक  दत्तकुमार धुतडे, व्यवस्थापक संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, आकाश भोरे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, शेख इकरम, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे व सेपकटाकरॉ असोसिएशनचे पदाधिकारी व खेळाडू आदि सहकार्य करीत आहेत.

याकार्यक्रमाचे सुत्र संचलन राहुल श्रीरामवार यांनी केले तर आभार प्रदर्शन रवी बकवाड यांनी केले. ही स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल, नांदेड येथे आयोजीत करण्यात आले असून यास्पर्धेचा जास्तीत जास्त खेळाडू, क्रीडा प्रेमी, रसिकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. 

00000










वृत्त क्र. 1160

शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील पिकासाठी पीकस्पर्धा 

                                                                                                                                                                        नांदेड दि. 4 डिसेंबर :- राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास नक्कीच मदत होईल. तसेच शेतकऱ्यांकडून अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून कृषि विभागामार्फत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

पिकस्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषिसहायक, कृषिपर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. रब्बी हंगाम 2024 साठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2024 असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पिकस्पर्धेत सहभागी व्हावे,  असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी.आर. कळसाईत यांनी केले आहे. 

शासन निर्णया अन्वये रब्बी हंगाम 2024 मध्येही पिकस्पर्धा मागील वर्षाप्रमाणे तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येणार आहे. त्यानुसार कृषि विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2024 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या 5 पिकासाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

 पिक स्पर्धेतील पिके

                                                                                                                                                                        रब्बी पिके - ज्वारी, गहू, हरभरा करडई व जवस (एकूण 5 पिके)

पात्रता निकष  

स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे, स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल, पीक स्पर्धामध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र -अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा, 8-अ उतारा, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास),पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबधित सातबारा वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा.

अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत

रब्बी हंगामामध्ये पिकस्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख खालील प्रमाणे राहील. ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस ३१ डिसेंबर. तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावरील पीक स्पर्धा निकाल प्रथम, द्वितिय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवडण्यात येतील.

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क

पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम ३०० रुपये राहील व आदीवासी गटासाठी रक्कम १५० रुपये राहील.

पिकस्पर्धा विजेत्यासाठी बक्षिस स्वरुप                                                                                                        स्पर्धापातळी व सर्वसाधारण आणि आदिवासीगटासाठी बक्षिस रुपये पुढील प्रमाणे आहे. तालुका पातळीसाठी पहिले बक्षिस 5 हजार, दुसरे 3 हजार तर तिसरे 2 हजार आहे. जिल्हा पातळीसाठी पहिले बक्षिस 10 हजार, दुसरे 7 हजार तर तिसरे 5 हजार आहे. राज्य पातळीसाठी पहिले बक्षिस 50 हजार, दुसरे 40 हजार तर तिसरे 30 हजार आहे.  याप्रमाणे आहे, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 1159

जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे उदघाटन                                                                                       

नांदेड दि. 4 डिसेंबर : - जिल्हा रुग्णालयात बुधवार ४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम दिन राबविण्यात आला. या मोहिमेचे उदघाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.एम पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.एस बुट्टे, डॉ. एच.के. साखरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पुष्पा गायकवाड यांची  उपस्थिती होती. या मोहिमेच्या माध्यमांतून जंताच्या प्रादुर्भावामुळे आरोग्यावर काय परिणाम होतात याविषयी सर्व मान्यवर अधिकारी व श्रीमती डी.ए. गुंडाळे, आर.के.एस.समुपदेशक व समन्वयक यांनी माहिती दिली . कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड यांनी केले. 

1 ते 2 वर्षातील बालकांना अर्धी गोळी व 2 ते 19 वर्षे वयोगटातील बालकांना जंतनाशक गोळी खाऊ घालण्यात आली. आज गैरहजर असलेल्या बालकांना 10 डिसेंबर 2024 रोजी मॉप अप दिनी जंतनाशक गोळया देण्यात येणार आहे. तरी सर्व बालकांनी जंतनाशक गोळी खावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

०००००



  वृत्त क्रमांक 24 दर्पण दिनानिमित्त आज जिल्हाधिकाऱ्यांचे व्याख्यान  नियोजन भवनमध्ये ४ वाजता पत्रकार दिन कार्यक्रम  नांदेड दि. 5 जानेवारी : ...