Sunday, April 17, 2022

 

पिण्याचे पाणी आणि जलसंधारण विकास कामावर अधिक भर देवू

 

-पालकमंत्री अशोक चव्हाण

 

नागापूर येथे 33 केंव्ही उपकेंद्राचे भूमिपुजन  

 

 

नांदेड, दि. 17 :-  सर्वच गावांमध्ये पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्धतेच्या दृष्टीने याला आवश्यक असणारे पाण्याचे स्त्रोत कमी अधिक प्रमाणात आहेत. अनेक गावांना सोयीची भौगोलिक स्थितीही नाही. यामूळे काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मे व जून अखेरीस अधिक आव्हानात्मक होतो. हे लक्षात घेवून मागील 40 वर्षापासून जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ज्या-ज्या ठिकाणी सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करता येतील तेवढ्या करण्यावर आपण भर दिला. यातूनही जी काही गावे शिल्लक राहीली त्या गावांसाठी गोदावरी खोऱ्यातील पाण्याचा अभ्यास करुन आता तो ही प्रश्न मार्गी लावण्यात यश मिळाल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

भोकर तालुक्यातील नागापूर येथे महावितरण कंपनीच्या 33/11 केंव्ही उपकेंद्राचे भूमिपुजन आज त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार अमर राजूरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, माजी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, भोसीकर, गोविंदराव शिंदे नागेलीकर, नागनाथ धिसेवाड,  कार्यकारी अभियंता चितळे व वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.

गोदावरी खोऱ्यातील उपलब्ध पाण्याचा आलेख शासनापुढे मांडून सुधा प्रकल्पाची उंची वाढवणे, पिंपळढोह, दिवसी प्रकल्पाला मंजुरी आपण मिळवून घेतली आहे. या तीन प्रकल्पाच्या माध्यमातून ज्या गावांना भौगोलिक स्थितीमूळे पाणी उपलब्ध होत नव्हते ते आता उपलब्ध होईल. लवकरच या प्रकल्पांचे भूमिपुजन करुन यांचे कामही पूर्ण करु असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. जिल्ह्यातील ग्रामीण भागाचाही समतोल विकास व्हावा यासाठी आम्ही दक्षता घेतली आहे. भोकर मतदार संघाची असलेली जबाबदारी लक्षात घेवून अधिकाधिक ग्रामपंचायतीना आम्ही  विविध विकास कामे देत आलो आहोत. ग्रामीण भागात या कामासोबत आता जल संधारणाच्या कामावर जास्त लक्ष देवू असेही त्यांनी सांगितले.

 

राज्यात विजेचा प्रश्न, प्रलंबित असलेली थकबाकी आणि कोळशाचे संकट यावर श्वाश्वत वीज पुरवठा अवलंबून आहे. एका बाजूला वीज उपलब्ध करुन देणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची मोठया प्रमाणात थकबाकी वसूल होत नसल्याने आव्हान निर्माण झाले आहे. वीज नियमित ठेवायची असेल तर ग्राहक म्हणून वीज बिल ही वेळेवर चुकते करावे लागेल. उर्जेच्या प्रश्नात राजकारण न आणता ग्राहक आणि सेवा देणारी कंपनी असा एक सुवर्णमध्य असला पाहीजे असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

महावितरणचे कर्मचारी अत्यंत जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडीत आहेत. असंख्य वेळेला त्यांना वीज ग्राहक शेतकरी व नागरिकांचाही रोष सहन करावा लागतो. जी वस्तुस्थिती आहे ती जनतेशी, ग्राहकांशी सतत सुसंवाद साधून ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्याठिकाणी हा सुसंवाद दिसत नाही त्या ठिकाणी रोष ओढवला जातो, असे आवर्जून त्यांनी सांगितले.

यावेळी अमर राजूरकर, बाळासाहेब पाटील रावणगावकर यांचेही भाषण झाले.  या भूमिपुजन झालेल्या उपकेंद्रामूळे 10 गावांना लाभ होणार आहे. 3 कोटी 71 लक्ष रुपये खर्चाच्या या उपकेंद्रामूळे सुमारे 1 हजार 850 शेती पंपासह या 10 गावांत योग्य दाबाने विद्यूत पुरवठा सुरळीत होईल. अवघ्या 12 महिन्यात हे उपकेंद्र निर्माण केले जाणार आहे. या भूमिपुजन समारोह समवेत पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते डौर येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपुजन, समंदर वाडी ते डोरली रस्ता, लहान पूल, संरक्षण भिंत, सी सी रस्ता तयार करणे, तीन मोरी पूल आदी विविध विकास कामाचेही भूमिपुजन झाले.

00000        





 

 

 

 

  

 

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...