Thursday, December 29, 2022

 लोकसहभागातून नदीचे स्वरूप बदलेल

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

· नदी संवाद यात्रेत गावकऱ्यांसह जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा सहभाग  

· मन्याडकाठची शेवाळा, आलूर आणि लिंबागावचे नागरिक पुढे सरसावले

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- लोकसहभागाशिवाय, नदीच्याकाठावर असलेल्या गावातील लोकांच्या योगदानाशिवाय नदीचे आरोग्य निरोगी होऊ शकणार नाही. गावाच्या पर्यावरणासाठी श्रमदान व निस्वार्थ लोकसहभाग यात एक वेगळी शक्ती दडलेली असते. आपण ज्या भागात वाढतो, मोठे होतो त्या भागाच्या विकासासाठी, जपणुकीसाठी जेंव्हा त्या-त्या भागातील लोक पुढे सरसावतात त्या चळवळीला, अभियानाला सकारात्मकता येते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

देगलूर तालुक्यातील शेवाळा येथे मन्याड नदी संवाद यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत व गावकऱ्यांसह सुरू झालेल्या या यात्रेत मन्याड नदीचे समन्वयक प्रमोद देशमुख, शिवाजी देशपांडे, शेवाळाचे सरपंच शिवकुमार पाटील, आलूरचे सरपंच राजू देसाई, राज्य समिती सदस्य डॉ. सुमन पांडे, पर्यावरण तज्ज्ञ अजीत गोखले, देगलूरचे तहसिलदार राजाभाऊ कदम व मान्यवर उपस्थित होते.

 

जनसामान्यांना नदीसाक्षर करण्यासाठी, त्यांच्यासमवेत नदीला समजून घेत तिला अमृत वाहिनी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने चला जाणुया नदीला हे अभियान हाती घेतले आहे. या अभियानअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील आसना नदी, मन्याड, कयाधू, मांजरा, सिता या नद्यांचा अभियानात समावेश आहे. या अभियानाअंतर्गत मन्याड नदी संवाद यात्रेच्या माध्यमातून नदी साक्षरता केली जाणार आहे.

 

नदीसमन्वयक प्रमोद देशमुख व शिवाजी देशपांडे यांनी या नदीसंवाद यात्रेत मन्याड नदीला दोन प्रवाहात विलग करणाऱ्या वझरगा येथील बेटाची माहिती दिली. वझरगा येथून मन्याड नदी विलग झाल्याने लिंबा येथे 1975 पासून सुरू असलेले उपसा जलसिंचन योजना बंद पडली. ही योजना पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी या ठिकाणी असलेल्या मन्याड नदीच्या पात्रातील गाळ काढण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. गावकऱ्यांशी संपूर्ण चर्चा करून आता लोकसहभागातून मन्याड नदीतील गाळ काढण्याला प्राधान्य देण्यात येईल, असे सर्व ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना सांगण्यात आले. या जबाबदार डोळस लोकसहभागाबद्दल त्यांनी सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन केले.  

00000




 राज्य मार्ग परिवहन महामंडळात

56 शिकाऊ उमेदवारांसाठी भरती

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागामध्ये सन 2022-23 सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायासाठी प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवार म्हणुन 56 पदे ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहेत. आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in व डिग्री / डिप्लोमा इन मेकॅनिकल / ॲटोमोबाईल अभियांत्रिकी उतीर्ण उमेदवारांनी www.mhrdnats.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर एमएसआरटीसी विभाग नांदेड या आस्थापनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतील. अर्ज केल्यानंतर विभागाचे विहित नमुन्यातील छापील अर्ज भरुन तो अर्ज दिनांक 2 ते 16 जानेवारी 2023 रोजी 3 वाजेपर्यंत शनिवार व सुट्टीचा दिवस वगळून विभाग नियंत्रक यांचे कार्यालय रा. प. नांदेड येथे विभागीय कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन राज्य परिवहन विभागाच्या नांदेड विभाग नियंत्रकांनी केले आहे.

 

 शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) म्हणुन 56 पदे ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहेत. यात (मेकॅनिकल मोटार व्हेईकल-36, ॲटो इलेक्ट्रीशियन-6, शिट मेटल वर्क्स-10, पेंटर (जनरल)-1, वेल्डर (गॅस ॲन्ड इलेक्ट्रीक)-1 अभियांत्रिक पदवीधर/पदवीकाधारक मेकॅनिकल/ॲटोमोबाईल -2 अशी एकुण 56 जागा आहेत. या जागांपैकी अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती व दिव्यांगासाठी शिकाऊ उमेदवार कायद्यानुसार जागा आरक्षीत आहेत) या जागेसाठी विहीत नमुन्यातील छापील अर्ज आस्थापना शाखा विभागीय कार्यालय रा.प. नांदेड येथे 16 जानेवारी 2023 रोजी 3 वाजेपर्यंत शनिवार व सुट्टीचे दिवस वगळुन सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत मिळतील व लगेच स्विकारले जातील.

 

या अर्जाची किंमत खुल्या प्रवर्गासाठी 590 रुपये व मागासवर्गीयांसाठी 295 रुपये आहे. ही शिकाऊ उमेदवार भरती नांदेड जिल्ह्यासाठी असून केवळ नांदेड जिल्हयातील आयटीआय/अभियांत्रिकी महाविद्यालयात उत्तीर्ण उमेदवारांचीच शिकाऊ उमेदवार म्हणून भरती करण्यात येणार आहे. नांदेड जिल्हा व्यतीरीक्त इतर जिल्हयातील आयटीआय / अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा अर्ज व मागील 3 वर्षापुर्वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही, असेही राज्य परिवहन विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

28.12.2022

 लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. लोकशाही दिन सोमवार 2 जानेवारी 2023 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत कॅबिनेट हॉल, नियोजन भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे. 


यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 


या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभाग व पाणी पुरवठा समन्वय अधिकारी इत्यादी जिल्हा स्तरावरील प्रमूख अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल. 


न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे. 

लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000

28.12.2022

 लम्पी प्रतिबंधक बाबत निराधार वृत्तावर विश्वास ठेवू नये

45 लाखांची उधळपट्टी या आशयाचे वृत्त निराधार

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- काही वर्तमानपत्रात लम्पी प्रतिबंधक प्रचारावर 45 लाखांची उधळपट्टी या आशयाची निराधार बातमी छापून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. अशा बातम्यांवर विश्वास ठेवण्यात येवू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगाव यात्रा तालुका लोहा, जिल्हा नांदेड येथे 22 ते 26 डिसेंबर 2022 दरम्याने जिल्हा परिषदेमार्फत भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा नियोजन समितीमार्फत 45 लाख रुपये नियतव्यय मंजूर आहे. या तरतुदीमधून पशुसंवर्धन विभागामार्फत विभागाचा स्टॉल, भव्य अश्व, श्वान, शेळी आणि कुक्कूट प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये सहभागी पशुंना बक्षीस वितरण, सहभाग भत्ता, शेतकऱ्यांसाठी माहितीपर पुस्तिका, घडीपत्रिका आणि अनुषंगिक बाबींसाठी शासन निर्णय 30 ऑगस्ट 2010 च्या अधीन राहून अंदाजे 16 लक्ष खर्च होत आहे. उर्वरित 29 लक्ष रुपये शासनखाती भरणा करण्यात आली अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भुपेंद बोधनकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...