Thursday, December 29, 2022

 लोकसहभागातून नदीचे स्वरूप बदलेल

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

· नदी संवाद यात्रेत गावकऱ्यांसह जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा सहभाग  

· मन्याडकाठची शेवाळा, आलूर आणि लिंबागावचे नागरिक पुढे सरसावले

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- लोकसहभागाशिवाय, नदीच्याकाठावर असलेल्या गावातील लोकांच्या योगदानाशिवाय नदीचे आरोग्य निरोगी होऊ शकणार नाही. गावाच्या पर्यावरणासाठी श्रमदान व निस्वार्थ लोकसहभाग यात एक वेगळी शक्ती दडलेली असते. आपण ज्या भागात वाढतो, मोठे होतो त्या भागाच्या विकासासाठी, जपणुकीसाठी जेंव्हा त्या-त्या भागातील लोक पुढे सरसावतात त्या चळवळीला, अभियानाला सकारात्मकता येते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

देगलूर तालुक्यातील शेवाळा येथे मन्याड नदी संवाद यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत व गावकऱ्यांसह सुरू झालेल्या या यात्रेत मन्याड नदीचे समन्वयक प्रमोद देशमुख, शिवाजी देशपांडे, शेवाळाचे सरपंच शिवकुमार पाटील, आलूरचे सरपंच राजू देसाई, राज्य समिती सदस्य डॉ. सुमन पांडे, पर्यावरण तज्ज्ञ अजीत गोखले, देगलूरचे तहसिलदार राजाभाऊ कदम व मान्यवर उपस्थित होते.

 

जनसामान्यांना नदीसाक्षर करण्यासाठी, त्यांच्यासमवेत नदीला समजून घेत तिला अमृत वाहिनी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने चला जाणुया नदीला हे अभियान हाती घेतले आहे. या अभियानअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील आसना नदी, मन्याड, कयाधू, मांजरा, सिता या नद्यांचा अभियानात समावेश आहे. या अभियानाअंतर्गत मन्याड नदी संवाद यात्रेच्या माध्यमातून नदी साक्षरता केली जाणार आहे.

 

नदीसमन्वयक प्रमोद देशमुख व शिवाजी देशपांडे यांनी या नदीसंवाद यात्रेत मन्याड नदीला दोन प्रवाहात विलग करणाऱ्या वझरगा येथील बेटाची माहिती दिली. वझरगा येथून मन्याड नदी विलग झाल्याने लिंबा येथे 1975 पासून सुरू असलेले उपसा जलसिंचन योजना बंद पडली. ही योजना पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी या ठिकाणी असलेल्या मन्याड नदीच्या पात्रातील गाळ काढण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. गावकऱ्यांशी संपूर्ण चर्चा करून आता लोकसहभागातून मन्याड नदीतील गाळ काढण्याला प्राधान्य देण्यात येईल, असे सर्व ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना सांगण्यात आले. या जबाबदार डोळस लोकसहभागाबद्दल त्यांनी सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन केले.  

00000




No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 68 नांदेड जिल्ह्यातील 67 रेती घाटांची जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष पर्यावरणीय जन सुनावणी  स्थानिक रोजगाराला प्राधान्य देण्याचा स...