Thursday, April 17, 2025
वृत्त क्रमांक 404
दिव्यांग, पॅरा बॅडमिंटनपटू लताताई उमरेकर
यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर
नांदेड दि. 17 एप्रिल :- दिव्यांग, पॅरा बॅडमिंटनपटू लताताई उमरेकर यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. शुक्रवार 18 एप्रिल रोजी सकाळी 11 वा. शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथे त्यांना हा सन्मान बहाल केला जाणार आहे.
लताताई उमरेकर यांनी जापान, थायलंड, दुबई, युगांडा याठिकाणाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचे पॅरा जागतिक स्पर्धामध्ये प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच भुवनेश्वर, दिल्ली, झारखंड या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये भाग घेतला आहे. त्यांना क्रीडा विभागात महाराष्ट्र शासनाने थेट नियुक्ती दिली आहे.
नांदेड जिल्ह्यातील या क्रीडा पटूचे या पुरस्कारासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंमरे यांच्यासह सर्व मान्यवरांनी स्वागत केले आहे. त्यांचे प्रशिक्षक किरण माने व चेतन माने यांनी देखील या उपलब्धीसाठी त्यांचे कौतुक केले आहे.
0000
वृत्त क्रमांक 403
मुक्या जनावरांना उन्हाळयात वारंवार पाणी द्या
गाढवांना दुपारी 12 ते 3 वेळेत कामाला गुंतवू नका !
नांदेड दि. 17 एप्रिल :-यावर्षी कडक उन्हाळा असून पाळीव प्राण्याबद्दल विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. विशेषत: विटभट्यावर काम करणारे गाढव, घोडा व खच्चर यांना अधिक वजन व भर उन्हात काम न देण्याचे तसेच दर दोन तासांनी उन्हामध्ये पाणी देण्याबाबत पशुसंवर्धन विभागाने सर्व विटभट्या मालकांना तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहकांना आवाहन केले आहे.
मुक्या जनावरांना काय त्रास होतो हे त्यांना सांगता येत नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द कोणतीही क्रुरता होवू नये यांची काळजी घेणे आवश्यक आहे. भारतीय जीवजंतु कल्याण बोर्ड या संस्थेने वीट भट्यावर काम करणाऱ्या गाढव, घोडा व खच्चर या प्राण्यासाठी मार्गदर्शीका निर्गमित केली आहे. तसेच प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायदा सन 1960 यामध्ये देखील यासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या असून ज्या ठिकाणी तापमान 37 अंशापेक्षा अधिक आहे त्याठिकाणी 12 ते 3 या वेळेत गाढवांना व अन्य प्राण्यांना काम करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. उष्ण हवामानात काम केल्याने मानवाप्रमाणे शरीरातील पाणी कमी होणे, उष्णतेचा ताण, पाठदुखी या समस्या गाढवांमध्ये अभ्यासाअंती दिसून आले आहे.
71 टक्के प्राणी उन्हाळयामध्ये कमी पाणी पिल्यामुळे आजारी होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गाढवांना वारंवार पाणी पाजणे आवश्यक आहे. तसेच काम करताना थोडया थोडया वेळाने त्यांना आराम देणे आवश्यक आहे. सतत 5 तास अधीक काम करुन घेणे निदर्यी वागणूक असून क्रुरतेचे लक्षण आहे.
त्यामुळे प्रशासनाच्या या निर्णयाकडे पशुपालकांनी गाढवांच्या मालकांनी लक्ष वेधावे यासंदर्भात काम करणाऱ्या संघटना तसेच सुशिक्षित तरुणांनी मुक्या जनावरांच्या या समस्याकडे लक्ष वेधावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी केले आहे.
00000
वृत्त क्रमांक 402
जलसंपदा विभागाच्या सर्व कार्यालयात स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय स्वच्छता मोहिम
नांदेड दि. 17 एप्रिल :- जलसंपदा विभागातर्गत 15 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत जलव्यवस्थापन कृती पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवड्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत तीसऱ्या दिवशी जिल्ह्यातील सर्व कार्यालयामध्ये "स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय मोहिम राबविण्यात आली.
जलसंपदा विभाग, नांदेड पाटबंधारे मंडळ, नांदेड अधीक्षक अभियंता अ.आ. दाभाडे पालक अभियंता नांदेड जिल्हा यांच्या अधिपत्याखाली आज "स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, व जलपुनर्भरन अन्वये नांदेड पाटबंधारे मंडळ नांदेड अंतर्गत असलेल्या सर्व विभागीय कार्यालये, उपविभागीय कार्यालये, सर्व शाखा कार्यालये येथे सर्व कार्यालयात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
कार्यकारी अभियंता, नांदेड पाटबंधारे विभाग, या विभागीय कार्यालयात जल पुनर्भरण कार्यक्रमांतर्गत वरिष्ठ भुवैज्ञानिक भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रना डॉ. भालचंद्रजी संगनवार यांनी सर्व अधिकारी / कर्मचारी यांना जलपुनर्भरणाबाबत प्रशिक्षण दिले. यावेळी अधीक्षक अभियंता अ.आ.दाभाडे यांच्यासह सर्व अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
00000
वृत्त क्रमांक 401
नांदेड जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा इशारा
18,19, व 20 एप्रिल रोजी येलो अलर्ट जारी
तीन दिवस उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता
नांदेड दि. 17 एप्रिल :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 18, 19 व 20 एप्रिल हे तीन दिवस येलो अलर्ट जारी केलेला आहे. या तीन दिवसांच्या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
काय करावे:
तहान नसली तरी पुरेसे पाणी प्या. अपस्मार, हृदयरोग, मूत्रपिंड, यकृतविषयक आजारांमुळे ज्यांना शरीरात द्रवपदार्थ टिकवण्याचा प्रश्न येतो, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच द्रवपदार्थ किंवा पाणी प्राशन करावे.
ओआरएस (ORS) म्हणजेच तोंडान घ्यावयाचे शरीरातले पाणी वाढवणारे द्रवपदार्थ, घरगुती लस्सी, भाताची पेज, लिंबूपाणी, ताक, नारळाच पाणी घ्या. हलक्या रंगाचे, वजनाला हलके आणि सैलसर सुती कपडे वापरा. घराबाहेर असाल तर डोके झाका. एखादे कापड वापरा, टोपी घाला किंवा छत्री वापरा. डोळ्यांच्या सुरक्षेसाठी गॉगल वापरा आणि उन्हापासून कातडीचाही बचाव करायला सनस्क्रीन वापरा.
अतिउष्णतेमुळे ज्यांना सर्वाधिक हानी पोहोचेल असे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी किंवा स्थूल व्यक्तींची विशेष काळजी घ्या.
काय टाळावे :
उन्हात जायचे टाळा, विशेषतः दुपारी १२ ते ०३ मध्ये दुपारी बाहेर असताना श्रमाची कामे टाळा. अनवाणी बाहेर जाऊ नका. अतिउष्णतेच्या काळात स्वयंपाक करणे टाळा. दार खिडक्या उघड्या ठेऊन अन्न शिजवण्याचे क्षेत्र स्वयंपाकघर हवेशीर राहील हे बघा. अल्कोहोल म्हणजे दारू, चहा, कॉफी, शीतपेये टाळा त्यातून शरीरातले पाणी कमी होते. उच्च प्रथिनयुक्त मिठाचं प्रमाण जास्त असलेले किंवा तिखट तसेच तेलकट अन्न खाऊ नका. शिळंपाकं खाऊ नका.चारचाकी वाहन लावून ठेवताना त्यात लहान मुले किंवा प्राणी ठेऊ नका. चमकणारे दिवे किंवा बल्ब्ज वापरू नका, त्यातून अनावश्यक उष्णता निर्माण होते.
00000
वृत्त क्रमांक 400
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा दौरा
नांदेड दि. 17 एप्रिल :- राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे शुक्रवार 18 एप्रिल 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
शुक्रवार 18 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2 वा. लातूरहून नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.15 वा. लोहा येथे ज्ञानेश्वर पाटील (पवार) यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ: शनी मंदिर जवळ, लोहा, जि. नांदेड . दुपारी 3.30 वा. कुसूम सभागृह, नांदेडकडे प्रयाण. दुपारी 4 वाजता आगमन व श्री. नौनिहालसिंग जहागिरदार रा. नांदेड व नांदेड एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित नवज्योत फाउंडेशनच्या 17 सतराव्या संस्कार शिबिराच्या उदघाटन समारंभास उपस्थिती. स्थळ: कुसूम सभागृह, नांदेड . सायं. 6 वा. कामठा (बु) येथील फार्म हाऊसला भेट. सायं.7 वा. जि. लातूरकडे प्रयाण.
शनिवार 19 एप्रिल रोजी दुपारी 4.30 वा. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून श्री गुरु गोविंद सिंघजी विमानतळ नांदेडकडे प्रयाण. सायं. 5.45 वा. श्री गुरु गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन. सायं 6 वा. उजना, ता. अहमदपूर जि. लातूरकडे प्रयाण करतील.
00000
वृत्त क्रमांक 399
24 एप्रिल रोजी दिशा समितीच्या बैठकीचे आयोजन
नांदेड दि. 17 एप्रिल :- जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) समितीची बैठक गुरुवार 24 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन, नांदेड येथे होणार आहे.तरी सर्व कार्यालय प्रमुखांनी अद्यावत माहितीसह बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा दिशा समितीचे सदस्य सचिव राहुल कर्डिले यांनी केले आहे.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) समितीचे बैठक खासदार तथा समितीचे पदसिध्द अध्यक्ष रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार 24 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.30 वा कै. डॉ. शंकरराव चव्हाण, नियोजन भवन, मुख्य सभागृह पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीसाठी सर्व कार्यालय प्रमुखांनी आपल्या विभागाच्या माहितीसह, मागील बैठकीचे अनुपालन व सन 2024-25 चा आर्थिक प्रगती अहवाल एकूण प्राप्त निधी, एकूण खर्च, खर्चाची एकूण टक्केवारी जि.ग्रा.वि.यं.नांदेड या कार्यालयाकडे तात्काळ पाठवावी व कार्यालय प्रमुखांनी अद्यावत माहितीसह बैठकीस उपस्थित राहावे, असे जिल्हाधिकारी तथा दिशा समितीचे सदस्य सचिव नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000
वृत्त क्रमांक 451 जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश नांदेड दि. 28 एप्रिल : महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी ध्...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 114 संजय गांधी निराधार योजनेतील २ हजार लाभार्थी अजूनही आधार कार्डशी 'अनलिंक ' ७ दिवसात कारवाई न केल्यास लाभापास...
-
वृत्त क्र. 1 47 नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले अभिजीत राऊत सहआयुक्त जीएसटी नांदेड दि. ४ फेब्रुवारी : सिडकोचे उपाध्यक्ष व व्य...