Monday, November 23, 2020

 

नायगाव नगरपंचायतीच्या आरक्षणाची सोडत 27 नोव्हेंबरला 

 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- नांदेड जिल्‍हयातील नगरपंचायत नायगाव सार्वत्रिक निवडणूक-2021 साठी मा. राज्‍य निवडणूक आयोग महाराष्‍ट्र यांनी 29 ऑक्टोबर 2020 अन्‍वये नगरपंचायतीची प्रभाग रचना, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्‍यानुसार आयोगाने ठरवून दिलेल्‍या आरक्षणाच्‍या प्रमाणानूसार नायगाव नगरपंचायतीच्‍या क्षेत्रातील एकूण प्रभागापैकी अनुसूचित जातीमधील महिला, अनुसूचित जमातीमधील महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला व सर्वसाधारण महिला याकरीता सोडत उपविभागीय अधिकारी, बिलोली यांच्‍या अध्‍यक्षतेखाली शुक्रवार 27 नोव्हेंबर, 2020 रोजी सकाळी 11 वाजता नगरपंचायत कार्यालय नायगाव येथे आयोजित करण्‍यात आली आहे. नायगाव नगरपंचायत क्षेत्रातील सर्व संबंधित नागरिकांनी आरक्षण निश्चितीच्‍या कार्यक्रमास सोडतीच्‍या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

0000

 

हिमायतनगर नगरपंचायतीच्या आरक्षणाची सोडत 27 नोव्हेंबरला 

 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- नांदेड जिल्‍हयातील नगरपंचायत हिमायतनगर सार्वत्रिक निवडणूक-2021 साठी मा. राज्‍य निवडणूक आयोग महाराष्‍ट्र यांनी दिनांक 29 ऑक्टोबर,2020 अन्‍वये नगरपंचायतीची प्रभाग रचना, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्‍यानुसार आयोगाने ठरवून दिलेल्‍या आरक्षणाच्‍या प्रमाणानुसार हिमायतनगर नगरपंचायतीच्‍या क्षेत्रातील एकूण प्रभागापैकी अनुसूचित जातीमधील महिला, अनुसूचित जमातीमधील महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला व सर्वसाधारण महिला याकरीता सोडत उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्‍या अध्‍यक्षतेखाली शुक्रवार 27 नोव्हेंबर, 2020 रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय हिमायतनगर येथे आयोजित करण्‍यात आली आहे. हिमायतनगर नगरपंचायत क्षेत्रातील सर्व संबंधित नागरिकांनी आरक्षण निश्चितीच्‍या कार्यक्रमास सोडतीच्‍या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

00000

 

36 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू  

53 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी   

नांदेड (जिमाका) दि. 23 :- सोमवार 23 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 36  व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 14 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 22 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 53 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या एकुण 1 हजार 820 अहवालापैकी  1 हजार 714 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता  20 हजार 42 एवढी झाली असून यातील  18  हजार 947 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 355 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 17 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. गुरुवार 19 नोव्हेंबर 2020 रोजी शिवकल्याण नगर नांदेड येथील येथील 62 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 545 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, हदगाव कोविड रुग्णालय व गृहविलगीकरण 1, मुखेड कोविड रुग्णालय व गृहविलगीकरण 1,  खाजगी रुग्णालय 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल 5, अर्धापूर तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 29 असे एकूण 53 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.53 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 11, किनवट 1, देगलूर 1, परभणी 1 असे एकुण 14 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 16, भोकर 1, कंधार 1, नांदेड ग्रामीण 1, देगलूर 1, नायगांव 2 असे एकुण 22 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 355 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 220, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 25, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 36, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 137, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 9, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 4, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 13, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 5, बिलोली कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 4, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 20, नांदेड जिल्ह्यातील गृह विलगीकरण 26 हैदराबाद येथे संदर्भित 1, औरंगाबाद येथे संदर्भित 1, खाजगी रुग्णालय 54 आहेत.  

सोमवार 23 नोव्हेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 175, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 80 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 39 हजार 239

निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 15 हजार 278

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 42

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 18 हजार 947

एकूण मृत्यू संख्या- 545

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.53 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-0

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-0

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-526

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-355

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-17. 

आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

00000

 

नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी

ऑनलाईन नोंदणीसाठी इच्छुकांनी पुढे यावे

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- केंद्रीय नवोदय विद्यालयात वर्ग सहावीच्या प्रवेशासाठी 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाईन नोंदणी सुरु केली असून यासाठी इच्छुकांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. केंद्रीय नवोदय विद्यालय आपल्या आदर्श शिक्षणासाठी ओळखल्या जाते. बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता 6 वी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु असून संबंधितांनी https://navodaya.gov.in या वेबसाईटवर वर विनामूल्य ऑनलाईन अर्ज करावेत. अर्ज करण्याची मुदत 15 डिसेंबर 2020 पर्यंत देण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज जिल्ह्यातील चालू शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये इयत्ता 5 वी वर्गात शिक्षण घेत असलेल्या सर्व शासकीय/निमशासकीय मान्यताप्राप्त शाळेतील विद्यार्थ्यांना करता येतील.

0000

 

सातव्या आर्थिक गणनेचे कामकाज करणाऱ्या

शासनाच्या प्रतिनिधींना नागरिकांनी सहकार्य करावे

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- केंद्र शासनातर्फे सातव्या आर्थिक गणनेचे कामकाज युद्धपातळीवर सुरु असून ग्रामीण भागासह आता शहर, महानगरामध्ये माहिती घेण्याचे काम सुरु आहे. या माहितीमध्ये व्यक्तीगत पातळीवरील आर्थिक माहितीचाही समावेश आहे. ही माहिती शासनस्तरावर गोपनीय राहणार असून सदर माहिती घरोघरी जाऊन घेणाऱ्या प्रगणक व तपासणी पर्यवेक्षकांना नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. यावेळी समितीचे सदस्य तथा शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शासनाचे ध्येय-धोरणे ठरविण्यासाठी या आर्थिक गणनेचा प्राधान्याने विचार केला जातो. 

या राष्ट्रव्यापी सातव्या आर्थिक गणनेत व्यवसाय, उद्योग, उत्पादन, वस्तु व सेवा वितरणामध्ये सहभागी आस्थापना, रोजगार, कामगारांची संख्या, स्वयंरोजगार, कामगार पणन संस्था आदी घटकांची गणना केली जाणार आहे. यात सर्व प्रकारच्या आस्थापना (हंगामी, बारमाही, तात्पुरती) यांची माहिती गोळा केली जाणार आहे. प्रगणक व पर्यवेक्षक हे आर्थिक गणनेचे क्षेत्रकाम Common Service Centre (CSC) E-Governance यांचेकडून नेमण्यात आलेले आहेत. आर्थिक गणने अंतर्गत माहिती संकलनाचे काम प्रत्येक घरोघरी तसेच व्यापारी प्रतिष्ठाने यांना प्रत्यक्ष भेट देवून यांची माहिती पेपरलेस पध्दतीने मोबाइल आज्ञावलीव्दारे संकलित करण्यात येत आहे. 

आस्थापनेची संपुर्ण माहिती प्रत्येक स्तरावर गोपनीय राहणार आहे. यागणनेमध्ये कृषी, वृक्षारोपण, बेकायदेशीर आर्थिक घडामोडी, सार्वजनिक प्रशासन व संरक्षण आणि बाह्य-प्रादेशिक संस्थांच्या आर्थिक घडामोडी इ. याबाबी वगळण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील गणनेचे काम अंतिम टप्पात असून नागरी भागामध्ये कामास सुरूवात झालेली आहे. आर्थिक गणनेच्या माहितीचा उपयोग केंद्र व राज्य शासनास नियोजन व धोरण आखण्यासाठी होतो. याप्रसंगी जिल्हायातील सर्वशहर व गावांत गणनेचे काम प्रभावीपणे होण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समिती मधील सर्व प्रशासकीय अधिका-यांनी गणना करण्यासाठी नेमणूक केलेल्या प्रगणक व पर्यवेक्षक यांना यथोचित सहकार्य करण्याबाबतचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत. प्रगणकांनी केलेल्या कामाचे तपासणी पर्यवेक्षक करतील. सदरील गणनेचे निरीक्षण जिल्हा सांख्यिकी कार्यालय, नांदेड या कार्यालयाकडून करण्यात येत आहे. नागरिकांनी या गणनेबाबत सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आवाहन केले आहे.

0000

 

 पंडित दीनदयाल उपाध्याय अल्पसंख्यांक

रोजगार मेळाव्याचे ऑनलाईन आयोजन 

नांदेड दि. 23 (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता व मार्गदर्शन केंद्राच्यावतीने जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी ऑनलाईन पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 24 ते 25 नोव्हेंबर 2020 रोजी आयोजीत करण्यात आला आहे. यावेळी बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी विविध पदाकरिता नामांकित कंपनीकडून ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोजगार व उद्योजकता केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. 

या मेळाव्यात BADVE ENGINEERING LTD. – II या कंपनीत ITI WELDER FRESHER FOR APPRENTISHIP या पदांसाठी 50 जागा आहेत. MAHINDRA STEEL SERVICE CENTRE LTD या कंपनीत TRAINEE- ITI FITTER/MACHINIST / TURNER / CNC /COE या पदांच्या 30 जागा आहेत. तर NUCLEUS TECHNOLOGIES या कंपनीत TALLY OPERTAOR च्या एका पदांसाठी मुलाखत घेण्यात येणार आहे.

00000

 

पदवीधर मतदानाच्या केंद्रावर

कोविड-19 च्या खबरदारीसाठी असतील कर्मचारी

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 


नांदेड जिल्हा प्रशासन सज्ज जिल्ह्यात 123 मतदान केंद्र 

नांदेड (जिमाका) दि. 23 :-  औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक मतदानासाठी नांदेड जिल्हा प्रशासन पूर्ण तयारीने सज्ज झाले असून जिल्ह्यातील सर्वच्यासर्व 123 मतदान केंद्रावर कोविड-19 अंतर्गत योग्य ती खबरदारी घेण्यासाठी स्वतंत्र 3 आरोग्य कर्मचारी कार्यरत असतील, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले. प्रत्येक मंडळ निहाय ग्रामीण भागात मतदान केंद्र असून त्याठिकाणी कोविड-19 आजार सदृश्य अथवा कोणाला ताप व इतर आजाराची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी मतदान केंद्रावर स्वतंत्र खोलीची व्यवस्था करण्यासही त्यांनी सांगितले आहे. 

कोविड-19 च्या या काळातील निवडणूक ही इतर निवडणुकीपेक्षा आरोग्याच्यादृष्टिने जिल्हा प्रशासनासाठी आव्हानात्मक आहे. अशा या काळात आरोग्याची संपूर्ण काळजी घेण्याच्या उद्देशाने प्रत्येक बुथ हे सॅनिटाइज, निर्जंतुकीकरण करण्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या. कोविड-19 च्या प्राथमिक चाचणीसाठी आवश्यक असणाऱ्या थर्मामीटर, ऑक्सीमीटर हे आवश्यक त्याठिकाणी देण्यात आले आहेत. मतदान केंद्रात जाण्याअगोदरच प्रत्येकाचे तापमान तपासले जाणार असून पदवीधर मतदारांनी योग्य ती खबरदारी घेऊन आपला मतदानाचा हक्क व कर्तव्य पार पाडावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

जिल्ह्यातील मतदारांसाठी मतदान सुलभ करता यावे यादृष्टीने मतदान केंद्राचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण 123 केंद्रावर मतदान पार पडेल यासाठी 907 अधिकारी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. या प्रक्रीयेत सहभागी असणाऱ्या प्रत्येकाची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेवून प्राथमिक चाचणी केली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...