Tuesday, January 8, 2019


   हरभरा पिकाचा कृषि संदेश
नांदेड, दि. 8 :- जिल्ह्यात हरभरा पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांनी हरभरावरील घाटेअळीसाठी क्लोरॅनट्रीनीलीप्रोल 18.5 एस. जी. 2.5 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तसेच मर रोगाची लक्षणे दिसत असल्यास अशी झाडे उपटुन नष्ट करावीत व हरभरा पिकास पाणी देणे टाळावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000


  जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 8 :- जिल्ह्यात 15 जानेवारी 2019 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 1 ते 15 जानेवारी 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
000000


मानसिक आरोग्य शिबिराचे
गुरुवारी धर्माबाद येथे आयोजन
नांदेड, दि. 8 :- मानसिक आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत ताण-तणाव व मानसिक आरोग्य शिबिराचे आयोजन गुरुवार 10 जानेवारी रोजी धर्माबाद येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहे. हे शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वि. रा. मेकाने यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्यावतीने मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रणद जोशी यांनी केले आहे.
या शिबिरात मानसिक रोग, चिंता, डिप्रेशन, टेन्शन, नैराश्य, बेचैनी, जुनाट डोकेदुखी, व्यसन समस्या, झोपेचे आजार, फिट, मिरगी, आकडी, लैगिक समस्या, वयोवृद्ध लोकांमध्ये असलेला विसराळूपणा, भानामती, करणी आदी आजारावर मोफत औषधोपचार व समुपदेशन करण्यात येणार आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निलकंठ भोसीकर, नोडल अधिकारी डॉ. एच. आर. गुंटूरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. इकबाल शेख यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा मानसिक आरोग्य सेवा कार्यक्रम (प्रेरणा प्रकल्प) कार्यालय नांदेड येथील 02462-233093 येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
000000


जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचा
अंतीम टप्पा 15 जानेवारी पर्यंत लस घेण्याचे आवाहन
नांदेड दि. 8 :- जिल्हयात गोवर-रुबेला लसीकरण मोहिम सुरु असून एमआर लस प्रशिक्षीत व्यक्तीमार्फत दिल्या जात आहे. या मोहिमेत जिल्हयातील सर्व बालरोग तज्ज्ञांचे सहकार्य असून एमआर लसीकरणाबाबत पालकांचा विश्वास वाढला आहे. लसीपासुन वंचित असलेल्या लाभार्थ्यांना पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता मंगळवार 15 जानेवारी पर्यंत या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
ग्रामीण, शहरी व महानगरपालिका  क्षेत्रातील 7 लाख 20 हजार बालकांना गोवर रुबेलाची लस देण्यात आली आहे. या मोहिमेत जिल्हयाचे 71 टक्के काम पूर्ण झाले आहे. अद्याप ग्रामीण, शहरी व मनपा क्षेत्रातील 2 लाख बालकांचे लसीकरणाचे कार्य शिल्लक आहे.
राज्य स्तरावरुन या मोहिमेचा अंतिम दिनांक 15 जानेवारी देण्यात आला आहे. जिल्हयात लसीकरणाचे कार्य वाढविण्यासाठी ज्या भागात काम कमी झाले आहे अशा भागातील शाळा व शाळांचे मुख्याध्यापक, प्रभावशाली व्यक्ती, धर्मगुरु, पालक व सर्व स्तरावरील व्यक्तींनी उर्वरित कालावधीत लाभार्थ्यांना लस घेण्यास प्रवृत्त करावे.
या मोहिमेचा लाभ देण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हयातील सर्व आरोग्य यंत्रणामधील कर्मचारी यांचे मार्फत जिल्हयातील शाळा व इतर ठिकाणी आयोजित लसीकरण सत्राद्वारे एमआरची लस देण्यात येत आहे.
0000



अनाथ मुलांना प्रमाणपत्रासाठी
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन 
नांदेड दि. 8 :- बालगृहात बाहेर पडलेल्या ज्या अनाथ मुलांच्या जवळ जातीचे प्रमाणपत्र नाहीत अशा मुलांनी त्यांच्या शेवटच्या वास्तव्यास असलेल्या संस्थेशी संपर्क साध ते अनाथ असल्याबाबतचा प्रस्ताव  संबंधीत संस्थेमार्फत जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
बालन्याय (मुलांची काळजी संरक्षण) अधिनियमांतर्गत राज्या कार्यरत शासक, स्वयंसेवी बालगृहा दाखल होणाऱ्या अनाथ मुलांना संस्थेतून बाहेर पडतांना त्यांच्या जवळ जातीचे प्रमाणपत्र नसल्याने त्यांना शैक्षणिक, अर्थिक, सामाजिक सवलती आणि विशेष लाभ मिळत नाहीत. त्यामुळे या लाभार्थ्यांना अनाथ असल्याचे प्रमाणपत्र महिला बाल विकास आयुक्तालय स्तरावरुन निर्गमित करण्यात येणार आहे.
0000000


शासकीय हमीभावानुसार
भोकर, तामसा येथे कापूस खरेदी केंद्र चालू

            नांदेड, दि. 8 :- जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा म्हणून कापूस पणन महासंघामार्फत भोकर व हदगाव तालुक्यातील तामसा येथे शासकीय हमीभावानुसार कापुस खरेदी केंद्र चालू करण्यात आली आहेत. याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन विभागीय व्यवस्थापक नांदेड यांनी केले आहे.
किंमत आधारभूत योजनेंतर्गत कापूस हंगाम 2018-19 मध्ये कापूस खरेदीसाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कापसाच्या गुणधर्मानुसार पुढीलप्रमाणे दरपत्रक निश्चित करण्यात आले आहे.
            लांब धाग्याचे कापसाचे गुणाधर्म – धाग्याची लांबी 27.5 ते 28.5, तलमता 3.5 ते 4.7, हमी भाव 5 हजार 350 रुपये, आर्दता 8 टक्के.  धाग्याची लांबी 27.5 ते 29.0, तलमता 3.6 ते 4.8, हमी भाव 5 हजार 400 रुपये, आर्दता 8 टक्के.  धाग्याची लांबी 29.5 ते 20.5, तलमता 3.5 ते 4.3, हमी भाव 5 हजार 450 रुपये, आर्दता 8 टक्के.
            मध्यम धाग्याचे कापसाचे गुणधर्म-  धाग्याची लांबी 24.5 ते 25.5, तलमता 4.3 ते 5.1, हमी भाव 5 हजार 150 रुपये, आर्दता 8 टक्के.  धाग्याची लांबी 26.0 ते 26.50, तलमता 3.4 ते 4.9, हमी भाव 5 हजार 250 रुपये, आर्दता 8 टक्के.  धाग्याची लांबी 26.5 ते 27.0, तलमता 3.8 ते 4.8, हमी भाव 5 हजार 300 रुपये, आर्दता 8 टक्के.
            शासकीय कापूस खरेदीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे असतील. कापूस पेऱ्याची अद्यावत नोंद असलेली चालू वर्षाचा सात-बारा प्रत, मुळ आधार कार्ड व बँक पासबुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत (बॅक खाते आधारकार्डशी संलग्न केलेले असावे) व शेतकऱ्यांचा चालू मोबाईल नंबर सोबत आणणे आवश्यक आहे. मुळ आधारकार्ड व पासबुक सोबत आणवे जणे करुन कापूस चुकाऱ्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. कापसाचे चुकारे सात दिवासचे आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. कापसातील आर्द्रतेचे प्रमाणे 8 ते 12 टक्के असावे. 8 टक्क्याच्यावर  व 12 टक्केच्या आतील आर्द्रतेचे नियमाप्रमाणे कपात करण्यात येईल. 12 टक्के वरील आर्द्रतेचा कापुस स्विकारण्यात येणार नाही. फक्त एफएक्यु प्रतिचा कापूस स्विकारण्यात येणार आहे, असेही आवाहन नांदेड येथील कापूस पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक यांनी केले आहे.  
00000


महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष
हरिभाऊ बागडे यांचा दौरा

            नांदेड, दि. 8 :- महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
            बुधवार 9 जानेवारी 2019 रोजी मुंबई येथून विमानाने दुपारी 2.45 वा. श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.10 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायं. 4 वा. मुख्यमंत्री चषक पारितोषिक वितरण समारंभास उपस्थिती. स्थळ- नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड. सायं. 6 ते 8 वाजेपर्यंत नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी (लेखक डॉ. सुरेश सावंत) या चरित्रात्मक पुस्तकाच्या प्रकाशन समारंभास उपस्थिती. सोईनुसार शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण, आगमन व राखीव.  
            गुरुवार 10 जानेवारी 2019 रोजी सकाळी 8 वा. मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेड येथून आरोग्य कॉलनी खानापूर पिंगळी रोड जि. परभणीकडे प्रयाण करतील.
0000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...