Tuesday, November 3, 2020

 

5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020

 विविध बाबींवरील निर्बंध आदेश निर्गमीत 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 च्या अनुषंगाने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये प्रदान करण्‍यात आलेल्‍या अधिकाराचा वापर करुन जिल्‍हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध आदेश 2 नोव्हेंबर 2020 रोजी निर्गमीत केले आहेत.   

शासकीय कार्यालय, विश्रामगृहे इत्यादी परिसरात

मिरवणुका, घोषणा देणे, सभा घेण्यास निर्बंध

या निवडणूक कालावधीत जिल्‍हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, सर्व तहसिल कार्यालये आणि सर्व शासकीय कार्यालय व विश्रामगृह याठिकाणी कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक/मोर्चा काढणे, सभा घेणे, उपोषण करणे, कोणत्‍याही प्रकारच्‍या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्‍हणने इत्‍यादी, कोणत्‍याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणे याबाबी करण्‍यास या आदेशान्‍वये बंदी घालण्‍यात आली आहे. 

ध्‍वनीक्षेपकाचा वापर नियंत्रीत करणे

कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था पक्ष कार्यकर्ते यांना ध्‍वनीक्षेपकाचा (लाऊडस्पिकरचा वापर सक्षम पोलीस अधिका-यांच्‍या पुर्व परवानगीशीवाय करता येणार नाही. फिरते वाहन रस्‍त्‍यावरुन धावत असतांना त्‍यावरील ध्‍वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. निवडणूक कालावधीत लाऊडस्पिकरचा वापर सकाळी 6 वाजेपूर्वी व रात्री 10 वाजेनंतर करता येणार नाही.

 

शासकीय वाहनाच्‍या गैरवापरास प्रतिबंध

कोणत्‍याही वाहनांच्‍या ताफ्यामध्‍ये पाचपेक्षा जास्‍त मोटारगाडया अथवा वाहने (Cars/Vehicles) वापरण्‍यास या आदेशाद्वारे निर्बंध घालण्‍यात आले आहे. 

सार्वजनिक ठिकाणी जवळपास

तात्‍पुरती पक्ष कार्यालये स्‍थापन करण्‍यावर निर्बंध

नांदेड जिल्‍ह्यातील धार्मिक स्‍थळे, रुग्‍णालये किंवा शैक्षणिक संस्‍था व सार्वजनिक ठिकाणाच्‍या जवळपास तात्‍पुरती पक्ष कार्यालये स्‍थापीत करता येणार नाही. 

पक्षांचे चित्रे / चिन्‍हांचे कापडी फलके,

सार्वजनिक ठिकाणी भाषण देण्यावर निर्बंध

सार्वजनिक ठिकाणी संबंधीत पक्षांचे चित्रे / चिन्‍हांचे कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषण देणे यावर निर्बंध घालण्‍यात आले आहेत. 

शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक

मालमत्‍तेची विरुपता करण्‍यास निर्बंध

शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्‍तेची प्रत्‍यक्ष किंवा अप्रत्‍यक्ष स्‍वरुपात विरुपता करण्‍यास निर्बध घालण्‍यात येत आहे. 

नांदेड जिल्‍ह्यासाठी वरील सर्व आदेश 2 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2020 पर्यंत लागू राहतील. 

  मतदानाच्‍या दिवशी सर्व मतदान केंद्र परिसरात

फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागु करणे

05-औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणूक-2020 मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्‍टीकोणातून तसेच निवडणूक कालावधीत कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत राहवी यादृष्‍टीने मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी नांदेड जिल्‍हयातील सोबत जोडलेल्‍या यादीप्रमाणे एकूण 123 मतदान केद्राच्‍या परिसरात सकाळी 6 ते मतदान संपेपर्यतच्‍या कालावधीकरिता मतदान केंद्राच्‍या ठिकाणापासून 200 मीटर परिसरातील सर्व मंडपे, दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरिक्‍त खाजगी वाहन, चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त व्‍यक्‍तीस प्रवेश करण्‍याकरीता याद्वारे प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे. 

मतदानाचा हा आदेश मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी नांदेड जिल्‍हयातील एकूण 123 मतदान केंद्राच्‍या परिसरात सकाळी 6 ते मतदान संपेपर्यंतच्‍या कालावधीसाठी मतदान केंद्राच्‍या ठिकाणापासून 200 मीटर परिसरात लागू राहील.

00000

 

50 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

40 कोरोना बाधितांची भर तर तिघांचा मृत्यू 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- मंगळवार 3 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 50 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 40 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 14 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 26 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 168 अहवालापैकी  1 हजार 122 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता  19 हजार 243 एवढी झाली असून यातील  18  हजार 88 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 477 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 36 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालानुसार तीन बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सोमवार 2 नोव्हेंबर 2020 रोजी विष्णुपुरी नांदेड येथील 71 वर्षाच्या एका पुरुषाचा, लोहा तालुक्यातील 66 वर्षाच्या एका पुरुषाचा तर विष्णुपुरी नांदेड येथील 43 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 518 एवढी आहे.   

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 17, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 13, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 8, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 1, खाजगी रुग्णालय 10, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1 असे एकूण 50 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.43 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 10, अर्धापूर तालुक्यात 1, देगलूर 1, नांदेड ग्रामीण 1, लोहा 1 असे एकुण 14 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 8, देगलूर तालुक्यात 6, उमरी 1, भोकर 3, नागपूर 1, नांदेड ग्रामीण 3, मुखेड 2, लोहा 1, हिंगोली 1 असे एकूण 26 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 477 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 112, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 28, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 36, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 133, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 9, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 25, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 5, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 8, लोहा कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 7, बिलोली कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 23, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 13, बारड अंतर्गत गृह विलगीकरण 1, धर्माबाद तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, हिमायतनगर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 3, कंधार तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4, मांडवी अंतर्गत गृह विलगीकरण 1, अर्धापूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 13, नायगाव तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 7, खाजगी रुग्णालय 48, आहेत.  

मंगळवार 3 नोव्हेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 110, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 76 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 16 हजार 405

निगेटिव्ह स्वॅब- 93 हजार 568

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 243

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 18 हजार 88

एकूण मृत्यू संख्या- 518

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.43 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 568

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 477

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले 36. 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

0000

 शासनाने निश्चित केलेल्या दराने एन-95

मास्कची खरेदी व विक्री करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 3 :-  शासनाने ठरवून दिलेल्या किंमतीत जनतेने मास्कची खरेदी करावी. तर 20 ऑक्टोंबर 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार ठरवून दिलेल्या विक्री किंमतीत एन-95, 3 व 2 प्लाय मास्कची विक्री औषध विक्रेत्यांनी करावी. कोणता औषध विक्रेता जास्त किंमतीत मास्कची विक्री करत असल्यास त्याची तक्रार अन्न व औषध प्रशासन कार्यालयास करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (औषधे) मा. ज. निमसे यांनी केले आहे. 

सध्या देशात व राज्यात कोविड-19 चा संसर्ग सुरु असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्या अनलॉकडाऊन प्रक्रीया सुरु असून शासनाने टप्प्या-टप्याने दैनंदिन व्यवहार, दळणवळण वाहतूक यांना परवानगी दिली आहे. परंतु खबरदारी म्हणून शासनाने सामाजिक अंतर राखणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, गर्दी टाळणे, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे इत्यादी बाबी बंधनकारक केल्या आहेत. त्यामुळे सामान्यांना मास्क वापरणे व त्याची खरेदी करणे शक्य व्हावे याकरीता शासनाच्या 20 ऑक्टोंबर 2020 रोजीच्या निर्णयानुसार एन-95, 3 व 2 प्लाय मास्क यांच्या किंमती निश्चित केल्या आहेत. त्यामुळे सर्व घाउक, किरकोळ उत्पादकांना शासन निर्णयानुसार मास्कची विक्री निश्चित केलेल्या विक्री किंमतीस विक्री करणे बंधनकारक केले आहे. मास्कचे दरपत्रक दुकानाच्या दर्शनी भागावर प्रदर्शित करावे. शासन निर्णयाच्या अंमलबजावनीसाठी प्रशासनाच्यावतीने औषध विक्रेत्यांच्या  तपासण्या करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार औषध निरीक्षक औषध विक्रेत्यांच्या तपासण्या करत आहेत. तपासणीत महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयाचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास अशा व्यक्ती विरुध्द प्रशासनाच्यावतीने कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल, असेही आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (औषधे) मा.ज.निमसे यांनी केले आहे.

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...