Tuesday, November 3, 2020

 शासनाने निश्चित केलेल्या दराने एन-95

मास्कची खरेदी व विक्री करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 3 :-  शासनाने ठरवून दिलेल्या किंमतीत जनतेने मास्कची खरेदी करावी. तर 20 ऑक्टोंबर 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार ठरवून दिलेल्या विक्री किंमतीत एन-95, 3 व 2 प्लाय मास्कची विक्री औषध विक्रेत्यांनी करावी. कोणता औषध विक्रेता जास्त किंमतीत मास्कची विक्री करत असल्यास त्याची तक्रार अन्न व औषध प्रशासन कार्यालयास करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (औषधे) मा. ज. निमसे यांनी केले आहे. 

सध्या देशात व राज्यात कोविड-19 चा संसर्ग सुरु असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्या अनलॉकडाऊन प्रक्रीया सुरु असून शासनाने टप्प्या-टप्याने दैनंदिन व्यवहार, दळणवळण वाहतूक यांना परवानगी दिली आहे. परंतु खबरदारी म्हणून शासनाने सामाजिक अंतर राखणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, गर्दी टाळणे, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे इत्यादी बाबी बंधनकारक केल्या आहेत. त्यामुळे सामान्यांना मास्क वापरणे व त्याची खरेदी करणे शक्य व्हावे याकरीता शासनाच्या 20 ऑक्टोंबर 2020 रोजीच्या निर्णयानुसार एन-95, 3 व 2 प्लाय मास्क यांच्या किंमती निश्चित केल्या आहेत. त्यामुळे सर्व घाउक, किरकोळ उत्पादकांना शासन निर्णयानुसार मास्कची विक्री निश्चित केलेल्या विक्री किंमतीस विक्री करणे बंधनकारक केले आहे. मास्कचे दरपत्रक दुकानाच्या दर्शनी भागावर प्रदर्शित करावे. शासन निर्णयाच्या अंमलबजावनीसाठी प्रशासनाच्यावतीने औषध विक्रेत्यांच्या  तपासण्या करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार औषध निरीक्षक औषध विक्रेत्यांच्या तपासण्या करत आहेत. तपासणीत महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयाचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास अशा व्यक्ती विरुध्द प्रशासनाच्यावतीने कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल, असेही आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (औषधे) मा.ज.निमसे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...