Friday, February 28, 2020


डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृती प्रित्यर्थ सिंचन दिन साजरा
नांदेड, दि. 28 :- महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृती प्रित्यर्थ 26 फेब्रुवारी हा दिवस सिंचन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सिंचन दिनानिमित्त  शेतकऱ्यामध्ये सिंचन विषयक बाबींची जागरुकता निर्माण करणे हा आहे. बुधवार 26 फेब्रुवारी 2020 रोजी शंकरराव चव्हाण सभागृह नांदेड येथे  कै. डॉ.  शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिप प्रज्वलाने समारंभाचे द्घाटन झाले.
कार्यक्रमास  अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार, महाजन उप्पलवाड, श्री. सुर्यवंशी, संतोष  देवराये, डॉ. बालाजी कोंपलवार, . शिवाजी शिंदे, निलेश देशमुख, रामराव कदम, रंगनाथराव कदम, गोपळ पाटील इजळीकर, राम कदम, भाग्यश्री कदम आदी मान्यवर  उपस्थित होते.
प्रस्ताविकात अधीक्षक अभियंता एस.के. सब्बीनवार यांनी सिंचन दिनाचे औचित्य साधुन काटकसरीने पाणी वापराची  आवशकता, शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा  वापर  . बाबतीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची विभागणी 3 सत्रात केली होती. पहिल्या सत्रात  प्रा. संतोष देवराये यांनी कै. शंकरराव चव्हाण- व्यक्ती विशेष त्यांचे सिंचनातील योगदान या बाबत सविस्तर विचार मांडले. शंकरराव चव्हाण यांची जडन घडन, राजकिय कारकिर्द, प्रशासकिय कौशल्य मराठवाडयातील जायकवाडी, विष्णुपुरी, पैनगांगा , अनेक पाटबंधारे प्रकल्पाच्या निर्मीतीतील  योगदाना बद्दल सविस्तर प्रकाश टाकला.
दुसऱ्या सत्रमध्ये लाभधारक शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यात प्रामुख्याने  सिंचन पुर्व शेती सिंचन नंतरची शेतीतील बदल या बाबत सविस्तर चर्चा झाली. सिंचनाचे फायदे, समृद्धी, ग्रामिण भागात झालेला सामाजीक आर्थीक बदल या बाबत लाभधारक शेतकाऱ्यांनी अनुभव व्यक्त केले. शेतीमध्ये अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सुक्षम सिंचनाचा वापर करुन उत्पादन  वाढीवर भर देण्याबाबत सविस्तर मत मांडले. शेती सोबत शेती मालावर प्रक्रिया करुन कषी उत्पादने निर्माण करण्या बाबत  स्वानुभव सांगितला.
तिसऱ्या सत्रात भविष्यातील सिंचन विषयक आव्हानांची  सविस्तर उकल करताना प्रा.डॉ. शिवाजी शिंदे प्रा.डॉ. बालाजी कोंपलवार यांनी याबाबत  काळानुसार पिक पद्धती राहनीमान, खाद्य पद्धती’’ पुर्णत: बदलण्याची आवश्यकतेवर भर दिला. पाण्याच्या उपयोग केवळ पिण्यासाठी, शेतीसाठी उदयोगासाठी नसुन नागरीकांच्या दैनंदिन वापराच्या जवळपास 80  टक्के वस्तुची निर्मिती पाण्यापासुन होत असल्याचे नमुद केले. चंगळपणा टाळुन काटकसरीने जगण्याची वनशैली आत्मसात करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.डी.पवार यांनी उत्कृष्ठरित्या केले. शेवटी आर.एम.देशमुख कार्यकारी अभियंता यांनी आभार प्रदर्शन केले उपस्थीत सर्व तज्ञ, मार्गदर्शक श्रोत्यांचे आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर.एम.देशमुख, व्ही. के. कुरुंदकर, . . अनमोड, एन. पी. गव्हाणे,  एन. व्ही. पत्वार, श्री. सांवत, श्री. शेख या सर्व कार्यकारी अभियंत्यांनी परिश्रम घेतले.
00000



"हत्तीरोग" उच्चाटनासाठी
सामुदायिक औषधोपचार मोहिम 
नांदेड, दि. 28 :- "हत्तीरोग" एक दिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहिम नांदेड जिल्ह्यात 2 ते 7 मार्च 2020 या कालावधीत ग्रामीण भागात तर शहरी, मनपा निवडक भागात 2 ते 12 मार्च 2020 दरम्यान राबविली जाणार आहे. या मोहिमेत डीईसी अधिक अॅलबेनडॉझॉल गोळया खाऊ घालण्यासाठी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेवक व स्वंयसेवक येतील तेंव्हा या गोळया जेवन करुन (उपासी पोटी न घेता)  घेऊन शासनाच्या या मोहिमेस प्रतिसाद दयावा व हत्तीरोगाच्या दूरीकरणासाठी सर्वानी हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. बी. एम. शिंदे यांनी केले आहे.
जिल्ह्यात ही मोहिम राबविण्यासाठी 1 हजार 895 टिम ( 2 कर्मचाऱ्यांची एक टिम)  तयार करण्यात आली आहे. त्यावर 378 पर्यवेक्षक, 20 जिल्हास्तरीय अधिकारी व 20 जिल्हास्तरीय पर्यवेक्षक पाहणी करणार आहेत. ही मोहिम राबविण्यासाठी 77 लाख डि.ई.सी. गोळया व 31 लाख अलबेंडॉझॉल गोळया प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरापर्यंत पोहच करण्यात आल्या आहेत.
जिल्हयात 35 लाख 79 हजार 24 लोकसंख्या पैकी 31 लाख 4 हजार 334 लोकसंख्या निवडलेली आहे. त्यात एकुण अपेक्षित लाभार्थी 28,87,37 आहेत. यात शुन्य ते 2 वर्षाचे बालके, गरोदर माता व गंभीर रुग्णांना वगळण्यात आले आहे. लोकसंख्येत नांदेड जिल्हयातील ग्रामीण, शहरी व मनपा नांदेड मधील हडको, सिडको  वाघाळा व तरोडा खु व तरोडा बु परिसराचा समावेश आहे.
एक दिवसीय उपचार मोहिमेच्या गोळयाचा डोस
वयोगट
डी.ई.सी. 100 मि. ग्रॅम गोळ्याची मात्रा
ॲलबेनडॉझोल 400 मि.ग्रॅ
2 वर्षापेक्षा कमी 
निरंक   
निरंक   
2 ते 5 वर्षे
1 गोळी
1 गोळी
6 ते 14  वर्षे
2 गोळ्या
1 गोळी
15 वर्षावरील
3 गोळ्या
1 गोळी
भारतात "हिवताप" खालोखाल हत्तीरोग ही महत्वाची सार्वजनिक आरोग्याची समस्या आहे. जगातील 110 कोटी लोकसंख्येचा भाग हत्तीरोगग्रस्त आहे. 80 देशातील 12 कोटी लोंकाना याची लागण झाली आहे. त्यापैकी 1 / 3 रुग्ण भारतात आढळतात. भारतात हा रोग देशभर पसरलेला असून त्यातल्या त्यात केरळ, आंध्रप्रदेश, ओरिसा, पं. बंगाल, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व बिहार राज्यातील काही भागात हत्तीरोग रुग्ण जास्त प्रमाणात आढळतात. तर राज्यात नांदेड, नागपूर, चंद्रपूर, ठाणे, भंडारा, सोलापूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली आदी जिल्हयात जास्त प्रमाणात आढळते.
            बुचेरिया बॅक्रोपटाय व ब्रुग्रीया मलायी नावाच्या परजीवी जंतुमुळे हत्तीरोग हा आजार होतो. जेंव्हा डासाची क्युलेक्स मादी हत्तीरोग झालेल्या (आजारी) व्यक्तीस चावते तेंव्हा ती मानवाच्या शरीरातील जंतू रक्तासोबत शोषून घेते. डासाच्या शरीरात या जंतूची 12 ते 14 दिवसात वाढ होऊन पुनः दुसऱ्या निरोगी व्यक्तीस जेंव्हा हा डास चावतो तेंव्हा, हे जंतू त्या व्यक्तीच्या शरीरात सोडतो. मानवाच्या शरीरात हे जंतू लसीका संस्थेत जातात तेथे त्यांची वाढ होते. नर व मादी वेगळे होतात नंतर नर व मादी जंतूचे मिलन होऊन असंख्य पिल्ले जन्म घेतात त्यांना आपण मायक्रोपफायलेरिया म्हणतो. नर व मादी मानवी शरीरात 5 ते 8 वर्षे राहतात. लसीकावाहिनीत हे जंतू अडकून बसल्याने तेथील भाग फुगीर बनतो व तेथेच संबंधीत व्यक्तीस विकृती येते त्यासच आपण लसीकाचा हत्तीरोग झाला असे म्हणतो. डास चावण्यापासून ते हत्तीरोगाचे लक्षणे दिसण्याचा कालावधी (अधिशयन काळ) 12 ते 18 महिने आहे.
            हत्तीरोगग्रस्त रुग्णाच्या लसीकाग्रृंथी सुजतात. जांघेत गाठ येते, वेदना होतात, रुग्णास ताप येतो, थंडी सुध्दा वाजते. काही पुरुषामध्ये वृषणदाह होतो. हातपाय व बाहय जननेंद्रिय सुजतात. रुग्णास अंडवृध्दी होते. या लक्षणामुळे रुग्ण सामाजिक उपेक्षेस पात्र ठरतो. रुग्णाचे लग्न होत नाही. अशा या हत्तीरोगाचे केंद्र शासनाने सन 2021 पर्यन्त उच्चाटण करण्याचे ठरविले आहे. सद्यस्थितीत हत्तीरोगाच्या नियंत्रणासाठी रुग्णांना औषधोपचार व डास नियंत्रण या कार्यप्रणालीनुसार हत्तीरोगाचे नियंत्रण करण्यात येते. जागतिक आरोग्य संघटनेने सुचविल्याप्रमाणे हत्तीरोगाच्या दूरीकरणासाठी "एकदिवसीय सामुहिक औषधोपचारएम.डी.ए. (मास ड्रग अॅडमिनिट्रेशन) सर्वाना (ज्यांच्या शरीरात मायक्रोफायलेरिया असोत किंवा नसोत, लक्षणे असोत किंवा नसोत) रोगाचा कायम प्रादुर्भाव असणाऱ्या भागात दिला जातो. फक्त 2 वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रीयांना व खुप आजारी रुग्णांना हा औषधोपचार देवू नये.
            या एम.डी.ए. एकदिवसीय सामुहिक औषधोपचार मोहिम ही जवळ-जवळ 12 दिवसाच्या हत्तीरोगाच्या समुळ उपचारा इतकीच प्रभावी आहे. हत्तीरोग रुग्ण शोधणे फार कठीण काम आहे. हत्तीरोगाचे संपुर्ण सर्वेक्षण होत नाही. रोगीचे रक्त नमुने घेणे, तपासणे व रुग्णास 12 दिवस औषधोपचार करणे. शिवाय रुग्णांना काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. एकदम 10 ते 15 वर्षाला विकृती दिसून येते. म्हणून एम.डी.ए या एकदिवसीय डी.ई.सी अधिक अॅलबेनडॉझॉल गोळयाचा उपचार एक दिवसीय सतत पाच वर्षे केल्यास एकाच मात्रा (डोस) मुळे रुग्णाच्या शरीरात जर हत्तीरोगाचे जंतू असतील तर ते जंतू जवळ जवळ 95 टक्के मरतात. यामुळे रोग फैलावत नाही. पर्यायाने हत्तीरोगाच्या प्रसारास आळा बसतो, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. बी. एम. शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.  
00000



     जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 
नांदेड, दि. 282 :- जिल्ह्यात शनिवार 14 मार्च 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शनिवार 29 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते शनिवार 14 मार्च 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.  
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000


लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन
नांदेड, दि. 28 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. लोकशाही दिन सोमवार 2 मार्च 2020 दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे.
यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.
न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000


डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना  
पात्र यादीमध्ये नाव नसलेल्या
विद्यार्थ्यांनी त्रुटीची पूर्तता करुन घ्यावी
नांदेड, दि. 28 :- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन 2019-20 या वर्षासाठी अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांची यादी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय नांदेड येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांची नावे पात्र यादीमध्ये नाहीत अशा विद्यार्थ्यांनी शुक्रवार 6 मार्च 2020 पर्यंत कार्यालयात येन कार्यालयीन वेळेत त्यांच्या अर्जातील त्रुटीची पुर्तता करुन घ्यावी. अन्यथा 6 मार्च 2020 नंतर आलेल्या विद्यार्थ्यांचा त्रुटी पुर्ततेसाठी विचार केला जाणार नाही याची नोंद, घ्यावी असे अवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले.  
00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...