Sunday, July 12, 2020


कोरोनातून 14 व्यक्ती बरे  
47 बाधित तर तिघांचा मृत्यू  
नांदेड (जिमाका) दि. 12 :- रविवार 12 जुलै रोजी प्राप्त झालेल्या एकुण 265 अहवालापैकी 198 निगेटिव्ह तर 44 व्यक्ती बाधित आढळले व बाहेर जिल्ह्यातून 3 बाधित नांदेड जिल्ह्यात उपचारासाठी दाखल झाले आहे. त्यामुळे बाधितांची संख्या एकुण 616 एवढी झाली आहे. यात 44 बाधितांपैकी 16 बाधितांचा अहवाल 11 जुलै रोजी रात्री उशिरा प्राप्त झाले. तसेच उर्वरीत 28 बाधितांचा अहवाल आज 12 जुलै रोजी प्राप्त झाले.
कोरोनाचे जिल्ह्यातील 14 बाधित व्यक्ती आज बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 375 बाधितांना सुट्टी देण्यात आली आहे. शनिवार 11 जुलै रोजी वजिराबाद नांदेड येथील 64 वर्षाचा पुरुष बाधितांचा व रविवार 12 जुलै रोजी सोमेश कॉलनी येथील 75 वर्षीय पुरुषाचा तसेच परभणी आनंदनगर येथील 34 वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे मृत्यू झाला. या बाधितांना उच्च रक्तदाब, श्वसनास त्रास, मधुमेह इतर गंभीर आजार होते.  जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बाधितांची संख्या 30 एवढी झाली आहे.
 नवीन बाधितांमध्ये उमर कॉलनी देगलूरनाका येथील 55 वर्षाची 1 महिला, दुलेशहानगर (रहेमाननगर) येथील 61 वर्षाची 1 महिला, हमिदियानगर येथील 40 वर्षे वयाची 1 महिला, फरांदेनगर येथील 59 वर्षाचा 1 पुरुष, 50 वर्षे वयाची 1 महिला, 3 वर्षे वयाचा 1 बालक, गोकुळनगर येथील 66 वर्षाचा 1 पुरुष, गंगाचाळ येथील 58 वर्षे वयाचा 1 पुरुष, राजनगर येथील 20 वर्षे वयाची 1 महिला, सिडको येथील 3 वर्षे वयाचा 1 मुलगा, आसर्जन येथील 38 वर्षाचा 1 पुरुष, धनेगाव येथील 9 वर्षाची 1 मुलगी, वाजेगाव येथील 41 वर्षाचा 1 पुरुष, मुखेड शहरातील अनुक्रमे 33,55 व 85 वय वर्षाचे 3 पुरुष, 65 वर्षाची 1 महिला, मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील 12 व 32 वर्षाचे 2 पुरुष, कावळगाव येथील 13 वर्षाची 1 महिला, धर्माबाद तालुक्याती शंकर गंज येथील 11 व 40 वर्षाचे 2 पुरुष, 55 वर्षे वयाची 1 महिला, बिलोली गांधी चौक येथील 39 वर्षाचा 1 पुरुष, कुंडलवाडी येथील 46 वर्षाचा 1 पुरुष, नरसी नायगाव येथील 45 व 48 वर्षाचे 2 पुरुष, 65 वर्षाची 1 महिला, नागोबा मंदिर परिसर देगलूर येथील 68 वर्षाची 1 महिला, 64 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर शहरातील 58 वर्षाचा 1 पुरुष, विकासनगर कंधार येथील अनुक्रमे 6,6,32,43,46,55,65 वर्षाच्या 6 महिला, 15 वर्षाचा 1 पुरुष, कंधार तालुक्यातील काटकळंबा येथील 55 वर्षाची 1 महिला, मुदखेड तालुक्यातील बाजार महोल्ला येथील 18 व 13 वर्षाच्या 2 महिला, परभणी जिल्ह्यातील जिंतूर कावी 70 वर्षाचा 1 पुरुष, वसमत तालुक्यातील गुंज येथील 33 वर्षाची 1 महिला, लातूर जिल्ह्यातील जळकोट येथील 60 वर्षाचा एका पुरुषांचा यात समावेश आहे.
आज रोजी 211 पॉझिटिव्ह बाधितांवर औषोधोपचार सुरु असून त्यातील 25 बाधितांची प्रकृती गंभीर आहे. यात 10 महिला बाधित व 15 पुरुष बाधित आहेत. आज रोजी 196 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळी प्राप्त होती.
आज रोजी 616 बाधितांपैकी 30 बाधितांचा मृत्यू झाला आहे. 375 बाधित हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. उर्वरीत 211 बाधितांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 70, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 54, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 27, नायगाव  कोविड केअर सेंटर येथे 7, जिल्हा रुग्णालय येथे 6, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 11, हिमायतनगर कोविड केअर सेंटर येथे 2, किनवट कोविड केअर सेंटर येथे 2, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित तसेच नांदेड शहरातील एका खाजगी रुग्णालयात 17 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 7 बाधित औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत.  
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे
सर्वेक्षण- 1 लाख 47 हजार 742,
घेतलेले स्वॅब- 8 हजार 159,
निगेटिव्ह स्वॅब- 6 हजार 774,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 44 (यात बाहेरुन जिल्ह्यातून आलेले 3) असे एकुण 47,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 616,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 15,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7,
मृत्यू संख्या- 30,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 375,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 211,
प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या 196 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000




महिलांच्या अधिकारासाठी
स्व. शंकरराव चव्हाण सदैव असायचे आग्रही
-         सौ. अमिताताई अशोकराव चव्हाण  
जिल्हा पोलीस मुख्यालयातील भरोसा सेलचा नवीन जागेत शुभारंभ

नांदेड (जिमाका) दि. 12 :- महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी नेहमीच सकारात्मक भुमिका घेतली. तीच भुमिका घरीसुद्धा त्यांनी ठेवत मला विविध सामाजिक उपक्रमात सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले, असे सांगत सौ. अमिताताई अशोकराव चव्हाण यांनी स्व. शंकरराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला.
नांदेड पोलीस अधिक्षक कार्यालयाच्यावतीने भारताचे माजी गृहमंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हैद्राबाद मुक्ती संग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक स्व. डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षाचे औचित्याने जिल्हा पोलीस विभागांतर्गत भरोसा सेल च्या नुतनीकरण केलेल्या कार्यालयाचे प्रातिनिधिक उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, महापौर सौ. दिक्षाताई धबाले, सौ. राजश्रीताई हेमंत पाटील, सौ. जयश्री विजयकुमार मगर, जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, दत्तराम राठोड, पोलीस उपअधिक्षक अभिजित फसके, धनंजय पाटील, डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक डी. जी. चिखलीकर, महिला पोलीस अधिकारी अनिता दिनकर आदींची उपस्थिती होती.
महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये दोषींना कठोर शिक्षा ही अभावानेच पाहायला मिळते. यातील ज्या काही पळवाटा असतील त्या भरोसा सेलच्या माध्यमातून थांबवुन सर्व तपास यंत्रणा बिनचुक कार्य करेल, असा विश्वास सौ. अमिताताई चव्हाण यांनी व्यक्त केला. महिलांनीही शक्यतोवर आपल्या संसारिक जीवनातील वाद हे घरच्याघरीच सामोपचाराने मिटविण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असेही त्यांनी आग्रहपूर्वक सांगितले.
समाजातील पिडित महिलांना अनेक पातळ्यांवर अपमान सहन करावा लागतो. विशेषत: त्यांच्या सोबत जी लहान मुलं असतात त्यांनाही त्यांचा कुठलाही दोष नसतांना त्रास सहन करावा लागतो. हा त्रास व त्यांना येणाऱ्या अडचणी या भरोसा विभागामार्फत दूर होतील, असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी सांगितले.
महिलांवरील अत्याचाराच्या बहुसंख्य प्रकरणात न्याय मागतांनाही महिलांनाच अधिक प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागते. कोणत्याही अन्यायग्रस्ताला आपल्या आन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी कोणतेही पोलीस स्टेशन हे आपले वाटले पाहिजे, अशी अपेक्षा सौ. राजश्रीताई हेमंत पाटील यांनी व्यक्त केली. स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा पोलीस मुख्यालयात नव्या स्वरुपात उभारण्यात आलेला हा भरोसा विभाग सर्व महिलांच्या, अबाल वृद्धांच्या मनात विश्वास निर्माण करेल, या शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या.
जिल्ह्यातील अबाल वृद्धांसह महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात घट व्हावी यासाठी पोलीस विभागामार्फत वेळोवेळी समुपदेशनासह विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत. भारताचे माजी गृहमंत्री तथा माजी मुख्यमंत्री स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून समाजातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व विशेषत: पिडित महिला यांना न्याय देण्यासाठी, सुरक्षा देण्यासाठी हा विभाग नव्या स्वरुपात तयार करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले.
00000

वृत्त क्र. 638

  
पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे जिल्हावासियांना
संचारबंदी पाळण्याचे कळकळीचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 12 :- नांदेड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा याचा प्रसार आटोक्यात यावा या उद्देशाने नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे दिनांक 12 जुलैच्या मध्यरात्रीपासून ते 20 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहेत. नांदेड जिल्ह्यात आजवर जवळपास 558 च्यावर कोरोना बाधितांची संख्या पोहचली आहे. यापैकी जवळपास 358 बाधित व्यक्ती बरे होऊन  घरी गेले आहेत तर 25 बाधित व्यक्ती दगावले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाची ही श्रृखंला आपल्या सर्वांच्या मदतीने तोडण्याशिवाय पर्याय नाही. ही साखळी तोडण्यासाठीच संचारबंदी ही  एकप्रकारचा प्रतिबंधात्मक उपायच आहे हे माझ्या जिल्ह्यातील सर्व बंधुभगिनींनी लक्षात घेतले पाहिजे. संचारबंदीच्या नियमांचे सर्वांनी काटेकोर पालन करावे, असे आवाहन मी करतो. या शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जिल्हावासियांना कळकळीचे आवाहन केले.  
मी स्वत: कोरोना योद्धा असल्याने यातून सावरतांना काय त्रास होतो हे मी जवळून अनुभवले आहे. याहीपेक्षा कुटुंबातील सदस्यांना याचा मोठा ताणही सहन करावा लागतो. कोणत्याही व्यक्तीला हा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण सर्वांनीच एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय योजना अर्थात संचारबंदीचा घेतलेला निर्णय अत्यावश्यक आहे. यातून भाजीपाला व इतर अत्यावश्यक विक्रेत्यांसाठी सकाळचा एक निश्चित वेळ काही नियमांतर्गत जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करुन दिलेला आहे. त्यामुळे आत्यावश्यक गोष्टीची गैरसोय होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.  
आपल्या सर्वांना कल्पना आहेच की, भारताचे माजी गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री तथा हैद्राबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र सैनिक डॉ. शंकरराव चव्हाण यांचे हे जन्मशताब्दी वर्षे आहे. या 14 जुलै रोजी त्यांचा जन्मदिन आहे. याचे एक विशेष महत्व आहे. या जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तथापि सध्याची स्थिती लक्षात घेऊन ते सर्व कार्यक्रम आम्ही रद्द केलेले आहेत. या जयंती निमित्त त्यांच्या समाधीस्थळावर अथवा पुतळ्याजवळ कोणीही जाण्याचा प्रयत्न करु नये, असेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडवासियांना भावनिक आवाहन केले.
संचारबंदीचे काटेकोर पालन केले तरच आपल्याला कोरोना बाबतची श्रृंखला खंडित करता येणे शक्य होईल. दुर्देवाने कोरोनावर आजपर्यंत कोणतेही औषध खात्रीलायकरित्या उपलब्ध नाही. यासाठी जागतिक पातळीवर मोठे प्रयत्न सुरु आहेत. आजच्या घडिला सर्वांनी याची काळजी घेणे हाच एक मोठा प्रभावी उपाय आहे. आपल्या नांदेड जिल्ह्यातील वाढती संख्या ही काळजीचा विषय झाला आहे. यावर आपल्याला मात करायची आहे. जिल्ह्यातील संपूर्ण प्रशासन यासाठी आहोरात्र मेहनत घेत आहे. जिल्ह्यातील डॉक्टर्स, खाजगी डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेविका सर्व यंत्रणा आपले योगदान देत आहेत. संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाला संचारबंदीचे नियम पाळून पूर्ण सहकार्य करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
0000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...