Sunday, July 12, 2020

वृत्त क्र. 638

  
पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे जिल्हावासियांना
संचारबंदी पाळण्याचे कळकळीचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 12 :- नांदेड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा याचा प्रसार आटोक्यात यावा या उद्देशाने नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे दिनांक 12 जुलैच्या मध्यरात्रीपासून ते 20 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहेत. नांदेड जिल्ह्यात आजवर जवळपास 558 च्यावर कोरोना बाधितांची संख्या पोहचली आहे. यापैकी जवळपास 358 बाधित व्यक्ती बरे होऊन  घरी गेले आहेत तर 25 बाधित व्यक्ती दगावले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाची ही श्रृखंला आपल्या सर्वांच्या मदतीने तोडण्याशिवाय पर्याय नाही. ही साखळी तोडण्यासाठीच संचारबंदी ही  एकप्रकारचा प्रतिबंधात्मक उपायच आहे हे माझ्या जिल्ह्यातील सर्व बंधुभगिनींनी लक्षात घेतले पाहिजे. संचारबंदीच्या नियमांचे सर्वांनी काटेकोर पालन करावे, असे आवाहन मी करतो. या शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जिल्हावासियांना कळकळीचे आवाहन केले.  
मी स्वत: कोरोना योद्धा असल्याने यातून सावरतांना काय त्रास होतो हे मी जवळून अनुभवले आहे. याहीपेक्षा कुटुंबातील सदस्यांना याचा मोठा ताणही सहन करावा लागतो. कोणत्याही व्यक्तीला हा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण सर्वांनीच एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय योजना अर्थात संचारबंदीचा घेतलेला निर्णय अत्यावश्यक आहे. यातून भाजीपाला व इतर अत्यावश्यक विक्रेत्यांसाठी सकाळचा एक निश्चित वेळ काही नियमांतर्गत जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करुन दिलेला आहे. त्यामुळे आत्यावश्यक गोष्टीची गैरसोय होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.  
आपल्या सर्वांना कल्पना आहेच की, भारताचे माजी गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री तथा हैद्राबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र सैनिक डॉ. शंकरराव चव्हाण यांचे हे जन्मशताब्दी वर्षे आहे. या 14 जुलै रोजी त्यांचा जन्मदिन आहे. याचे एक विशेष महत्व आहे. या जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तथापि सध्याची स्थिती लक्षात घेऊन ते सर्व कार्यक्रम आम्ही रद्द केलेले आहेत. या जयंती निमित्त त्यांच्या समाधीस्थळावर अथवा पुतळ्याजवळ कोणीही जाण्याचा प्रयत्न करु नये, असेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडवासियांना भावनिक आवाहन केले.
संचारबंदीचे काटेकोर पालन केले तरच आपल्याला कोरोना बाबतची श्रृंखला खंडित करता येणे शक्य होईल. दुर्देवाने कोरोनावर आजपर्यंत कोणतेही औषध खात्रीलायकरित्या उपलब्ध नाही. यासाठी जागतिक पातळीवर मोठे प्रयत्न सुरु आहेत. आजच्या घडिला सर्वांनी याची काळजी घेणे हाच एक मोठा प्रभावी उपाय आहे. आपल्या नांदेड जिल्ह्यातील वाढती संख्या ही काळजीचा विषय झाला आहे. यावर आपल्याला मात करायची आहे. जिल्ह्यातील संपूर्ण प्रशासन यासाठी आहोरात्र मेहनत घेत आहे. जिल्ह्यातील डॉक्टर्स, खाजगी डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेविका सर्व यंत्रणा आपले योगदान देत आहेत. संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाला संचारबंदीचे नियम पाळून पूर्ण सहकार्य करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...