Monday, March 9, 2026

 वृत्त क्रमांक 

दर्जा, ट्रेसेबिलिटी आणि मूल्यवर्धनावर भर दिल्यास

निर्यात संधी अधिक वाढतील - सचिव एन. भवानीश्री 

शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेशी जोडण्यासाठी

खरेदीदार-विक्रेता मेळावा प्रभावी व्यासपीठ- जिल्हाधिकारी 

हळद क्षेत्रातील शेतकरी-निर्यातदार संबंध मजबूत करण्यासाठी खरेदीदार-विक्रेता मेळावा 

नांदेड, 9 मार्च :  जागतिक हळद व्यापारात भारताचे नेतृत्व टिकवून ठेवण्यासाठी दर्जेदार उत्पादन व ट्रेसेबिलिटीचे महत्त्व अधिक असून हळद उत्पादनासाठी भारताची जागतिक स्तरावर मजबूत ओळख आहे. दर्जा सुधारणा, ट्रेसेबिलिटी आणि मूल्यवर्धन यावर भर दिल्यास आपल्या शेतकरी व उद्योगांसाठी निर्यात संधी अधिक वाढतील, असे प्रतिपादन राष्ट्रीय हळद बोर्डाच्या सचिव  सौ. एन. भवानीश्री यांनी केले. 

हळद क्षेत्रातील व्यापार संधी वाढविणे आणि बाजारपेठेतील दुवे मजबूत करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय हळद बोर्डाच्यावतीने, स्पायसेस बोर्ड इंडिया यांच्या सहकार्याने आज नांदेड येथील VITS हॉटेलमध्ये हळद विषयक खरेदीदार–विक्रेता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात महाराष्ट्रातील हळद उत्पादक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, देशभरातील निर्यातदार, उद्योग प्रतिनिधी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी सहभागी झाले. 

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले  हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय हळद बोर्डाच्या सचिव सौ. एन. भवानीश्री यांच्या उपस्थितीत झाले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजीराव शिंदे तसेच मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र हिंगोली येथील प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी हळद मूल्य साखळी मजबूत करण्यासाठी शेतकरी, संस्था आणि निर्यातदार यांच्या समन्वयित प्रयत्नांचे महत्त्व स्पष्ट केले. खरेदीदार–विक्रेता मेळावे हे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेशी जोडण्याचे प्रभावी व्यासपीठ असून मूल्यवर्धन व चांगला दर मिळविण्यासाठी नवी संधी निर्माण करतात, असेही त्यांनी सांगितले. 

मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र हिंगोलीचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील यांनी त्यांच्या प्रतिनिधीमार्फत संदेश पाठवून हळद-आधारित उद्योग बळकट करण्याचे तसेच शेतकऱ्यांचा मूल्यवर्धन उपक्रमांमध्ये सहभाग वाढविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. 

उत्पादकता व गुणवत्ता वाढविण्यासाठी सुधारित शेती पद्धती आणि तंत्रज्ञान विकसित करण्याच्या गरजेवर भर दिल्याचे सांगून संशोधन संस्थांची भूमिका सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजीराव शिंदे यांनी स्पष्ट केली. 

कार्यक्रमादरम्यान कृषी विभाग, राज्य शासनाच्या उद्योग विभाग, निर्यातदार संघटना तसेच संशोधन संस्था (मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र हिंगोली) यांचे तज्ज्ञ यांनी तांत्रिक सत्रे घेतली. या सत्रांमध्ये हळद लागवडीत उत्पादकता व गुणवत्ता वाढविणे, निर्यात दर्जा मानके व अवशेष नियंत्रण, मूल्यवर्धनाच्या संधी तसेच सेंद्रिय हळद उत्पादन तंत्रज्ञान यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. 

कार्यक्रमात प्रगतिशील शेतकऱ्यांनी सेंद्रिय हळद लागवड व जीआय टॅग प्राप्त वायगाव हळदीच्या विपणनाविषयी अनुभव शेअर केले. तसेच खरेदीदार, निर्यातदार, शेतकरी व FPOs यांच्यातील व्यापार भागीदारी व खरेदी संधींबाबत चर्चेसाठी विशेष नेटवर्किंग सत्र आयोजित करण्यात आले. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपसंचालक, स्पायसेस बोर्ड, प्रादेशिक कार्यालय मुंबई सिमांता सैकिया  यांनी स्वागतपर भाषण करून हळद मूल्यसाखळीतील विविध घटकांमध्ये सहकार्य वाढविणे हा या मेळाव्याचा उद्देश असल्याचे सांगितले. शेवटी  स्पायसेस बोर्ड प्रादेशिक कार्यालय मुंबईच्या सहाय्यक संचालक डॉ. ममता कृष्णा धनकुटे  यांनी आभार मानले. 

हा खरेदीदार-विक्रेता मेळावा हळद उत्पादक व निर्यातदार यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी, दर्जेदार उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि हळद क्षेत्रात मूल्यवर्धन वाढविण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरले आहे.

00000




वृत्त क्रमांक  

माजी सैनिकांच्या पुनर्वसन व कौशल्य विकासासाठी 13 मार्च रोजी समुपदेशन

नांदेड, दि. 9 मार्च :- नांदेड जिल्हा व अधिपत्याखालील क्षेत्रात माजी सैनिक व त्यांच्या विधवांची संख्या 1 हजार 834 इतकी आहे. जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिकांना त्यांच्या आवडीनुसार योग्य कौशल्य विकास व पुनर्वसनाची संधी मिळावी यासाठी जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरावर विशेष समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा समुपदेशन कार्यक्रम शुक्रवार, दि. 13 मार्च 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हा सैनिक कार्यालय, नांदेड येथे होणार आहे. जिल्ह्यातील सर्व इच्छुक माजी सैनिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किरण अंबेकर यांनी केले आहे.

या समुपदेशन कार्यक्रमाद्वारे माजी सैनिकांना जिल्हा कौशल्य विकास कार्यालयामार्फत त्यांच्या कौशल्यानुसार योग्य तांत्रिक अथवा शैक्षणिक अभ्यासक्रम निवडण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच विविध शासकीय व निमशासकीय नोकरीच्या संधींबाबत माहिती, आवश्यक प्रमाणपत्रांविषयी मार्गदर्शन, रोजगाराच्या संधींबाबत सल्ला तसेच पुनर्वसन प्रक्रियेत येणाऱ्या शैक्षणिक व तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

000000

वृत्त क्रमांक  

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

नांदेड दि. 9 मार्च :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालय उमरी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 10 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वा. पासून . बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालय उमरी येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या प्लेसमेंट ड्राईव्ह /रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी आस्थापनामध्ये रोजगार व नोकरीच्या संधीसाठी मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी मंगळवार 10 मार्च 2026 सकाळी 10 वा. पासून कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालय उमरी यांच्या येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्कासाठी मा. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com दुरध्वनी  क्रमांक 02462-251674 व योगेश यडपलवार 9860725448 वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक  

दिव्यांग लाभार्थ्यांनी युडीआइडी व आधार कार्ड ३१ मार्चपूर्वी जमा करावे

जिल्हा प्रशासनाचे आवाहन

नांदेड,दि.९ मार्च:- दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सूचनेनुसार राज्यातील दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ सुलभ व पारदर्शक पद्धतीने देण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांचे वैशिष्ट्यपूर्ण ओळखपत्र युडीआइडी कार्ड, ई-दिव्‍यांग प्रमाणपत्र (E-Disability Certificate) व आधार कार्ड संबंधित योजनांशी संलग्न करणे आवश्यक करण्यात आले आहे.

राज्य शासनामार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले युडीआइडी कार्ड व आधार कार्ड संबंधित कार्यालयात तात्काळ जमा करावे.

शासन निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारे मासिक अर्थसहाय्य थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात डीबीटी DBT पद्धतीने जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे योजनांचा लाभ अखंडपणे सुरू राहण्यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करणे अत्यावश्यक आहे.

तरी तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले UDID कार्ड व आधार कार्ड संबंधित तहसील कार्यालय येथे 31 मार्चपूर्वी तात्काळ जमा करावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

००००

वृत्त क्रमांक  

गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी सर्व स्तरावर जनजागृती करा- जिल्हाधिकारी 

14 वर्षांच्या मुलींच्या ‘एचपीव्ही’ लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

शिक्षण विभागाच्या समन्वयाने प्रत्येक पात्र मुलीपर्यत पोहोचावे

एचपीव्ही लस पूर्णपणे सुरक्षित ; पालकांनी अफवाना बळी पडू नये

नांदेड  दि. 9 मार्च : महिलांमध्ये वाढता गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने 'एचपीव्ही' (HPV) लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा आढावा आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या मोहिमेसाठी सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे आणि शिक्षण विभागाच्या समन्वयाने प्रत्येक पात्र मुलीपर्यंत पोहोचण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

याबाबत त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. कोपूरवाड, जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुटे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.शिवशक्ती पवार, वैद्यकीय अधिकारी मनपा, बालरोगतज्ञ डॉ. राठोड, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अमृत चव्हाण, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्रीमती रेणुका दराडे  यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि समुपदेशक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोहिमेचे स्वरूप आणि अंमलबजावणी :

बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी 'एचपीव्ही' लसीकरणाच्या तांत्रिक बाजूवर सखोल चर्चा केली. १४ ते १५ वयोगटातील (१४ वर्षे पूर्ण) मुलींना या जीवघेण्या आजारापासून वाचवण्यासाठी ही लस अत्यंत प्रभावी आहे. या मोहिमेअंतर्गत पात्र मुलींना लसीचा एकच डोस (Single Dose) दिला जाणार आहे. 

या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, तालुकास्तरीय बैठका आणि पालकांचे समुपदेशन तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

अफवांना बळी पडू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

एचपीव्ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. समाजातील कोणत्याही अंधश्रद्धा किंवा अफवांना पालकांनी बळी पडू नये. आपल्या मुलीचे आरोग्य सुरक्षित करण्यासाठी पालकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करून लसीकरण करून घ्यावे," असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी केले. शिक्षण विभागाने शाळांमार्फत विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये याविषयी जनजागृती करावी, असेही त्यांनी नमूद केले.

विविध आरोग्य योजनांचा आढावा:

या बैठकीत केवळ लसीकरणच नव्हे, तर जिल्हयातील इतर महत्त्वाच्या आरोग्य विषयांचाही आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने:

 * NACP (एड्स नियंत्रण), PCPNDT (स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध), NTCP (तंबाखू नियंत्रण) आणि NTEP (क्षयरोग निर्मूलन) या कार्यक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

 * रक्तपेढी (Blood Bank) मधील साठा, रुग्णवाहिका (Ambulance) सेवांची उपलब्धता आणि जिल्हा कृती दलाच्या (Task Force) कार्याची माहिती घेण्यात आली.

00000

 वृत्त क्रमांक  

सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम

नांदेड, दि. 9 मार्च :- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे शुक्रवार 13 मार्च 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार 13 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वा. परभणी येथून नांदेड येथे आगमन व शासकीय विश्रामगृह येथे राखीव. सकाळी 11 ते 12 या कालावधीत हुजूर साहिब नांदेड गुरुद्वारा येथे समाधी दर्शन राखीव. दुपारी 12 ते 1 या कालावधीत सर्व स्थानिक सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी भेटीची राखीव वेळ व सर्कीट हाऊस. दुपारी 1 ते 2 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगांराच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे बाबत तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडीअडचणी निवारण्यासाठी केलेल्या उपाययोजना संदर्भात आढावा बैठक व त्यानंतर पत्रकार परिषद होईल. दुपारी 2 ते 3 वा. भोजनासाठी राखीव. दुपारी 3 ते 4 वा. आयुक्त, महानगरपालिका, नांदेड यांच्यासमवेत नमस्ते योजनेची जिल्ह्यातील अंमलबजावणी तसेच उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल रिट याचिका क्र. 3950/202 व सिव्हिल अर्ज क्रमांक 15434/2023 मधील निर्देशानुसार करण्यात आलेली कार्यवाही लाड-पांगे समितीच्या शिफारशी प्रमाणे प्रलंबित प्रकरणे व त्याबाबत करण्यात आलेली कार्यवाही सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व त्यांचे निराकरण करणेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना याबाबत आढावा बैठक व पत्रकार परिषद. रात्री 4 नंतर नांदेड येथील मुंबई कार्यालयाकडे प्रयाण करतील.

00000

  वृत्त क्रमांक   दर्जा , ट्रेसेबिलिटी आणि मूल्यवर्धनावर भर दिल्यास निर्यात संधी अधिक वाढतील -   सचिव एन. भवानीश्री   शेतकऱ्यांना थेट बा...