‘उज्ज्वल नांदेड’चा ध्यास... प्रेक्षागृह भरले
तुंडुंब
स्पर्धा
परीक्षा मार्गदर्शनाला मिळालेल्या तरुणाईच्या
प्रतिसादाने
जिल्हाधिकारी काकाणीही भारावले
नांदेड दि. 31 :- तुडूंब
भरलेले डॅा. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह....अगदी व्याख्यात्याच्या पायांपर्यंत
बसलेले होतकरू तरुण. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने
आयोजित ‘उज्ज्वल
नांदेड’ उपक्रमास मिळणाऱ्या प्रतिसादाची अनोखी चुणूक आज दिसून आली. जिल्हा
प्रशासनातील नांदेड सेतू समिती, नांदेड मनपा आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी
कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमातील विद्यार्थ्यांचा वाढता
सहभाग पाहून जिल्हाधिकारी सुरेश काकाणी हे भारावून गेले.
आजच्या एकदिवसीय शिबीरात
चार सत्र संपन्न झाली. यामध्ये स्पर्धा परीक्षेतील इंग्रजीची तयारी या विषयावर
रत्नेश अग्रवाल यांनी दोन सत्रांत मार्गदर्शन केले. याशिवाय डॅा. विलास कांबळे यांचे
भुगोल विषयाची तयारी तसेच डॅा. विजय पोवार यांचे सामान्य ज्ञान या विषयावर
मार्गदर्शन झाले. श्री. अग्रवाल यांच्या सत्रासाठी प्रेक्षागृहात मिळेल,
त्याठिकाणी युवा विद्यार्थ्यांनी जागा पटकावली. अगदी व्यासपीठावर आणि फळ्याच्या
शेजारीही. अग्रवाल यांनी तितक्यात तन्मयतेने आणि सोप्या-ओघवत्या भाषेत इंग्रजीच्या
तयारीचे धडे दिले. डॅा. कांबळे यांनीही हसत खेळत भुगोल विषयाची तयारी कशी करावी
यासाठी मार्गदर्शन केले. डॅा. पोवार यांनी सामान्य ज्ञान विषयाची तयारी कशी करावी
याबाबत सखोल माहिती दिली.
आजच्या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी काकाणी यांचे हस्ते झाले. उद्घाटनपर
भाषणात श्री. काकाणी म्हणाले की, उज्ज्वल नांदेड घडविण्याचा आपल्या ध्यास आहे.
त्यासाठी अभ्यासिका, मार्गदर्शन शिबीर, सराव प्रश्न संच तसेच अभिरूप मुलाखती
यांच्याद्वारे आपण पद्धतीशरपणे प्रयत्नशील आहोत. यातून चांगले निकालही हाती येऊ
लागले आहेत. ही बाब महत्त्वपुर्ण आहे. प्रशासनाचे प्रयत्न अखंडपणे तुमच्या सोबत
आहेत. याचा विद्यार्थ्यांनी चांगला विनीयोग करायला हवा. विषयांचे सखोल ज्ञान घेण्यातूनच,
तुम्हाला परीक्षेत यश संपादन करता येणार आहे. तालुका स्तरावरही स्पर्धा परीक्षा
तयारी आणि विविध क्षेत्रातील संधीची माहिती पोहचावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
नांदेडमधील होतकरू आणि जिद्द, चिकाटीच्या जोरावर तयारी करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी
यशाची जीवनमार्ग यातून आम्ही प्रशस्त करत आहोत.
उद्घाटन सत्रात
जिल्हाधिकारी काकाणी यांनी मार्गदर्शक व्याख्यात्यांचे ग्रामगीता देऊन स्वागत
केले. यावेळी मनपा आयुक्त समीर उन्हाळे उपस्थित होते. जिल्हा ग्रंथालय अधिकारी
सुनील हुसे यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले. श्री. हुसे आणि समाज कल्याण
अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी विविध सत्रांचे संयोजन केले. शिबीराच्या संयोजनात
साईनाथ डहाळे, आरती कोकूलवार, अजय वट्टमवार, कोंडीबा गादेवाड, विठ्ठल यनगुलवार,
लक्ष्मण शन्नेवाड, बाळू पावडे, रघुवीरसिंह यांनी सहभाग घेतला.
रविवार 5
फेब्रवारी रोजी अर्थशास्त्र विषयाचे मार्गदर्शन
उज्ज्वल नांदेड या मार्गदर्शन
मालिकेत विषयांचे सखोल मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. स्पर्धा
परीक्षा किंवा व्यक्तीमत्त्व विकासाची प्रेरक व्याख्यानांवर भर न देता, परीक्षांची
तयारी करताना विषयांचे सखोल ज्ञान मिळावे, त्याद्वारे अधिकाधीक गुण मिळविता यावेत
यासाठी प्रयत्न केला जातात. याच मालिकेत रविवार 5 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 11
ते सायंकाळी 5 यावेळेत अर्थशास्त्र विषयातील तज्ज्ञ रंजन कोळंबे यांचे मार्गदर्शन
आयोजित केल्याची माहिती संयोजकांच्यावतीने देण्यात आली. डॅा. शंकरराव चव्हाण
प्रेक्षागृह येथे होणाऱ्या या शिबीरासाठी उपस्थित रहावे , असे आवाहनही करण्यात आले
आहे.
0000000