निवडणूक आचारसंहितेसाठी विविध यंत्रणांना
सतर्कतेचे निर्देश ; संनियंत्रण समिती बैठक
संपन्न
नांदेड, दि. 31 :- जिल्हा परिषद आणि पंचायत
समिती निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रीया अंतिम टप्प्यात आहे ,
त्यामुळे या निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होईल , यासाठी यंत्रणांनी
आणखी सतर्क व्हावे , असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिले.
निवडणुकीसाठी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी काकाणी यांच्या
अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा
परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आगामी काळात होणारा वाहनांचा वापर,
आर्थिक व्यवहार यांच्याबाबत, तसेच दारू विक्रीच्या व्यवहारांबाबतही मागोवा
घेण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
बैठकीस जिल्हा
अप्पर पोलीस अधीक्षक संदिप डोईफोडे, उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, सहायक
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, कार्यकारी अभियंता गजेंद्र राजपूत,
जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजय उशीर, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री.
कांबळे आदीं विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थिती होती.
भारत निवडणूक
आयोगाकडून विधानपरिषदेच्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाची तसेच राज्य निवडणूक
आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील
जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.
बैठकीत जिल्हाधिकारी
काकाणी यांनी निवडणूक आचारसंहिता अंमलात आल्यापासून सुरु करण्यात आलेल्या विविध
पथकांच्या अहवाल पद्धतीबाबत सूचना दिल्या. निवडणूक काळातील वाहनांचा,
ध्वनीक्षेपकांचा तसेच सार्वजनिक ठिकाणांच्या वापरांबाबत यंत्रणांनी दक्षता
बाळगावी. वीज वापर तसेच अनुषंगीक परवानग्या आदींबाबत काटेकोर कार्यवाही करावी, असे
निर्देश दिले. व्यावसायीक, उद्योजकाव्यतिरिक्त अन्य काही खात्यांवरून आर्थिक
व्यवहार होत असतील , तर त्याबाबत बँक आयकर-विक्रीकर यांनी संयुक्त पडताळणी करावी.
सोने-चांदी तत्त्सम मौल्यवान वस्तुंच्या खरेदी-विक्रीद्वारे छुपे आर्थिक व्यवहार
होत असतील, तर त्याबाबतही संयुक्तपणे कारवाई करावी लागेल. या सर्वच बाबतीत संबंधित
यंत्रणांनी अहवाल द्यावेत. त्याबाबतची पद्धती विहीत केलेली आहे. त्यानुसार वेळेत
अहवाल देण्याचेही निर्देश बैठकीत देण्यात आले.
राज्य उत्पादन
शुल्क विभाग, पोलीस यांच्यासह सर्वच यंत्रणांनी अवैध प्रकारांवर नियंत्रणासाठी
समन्वय राखावा. निवडणूक काळात मतदारांना आमिष दाखविण्याचे, किंवा त्यांच्यावर
प्रभाव टाकणाऱ्या अवैध प्रकारांची वेळीच दखल घेऊन कारवाई करण्याचे निर्देशही
बैठकीत देण्यात आले. बैठकीत उपजिल्हाधिकारी श्रीमती ढालकरी यांनीही विविध बाबींचा
तपशील सादर केला.
0000000
No comments:
Post a Comment